पार्ले कट्टा- श्री. अच्च्युत गोडबोले

 पार्ले कट्टा-

‘श्री अच्च्युत गोडबोले यांच्याशी मनमोकळ्या गप्पा.’

—————-

१.

सामाजिक आणि सांस्कृतिक जाणिवा अधीक प्रगल्भ करणारा आणि संवादातून नाते जोडणारा असा, संचालिका श्रीमती रत्नप्रभा महाजन संचालित, ‘पार्ले कट्टा’ या कार्यक्रमात सुप्रसिद्ध संगणक तज्ञ आणि साहित्य, विज्ञान, संगीत, अर्थशास्त्र अशा वैविध्यपूर्ण विषयांचे सखोल अभ्यासक,  ‘श्री अच्युत गोडबोले यांच्याशी मनमोकळ्या गप्पा’, संवादिका प्रा. छाया पिंगे, हा कार्यक्रम, शनिवार, दिनांक ६ डिसेंबर २०२५ या दिवशी आयोजित करण्यात आला होता. श्रोत्यांच्या प्रचंड उपस्थितीत साठे उद्यान विलेपार्ले पूर्व येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. 


कार्यक्रमाची सुरुवात चित्रा वाघ यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी हे पार्ले कट्ट्याचे सतरावे  सत्र असून आजचा कार्यक्रम हा, कट्टा क्रमांक शहाण्णाव आहे ही माहिती देत उपस्थितांचे स्वागत केलं. रत्नप्रभा महाजन यांनी अच्च्युत गोडबोले यांचा स्वागत सत्कार केला. 


छाया  पिंगे यांनी मुलाखत सुरू करण्यापूर्वी,  अच्च्युत गोडबोले यांचा परिचय करून द्यायला शब्द अपुरे पडतील असं सांगून ते पारंगत असलेल्या काही क्षेत्रांची नावं घेऊन “अनेक विश्व आत घेऊन वावरणारी माणसं आणि तसेच आजचे ‘बहुआयामी, बहुविध गुणसंपन्न पाहुणे अच्च्युत गोडबोले!’ अशा समर्पक शब्दात त्यांचे वर्णन करून मुलाखतीला सुरुवात केली. 


छाया पिंगे या जाणकार मुलाखतकार आहेत त्यांनी अच्च्युत गोडबोले मनापासून व्यक्त होतील असे अत्यंत महत्त्वाचे, योग्य, मोजके प्रश्न विचारले. 


अच्च्युत गोडबोले यांनी मुलाखतीच्या सुरुवातीलाच अत्यंत नम्रपणाने मी अनेक क्षेत्रांचा, विषयांचा 

तज्ञ नव्हे अभ्यासक आहे असं सांगितलं.  माझ्यात शोधण्याचं सातत्य आहे. ज्ञान मिळवण्यासाठी कुतुहल जागं हवं. आदिमानवाला निसर्ग पाहून हे असं का होतं  हा प्रश पडला आणि तिथुनच पुढे विज्ञान- तंत्रज्ञान- इतर ज्ञानशाखा- कलाशाखा निर्माण झाल्या. ह्या प्रक्रियेचे शिलेदार कोण हे शोधण्याचा ध्यास हवा. विषयावर प्रेम करावं मार्कांसाठी कुठल्याही विषयाचा मी अभ्यास केला नाही. तणाव, कुठलंही विशिष्ट ध्येय ठेवलं नाही. 


