प्रवास नॉर्वे आणि आइसलैंड
प्रवास
(नॉर्वे-आइसलैंड)
नॉर्वे आणि आइसलैंड अशी नोव्हेंबर २७ ते डिसेंबर १२ साधारण १५ दिवसाची टूर करायचं ठरलं आणि आम्ही विमानाची तिकिटं काढून १सप्टेंबरला शॅंगेन व्हिसासाठी अॅपलाय केलं. या आधी आमची स्केन्डेनेव्हिया रशिया ही टूर झाली होती पण ती तिथल्या उन्हाळ्यात, तिथलाउन्हाळा फारच सुन्दर असतो कारण फार थंडी नसते, दिवस भरपूर मोठ्ठा असतो. अगदी काही तास अंधार होतो न होतो तोच हलकेच उजाडतं. निळं आकाश, निळं पाणी, हिरवीगार झाडं, रंगबिरंगी फुलं, अक्षरश: स्वर्ग! ती टूर धावती होती कारण डेनमार्क, नॉर्वे, स्वीडन, फिनलेन्ड आणिरशिया असा केसरी ट्रावल्स बरोबरचा प्रवास होता.
या वेळी सेव्हन लक्स या ट्राव्हल कंपनीने मॅनेज केलेली कस्टमाइज्ड टूर होती. त्या कंपनीचे ओनर्स मनाली आणि अमित आमच्या संपर्कातरहाणार होते. मी माझा नवरा दिगंबर ऊर्फ किशोर आणि आमच्या बरोबर आमच्या मुलीपेक्षा वयाने थोडेसेच मोठे असे स्मीता आणि विकासनानेकर हे तरूण उत्साही जोडपं होतं. आफ्रिकेची टूर आम्ही अेकत्र केली तेंव्हा आमची मैत्री झाली होती. ती दोघं मला मम्मा आणि किशोरलाडेडू म्हणतात.
व्हिजा वेळेत येणार याची खात्री होती पण जायला आठवडा उरला तरी त्याचा पत्ता नाव्हता. कोवीड नन्तरची परिस्थिती म्हणा किंवा रशियायुक्रेन वॉर मधील भारताची तटस्थ भूमिका हे कारण म्हणा, सध्या व्हिजा हे असेच खूप उशिरा होत आहेत हे माहीत होतं. तरिही २७ ची फ़्लाइटआणि २५ तारखेला व्हिजाची अन्डर प्रोसेस ही स्थिती पाहून वैतागून, २५ दुपारी तिकिटं रद्द केली आणि अेक तासानी पासपोर्ट पाठवले आहेतअसा मेसेज आला. मग काय विचारता, पुन्हा 31 ऑक्टेबर ते 16 नोव्हेंबर अशी तिकिटं बुक करून आम्ही मोठ्या उत्साहात बॅग्ज भरून तय्यार….
३१ ऑक्टोबर फिनएअर कंपनीच्या विमानाने सकाळी 8:10 वाजता निघालो, नॉर्वे टाईम 14:15 ला हेलसिंकीला पोहोचलो. 16:05 ला निघून16:40 वाजता ओस्लो ला पोहोचलो. नॉर्वे आणि आइसलैंड अशा दोन देशांचा प्रवास होता. दोन्ही देश शेंगेन देश समुहात येतात पण आमचीअेन्ट्री हेलसिंकीत झाल्याने आणि फिनलेन्डही शेंगेन कंन्ट्री असल्याने फ़िनलैंड इमिग्रेशननेच आमच्या प्रवासाची चौकशी करून आमच्यापासपोर्टवर अेन्ट्रीचा शिक्का मारला.
नॉर्वे ची राजधानी ओस्लोत पोहोचलो. एअरपोर्ट वरूनच गाडी घेऊन हॉटेलवर पोहोचणार होतो पण बराच अंधार झाला होता आणि नवा देशतसेच अमेरिके प्रमाणे उजव्या बाजूचे ड्रायव्हिंग ज्याची आपल्याला सवय नसते म्हणून गाडी न घेता टॅक्सी केली आणि हॉटेल रेडिसन ब्ल्यू लापोहोचलो.
ओस्लोतून लवकर निघायचं होतं कारण इथून कारने फ्लामला जायचं होतं म्हणून फक्त विगलैंड पार्कला गेलो.
फ़ॉल्स/ विंटरची सुरुवात असल्याने झाडं लाल, केशरी,
पिवळ्या, निळसर हलक्या जांभळ्या रंगात नटली होती. पानगळ सुरू असल्याने जमिनीवर रंगीत पानांचा सडा पडला होता.
विगलैंड पार्क ओस्लो:
80 अेकर जमीनीवर गुस्तव विजलैंड नावाच्या आर्टिस्ट ने बनवलेला पार्क, तिकीट नाही. एका आर्टिस्ट ने बनवलेली जगातली सर्वात मोठी न्यूडस्कल्पचर पार्क, हे स्कल्पचर ब्रॉन्ज आणि ग्रेनाइट चे आहेत. पार्क मधे खास, अेक14 मीटर उंचीचे स्कल्पचर आहे ज्यात 121 माणसांची रचनाआहे. हा पार्क 1950 मधे तयार झाला.
