माझ्या कविता 5


    - वाट -    

     

वाट वळणाची धीट,

डोंगरात उधळली.

कडे कपारी चढून,

खोल दरी उतरली.


तिची नागिणीची चाल,

साद घाली आकाशाला.

ढग खुळाउन जाती,

होती अधीर भेटीला.


वाट वळणाची वेडी,

पुढे-पुढे जात राही.

इथे थांबेल- थांबेल,

झाड आशेने ते पाही.


वारा येई मागे- मागे,

हळू शीळ वाजवीत.

वाट चालतच राही,

आपुल्याच त्या तो-यात.


भेटे पाऊस वाटेला,

वाट शहारून जाई.

धुंद मातीच्या गंधाने,

कुजबुजे हळू काही.


पावसाची ती धिटाई,

लाज- लाजली ती अशी.

गर्द हिरवळीत ओल्या,

मिटुनिया गेली जशी.


चारूलता काळे 


——————


                  - वसंत -


ऋतु वसंत आला, तना-मनाला, 

चैतन्याचा साज,

वना-वनातुन पंचम छेडित,

कोकिळ विहरे आज.


ऋतुराज असा हा, उधळित येतो,

केशर कुमकुम रंग,

गुलमोहर फुलतो, पळसही वेडा,

अपुल्या नादी दंग.


ऋतु प्रेमाचा, मोहरून जाई,

आम्रवृक्षही खुळा,

अखंड गुंजन, चटोर भुंगा,

कलिकेचा त्या लळा.


ऋतु फुलण्याचा, ऋतु झुलण्याचा, 

ऋतु प्रीतीचा हा हळवा,

ऋतु मदनाचा, मोहरण्याचा,

कुणी सजणाला, त्या कळवा.


चारूलता काळे 

———————————

             निळी निळाई आकाशाची


निळी निळाई आकाशाची,

आकाशाला भरून उरली,

हिरवाईची लाट मखमली,

द-या डोंगरी धावत सुटली.


वा-या वरती स्वार होउनी,

शुभ्र ढगांचा, कापुस आला,

मावळतीची नाजुक किरणे,

साज रुप्याचा देती त्याला.


कृष्ण वर्णिहा ढग एखादा,

अवचित झरझर बरसुन जाई,

इन्द्रधनूची वेल कमानी,

सत रंगाने न्हाउन घेई.


कौलारू ती घरे पहुडली,

गर्द झाडिच्या अधुनी मधुनी,

किण-किण घंटा नाद करित हा,

गाई जाती डोंगर चढुनी.


नितळ बिलोरी तलाव सुंदर,

जणू सांडले टुपुर चांदणे,

जरा बोचरे परी हवेसे,

मऊ रेशमी अवखळ वारे.


डौलदार ते पृच्छ पसरुनी,

मोर जसा चाले तो-याने,

शीड उभारुन तशीच नौका,

विहरत जाई मंद गतीने.


निसर्ग जादू कशी असे ती,

पहावयाला स्वर्ग उतरला

सत्य असे की स्वप्न म्हणावे,

भान विसरला तिथेच रमला.


चारुलता काळे 


———————————-


           हरवून सूर गेले


त्या मैफिलीत माझ्या, हरवून सूर गेले

ते सप्त सूर माझे, विखरून दूर गेले.


शाब्दीक शब्द झाले, अर्थास अर्थ नुरला.

ती उंच तान घेता, मज श्वास नाही पुरला.

वाद्ये जरी सभोती, बेताल गीत झाले.

त्या मैफिलीत माझ्या हरवून सूर गेले.


अंगाई गीत माझे, दंगा भरून उरला.

गाता अभंग मी तो, रस भंग आज झाला.

त्या लावणीत माझ्या, लावण्य लुप्त झाले.

त्या मैफिलीत माझ्या हरवून सूर गेले.


केला किती रियाज़, सुर ताल तो जुळे ना.

दाटून कंठ येता, मज शब्द बोलवेना.

हे गीत जीवनाचे, ओठी विरून गेले.

त्या मैफिलीत माझ्या हरवून सूर गेले.



चारुलता काळे 


———————————————————


                 आई


किती तुझी धावपळ,

किती तुझी घाई,

रिकामपण आई,

तुला माहितच नाही.