छाया पिंगे यांच्या आपलं बालपण कसं होतं?  या प्रश्नावर बोलताना  छोटं घर, कनिष्ठ मध्यम वर्गीय परिस्थितीत वाढलो पण घरात वैचारिक, सांस्कृतिक श्रीमंती होती हे सांगत, त्यांनी लेखक कवी घरी यायचे. जसराज  बहिणीला शिकवायचे ही माहिती दिली. भिमसेन जोशीं बरोबर गप्पांचे वर्णन करताना, गोडबोलेंनी त्यांच्या बरोबर गाडीतून केलेल्या प्रवासाची आठवण सांगितली. भिमसेन अत्यंत अपुरे झोपले होते. सोलापूर ते पुणे प्रवास. त्यांचं रस्त्यात टपरीवर भजी खाणं, सात तासाचा प्रवास चार तासात. लगेच गायला बसणं. भिमसेनना कौतुकाने “तो माणूस म्हणजे राक्षसच!” असं गोडबोले म्हणताच श्रोत्यांना हसू आलं. वडिलां बरोबर गणिताचा सराव करताना घडलेल्या गमती जमती, पुढच्या वर्गाची गणितं सोडवणं या बद्दल सांगून गोडबोलेंनी अत्रे विज्ञान का शिकले नाहीत याचं अत्र्यांनी दिलेलं उत्तर म्हणून एक मजेशीर किस्सा सांगितला. 

————

२.

अत्र्यांचे विज्ञानाचे शिक्षक कुठल्यातरी दुस-याच विषयावर गप्पा मारत विज्ञान शिकवायचे. पेढा या पदार्थावर बोलायला सुरुवात करून, “कुणा कुणाला पेढा हवा?” असा त्या शिक्षकांचा प्रश्न आणि त्यावर “मला हवा” हे मुलांच उत्तर येताच “चला आज आपण हवेची माहिती घेऊ.” असं म्हणत शिक्षकांनी सुरू केलेला विज्ञानाचा पाठ. हा किस्सा गोडबोल्यांनी सांगितला आणि श्रोत्यांनी दाद दिली. 


अच्च्युत गोडबोले बोलतांना हे लक्षात आलं की हा माणूस ताकदीचा वक्ता आहे जो श्रोत्यांना भारावून टाकतो. अत्रे किस्सा संपवून त्यांनी भूगोल हा विषय प्रात्यक्षिक करून शिकवणा-या  बाईंचा भुगोलाचा तास मजेशीर पद्धतीने रंगवला. “बाई झाल्या सूर्य, मला त्यांनी पृथ्वी बनवलं आणि दिलीपला चंद्र. स्वतः भोवती सूर्य होऊन फिरणा-या बाई,  स्वतः भोवती फिरत बाईं भोवती फिरणारा मी म्हणजे पृथ्वी. आणि स्वतः भोवती फिरत, आम्हा दोघांच्या भोवती फिरणारा दिलीप.” असं फिरताना दिलीप आणि गोडबोल्यांचे एकमेकांवर आदळणे. आणि कहर म्हणजे “चंद्र कुणाभोवती फिरतो?” या प्रश्नाचे “ अच्च्युत भोवती” हे मुलांच उत्तर. ही सगळी मजा ऐकून श्रोते खळखळून हसले. गोडबोलेंनी असाच एका गोंधळ्या गणित शिक्षकाचा वेगवेगळे खडू वापरत उडालेला गोंधळ आणि लेट अस स्टार्ट अगेन म्हणून शेवटी कसेही करून मिळणारे योग्य उत्तर हा मजेशीर किस्सा सांगितला. 


छाया पिंगेचा मधेच एखादा प्रश्न आणि अच्च्युत गोडबोले यांच धमाल मार्मिक बोलणं रंगात आलं होतं. गोडबोले बोर्डात सोळावे आले. “सोलापुरकरांनी माझं बोर्डात येणं आणि गावात कुणाला भोसकलं जाणं फक्त एक बातमी म्हणून वाचलं”, असं सांगून ते हसले. “बोर्डात वरचा नम्बर का मिळवू शकलो नाहीत याचं कारण हिंदी विषयातली माझी दयनीय परिस्थिती” असं म्हणून “तुम मेरी तरफ ढुंकी नही। हे माझं हिंदी” असं त्यांनी म्हणताच प्रचंड हशा पिकला. 


युनिव्हर्सीटीत मात्र ते पहिले आले. केमिकल इंजिनिअरिंग करत असताना ते एका अवलिया ग्रूपकडे ओढले गेले. त्या ग्रूपमधे आपण कल्पनाही करू शकणार नाही अश्या बुध्दिमत्तेची मुलं होती. त्यांच्या जिज्ञासेला कुठलाच विषय वर्ज्य नव्हता. जगाच्या किंवा देशाच्या इकॉनोमिक्सशी आपलं काय देणं घेणं असा विचार नव्हता. 