पार्क पाहून झाला आणि भाड्याची कार घ्यायला गेलो. व्होल्वोची सेव्हन सिटर अप-टू-डेट कार पाहून मस्त वाटलं. किशोर काही काळअमेरिकेत राहिलेला असल्याने तो उत्साहात होता, त्याने गाडी चालवली, हॉटेलला आलो सामान गाडीत टाकलं निघालो. उजव्या बाजूने कधीचड्रायव्हिंग न केलेल्या पण भारतात ड्रायव्हिंगचा चांगला अनुभव असलेल्या विकासने चालकाची जबाबदारी घेतली. तो अत्यंत सफाईने गाडीचालवतोय हे लक्षात येताच आम्ही निवांत झालो.
नॉर्वे हा बोगद्यांचा देश आहे असं म्हटलं तरी चालेल. असंख्य बोगदे पार करत आमचा प्रवास सुरू होता. ओस्लोहुन फ्लामला जाताना 24.5 किलोमीटरचा जगातल सर्वात लांब रोड टनल, लिअरडल टनल पाहून थक्क झालो. नॉर्वेमधे गाड्या अत्यंत शिस्तित चालवतात.
मधेच कुठे थोडं थांबून आम्ही फ्लामला पोहोचलो. बाहेर अंधार होता. रिसेप्शन काउंटरला हॉटेलमधे धूम्रपान करू नये अशी गोड शब्दात पणकडक सूचना देण्यात आली. हॉटेलच्या रूम्स सुन्दर प्रशस्त होत्या. आमचा इथला मुक्काम दोन रात्रींचा होता. हॉटेलच्या सभोवती छोटे मोठेडोंगर, टेकड्या, त्यांच्यावर जमा होणारा बर्फ, अधून मधून कोसळणारे पांढरे शुभ्र झरे, हॉटेलच्या समोर छोटसं रेल्वे स्टेशन आणि शॉपिंग सेन्टर, त्याच्या बाजूला फियोर्ड, त्यात विसावलेल्या छोट्या बोटी, होड्या.
दुसरा दिवस, फ़्लाम मधे खूप धमाल केली. समोरच्या स्टेशनवर जाऊन दिलवाले दुल्हनिया सिनेमा प्रमाणे शाहरुख़-काजोल स्टाइलचे फोटोकाढले. अंगावर भरभक्कम पिवळे कोट चढवून फियोर्ड टूर केली. ह्या कपड्यातले आम्ही, म्हणजे जसे काही अंतराळवीर! आधी नकोसे वाटणारेते जाडजूड सूट किती आवश्यक होते हे मग लक्षात आलं कारण त्या स्पीड बोटाच वेग, बोचरा गारठवून टाकणारा वारा, पावसाळी हवामान यातते नसते तर मरण होतं हे जाणवलं. आम्ही उन्हाळ्यात फियोर्ड टूर केली होती तेंव्हा ते पाणी निळंशार होतं कारण वरचं आकाश स्वच्छ निळं होतं. आत्ता मात्र पावसाळी हवामान असल्याने काळ्या ढगांच्या प्रतिबिंबाने ते काळं दिसत होतं, म्हणून मला थोडं वाईट वाटलं.
त्याच दिवशी फ्लाम मधे अप्रतीम असा अेक सिनिक व्ह्यू पॉइन्ट आहे तिथे गेलो. आम्ही फ्रेतेइम हॉटेल या हेरिटेज हॉटेलला उतरलो होतो. हेहॉटेल 1875 ला सुरू झालं. त्या हॉटेलची माहिती देणारी छोटीशी टूर छान वाटली. ही टूर करताना गमतिशीर माहिती समजली की फ्लाम मधेहॉस्पिटल, पोलीस, फायर ब्रिगेड यातलं काहीच नाही त्याची फारशी गरजच पडत नाही. हे ऐकून मनात विचार आला “किती निरागस जगणंहे…..!”
तिस-या दिवशी सामान रिसेप्शन लॉकरला ठेऊन फ्लाम ते मिरडॉल आणि तिथून परत असा सिनिक रेल्वे प्रवास केला. या प्रवासात अेकधबधबा पहाण्यासाठी गाडी थांबते. प्रवासी उतरतात फोटो काढतात आणि परत गाडीत येतात.
रेल्वेचा हा छोटासा प्रवास आटपून परत हॉटेलला आलो. सामान गाडीत टाकलं आणि गाडीने बर्गेनला निघालो.
फ्लाम ते बर्गेन साधारण 167 कि. मी. चा हा संपूर्ण प्रवास निसर्गाच्या अनुपम दर्शनाने फारच छान वाटतो. नागमोडी रस्ते, पाणी, डोंगर, छोटीछोटी लाल, राखाडी, पिवळी घरं, डोंगर माथ्यावरील बर्फावर चमकणारा हलका सूर्य प्रकाश. या प्रवासात किशोरने मधे काही वेळ गाडीचालवली.
आम्ही बर्गेनला दुपारी 3 वाजता पोहोचलो. इथे गाडी परत करून आम्हाला बर्गेन-बोडो अशी रात्री 8:15 ची फ़्लाइट पकडायची होती. पुढचीकनेक्टिंग फ़्लाइट बोडोवरून
10:30 ची होता जी स्लोव्हर ला रात्री 10:55 ला पोहचत होती. या आधी बर्गेनचा सर्वात लोकप्रीय टूरिस्ट पॉइन्ट माउन्ट फ्लोयन करायचाहोता. इथे माउन्टनवर जायला फनिक्यूलर ट्रेन आहे. वरून बर्गेन शहर अत्यंत विलोभनीय दिसतं. झिरमिर पाउस, थंड वारा तरिही तिथून निघावंअसं वाटत नव्हतं. पण निघावंच लागलं कारण फ्लाइट पकडायची होती.
