रसग्रहण लघुपटांचे

रसग्रहण लघुपटांचे

लोकमान्य सेवा संघ, पारले, या संस्थेच्या, सी. म. जोशी दिलासा केन्द्र  आयोजित, ‘रसग्रहण लघुपटांचे’ हा कार्यक्रम गुरुवार ४ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे संवादक होते साहित्त्यिक, चित्रपट, लघुपट प्रेमी, अवधूत परळकर आणि साहित्यिक तसेच फ्रेंच भाषेचे अध्यापक, अनुवादक आशुतोष उकिडवे. 


या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून श्री मुंगळे यांची उपस्थिती लाभली होती. मुंगळे हे दूरदर्शन, एफ टी आय. आय. पुणे, अशा संस्थाशी संलग्न तसेच कला क्षेत्रातील मान्यवर आहेत. 


कार्यक्रमाची सुरुवात संस्थेची माहिती, उपक्रम, आगामी काळात होणारे कार्यक्रम यांनी झाली. विशेष अतिथी मुंगळे यांचा परिचय तसेच कार्यक्रमाचे संवादक अवधूत परळकर आणि आशुतोष उकिडवे यांचाही परिचय देऊन त्यांचे स्वागत सत्कार करण्यात आले. 


कार्यक्रमात एकूण नऊ लघुपट दाखवण्यात आले. दोन्ही संवादकांनी आपापल्या दृष्टिकोनातून त्या लघुपटांच्या रसग्रहणासाठी मार्गदर्शन केले. 


आशुतोष यांनी लघुपटांचा उद्देश, ते कसे पहावेत याचे निकष तसेच त्या लघूपटाचा विषय, आशय या बद्दलची प्रस्तावना केली. 

——-

१ Underwater: (अंडर वॉटर). 

हा लघुपट जैवीक विविधता. अंतस्थ समुद्री जीवन. याचं उत्कृष्ट संकलन असलेला. या लघुपटाचे सौंदर्य, कलात्मकता या विषयी आशुतोष बोलले.  

१५ वर्षांपूर्वीचा लघुपट तेंव्हा खूप प्रगत  कॅमेरे नसूनही प्रचंड मेहनत घेऊन केलेलं चित्रीकरण कमालीचं सुंदर वाटलं. 

परळकरांनी समुद्री जिवांची सततची हालचाल पण तरिही एकमेकांना त्रास न देणं. उगाचच आक्रमक न होणं या गोष्टी अधोरेखित केल्या. 

मानवाची आक्रमकता, तो करत असलेला विध्वंस आणि पर्यावरण संरक्षण, संवर्धन यांची जाणीव देणारा हा लघुपट पाहून मन प्रसन्न झालं. 

———————-

२ Pink color (गुलाबी रंग). 

या लघुपटातचे नायक मांजर आणि उंदीर यांच्यातील हा रंगांचा सामना. मांजराची सर्व भवताल गुलाबी करण्याची धडपड. उंदराला तो निळा करण्याची जिद्द. कार्टून फिल्मची धमाल. 

आशुतोषनी हे भांडण क्रमाक्रमाने आधी गंम्मत, मग आक्रमकता, मग हिंसा अशाप्रकारे, कसं पुढे जातं आणि शेवटी विरोधकाचाच रंग कसा  बदलला जातो हे सांगून ‘आत्ताचे राजकारण असेच आहे ना?’ असा प्रश्न विचारला आणि या लघुपटाचे गांभीर्य दाखवून दिलं. 

———————

३ Bubble (बुडबुडा/फुगा)

एक वैज्ञानिक पाण्याच्या फुग्या सदृश काही बनवतो. तो त्याला वेगवेगळ्या प्रकारे आजमावत असतांनाच एक दुसरी व्यक्ती येते. हा वैज्ञानिक जे काय करतो आहे त्या विषयी त्याला कुठलीही उत्सुकता नाही. तो वैज्ञानिकाची चेष्टा/ हेटाळणी करतोय असं त्याचं वागणं. ती गोष्ट फारशी महत्वाची नसून आपणही ती आजमावू शकतो हा फाजील विश्वास. तो वैज्ञानिक वैतागून तो फुगा त्याला सोपवून निघून जातो. त्याचवेळी तो फुगा फुटतो. 

