काव्यसंग्रह मनस्वी
निवारा
तिथलं घड्याळ चालतं,
तिथे सूर्यही उगवतो,
पण तिथल्या काळाला,
वेळेचं भान नाही……
दिवस येतो, संपून जातो,
महिने आणि ऋतू ही बदलतात,
तरिही तिथली, पिकली पानं,
असहाय्यपणे जीवनावर लोंबकळतात.
निवारा, आधार, सांज, अशा
सुखद नावांचे वृध्दाश्रम दिसतात.
सुखासुखी कुणी आलेला नसतो,
ते माणसांचे कोंडवाडेच असतात.
तिथले डोळे रडत असतात,
कधी कुणाची तक्रार घेऊन.
गुपचुप काही अश्रू झरतात,
चुका स्वत:च्या उशिरा कळून.
मृत्यू तिथून, रिकाम्या वेळात,
फेरफटका, मारून जातो.
आधीच मेलेल्या अेका जिवाला,
सोबत थोडी करून देतो.
ती जागा, रिकामी होताच,
नव्यांची पुन्हा झुंबड होते.
राजा-राणीच्या, संसारातील,
अेक अडचण दूर होते.
चारुलता काळे.
——————————————
(☝️माझ्या ‘मनस्वी’ ह्या काव्य संग्रहाताला अेक कविता. साधारण पंचवीस वर्षांपूर्वी लिहिलेली, आता भारतात वृध्दाश्रमांकडे पहाण्याचा दृष्टिकोण, मानसीकता बदलली आहे. बदलते आहे पण तरिही या कवितेतील वेदना तशीच आहे.)
टिप्पण्या