चार वाजले अंधार वाढला, गाडीत फ्युअेल भरणं महत्वाचं होतं नाहीतर वापरलेल्या फ्युअेलचे जास्त पैसे द्यावे लागले असते. आता ड्रायव्हिंगसीटवर विकास होता. अॅाटो नेव्हिगेशन चालू होत. किशोर गाडीच्या कंपनीशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. स्मीता आणि मी मागे बसून सूचनादेत होतो. स्मिताला ड्रायव्हिंग येत पण ती फार जास्त गाडी चालवत नाही, मला ड्रायव्हिंग या विषयातलं पाच पैशाच कळत नाही पण तरिहीमाझ्या सूचना सर्वात जास्त. विकास थोडा वैतागला. विमानतळ दिसला आणि हायसं वाटलं. डिपार्चर ऐवजी गाडी अरायव्हलकडे गेली आणि मीते लक्षात आणून दिलं. पाठोपाठ गाडी कशी वळव हे स्मीता सांगायला लागली गाडीत पुन्हा गडबड! पण आम्ही वेळेत पोहोचलो होतो.
नॉर्वेत आम्ही जेवढ्या इन्टरनल फ़्लाइटस् घेतल्या ती विमानं आकाराने लहान होती. अेक दोन वेळा आमच्या केबिन बैग्ज विमानात चढण्या आधीक्रू मेम्बर घेऊन जात आणि चेकइन बॅगेज विमानात ठेवलेलं असे तिथे ठेऊन देत.
आमच्या बर्गेन बोडो प्रवासात अेक आगळी वेगळी सुखद घटना घडली. विमान उडून थोड़ा वेळ झाला आणि एअर होस्टेसने माझ्या जवळ येतविचारलं , “ हॅव यू अेव्हर सीन नॉर्दन लाइटस्?” मी म्हणाले, “नो, वुइ हॅव स्पेशली कम हिअर फॉर दॅट!”. ती हसून म्हणाली “कम विथ मी.” “टुमॅारो ईज माय हजबंडस् बर्थ डे. कॅन ही?”, माझा प्रश्न. तिने हसून होकार दिला. चक्क कॉकपिट मधून आम्हा चौघांना, निसर्गाचा तो अद्भुतचमत्कार पहाता आला. ते दृष्य पाहताना भावनीक होऊन माझे डोळे पाणावले. कृतज्ञतेने मी त्या अगदी तरुण पायलटला म्हटलं, “स्टे ब्लेस्डडियर!”. माझी ती अवस्था पाहून, तो मला म्हणाला “लेटअस गेट वन सेल्फी.” खरंच कोण कुठली माणसं आपलं जगणं समृद्ध करून जातात ना!
आम्ही साधारण रात्री 11 वाजता स्लोव्हर एअरपोर्ट बाहेर आलो. हा एअरपोर्ट छोटा आहे. दोन फुटावर आमची प्रीबुक्ड टैक्सी उभी होती. स्लोव्हरविमानतळावरून दहा मिनिटात आम्ही लोफोटेन या ठिकाणच्या, नॉर्डिस सूट, स्लोव्हर या हॉटेलला पोहचलो. रात्री साडेअकराला तिथे कामकरणारी मुलगी आमची वाट पहात उभी होती. हे हॉटेल हार्बरवर ( बंदरावर) आहे. दोन बेडरूम्सचा हार्बर फेसिंग अतिशय लक्झुरिअस स्वीट. रात्र होती तरी ब-यापैकी दिवे होते. छोट्या बोटी होत्याच पण अेक मोठी दहा मजली क्रूजही उभी होती. संपूर्ण बंदर अतिशय सुन्दर दिसत होतंजशी काही स्वप्न नगरी!
आजची रात्र आणि उद्याचा दिवस खास होता कारण उद्या किशोरला सत्तर वर्ष पूर्ण होत होती. आमची टूर मॅनेज
करणा-या सेवन लक्स या कंपनीने, अप्रतीम अशा केक आणि शॅम्पेनची व्यवस्था केली होती. मध्यरात्री, चार तारीख सुरू होतानां, आम्हीकिशोरचा सत्तरावा वाढदिवस साजरा करीत होतो. स्मीताने पटकन दोन मेणबत्त्या पेटवून काचेच्या डीश मधे ठेवल्या, औक्षणासाठी आंगठीठेवली आणि म्हणाली, “ममा डेडूला ओवाळुया!’” माझं मन भरून आलं. मी आणि तिने किशोरला ओवाळलं. शॅम्पेन उघडली, केक कापला. खरं तर खूप खायचं नव्हतं पण केक इतका सुन्दर होता की पहाता पहाता अर्धा केक गट्टं झाला.
लोफोटेनला आम्ही 4,5,6 अशा तीन रात्री रहाणार होतो.
दुस-या दिवशी ब्रेकफास्ट करून बाहेर पडलो, भटकलो, बंदरावर नाचत मजेशीर व्हिडिओ बनवले. बसने जवळच्या दुस-या अेका गावात फिरूनआलो. लोफोटेनला खरंतर आमच्या स्वीटच्या मोठ्ठ्या बाल्कनीतून संपूर्ण बंदर दिवस रात्र पहात बसणं हे स्वर्ग सूख होतं. लोफोटेन अेक सुंदरस्वप्नवत आठण बनून कायमचं मनात राहील.