अग, जरा श्वास घे,

बस थोडी इथे,

‘घेते घेते’ म्हणुन तुझा,

चहा राहिला तिथे.


घर-दार, नोकरी,

चोख तुझ काम,

हसत मुख, आनन्दी,

कामच तुझा राम.


आई, अता थांब जरा,

कर थोडी मजा,

सोड सगळी दगदग,

घे हक्काची रजा.


होतीस जेंव्हा आमच्यात,

 अस म्हटल नाही कधी,

आई सुद्धा दमली असेल,

गोष्ट कळली नाही साधी.


आता तरी देवाघरी,

काम तिला नसेल,

का देवाचीही आई बनुन,

ती राबतच असेल.


चारुलता काळे 


————————————————

आई


आज अचानक, पुन्हा अेकदा,

आई तुझी आठवण आली.

डोळे पाण्याने भरले,

श्वास कंठातच दाटला, 

पुन्हा अेकदा माझा पदर,

माझ्या अश्रूंना, अपुरा वाटला…..


चारुलता काळे 



————————————————                  

                    घर


घर मातीच्या भिंतींचे, घर कौलारू छताचे,

वर डौलदार माडी, घर दगडी जोताचे.


स्वैंपाकघर, माझघर, देवघर देवाजीला,

ओटी पै-पाहुण्यांची, झुला झुले पडवीला.


घरा मागे एक गोठा, झाडे माडे परसात,

गोड पाण्याची विहिर, चाले रहाट मजेत.


माझ्या घराच्या या भिंती, अशा रुंदावत जाती,

आजुबाजुच्या घराना, देती किती नाती गोती.


काळ कसा किती गेला, बालपण ही सरले,

माझे धकलेले घर, माती मोलाचे उरले.


झाली जमीन सोन्याची, भाव गगनाला गेला,

मन कावरे बावरे, सौदा घराचा मी केला.


घर पाडले मोडले, मागे राहिले ना काही,

बंद पापणीला माझ्या, आसवांचा भार होइ.


चारुलता काळे 


———————————————————

            क्षण


क्षण क्षणीक असतो, क्षणात येतो,

क्षणात संपुन जाई.

काळ संपतो, क्षणा क्षणाने,

कधीच समजत नाही.


जगणे असते, क्षणा क्षणांचे,

क्षण क्षण एक थरार.

क्षणात सरशी, हवी हवीशी,

क्षण पुढचा अंधार.


हा क्षण माझा, म्हणता म्हणता,

क्षण मज मिठीत घेई.

क्षणात बदले, रंग क्षणाचा,

ती जाण्याची घाई.


बिलगुन बसले, क्षण हे सारे,

जीवन त्याचे नाव.

क्षणिक सुखाच्या, क्षणा क्षणास्तव,

जो तो घेई धाव.


जाणुन माया, क्षणिक क्षणांची,

क्षणभर मन बावरले.

क्षण पुढचा तो, खुणवित आला,

क्षणात मी सावरले.


चारुलता काळे 



——————————————————-

             आजी


पंखां खालून, माझी पिल्ले,

तुरूतुरू दूर गेली,

त्यांची पिल्ले, पंख लावून,

दूर देशी भूर गेली.


मी इथे मजेत आहे,

त्रास असा काही नाही,

नव्वदीची झाले आज,

देवाजीची कृपा राही.


थकलेल्या डोळ्यांमधे,

औषध घालून पडते जेंव्हा,

आठवणींच्या साठवणींचा,

चित्रपटच पहाते तेंव्हा.


तुम्ही सगळे पळत असता,

शिक्षण, नोकरी, कामा पाठी,

मन अगदी भरून येतं,

जेंव्हा वेळ काढता माझ्यासाठी.


आज माझा जन्म दिवस,

एकच मागणे देवाला,

तुझ्या कृपेची ऊब दे, 

माझ्या पिल्लांच्या त्या पिल्लाना.


चारुलता काळे 

——————————————



          तू सुखकर्ता


तू सुखकर्ता, तू दु:ख हर्ता,

विघ्न विनाशक तू.

गणपती तू, गुणपती तू,

काय तुला वर्णू!