आशुतोष यांनी वैज्ञानिकाचं वय, त्याचा अनुभव, मेहनत, दृष्टीकोन हे समजावून सांगितलं तसंच त्या दुसऱ्या माणसाच्या वयावरून तो वृद्ध आहे पण सुजाण नाही हे दाखवून समाजात बरेचदा असंच होतं ही कथा, व्यथा उलगडून दाखवली. 


अवधूत यांनी हा लघुपट बनवला असेल तेंव्हा त्या फुग्याची पारदर्शकता, हालचाल या साठी बनवलेल्या स्केचेस, मेहनत याची जाणीव करून दिली. 

—————-

४ La_difference_est_humaine (प्रत्येक माणूस निराळा) 


फ्रेंच लघुपट. नायक मूक बधीर. त्याच्या आजूबाजूला जे घडतंय त्याच्या आवाजाचं त्याला आकलन होत नाही. तो बोलून व्यक्त होऊ शकत नाही. पण तो पाहू शकतो हे अधोरेखित करून आशुतोष यांनी त्या मुलांशी असंवेदनशील असणाऱ्या लोकांकडून तो कसा नकळत दुखावला जातो हे दाखवून दिले. 


आशुतोष ह्यांच्या “समाजात सहसंवेदना असणारीही मुलं आहेत. ती त्याला समजून घेतात. अपंगत्व हे फक्त वेगळेपण ते स्वीकारणे ही माणुसकी. ह्या लघुपटाला ॲवॉर्ड मिळालं नसतं तरच नवल” ह्या शब्दांनी वास्तवतेने चित्रित केलेला हा लघुपट अधीक अर्थपूर्ण झाला. 

————-

५ Balcony girl ( बाल्कनीतली मुलगी) 


‘मेरे सामनेवाली खिडकी में।’ असा हा लघुपट. आरंभ शूर माणूस तसा आळशी पण मुलगी पाहून तिच्या दर्शनाने तो घायाळ. कल्पनेच्या भरा-या. हा लघुपट भारतीय मुलांनी बनवलंय. ती अंध आहे हे लक्षात येऊन स्वप्नांचा चुराडा. 

आशुतोष यांनी “या लघुपटात खरा अंध कोण?” हा मार्मिक प्रश्न विचारून लघुपटाला एक वेगळी उंची दिली. 

अवधूत यांनी या चित्रपटात असलेली अतिशयोक्ती ही तो लघुपट व्यंगचित्र असल्याने आहे हे स्पष्ट केलं.

——————

६ Tiger and a man ( वाघ आणि माणूस) 

हा लघुपट थोडासा बढेजावी करणारा वाटला. आशुतोष यांनी प्राण्यांबरोबर असे आंगचटीला जाणे आणि ते दाखवणे ही कदाचित चुकीची गोष्ट असे म्हटले. 

अवधूत जींनी “वन्यजीव खरंच आपले शत्रू असतात का?” हा विचार दिला. 

——————

७ The other pair ( द अदर पेअर)

इराणी फिल्म. मन हेलावून टाकणारा, अनपेक्षित सुखद अंत असलेला लघुपट. दयनीय परिस्थितीत असलेला गरीब मुलगा आपली तुटकी स्लीपर घालण्यासारखी होऊ शकत नाही म्हणून हताश. तेवढ्यात त्याची नजर चकचकीत नव्या बुट घातलेल्या मुलाच्या पायावर पडते. त्या बुटांच अप्रुप. 


तेवढ्यात गाडी येते गर्दीत त्या मुलाचा एक बूट पडतो. गाडी सुटते तो बूट राहिला म्हणून त्या मुलाचा जीव खालीवर होतो. 

हा गरीब मुलगा जणू पत्कर घेऊन घायकुतीला येऊन  तो बूट त्या मुलाला द्यायला झटतो. शेवटी तो त्याला मिळावा म्हणून त्याच्याकडे तो फेकतो. इथेच या लघुपटाचा खांदेपालट होतो कारण तो बूट गाडीवर आदळतो आणि फलाटावर पडतो. 