सहा तारखेला आमची स्लोव्हर ते बोडो आणि बोडो ते ट्रोमसो अशी फ़्लाइट होती. स्लोव्हर बोडो 25 मिनिटांची फ्लाइट. साधारण अडीच तासबोडोला थांबून, बोडो ते ट्रोमसो 1 तास 15 मिनिटांची फ़्लाइट करून आम्ही संध्याकाळी सव्वा सहाला ट्रोमसो पोहोचलो. ट्रोमसो लॉज अेन्डकैंपिंग इथे रहाणार होतो. टैक्सीने तिथे पोहोचलो.
इथे छोटी छोटी सुन्दर टुमदार बैठी घरं होती. आजुबाजूला पाण्याचं बर्फ बनलं होतं. स्मीताला त्याच्यावर पाय देऊन ते तोडताना “कुर्र sss”, असा आवाज करायला मजा यायची.
या संपूर्ण टूर मधे आमचा इंग्लिश ब्रेकफास्ट जिथे रहायचो तिथल्या हॉटेलला असायचा. आमच्या बरोबर रेडि टू कुक सूप्स, पोहे, उपमा असेपदार्थ. ड्राइफ्रूटस्स्, लाडू, खजूर तसेच स्मीताने बरोबर घेतलेली खिचडीची सामग्री असे बरेच खाद्य पदार्थ होते. आम्ही कधी त्यातलंच काहीबनवायचो तर कधी बाहेर खायचो. रात्री मुक्कामाला पोहचून सोमरसाचे अनेक प्रकार अेन्जॅाय करायचो.
ट्रोमसोला आम्ही भरपूर भटकलो. आमच्या हॉटेल पासून जवळच रोप वे ने उंच डोंगरावर गेलो. वरती मस्त बर्फ होता. वरून खालचं पाण्यानेवेढलेलं शहर विलोभनीय दिसत होतं.
पाऊस सुरू झाला आम्ही तिथल्या रेस्टोरेन्ट मधे आलो माझ्या मागे मला हिन्दी मिश्रीत इंग्लिश ऐकू आलं मी मागे वळून “इन्डिया?” असंविचारताच त्यांनी “हांजी” म्हणताच ते लोकं आणि आम्ही सर्व खुश होऊन, अेकदमच “वंदेमातरम!”, असं म्हणालो. त्या ग्रूपमधील अेक व्यक्तिआणि त्यांची पत्नी यांचा रुबाब, व्यक्तिमत्व आणि कपडे पाहून लक्षात आलं की ते भारतीय सैन्यातील होते. त्यांच नांव डॉ प्रदीप भारद्वाज, मेडिकल डायरेक्टर आणि सीइओ. मोठ्या आदराने त्यांनी दिलेलं त्यांच व्हिजिटिंग कार्ड घेतलं आणि त्यांना ‘जय हिन्द’ म्हणून आम्ही निघालो.
पोलर म्युझिअम पाहून ट्रोमसो सिटी सेन्टर फिरताना नॉर्वेचं स्ट्रिट फूडही एन्जॉय केलं. स्ट्रिट फूडचं छोटसं दुकान चालवणारी बाई मजेशीर होती. किशोरने विकासकडे पाहून विचारलं “ही वॉन्टस् टू मेरी नॉर्वे गर्ल, कॅन यू हेल्प?” माझ्याकडे आणि स्मीताकडे पाहून डोळे मिचकावत हसून तीम्हणाली “आय अेम रेडी, इफ़ ही इज रेडी टू डिग द स्नो” आम्ही सर्वच खळखळून हसलो. तिला बाय करून तिथून निघालो.
दुसरा दिवस खास होता कारण आम्ही नॉर्दन लाइटस् टूर बुक केली होती. आजही आकाश बरंच ढगाळलेलं होतं. मोकळं आकाश असेल तरच तेदिसतात. पण आशा होतीच. आमच्या बस मधे विविध देशांचे लोक होते. नॉर्दनलाइटस् बद्दल शिकणारे काही ट्रेनीजही होते. पूर्ण अंधार होता. आमचा गाइड आकाशाकडे पहात अंदाज घेत होता आणि ड्रायव्हर बस पळवत होता. अधून मधून आम्ही थांबत होतो. आशा निराशेचा हा खेळमजेशीर होता, बाहेर वारा होता, हलका बर्फ पडत होता. गाडीच्या पुढच्या काचेवर वेगाने येणारा बर्फ पहायला मजा येत होती. आता ढग कमीझाले आणि अेका वळणावर गाडी थांबताच आम्ही गाडीतून ख़ाली उतरलो. “येस, हिअर इटइज!” आम्हाला नॉर्दन लाइटस् दिसले! आम्हीमोबाइल, कॅमेरे सरसावले कारण नुसत्या डोळ्यांनी त्याचे ते
निळे हिरवे रंग दिसत नाहीत. आम्ही मंत्रमुग्ध होऊन पहात होतो. आमच्या मोबाईल मधे निसर्गाचा तो अलौकिक सोहळा बंदिस्त करत होतो. टूरगाइडने त्याच्या कॅमेर्यात आमचे फोटो घेतले कारण नॉर्दन लाइटस् त्यात अधीक सुन्दर दिसत होते.
