प्रवास वर्णनः ग्रीस 10
ग्रीस
6 जून 2023, दिवस नववा)
आज जरा उशिरा उठलो. सामानाचं बरचसं पॅकिंग करून ठेवलं. आरामात ब्रेकफास्ट आटपला आणि बस पकडली. दिवसभर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी उतरून महत्वाची ठिकाणं पाहिली. पार्लमेंट, म्यूझियम, युनिव्हर्सिटी या ठिकाणांना धावती भेट दिली. बरेचसे समुद्र किनारे बसच्या ओपन रुफ टॉप वरून पाहिले तर क्वचित उतरूनही.
खास रमलो ते अथेन्स ऑलिंपिक स्टेडियमला. या स्टेडियम मधे पहिली ऑलिंपिक स्पर्धा झाली होती. ऑलिंपिकचा ध्वज आणि त्याच्या बाजूला ग्रिसचा राष्ट्रध्वज मोठ्या दिमाखात फडकत होते. आम्ही स्टेडियमच्या माहितीचा ऑडिओ ऐकत फिरलो. अंडाकृती गोल आसन व्यवस्था, किंग आणि क्विन साठीची आसनं सर्व काही मारबलचं आहे. कमालीचं आखीव रेखीव. जवळपास पासष्ट हजार लोकं बसू शकतात. स्टेडियमची भव्यता आमच्या मोबाईल फोटोत घेणं हा केविलवाणा प्रयत्न वाटला. दोन्ही हात उंचावून खेळाडूंना प्रोत्साहन देणारं खचाखच भरलेलं स्टेडियम आणि विजयश्री खेचून आणण्यासाठीचा खेळाडूंचा आक्रमक खेळ कल्पनेने डोळ्यांसमोर साकारला! विजेत्याना ट्रॉफ़ी दिली जाते त्या प्लॅटफॉर्मवर उभं राहून मी भारतासाठी ट्रॉफ़ी जिंकणा-या खेळाडूचा अभिमान, आनन्द माझ्या परीने अनुभवण्याचा प्रयत्न केला. मन सैराटलं होतं. हे सर्व मनात साठवून तिथून निघालो.
टूरचा शेवटचा दिवस. आमच्या हॉटेलच्या रूफ टॉपवरच्च्या रेस्टॉरेंट मधे डीनर करायचं ठरवून तिथे आलो. थंड हवेत व्हिस्की घ्यावी असं वाटलं. स्टार्टर म्हणून फिश आणि नन्तर चिकन ऑर्डर केलं. संपूर्ण ट्रिपच्या खास आठवणी मनात साठवून उद्या निघणार होतो.
————————————————
(7 जून 2023, दहावा दिवस)
दुपारी ग्रीस- इस्तांबूल आणि नन्तर इस्तांबूल-मुंबई अशी फ्लाईट घेऊन 8 जूनला पहाटे मायभूमीत परत आलो.
आमची ही टूर फारच सुन्दर अविस्मरणीय झाली. दुनियाभरचे लोक, विविध प्रकारचं खाणं, रम्य निसर्ग, किती किती गोष्टी आठवून आता ही मजा संपली त्याची जाणीव होऊन थोडं वाईट वाटत होतं पण त्याच बरोबर मायदेशी परतण्याचा आनन्दही होताच.
————————————————-
चारुलता काळे
टिप्पण्या