गौरी पुत्रा तुला लाभला,

भोळा शंकर पिता.

आद्य पुजेचा मान तुला,

तू विद्येचा दाता.


भाद्रपदाच्या चौथ्या तिथिला,

वाजत गाजत येशी.

सखा, बंधु तू, आप्त स्वकिय रे,

घरचा होउन जाशी.


वास्तु सजवुनी, तोरण बांधुनी,

रांगोळ्या रेखिती.

दूर्वांकुर ते, ती शमिपत्रे,

फुले लाल अर्पिती.


लाडू, पेढे, बर्फी, मोदक,

तबक सजविले असे.

मुखकमलावर तुझ्या राजसा,

तेज अलौकिक दिसे.


दीप पाजळे, धूप दरवळे,

तुझी स्थापना होई.

मृदुंग, तबला, टाळ, ढोलकी,

आरती रंगुन जाई.


प्रेम भक्तिने, पुजा अर्चना,

लगबग जो तो करितो.

‘गणपती बाप्पा मोरया!’,

हा गजर असा दुमदुमतो.


विसर्जनाचा दिवस नकोसा,

तरि तो चुकला नाही.

‘पुढच्या वर्षी येइन लवकर’,

हसुन बोलशी तू ही.


चारुलता काळे 


——————————————


            पाऊस


लागे आभाळाला वेड,

उठे पावसाची झोड,  

कोसळत काळी भोर,

बने नागीण ती सर.


पाय वाटा, रस्ते शेते,

जिथे तिथे पाणी साचे.

चिंब भिजुनीया पुरा,

बाळ गोपाळ तो नाचे.


एक पक्षी चिमुकला,

पंख मिटुन बसतो,

भान हरपून वेडा,

मोर बेभान नाचतो.


एक झोपडे बिचारे,

होई हळवे उदास,

कसे सावरावे त्याला,

जीव होई कासाविस.


चारुलता काळे 


———————————————————



             गेली दूर सोना राणी


गेली दूर सोना राणी,

आठवणी ठेवी मागे,

“आई! आहे मी सुखात!’,

पत्र तिचे मला सांगे.


कुणी ‘आई!’ हाक मारी,

तीच आली वाटे मला,

कधी रेशमी मिठीचा,

तिचा स्पर्श भासे खुळा


“अशी वाग, असे बोल,

थोडी अदबीने चाल”

माझ्या कठोर बोलाने,

तुझ्या जिवाचे ते हाल.


“इथे तिथे हा पसारा!

चल घाई कर बाई!”

माझी आरडा ओरड,

नाही उरले ते काही.


तुझ्या एका बोलासाठी,

कान माझे आसुसती,

“लेक विसरली तुला!”,

कुणी मला चिडवती.


तू दूर दूर तेथे,

नव्या जागी, नव्या घरी,

आठवण तुझी येता,

डोळा श्रावणाच्या सरी.


चारुलता काळे 


———————————————————



               संध्याकाळ


आयुष्याच्या संध्याकाळी,

हळवे ते तन मन,

नको तुडवाया कोणी,

कसे वागावे जपून.


जीव जन्मतो वाढतो,

जगण्याची हौस त्याला,

इन्द्र धनुच्या रंगाची,

लावी झालर स्वप्नांना.

काही स्वप्ने सत्य होती,

काही दूर दूर जाती

काही हाती येता येता,

सुटूनिया चूर होती.


जीव तारुण्यात येतो,

भेटे जोडिदार त्याला,

मऊ उबदार घर,

आता हवेना बाळाला!

कुणी जमवीतो काडी,

कुणी बांधी उंच माडी,

कुणी थकून, हरून,

घरट्याचा नाद सोडी.


आयुष्याच्या संध्याकाळी,

घरट्याची माया जरी,

बळ पंखाना त्या नाही,

कशी घ्यावी ती भरारी.


आयुष्याच्या संध्याकाळी,

स्वप्नांचा ताळमेळ

नको हिशोब चुकाया,

हाती नाही फार वेळ.


चारुलता काळे 

——————————————


                 दूरियाँ 


ज़िन्दगी है कितनी ज़ालिम,

कैसी ये मजबूरियाँ!