बिग बॅंग आधी काय होतं असे प्रश्न होते. जरी कालगणनेची सुरवातच तिथून झाली हे माहीत असूनही ते प्रश्न निर्थक नव्हते. पहिला जीन निर्माण झाल्यावर २०० कोटी वर्षे सेक्स नव्हता. पेशी विभाजनानेच पुनरुत्पादन होतं होतं या विषयी जिज्ञासा हेती.  ‘रेड क्वीन’ ह्या जेनेटिक्स वरील पुस्तकाचा त्यांनी उल्लेख केला. 


गोडबोले हे पुस्तक/ग्रंथ प्रेमी होते आणि आहेत. त्यांचा पुस्तक संग्रह आणि वाचन आश्चर्य वाटावं असं आहे. त्यांची ७० पुस्तकं प्रकाशित झाली आहेत जी प्रचंड गाजली आहेत. १७ पुस्तकं प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. विविध विषयात सखोल रस, कमिटेड इन्टरेस्ट ह्यामुळेच ते शक्य आहे. त्यांना भौतिकते पेक्षा ज्ञान महत्वाचे आहे हे त्यांच्या बोलण्यातून जाणवते. 

—————-

३.


आपण मराठीतून का लिहितो याचं कारण सांगताना ते म्हणतात इंग्रजीत अनेक विषयांवर अगणित पुस्तकं आहेत. इंग्रजी लेखक सामान्य वाचकांना पुस्तक कळावं यांच्यासाठी धडपडतात. पुस्तक समजलं तरच त्या विषयाची गोडी निर्माण होते. अनेक प्रसिद्ध लेखकांचे आपल्यावर संस्कार आहेत हे गोडबोले अभिमानाने सांगतात. वाचनामुळे कसं लिहायचं याची कल्पना आली.  माझ्या कडील सर्व पुस्तकं मी वाचलेली असतात किंवा नसतातही पण कुठल्या पुस्तकात  काय आहे ते मला माहीत असतं. काही पुस्तकं नीट वाचलेली , अभ्यासलेली असतात. नवीन पुस्तक लिहिताना माझ्या स्वतःच्या लिखाणात या अशा पुस्तकां मधून कशातनं काय किती घ्यायचं हे मला नक्की माहित असतं.


गोडबोले आपल्या लिखाणा विषयी बोलताना पुढे म्हणाले माझी पुस्तकं प्रचंड गाजली. पुस्तक वाचलं आणि काय झालं हे मला वाचक सांगतात. मला वाचकांच उदंड प्रेम मिळालं. छाया पिंगे यांनी अच्च्युत गोडबोले यांच्या सन्मानांचा, पुरस्कारांचा उल्लेख केला त्यातील  डॉ. भांडारकर यांच्या नावाने मराठी ही ज्ञान भाषा व्हवी म्हणून दिला जाणारा पुरस्कार हा मला खास आनंद देणारा आहे असं ते म्हणाले. 


छाया पिंगे यांनी “लिखाणासाठी आपण सहलेखक का घेतलेत?” असा प्रश्न विचारला. त्याचं उत्तर देताना गोडबोले म्हणाले मला मराठीत बरंच ज्ञान आणायचंय. माझ्या शारिरिक व्याधी पहाता हे काम मी एकटा करू शकत नाही. माझ्या पुस्तकांचे विषय,पॅनिंग, हे माझं असतं. सहलेखकाला माझ्या लिखाणाची ओळख आहे हे लक्षात घेऊन मी त्यांची निवड करतो. त्यांनी लिहिलेलं मी तपासतो आणि मग ते प्रसिद्ध होतं. गोडबोले आपल्या सहलेखकांची नावं सांगून त्यांचं मनापासून कौतुक करतात. हे सर्व लेखक भाषा, ज्ञान, लेखनाचे जाणकार, असेच आहेत हे ते आवर्जून सांगतात. मराठी भाषेत इतक्या विविध विषयांवर लेखन करणारे लेखक घडवायचा आनंद ते व्यक्त करतात. गोडबोलेंची पुस्तकं माहितीपूर्ण, सोपी आणि रंजक असतात असं छाया पिंगे यांनी सांगितलं. गोडबोले यांनी त्यांच्या गाजलेल्या पुस्तकांवर भाष्य केलं. बोर्डरूम हे पुस्तक. राखेतून निर्माण केलेलं साम्राज्य म्हणून फेडएक्सचा उल्लेख. 