निसर्गाचा हा चमत्कार आम्ही दोनदा अनुभवला अेकदा विमानाच्या कॅाकपिट मधून थेट डोळ्या समोर आणि आता हा असा जमिनी वरून. विलक्षण, अद्भूत, अवर्णनीय जादू!
दोन तास गाडी पळवल्याचं सार्थक झालं होतं. गाईडने नॉर्दन लाइटस् कसे बनतात त्याची माहिती दिली. तिथून निघालो आणि आमची गाडीपुन्हा थांबली. गाईडच्या सूचने प्रमाणे गाडीतून सांभाळून उतरलो कारण रस्त्यावर बर्फाचा पातळसा थर होता, ज्याच्यावरून बूट सरकत होते. नुकतीच पौर्णिमा होऊन गेली होती निरभ्र आकाशात चंन्द्र उठून दिसत होता. समोरच्या डोंगरावरील बर्फ त्या चंन्द्र किरणात चमकत होतं“लाजवाब, क्या बात है!” आम्ही हरवून गेलो. भरपूर फोटो काढले. परत फिरताना वाटेत थांबून गरम सूप, नुडल्स, चहा-कॉफी यासाठी थांबलोजे टूर कॉस्टमधे समाविष्ट होतं.
नॉर्दन लाइटस् दिसल्याच्या आनन्दात त्या खाण्याचा स्वाद अधिकच वाढला होता.
तिसरा दिवसही मस्त मजेत गेला कारण त्या दिवशी रेनडिअर टूर होती. आम्हाला रेनडिअर स्लेजची मजा अनुभवता आली नाही कारण त्यासाठीआवश्यक तेवढा बर्फ अजून जमला नव्हता. रेनडिअर असलेल्या जागी पोहोचलो. आम्हाला अेका बर्यापैकी मोठ्या तंबूत बाकांवर बसायलासांगितलं मधे शेकोटी होती. शेकोटीला लागून स्टॅन्डस् होते ज्यांच्यावर ठेवलेल्या किटल्यांमधे पाणी गरम होत होतं. ते पाणी वापरून आम्हालाचहा-कॉफी दिली गेली. आपल्या हिन्दी सिनेमातील बंझारा लोकं जसे घेरदार लांब घागरे घालतात तसे कपडे घातलेल्या अत्यंत देखण्याबायका वावरत होत्या. यातील अेकीने रेनडिअरला खाणं कसं द्यायचं याच्या सूचना दिल्या त्या ऐकून आम्ही बाहेर आलो.
आजू बाजूला आणि दूरवर बरेच रेनडिअर होते. आमच्या हातात खाणं असलेल्या छोट्या बादल्या पाहून ते मिळवण्यासाठी ते आमच्या जवळ येतहोते. माद्या आणि लहान रेनडिअर लाजाळू असल्याने फार जवळ येत नव्हते पण भली मोठ्ठी शिंग असलेले नर चक्क ढुशा मारायला लागताचआमची तारांबळ उडत होती. तिथेच अेका बाजूला रेपडिअरची शिंग बसवली होती. लांब उभं राहून हातातली दोरी फेकायची आणि त्या शिंगातअडकवाची असा खेळ चालला होता. मजा वाटत होती. भरपूर फोटो काढले. एका दुसर्या तंबूत सूप, ब्रेड, चहा-कॉफी दिलं गेलं. रेनडिअरचमांस असलेलं सूपही होतं, घ्यावं की न घ्यावं अशा संभ्रमात होतो पण “पाहू तर खरं!” असं म्हणून ते घेतलं आणि ते आवडलं.
तिथून बाहेर पडून पुन्हा आधी बसलो होतो त्या तंबूत आलो.
रेनडिअर पाळणार्या समाजाची माहीती सांगून अेका बाईने त्यांची पारंपरिक गाणी म्हणून दाखवली. भूतकाळात या समाजाला चेटूक करणारेम्हणून कशी वाईट वागणूक दिली गेली हे सांगताना तिचे डोळे भरून आले. आपला समाज
ख-या अर्थाने पर्यावरणाचं महत्व समजणाऱा आहे ह्याचा तिला सार्थ अभिमान होता.
10 तारखेला आम्ही ट्रुम्सो सोडलं. आता नॉर्वे सोडून आइसलैंडला जायचं होतं. नॉर्वेची ड्रायव्हिंग बद्दलची शिस्त, मनमोहक निसर्ग, इथल्यालोकांची पटकन मदत करण्याची वृत्ति, व्यवहारातील पारदर्शकता, या सर्व गोष्टी उल्लेखनीय आणि कौतूक करण्या सारख्या होत्या. नॉर्वेतलासमर भावला होता, या वेळी फॅाल्सचे निसर्गरंग आणि नॅारदन लाइटस् पहायला विन्टरच्या सुरवातीला आलो आणि पुन्हा नॉर्वेच्या प्रेमात पडलोहोतो. “काय सांगावं! आम्ही पुन्हाही इथे येऊ शकतो” असा विचार मनात आला …..