हम यहाँ है, तुम वहॉं हो, 

बीच में ये दूरियाँ।


गीत बनता है सुरीला,

जब सुरोंका साथ हो।

थिरक उठती है ये पायल,

ताल की जब बात हो।


बोलती है मधुर मुरली,

शाम जब छेड़े उसे।

कूकती है प्यारी कोयल,

ऋतु बसंती जब हँसे।


चमकती है ओस जब,

चंचल किरन उसको छुए।

झूम उठती है पतंग,

जब पवन उसको ले उड़े।


बिन तुम्हारे दिन न कटता,

कटती नही ये लम्बी राते।

तुम कहो, किसको बताऊँ,

मेरे मनकी सारी बातें।


अब तो आओ, आ भी जाओ,

कैसी ये मजबूरियाँ?

साथ हो मेरा तुम्हारा,

दूर हो ये दूरियाँ।


चारुलता काळे 


——————————————————


             भेट


जरी भेटलो असेच अवचित,

मनात उठली लहर जराशी,

काहि म्हणावे, आले ओठी,

दबून गेले त्याच कवाडी,


इथले तिथले बोल बोललो,

खास असे ते काहिच नव्हते,

हास हासलो उगीच खोटे,

डोळे भरले तरी जरासे.


माहित नाही, जरी म्हणालो,

अजाण नव्हतो माहित होते.

“मला कशाचे काही नाही!,

आव आणला तरि ते खोटे.


झाले गेले, नकोच गुंता,

नकोच हुरहुर आठवणींची.

बरेच झाले, जरी म्हणालो,

उरी वेदना, तरिही उरते.


चारूलता काळे


——————————————————


रंगांची धमाल मस्ती


सतत सारखी चित्र रंगवून,

रंगाना आला कंटाळा,

रंग म्हणाले “धावा पळा,

नवा काही खेळ खेळा!”


गम्मत जम्मत, धमाल मस्ती,

जंतर मंतर जादू ती,

चित्र आज रंगविल त्याची,

अश्शी करू फटफजिती!


लाल रंग काळा झाला,

काळा गुपचुप झाला लाल.

हिरवा बनला पिवळा धम्मक,

पिवळा हिरवी ल्याला शाल.



रंग पांढरा चिडून म्हणाला,

‘मीच नेहमी का स्वच्छ रहाव!’

निळा म्हणाला आकाश सोडून,

जमिनी सारख, मातकट व्हाव.


अदला-बदली करून सारी,

रंग हळूच हसले गाली.

चित्र काढायला गेला त्याची,

फजिती पाहून धमाल आली.


लाल सूर्य झाला काळा, 

अंधार काळा, लाल झाला

हिरव गवत, झाल पिवळ,

रंग मातीचा दिसे, आकाशाला


चित्रकार, गोंधळला, 

हिरमुसला, खूप चिडला.

उड्या मारत, टाळ्या देत,

रंग म्हणाले ‘फ़सला रे फसला!’


चारूलता काळे. 

———————————————————


* ओवी *


तू गोड गोडुली ग,

    मउ साय ती दुधाची,

अन रंग तो गुलाबी,

    कळी तू जशी फुलाची.


हासून तू पहाता,

       घर मोहरून जाई

लडिवाळ लाड करण्या,

       उचलून कुणी घेई.


ससूल्या, म्हणू तुला की,

      चिउ-माउ, खारुताई,

तू शुक्र चांदणी ग,

      तू चंन्द्र कोर बाई.


ओवी प्रसन्न चित्ते,

       देवाजिची म्हणावी.

ओवीतुनी कधी त्या,

       गुज गोष्ट ती असावी,


ओवी सुरेल गाणे,

       अंगाई गीत व्हावे

‘ओवी’ मधूर नाव,

       हृदयात जे वसावे.


चारुलता काळे 


———————————————————

                   ढोर 


नाव माज लक्षिमी,

पारवती माजी माय,

माय म्हन बाईनं,

कष्टाला भियाच नाय.

लगीन होउन जाशिल जवा,

म्हन्नं माजं कलल तवा.....


