प्रवास वर्णनः ग्रीस 2
ग्रीस
(29 मे 2023, दुसरा दिवस.)
आमची दिवसभराची टूर होती. अथेन्सहून निघून आम्ही हायड्रा, पोरोस आणि अेजिना या बेटांवर जाणार होतो. ही टूर कॉसमॉसची होती. सकाळी सव्वा सातला आमचा पिकअप असल्याने झटपट ब्रेकफास्ट करून निघालो. जेट्टीला पोहोचलो, चार मजल्याची शानदार बोट पाहून ख़ुश झालो. ती ब-यापैकी भरली आणि वेळेत निघालो. बोटीवर जागा पकडण्यासाठी थोडी धावपळ झाली पण सर्वजण कुठेना कुठे आरामात बसू शकले. जागा मिळाल्यावर पर्स, हॅटस्, कॅप्स, बॅग्ज असं सामान बसण्याच्या जागेवर ठेऊन सर्व फोटो काढण्यासाठी इकडे तिकडे फिरत होते. रेस्टॉरंट मधून बसल्या जागी खाद्य पदार्थ दिले जात होते. ऑर्डर देताना माझं तोडकं मोडकं स्पॅनिश कामात आलं.
गायडेड टूरचे निरनिराळे ऑपशन्स होते. किशोरने गायडेड टूर्सचा सर्वसमावेशक असा ऑप्शन घेतला. पहिलं बेट होतं हायड्रा. हायड्राला इद्रिस असंही म्हणतात. उच्चभ्रू, प्रसिध्द अमीर लोकांच, हॉलीवुड सेलिब्रिटीज़चं आवडतं ठिकाण. अनेकांच्या इथे प्रॉपर्टीज़ आहेत. इथे मोठं हॉस्पिटल नाही. हायड्रातं अनेक चर्च आहेत त्यातलं सर्वात जुनं, प्रसिध्द चर्च पाहिलं. गाइडने त्याबद्दल माहिती दिली. त्या नन्तर छोट्या छोट्या गल्ल्यांमधे फिरलो. हायड्रामधे गाड्या, दुचाकी वाहने अजिबात नाहीत. फक्त कचरा गोळा करायला दोन ट्रक आहेत. बाकीची वहातूक करण्यासाठी फक्त गाढव हाच अेकमेव पर्याय. मला माझ्या सासूबाईंची आठवण आली. त्या गमतिशीर म्हणी वापरायच्या त्यातली अेक “ सब सिरेसे फिटी पर गधेपे नही बैठी!” याचा अर्थ “ सगळे अपमान झाले, फक्त गाढवावर बसायचं तेवढंच राहिलय!” भारतात ‘गाढव’ हा शब्द आळस, मूर्खपणा, अपमान यासाठी वापरला जातो पण इथे मात्र गाढवाला महत्व आहे. सजवलेल्या गाढवांबरोबर लोकं फोटो घेत होते. अेका दुकाना बाहेर टीशर्ट घातलेल्या गाढवाचा ऐटीत बसलेला छोटासा पुतळा दिसला, त्याच्या बरोबर आम्ही मोठ्या कौतुकाने फोटो काढला. हायड्राची वस्ती फार कमी आहे. पोर्टच्या आजुबाजूला अनेक रेस्टॉरेंट्स, दुकानं होती. लोकं तिथे निवांत बसून मजा करत होते.
बोटीवर परत येताच जेवण दिलं गेलं. कमालीच व्यवस्थापन. इतके लोक असुनही पटापट जेवण मिळालं. बफे होता पण हवं नको ते विचारून धडाधड प्लेटस् भरून हातात दिल्या जात होत्या. पास्ता, राइस, ब्रेड, फिश, चिकन, सॅलड सर्वच गोष्टी फार सुन्दर!
नन्तरचं बेट होतं पोरोस, आकाराने अगदी छोटं. इथे फार थांबणार नव्हतो. होममेड आइसक्रीमचं दुकान दिसलं तिथलं आइसक्रीम अप्रतीम होतं.
तिसरं बेट अेजिना, इथे बस टूर होती. जवळपास दोन तास फिरलो. पुरातन इमारती, अत्यंत सुन्दर सिनिक व्ह्यूज असलेली ठिकाणं आणि अेक प्रसिध्द चर्च. पिस्त्याच्या बागाही दिसत होत्या. अेजिनाचे पिस्ते प्रसिध्द आहेत. मार्केटिंग करण्यासाठी आम्हाला अेका ठिकाणी पिस्त्याची मिठाई दिली गेली आम्हाला ती काही विशेष वाटली नाही. बस मधून उतरून परत बोटीत बसलो.
आजचा दिवस मस्त मजेत गेला. ग्रीस हा बेटांचा देश आहे. इथे शेतडो बेटे आहेत. साधारण 80% लोक एथेन्सला रहातात पण प्रत्येकाचं अेखाद्या छोट्या बेटावर मूळ घर किंवा सेकंन्ड होम असतं हे नक्की. हे लोक खरे समुद्र प्रेमी आहेत. हॉटेल ड्रॉप असल्याने आरामात हॉटेलवर पोचलो. वाईन पिताना गॅलरीतून रस्ता पहायला मजा वाटत होती. समोरच कॅब्रे आणि नाइट लाइफ अेन्टरटेन्मेट चे क्लब होते पण कुठेही गडबड, गोंधळ, कलकलाट असा धुडगुस नव्हता. लांब दूरवर ती अॅक्रोपोलिसची भव्य वास्तू मंद प्रकाशात खूपच सुन्दर दिसत होती. आम्ही उद्या मिकोनोसला जाणार होतो.
चारुलता काळे
🙏
टिप्पण्या