ट्रुम्सो एअर पोर्टला निघालो, अेका बोगद्यातून जाताना त्या बोगद्यात दोन रस्ते अेकमेकांना क्रॉस करत होते म्हणजे चक्क अंडर ग्राउंड नाका होता. ते पाहून आम्ही थक्क झालो. पुन्हा अेकदा नॅर्वेचं बोगदे बनवण्याचं नैपुण्य लक्षात आलं. सकाळी 8:45 ची ट्रुम्सो ओस्लो फ़्लाइट, ओस्लोला10:45 ला पोहोचत होती. ओस्लोची पुढची फ्लाइट दुपारी 1 ची होती, जी रेकझाविक या आइसलॅंडच्या राजधानीत, साधारण तीन वाजतापोहचत होती. नॉर्वेत आम्ही भारता पेक्षा साडे तीन तास मागे होतो आता आणखी दोन तास मागे पडणार होतो.
जरी देश बदलत होतो तरी नॉर्वेतच आमचे इमिग्रेशन चेक झालेले असल्याने पासपोर्ट न दाखवता जणुकाही आम्ही डोमेस्टिक फ़्लाइट घेतोयअशा पध्दतीने हा प्रवास केला. आणि रेकझाविकला पोहोचलो. हा एअरपोर्ट शहरा पासून थोडा दूर आहे. टैक्सीत बसताच जाणवलं की नॉर्वेचंड्रायव्हिंग जास्त़ शिस्तित होतं. रेकझाविकला दोन रात्री आम्ही फॉस हॉटेलला रहाणार होतो. हॉटेलमधे पोहोचून रूम घेऊन सामान ठेवी पर्यन्तबाहेर चांगलाच अंधार झाला होता. हॉटेल पासून जवळच सुन्दर बीच होता. खिडकीतून तो आपल्या मुंबईच्या मरीन ड्राइव सारखा दिसत होता. गरमा गरम चहा पिऊन आम्ही बीचवर पोहोचलो. मला वाटलं होतं की आइसलॅन्डला, नॉर्वे पेक्षा जास्त थंडी असेल पण तसं नव्हतं, वारा मात्रजास्त होता.
फ्लाम पासूनच आम्ही थर्मल कपड़े वापरत होतो. शिवाय कपड्यांचे लेअर्सही होतेच. दुसर्या दिवशी भाड्याची गाडी घेतली जी पुढील चार दिवसआम्ही वापरणार होतो.
आइसलैंड मधील पहिला दिवस. गोल्डन सर्कल नावाचा अत्यंत लोकप्रिय असा साधारण 230 किमी चा रूट करणार होतो. रेकझाविक पासूनसुरुवात करून जिओथर्मल अेरियातील गीझर्स पहायचे होते. पृथ्वीच्या पोटात असलेली प्रचंड ऊर्जा घेऊन जमिनीतून वर येणारे झरे म्हणजेगीझर्स. तिथे पोहचलो. थंड हवा, वारा आणि थोडासा पाऊस. गिझरच्या दिशेने चालू लागलो. छत्र्या सांभाळताना तारांबळ होत होती. फोटोकाढणं सोईचं म्हणून मी हातमोजे घातले नव्हते, हात थंडगार होऊन बोटं बधीर झाली, वार्याने डोळ्यातून नाकातून पाणी येत होतं. तिथे छोटे मोठेबरेच गीझर्स होते. अेका मोठ्ठ्या गीझर पासून सुरक्षित अंतर ठेऊन बरेच लोक उभे होते. आम्हीही तिथे पोहोचलो इतक्यात त्या गीझर मधूनउकळत्या पाण्याचं भलं मोठ्ठ कारंज आणि त्याच्या वाफा “सर्र ssss” असा आवाज करीत हवेत उसळल्या, पाठोपाठ लोकांचा आनन्दातजल्लोश! पटापट व्हिडिओ, फोटो घेण्याची धावपळ ! ते कारंज लगेचच खाली आलं, अगदी काही मिनिटात ते पुन्हा उसळलं. थोडा वेळ तीमजा पाहून, आम्ही तिथून परत फिरलो. जवळच्या रेस्टोरेन्ट मधे थोडी पोटपुजा करून गाडी सुरू झाली.
गीझर्स पासून अगदी थोड्या अंतरावर अप्रतीम असा गलफॉस वॉटरफॉल पाह्यचा होता. पार्किंग पासून ख़ाली उतरत पुन्हा वर चढत जाऊन याधबधब्याच संपूर्ण दर्शन घेतलं. शुभ्र, प्रचंड वेगात खळाळत धावणारं पाणी, पाहून वाटलं, “लाजवाब!” आइसलॅन्ड हा लाव्हा आणि बर्फाचा देशआहे. हा धबधबा थंडी वाढली की गोठतो, तो पहायलाही लोक येतात. आमचा पाय निघत नव्हता पण परतीच्या मार्गावरील पिंगव्हेलिअरनेशनल पार्क अजून बाक़ी होता. उशीर केला तर अंधार आम्हाला गाठणार हे माहीत होतं. नेशनल पार्क ला आलो. हा पार्क म्हणजे उंच कड्यासारखे दगड कापत खाली उतरत दूरवर जाणारा रस्ता. पार्कचा परिसर खूप मोठा आहे. हा पार्क मात्र विशेष भावला नाही. अंधार पडू लागला, साधारण चार वाजता हॉटेलला पोहोचलो.
तिसरा दिवस, आम्ही ब्रेकफास्ट करून व्हिकला जाणार होतो. हे अंतर साधारण 186 कि.मी. आहे. तिथे दोन रात्री राहून 14 ला परतरिकझेव्हिकला परतणार होतो.