झाड-लोट, ढोरं राखनं,

धुनी-भांडी, पानी भरनं,

भावंडा सांबालून, रांधायचा काम,

शेतावर राबून,गालायचा घाम.

काम समद, मला दावायची माय,

बा म्हनं, ‘पोरीला उजवायची हाय’.


लगीन झालं, सासरला आले, 

घरादाराची लाडकी झाले.

‘कामाला वाघ, लक्षिमी आमची’,

सासू माजं, कौतिक करायची.


मला बी तवा वाटायच बरं,

मन म्हनायच ‘नाय काय खरं!’

कामाच्या येळला, घेत्यात नाव माजं,

पन पैशाच्या व्येवारात म्हनतात,

‘काम काय तुजं!’


जलमल्यापास्न ढोरावानी खपले,

माज्यातला मानुस, हरवुन बसले.

सोताकड कदी पायलच नाय,

जीव म्हनतो आता, “थकलो मी बाय!”


मी  -हायले आडानी,आता उगडल डोलं

उशीर झाला तरी,माज्यात श्यानपन आलं.

लेकी सुनाना आता,शिकिवनार बगा,

ढोरावानी न्हव,मानसावानी जगा.....


चारुलता काळे 

———————————————————

विराणी


जीव हा जन्मास येतो,

एक मिळते नाव त्याला.

एक असते, जन्मदात्री,

जन्म दाते वडिल त्याला.


एक असतो गाव त्याचा,

एक असते मातृभाषा.

एक असते ते घराणे,

एक असते जात त्याला.


एक असतो वेष त्याचा,

एक असतो देश त्याला.

एक असतो देव त्याचा,

एक असतो धर्म त्याला.


जीव हा मृत्यूस भेटे,

दाटती वा जाळती.

दाटल्याची होई माती,

जो जळाला राख ती.


मातिची त्या जात नसते.

राख ना धर्मास मानी.

जीव हा संपून जातो.

जीवनाची ही विराणी.


चारुलता काळे

——————————-


लेट गो


खूप गार वारा होता,

पावसाचा मारा होता.

“बाबा चल बाहेर जाऊ,

पावसात मस्त भिजून घेऊ!”

मी नको म्हणणार होतो,

पण बोलुन बसलो “हो!”

आठवून आपलं बालपण, 

करावं कधी लेट गो….


खूप गार वारा होता, 

पावसाचा मारा होता.

अेक तो, अेक ती,

नशा काही न्यारा होता.

निरखून जरा पहिन म्हटलं,

आहे तरी कोण “तो”?

आठवून आपली तरुणाई,

करावं कधी लेट गो…


खूप गार वारा होता, 

पावसाचा मारा होता.

मूड होता मस्त आणि,

माझ्या हातात ग्लास!

खोटा रुसवा आणुन ती,

मला म्हणाली “आता बास!”

अलगद तिला जवळ घेत,

हसून म्हणालो “नो नो नो!”

असे क्षण जगण्यासाठी,

करावं कधी लेट गो…


चारुलता काळे

—————————


निरोप


हसू माझ्या ओठावरी,

डोळा श्रावणाची धार.

हर्ष दुःखाच्या हिंदोळी,

मन कातर-कातर.


इथे आधार पित्याचा,

ऊब आईच्या पंखांची,

तिथे नाही मिळणार,

वेडी माया घरच्यांची.


सण आणि समारंभ,

किती येतील जातील,

राजा, तुझ्याविण आम्हा,

नको नकोसे होतील. 


जाती-धर्म, चाली-रिती,

वारा पाऊस आगळा,

सोन्या, घरट्या बाहेर,

झुंजणार तू वेगळा.


वेड्या वाकड्या रस्त्याने,

चुकुनही नको जाऊ,

विद्येसाठी, कामासाठी,

नको कधी मागे राहू.


उंच-उंच हिमालय,

सांगे नाते धरित्रीला,

नको विसरून जाऊ,

माय देशाच्या मातीला.


विद्यावान, धनवान,

तुला यशस्वी पाहिन.

पंच प्राणांची आरती,

तुझ्या स्वागता करीन. 


चारुलता काळे.

—————————





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चित्र कविता

प्रवास नॉर्वे आणि आइसलैंड

काव्यः माझ्या कविता 1