एका क्षणाचा विचार करून तो श्रीमंत मुलगा आपला बूट या गरीब मुलाला मिळावा या उद्देशाने फेकतो.  निर्व्याज, निष्पाप मुलं आणि माणुसकीचा मोठा संदेश देणारा विचार! 


लघुपटाची संवेदनशीलता आशुतोष यांनी दाखवून दिली तर हा लघुपट आपल्या डोळ्यांसमोर घडतोय असा परिणाम साधण्यासाठीचे बारकावे अवधूत यांनी समजावले. 

————-

८ This is life ( यही है जिंदगी)


एका  रेषेत होणारा जन्म ते मृत्यू असा प्रवास. समग्र आयुष्याचं मर्म खुळखुळा, फ़ुटबॉल, मोबाइल, ऑफीसची बॅग, काठी. आणि शेवटी RIP हे शब्द असा बाल्य (जन्म)  ते वृध्दत्व (मृत्यू) दाखवून उलगडणारा. 


या लघुपटात काय आहे हे सांगताना आशुतोष म्हणाले. ‘उपजे ते विनाशे’ तसेच त्यांनी हा लघुपट पाहून ‘इज धिस अ लाईफ!‘ असंही मनात येतं असं म्हटलं. 


अवधूत जी म्हणाले “या एक मिनिटाच्या फिल्मवर कितीही बोलता येईल.”

———————


९ The Girl at the Airport ( एअरपोर्ट वरील मुलगी) 


हा लघुपट सुरू होण्यापूर्वी यातील मुलगीच खूप बडबडते आहे म्हणून तिच्यावरच कॅमेरा आहे असं अवधूत जींनी सांगितलं असल्याने निःशंक होऊन लघुपट पाहिला गेला. 


११ सप्टेंबर अमेरिकेत बॉम्ब ब्लास्ट मधे मारला गेल्याने ‘तो’ १२ सप्टेंबरला मुंबईत येत नाही. मुलगी हे सत्य स्वीकारत नाही. वर्षानुवर्षे त्याची वाट पहातेय हे भीषण सत्य जेंव्हा समजतं तेंव्हा डोळे पाणावतात 

‘टेरर नॉट किल्स अ पर्सन इट किल्स फॅमिली.’ 


आशुतोष यांना या लघुपटातली पालकांची भूमिका ही थोडी असंवेदनशील किंवा अयोग्य वाटते. अवधूत म्हणतात हा शेवट लघुपट केला त्याला जसा वाटला तसा आहे. 

——————-

दिलासा सदस्य प्रधान यांनी “आपण बरेचदा पहातो पण लक्षात घेत नाही हे कबूल करायला हवं.” असं म्हणत कार्यक्रमात मिळालेल्या रसग्रहणाच्या धड्यांसाठी संवादकांचे कौतुक करत आभार व्यक्त केले. 

——————

प्रश्नाोत्तरे, थोडी चर्चा आणि अतिथी मुंगळे यांच्या कार्यक्रमा विषयीच्या अभिप्रायाने हा कार्यक्रम संपन्न झाला. 

—————-

दूरदर्शनचे कॅमरामन व त्यांची टीम आली होती ज्यांनी अवधूत व आशुतोष यांचे इंटरव्यू कम बाईटस घेतले शिवाय कार्यक्रमाचं चित्रीकरण केलं जे लवकरच प्रसारित होईल

———-


दीर्घकाळ लक्षात रहाणारा, कुठल्याही विषयाकडे सभानतेने पहायला शिकवणारा. लघुपट या विषयाचे ज्ञान देणारा असा हा कार्यक्रम रंगतदार झाला हे नक्की…


कार्यक्रमाला मी उपस्थित होते. मला यातून जे समजलं, लक्षात राहिलं ते लिहिण्याचा हा प्रयत्न. अनावधानाने काही उल्लेख राहून गेले असतील किंवा चुका झाल्या असतील तर क्षमस्व! 


चारुलता काळे 

—————-

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रवास नॉर्वे आणि आइसलैंड