किमयागार बद्दल बोलून गोडबोलेंनी आइन्स्टाइन आणि चार्ली चॅपलीन यांचे मजेशीर किस्से सांगितले 

आइन्स्टाइन चार्ली चॅपलीनला म्हणाले तू काहीही बोलत नाहीस मग ते लोकांना कसं कळतं त्यावर चॅपलीन म्हणाले तू लिहिलेले तरी लोकांना कुठे कळतं. आइन्स्टाइनला तिकीट चेकरने तिकीट मागितले ते त्यांना सापडेना, तिकीट चेकर त्यांना म्हणाला जाऊदे माझा तुमच्यावर विश्वास आहे. त्यावर आईन्स्टाईन म्हणाले ते मिळायलाच हवं नाही तर मला कुठे जायचंय हे कसं समजणार? त्याची छानछोकीची हौस असणारी आईन्स्टाईनची पत्नी बरीच खरेदी करते. त्या खरेदीची रक्कम न बघता आईन्स्टाईन चेकवर सही करतात. आश्चर्य आणि काळजी वाटून ती विचारते की चेक वटणार ना? त्यावर आईन्स्टाईन उत्तर देतात हा चेक बॅंकेत जाणार नाही माझ्या सहीमुळे तो अभिमानाची कौतुकाची गोष्ट म्हणून सजवला जाईल. गोडबोलेंच्या बोलण्यात श्रोते हरवले होते. 

—————-

४.


अमेरिकेत बोगदे खणण्यचं काम चालू असताना करण्यात येणा-या स्फोटात  एक लोखंडी पार्ट एका व्यक्तीच्या डोक्यात घुसला त्याचं ऑपरेशन झालं पण त्या नन्तर त्याचा स्वभाव बराच बदलला ह्या घटने नन्तर न्यूरोसायन्स डेव्लपमेंटला एक वेगळी दिशा मिळाली. ब्रेन सेल नोबल प्राइज़ मिळालेल्या दोन भावांची डेव्हिड ह्युबेल आणि टॉर्स्टन निल्स विसे यांचा किस्सा  सांगून गोडबोले कम्युनिकेशन इतिहास सांगताना छपाई नसल्याने प्रती काढताना नन्स काहीही घुसवायच्या ही गंम्मत सांगून ते पोनी एक्सप्रेस  ह्या कंपनी बद्दल बोलले. टेलेक्स निघालं आणि पोनी एक्सप्रेस बंद झाली. पोस्टाचे तिकीट का आणि कसं सुरू झालं त्या विषयीची मजेशीर माहिती देताना गोडबोले म्हणाले. ज्याला पत्र किंवा पाकिटं मिळे तो पैसे द्यायचा. पोस्टमनची पायपीट म्हणून त्याला पैसे मिळत पण कधीकधी घेणा-याला बुरदंड व्हावा म्हणून लोक रोज काहीतरी पाठवायचे. याच्यावरचा उपाय म्हणून घेणाऱ्याला ते नाकारायचा अधिकार मिळाला. पण फुकटे तो मजकूर वाचून ते नाकारू लागले. ह्याच्यावरील इलाज म्हणून ज्यानी पाठवायचं त्यानी पैसे द्यायचे हा रिवाज सुरू झाला आणि पुढे पोस्टल तिकिट सुरू झालं. चांगल्या पुस्तकात ज्ञान, इतिहास, माणसांचे गुण दोष रंजकता असं काही हवं. 

——————

५.