व्हिकला जाताना वाटेत उंचीने कमी पण थोडे केसाळ, धष्टपुष्ट घोडे तसच गोबर्या लठ्ठ मेंढ्या पाहून मजा वाटायची. भुरभुरणार्या पावसात कुठेइन्द्रधनुष्य दिसायचं तर अधून मधून गीझर्स आणि त्यातून निघणार्या वाफा. व्हिकच्या वाटेवर सेलजालैन्डसफॉस वॉटरफॉल आणि स्कोगाफॉसवॉटरफॉल पाहिले. हे दोन्ही वॉटरफॉल्स उंचावरून खाली पडतात. प्रत्येक धबधबा हा आपापल्या परीने सुन्दर दिसतो. स्कोगाफॉस वॉटरफॉलमधे इन्द्र धनुष्य दिसत होतं, याच्या मागच्या खडकात बसलेले पांढरे पक्षी ठिपक्यां सारखे दिसत होते. त्यातला मधुनच अेखादा इकडून तिकडेउडून जणूकाही आम्हाला म्हणत होता, “ जरा इथे वर येऊन पहा की हा धबधबा!”
व्हिकला पोहोचलो. हॉटेल ‘क्रिआ’ मधे चेकइन केलं आणि पटकन गाडी काढली. आता विकास जसा काही इथलाच रहिवासी असल्याच्याथाटात ड्राइव्ह करत होता. अंधार पडत होता आणि आम्ही रेनिस्फजारा या जगप्रसिध्द काळी वाळू असलेल्या बीच वर उभे होतो. त्याच्या त्याधडकी
भरवणार्या लाटा, अंधार, थंडी! मी आणि किशोर माघारी आलो. स्मीता आणि विकास थोडे रेंगाळले. या बीचवर लाटांपासून दूर उभे रहा, काळजी घ्या ही सेव्हन लक्सच्या अमीतची सूचना होती.
व्हिक मधील दुसरा दिवस, नेव्हिचं क्रॅश झालेलं विमान पहायला जाण्यासाठी आमचं बुकिंग होतं पण त्या दिवशी भंयंकर वारा,पाऊस होता, रेडअॅलर्ट असल्याने कुठलीच टूर होणार नव्हती. आइस केव्ह पहाणंही शक्य नव्हतं. आम्ही ब्रेकफास्ट करून बाहेर पडलो. दुसर्या बीचवर गेलो. गाडीने अेक छोटी टेकडी चढून वर गेलो. वरून खालचा समुद्र दिसत होता. प्रचंड वारा होता. गाडीचा दरवाज़ा उघडणंही मुश्किल होतं. त्याहीपरिस्थितीत विकास बाहेर पडला, स्मीताही कशीबशी बाहेर पडली. अेकमेकांना सांभाळत ते फिरून आले. मी आणि किशोर मात्र गाडीतच बसूनहोतो. ते दोघं परत आल्यावर, आम्ही बाहेर न जाणंच योग्य होतं असं म्हणाले . “वरून खालचा समुद्र फारच छान दिसतो, उद्या परत येऊ” असंम्हणून आम्ही तिथून निघालो. गाडीतूनच फिरलो. अंधार पडायच्या आत हॉटेलमधे आलो. ती संध्याकाळ किशोरने मस्त अेंजॉय केली कारणत्याला स्नूकर खेळता आलं.
14 तारखेल व्हिक सोडायचं होतं पण आता रेकझाविकचा रस्ता आणि तिथे पोहोचायला लागणारा वेळ याचा अंदाज होता. ते क्रॅश झालेलंविमान पहाण्याची टूर मनालीने पुन्हा बुक केली होती. तिथे पोहोचायचं असल्याने सामान हॉटेल लॉकररूममधे ठेऊन गाडीत बसून निघालो. तिथेबर्फातून चालावं लागतं असं ऐकलं होतं.
जिथे आमचा पिकअप होता त्या साइटला पोहोचलो आणि लक्षात आलं की आम्ही चौघेच असल्याने बस नव्हे तर अेटिव्ही बाइकने त्या क्रॅशझालेल्या विमाना पर्यन्त पोहचायच आहे. ही चारचाकी अेटिव्हि बाइक म्हणजे ट्रेक्टरचं पिल्लू, हे वाहन सहसा घसरत अथवा कोलमडत नाही. अपघाता पासून संरक्षण देणारे सूटस् आणि हेलमेट घालून आम्ही ‘लय भारी’ दिसत होतो. गाईडची बाइक पुढे त्याच्या मागे आमच्या दोनडबलसीटर बाइक. लाव्हायुक्त काळी चढउतार जमीन, छोटे नदी नाले, पार करत होतो. मधेच बीचही लागला आणि आम्ही चक्क त्याविमानाच्या जवळ पोहोचलो. बिलकुल चालावं लागलं नाही.
1973 ला अमेरिकन नेव्हिचं हे विमान इथे फोर्स लॅंन्डिग करताना कोसळलं. सुदैवाने सर्व प्रवासी वाचले. आता त्या विमानाचा सांगाडा पहायलालोकं येतात. “दिलवाले”, या हिन्दी सिनेमात शाहरुख़ काजोल यांच्यावर चित्रित केलेले “रंग दे तू मुझको गेरुआ” हे गाणं इथे तसंच आम्हीवाटेत पाहिलेल्या धबधब्यांवर आणि इथल्या समुद्रावर चित्रित झालं आहे. नशिबाने आम्ही तिथे पोहोचलो तेंव्हा दुसरं कुणी नव्हतं. मस्त फोटोकाढले तेवढ्यात दुसरा ग्रूप आला.
