माझ्या कविता 5 - वाट - वाट वळणाची धीट, डोंगरात उधळली. कडे कपारी चढून, खोल दरी उतरली. तिची नागिणीची चाल, साद घाली आकाशाला. ढग खुळाउन जाती, होती अधीर भेटीला. वाट वळणाची वेडी, पुढे-पुढे जात राही. इथे थांबेल- थांबेल, झाड आशेने ते पाही. वारा येई मागे- मागे, हळू शीळ वाजवीत. वाट चालतच राही, आपुल्याच त्या तो-यात. भेटे पाऊस वाटेला, वाट शहारून जाई. धुंद मातीच्या गंधाने, कुजबुजे हळू काही. पावसाची ती धिटाई, लाज- लाजली ती अशी. गर्द हिरवळीत ओल्या, मिटुनिया गेली जशी. चारूलता काळे —————— - वसंत - ऋतु वसंत आला, तना-मनाला, चैतन्याचा साज, वना-वनातुन पंचम छेडित, कोकिळ विहरे आज. ऋतुराज असा हा, उधळित येतो, केशर कुमकुम रंग, गुलमोहर फुलतो, पळसही वेडा, अपुल्या नादी दंग. ऋतु प्रेमाचा, मोहरून जाई, आम्रवृक्षही खुळा, अखंड गुंजन, चटोर भुंगा, कलिकेचा त्या लळा. ऋतु फुलण्याचा, ऋतु झुलण्याचा, ऋतु प्रीतीचा हा हळवा, ऋतु मदनाचा, मोहरण्याचा, कुणी सजणाला, त्या कळवा...