स्वतःच्या आयुष्या बद्दल बोलताना गोडबोले लिखालसपणे बोलले. आयआयटी केमिकल इंजिनियर होऊन बाहेर पडलो.श्रमिक संगठन स्थापन केली. चांगली नोकरी नाकारली. आदिवासिंची बळकवलेली जमीन परत मिळावी म्हणून लढ़े दिले. समाजासाठी आपण काही करतो याचा आनंद होता. त्यांच्यावर अतिक्रमणाचा खटला भरला गेला, दहा दिवसांची जेल झाली, विदारक, आयुष्य शिकवणारा अनुभव. असं सांगत वातावरण थोडं हलकं व्हावं म्हणून ते म्हणाले “तिथल्या कैद्यांचे इन्टरव्ह्यू घेताना खिसा पाच प्रकाराने कसा कापता येतो हे समजलं पण मला ते काम करायचं नव्हतं. जेलचा अनुभव प्रत्येकाने  घ्यावा” त्यांच्या बोलण्यातूल  मजेशीर वाक्यांवर श्रोत्यांनी हस्याची दाद दिली. 


समाज सेवा करताना मला माझ्या लिमिटेशन लक्षात आल्या. जॉब मिळेना, कुठेही कसाही फिरलो. रे रोड येथे रात्र पााळी कामगारांवर लक्ष ठेवायचं काम मिळालं. त्यांचे हाल पाहून मी त्यांना सवलती द्यायचो.  नोकरी गेली. दुर्गा भागवतां बरोबर क्वचित लायब्ररीत गप्पा. चित्र प्रदर्शनांना भेटी. अशातच आयबीएम मधील जॉब विषयी कळले. तिथल्या भपकेबदार ऑफ़िस ला गेलो. हार्डवेयर,सॉफ़्टवेयर बद्दल खरं ज्ञान नसतांना जे ऐकलं होतं ती पोपटपंची केली. ते इंप्रेस झाले. दुस-या वेळी कम्प्यूटर बद्दल काहीत न विचारता त्यांनी ब्राझील इकॉनमी विषयी विचारलं. मी २८ मिनिटं माहितीपूर्ण बोललो. त्याना वाटलं कटकट नको साला घेऊन टाका. 


मराठीतून शिक्षण. इंग्रजीवरून कोणी अपमान केला तो जिव्हारी लागला आणि इंग्लिश शिकलो. अकाउंट वरून कोणी काही बोललं आणि त्यात पारंगत झालो. 

मटीरियल रिक्वायरमेंट पलॉनिंग माहित नव्हतं त्याचा अभ्यास केला. अॅपलिकेशन सॉफ़्टवेयर मधे काम केलं. 


छाया  पिगेनी पुरस्कारांच्या यादीचा उल्लेख करताच 

“कुमार गंधर्व पुरस्कार! जो मला भिमसेन जोशींनी दिला.तो माझ्या मनाच्या जवळचा पुरस्कार” असं

गोडबोले नी म्हणताच श्रोत्यांनी कौतुकाची दाद दिली. 

——————

६.


पटणी मधील जॉब- कम्प्यूटर निगडीत अनेक विषय जे इन्टरलिंक असतात ज्यांची मला माहिती नव्हती पण माझ्या हाताखालची संपूर्ण टीम ही त्या विषयातली जाणकार, अनुभवी, निष्णात मुलं. मी तिथे अपुरा पडतोय याची जाणीव होत राहिली. मी कम्प्यूटर सायन्स न केल्याने माझा कॉन्फ़िडेंस जात चालला पण तो विषय येत नाही म्हणून सोडणं पटणारं नव्हतं 


व्यसन हे नेहमीच वाईट असतं हे खास करून आजच्या तरुणांना सांगून, अच्च्युत जींनी त्यांच्या व्यसनांविषयी निखालस माहिती दिली. सहज, गम्मत म्हणून सुरू केलं वाढत गेलं. विकेपाला गेलं. तेंव्हाच मुलाला ऑटिझम झाल्याचा मेडिकल रिपोर्ट आला. त्या आजाराची माहिती नसल्याने गांभीर्य लक्षात आलं नाही. आनन्द नाडकर्णीना माझ्या मुलाला तो झालाय हे न सांगता सहज म्हणून त्या बद्दल विचारलं त्याची माहिती ऐकून मात्र खचलो. आपल्या नन्तर मुलाचं काय हा प्रश्न भेडसावत राहिला. नोकरीतील काम जमत नसल्याची बोचरी जाणीव, व्यसन, मुलाची काळजी, यातून आत्महत्येचे विचारही मनात आले.