हॉटेलला जाऊन सामान घेऊन रेकझाविकला जाताना पुन्हा समुद्रावर जाण्याचा मोह झाला कारण कालच्या वादळी
वार्यात मी आणि किशोर तिथे पोहचूनही, समुद्राचं ते वरून दिसणारं विलोभनीय दृश्य पाहिलं नव्हतं. विकास आणि स्मीतालाही तिथे फोटोघ्यायचे होते.
संध्याकाळी रेकझाविकला पोहोचलो मला आणि स्मीताला सामानासकट ‘सेन्टर’ हॉटेलला ड्रॉप करून किशोर आणि विकास गाडी परतकरायला गेले. ते येई पर्यन्त आम्ही आपापल्या रूम्स मधे सामान ठेवलं. उद्याचा दिवस या टूरचा शेवटचा दिवस. उद्या आमचं ब्ल्यू लगुन्सचंबुकिंग होतं.
रेकझेविक पासून गाडीने तासाभरात आपण ब्लू लगून या ठिकाणी पोहोचतो. हा गरम पाण्याचा स्पा नैसर्गिक नाही. जिओथर्मलपॉन्ट मधीलमिनरल्स युक्त निळ्या गरम पाण्याचा वाफाळलेला हा स्पा म्हणजे स्वर्ग सूख आहे.
इथे गरम पाण्याचे शॉवर्स, चेंजिंग रूम्स, लॉकर्स, रेस्टॉरेंटस् असं सर्व काही आहे. इथे वेगवेगळे पॅकेजिस् बुक करतात. आम्ही दहा वाजता तिथेपोहोचलो. आत शिरतानाच अेका हातात अेन्ट्री बॅन्ड तर दुस-या हातात आम्ही जो स्पा मसाज घेतला होता त्याचा बॅन्ड बांधला गेला. अेन्ट्री बॅन्डस्कॅन करून प्रवेश देणे, लॉकर, तसेच तुम्ही केलेली इतर खरेदी शक्य होते. शुभ्र पांढरे टॉवेल्स, बाथरोब पुरवले जातात. स्वीमिंग कॉस्ट्यूमसक्तीचा आहे.
थंड हवा, वारा या वातावरणातून त्या सी ग्रीन, निळसर रंगाच्या गरम पाण्याचा स्पर्श उबदार प्रेमळ मिठीसारखा वाटतो. पाण्याची खोली फारनसल्याने लोक कधी थोडं पोहत तर कधी चालत असतात. पाण्यातून निघणार्या वाफांमुळे वातावरण धूसर अस्पष्ट असतं. तुमच्या पॅकेजप्रमाणे कॉम्प्लीमेंटरी अथवा पैसे चार्ज करून तुमच्या हातातील बॅन्ड स्कॅन करून बिअर, ज्यूस दिला जातो. लोक लाव्हा, अॅन्टिअेजिंग आणिमॉयस्चरायझिंग करणारे निरनिराळे फेस पॅक लाऊन घेतात, मसाज आणि स्पॅा ट्रिटमेंट घेतात.
आमच्या पॅकज मधे मसाज होता. मसाज आणि स्पा यासाठी पाण्यातच अेक वेगळी जागा होती आम्ही आमच्या बुकिंगच्या वेळे प्रमाणेपाण्यातून चालत तिथे पोहोचलो. योगा मॅट सारख्या तरंगत्या मॅटवर झोपवून अंगावर अेक जाड मऊ पांघरूण ठेऊन, डोळ्यावर पट्टी ठेऊन, पाठ, हात, पायाचे तळवे असा सुगंधी क्रीम लाऊन हल्का मसाज केला जातो. मसाज झाल्यावर त्या मॅटवर तसंच तरंगत पडून रहाण्यातलं स्वर्गसूख, आनन्द शब्दांच्या पलिकडचा!
ब्ल्यू लगून मधे चार पाच तास कसे जातात ते समजत नाही. आमची परतीची बस चार वाजता होती त्याचं भान ठेऊन आम्ही त्या स्वर्गीयआनन्दाला मनात साठवत तिथून निघालो.
आमच्या टूरचा हा शेवटचा दिवस इतक्या सुन्दर आरामदायक अनुभवचा, बनवण्यासाठी मी मनोमन सेवन लक्स टूरच्या मनाली आणि अमितचेआभार मानले.
अेकतीस तारखेला टूर सुरू झाली सोळाला निधून सतराला सकाळी आम्ही मुंबईत पोहोचलो. आमचे सोशल मिडियावरचे फोटो पोस्ट यांना उदंडप्रतिसाद मिळाला होता, मिळत आहे.
अनेकांनी या टूर बद्दल कुतुहल व्यक्त केलं. आम्ही आजवर भरपूर फिरलो पण ही टूर अनेक अर्थाने वेगळी होती म्हणुन हा अनुभव लिहून ठेवावाअसं वाटलं.
प्रवास वर्णन म्हणून हे लिखाण कितपत वाचनीय झालंय ते वाचकालाच माहित पण हे वाचून मला या टूरच्या सुखद आठवणी सुखाऊन जातीलहे नक्की.
चारुलता काळे
🙏
टिप्पण्या