आपल्याला मुलाच्या भवितव्व्यासाठी किमान तीन कोटी हवेत याचा अंदाज आला पण बँन्केत ठणठणाट. बेफाम जगण्याने जवळ काही नाही. पण ह्या अशा परिस्थितीत एकदा मनात विचार आला की ‘बिचा-या निहारचे वडील ही कीव करणारी ओळख नको.’ त्या विचारातच सगळी व्यसनं त्याच क्षणी सोडली. 


पटणीच्या मुलांनी कामात मदत केली , पुन्हा वाचन सुरू केलं . कम्प्यूटर कसा चालतो हे कळलं आणि त्या दिवशी एकटा नाचलो.सिस्टम सॉफ़्टवेयर संबंधात पहिलं पुस्तक लिहिलं. पुढे कम्प्यूटर संबंधित बरीच पुस्तकं लिहिली. 

————————

७.


मार्केटिंगचं माझं ज्ञान पाहून ते नवीन क्षेत्र लाभलं. कामाने जगभर फिरलो. निहारला गरज होती त्याच्या पेक्षा किती तरी जास्त पैसे आले. मग फक्त लिखाणाकडे वळलो. त्यांच्या विविध विषयांवरील पुस्तकांचा त्यांनी धावता आढावा घेतला. 


छाया पिंगे यांनी पत्नी शोभा हिच्या विषयी काही सांगालका असं विचारल्यावर ते शोभा यांच्याबद्दल आदराने बोलले. छबीलदास येथील नाटकातून ओळख. लग्न ठरलं तेंव्हा गोडबोले तेंव्हा माहीमला कोळीवाड्यात राहात होते. मुलाची जबाबदारी तिने  उत्तम सांभाळली. आयुष्यात ताण तणाव प्रचंड आले. 

गोडबोले एक वाक्य बोलले की निहार नसता तर मी व्यसनीच राहिलो असतो. ते ऐकून मनात विचार आला यालाच नियती म्हणतात का? तो ४३ वर्षांचा आहे. छाया पिंगे यांनी निहार गातो, चित्र काढतो. तो यू ट्यूबर आहे ही विशेष माहिती आवर्जून दिली. 


गोडबोले हे सकारात्मक आहेत. जाता जाता त्यांनी ज्यांची स्पेशल किडस् (विशेष मुलं) ही दहा वर्षांपेक्षा लहान असतील त्यांना प्रचंड आशा आहे. ती आशा पंधरा पर्यंतच्या मुलांनाही आहे कारण डेमिस हसाबिस सारख्या माणसांमुळे प्रचंड संशोधन होत आहे, त्याचे नक्कीच चांगले रिझल्ट येतील असं सांगितलं. पालकांनी आनन्दी, हसतमुख, क्रिएटीव्ह रहावं. गिल्ट न ठेवता स्वतःचे आयुष्य जगावं. मुलाकडे दुर्लक्ष करणं हे चूक पण कर्तव्य पूर्ती नन्तर तुमचं जगणं हक्काने जगा असा मौलिक सल्ला विचार त्यांनी दिला. 


आधुनिक समाजाच्या समस्या असं म्हणत जेंव्हा छाया पिंगेंनी त्यांचं मत विचारलं तेंव्हा सामाजिक- कुटुंब व्यवस्था तुटलेली दिसतेय. सोशल मीडिया पोखरून टाकतेय हे कबूल तरच अच्च्युत जी म्हणाले की आता नवरा बायको एकत्र रहातात यालाच एकत्र कुटुंब म्हणतात. पुढे गमतीशीर बोलत ते म्हणाले की मोठा पेहलवान लहानाला हरवतो. म्हणजे तो विजेता असतो पण तसं घोषित न करता रेफ्री पडलेल्याचा हात उचलतो कारण त्याला जास्त एस. एम. एस. आलेले असतात. 


सोशल मीडिया हा धोका आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, रिल्स, व्हिडिओ ही व्यसनंच आहेत. 

संवाद हरवल्याने नैराश्य येतंय. संबंध कुरतडून गेलेत. उपदेश कामाचा नाही, निर्धार, कृती महत्वाची कारण तुम्हाला त्याची सवय लागावी अशी टेक्नॉलॉजी आहे. कॉरपोरेट कंपन्या नफा कमावतात. तुमचा डाटा ते वापरून हे करतात. 

—————-

८.


कार्यक्रमाच्या अखेरीस छाया पिंगे यांनी रॅपिड फायर म्हणजेच जलदगतीने विचारले जाणारे तसे सोपे पण मजेदार, रोचक प्रश्न विचारले आणि अच्च्युत गोडबोले यांनी त्याची उत्तरं दिली ती प्रश्नोत्तरेः 


प्रश्नःएक पुस्तक ज्यानी तुमचं आयुष्य बदललं 

उत्तर- ओल्ड मॅन ॲन्ड द सी 


प्रश्नःतुमचं प्रेरणास्थान

उत्तर-स्व. श्रीराम पुजारी आणि स्व. प्रफुल्ल बिडवाई, ज्यांनी जगण्यासाठीची मूल्य लक्षात आणून दिली. 


प्रश्नःसर्वात कठीण निर्णय.

उत्तर-अमेरिकेत निहारच्या उपचाराच्या संदर्भात औषधाच्या बाबतीतला निर्णय 


प्रश्नःक्षण जो पुन्हा जगायला आवडेल- 

उत्तर- आय आय टीतलं जगणं. 


प्रश्नः निवांत क्षण मिळतात तेंव्हा विरंगुळा म्हणून काय करता. 

उत्तर-गाणं आणि खाणं

———————

खाण्या बद्दल बोलताना अच्युत जींनी दावत कार्यक्रम, कालनिर्णयातील लेख या विषयी बोलून. 

कारली बनवेल त्याला फाशी, शेपूला जन्मठेप, भेंडीसाठी फटके. अशा शिक्षा ऐकवून त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना न देता खाल्ल्यास पोलीस तक्रार असं म्हणून मजेशीर प्रतिक्रिया दिली. 


अच्च्युत गोडबोले यांनी किशोरी अमोणकर ह्या शास्त्रीय संगीत गायिका आणि लता मंगेशकर ह्या गायिका, शतक श्रेष्ठ कलाकार म्हणत त्यांचा उल्लेख केला


कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात छाया पिंगे यांच्या “गाणं म्हणाना…” या विनंतीला मान देत. मी सगळं ऐकतो. कुठलंही गौण नाही. असं सांगून “गाण्या पूर्वीची गवयाची नाटकं” असं  म्हणत पाणी प्यायलं कारण त्यांचा घसा खराब होता. 


सुर जा रही , मधुबन में राधिका, सुर की गती मै क्या जानू, जन पळभर म्हणतील, एक बस तू ही नही अशा अनेक गाण्यांची झलक दाखवत ते संगीतातील रागांची नावं सांगत होते. 


छाया पिंगे यांनी धन्यवाद असं म्हणणं पुरेसं नाही असं म्हणत आभार व्यक्त केले. 


सुबोध जोशी यांच्या हस्ते अच्च्युत गोडबोले यांना छोटीशी भेटवस्तू देऊन कार्यक्रम सपन्न झाला. 

——————-

मी या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमातून मला जे समजलं, लक्षात आलं ते लिहिण्याचा हा प्रयत्न. अनावधानाने काही उल्लेख राहिला असेल किंवा काही चुकले असेल तर क्षमस्व 🙏


चारुलता काळे 

९८२१८०६८२७

———-


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रवास नॉर्वे आणि आइसलैंड