प्रवास वर्णनः ग्रीस 5
ग्रीस
(1 जून 2023, दिवस पाचवा)
नाश्ता आटपून बाहेर पडलो पुन्हा अेकदा त्या पवनचक्क्या पाहिल्या, चर्चला गेलो. बारा वाजण्याच्या आसपास आर्किओलॉजिकल साइट पहाण्यासाठी छोट्या फेरी बोटची टूर घेतली. अेका बेटावर उतरलो. कडक ऊन होतं पण प्राचीन काळातील कलात्मकता, समृध्दीच्या साक्षिदार असलेले ते भग्न अवशेष पाहतांना हरवून गेलो. मला आपल्या हम्पीची आठवण आली. ही टूर साधारण दोन अडीच तासाची आहे. तीन वाजता आमची परत यायची बोट होती. मी बहुतेक वेळा मोबाईल मधे अलार्म लाऊन ठेवते. तो वाजायच्या आधीच आम्ही परत आलो. आमच्या बोटीची वाट पहात बसलो. अेक बोट रिकामी झाली लोकं चढली पण आम्ही ज्या बोटीने आलो त्या बोटीवर जे नाव होतं ते त्यावर नव्हतं. तेव्हढ्यात वॉकीटॉकी घेतलेली अेक अगदी गोड मुलगी दिसली. तिच्याकडे पाहून अेक जुनं गाणं आठवलं, “ती पाहताच बाला कलिजा खलास झाला!” तेवढ्यात तिने विचारलं “ वेतिंग फ़ॉर बोट? बी फास्त, द अदर विल कम आफ्तर थरी अवर्स”. आम्ही लगबगीने बोटीकडे गेलो आणि बचावलो. नावं आणि प्रकार वेगळे असले तरी त्या सर्व बोटी अेकाच कंपनीच्या होत्या. ही सुटली असती तर दुसरी थेट सहा वाजता होती. आम्ही चढलो आणि लगेच बोट सुटली. “बचावलो!!!!!” असं म्हणत आम्ही अेकमेकांना मिठी मारली.
लिटल व्हेनिसला आलो. त्या गल्ल्यांमधून थोडं फिरलो. आज हॉटेलवर जायला खूप उशीर करायचा नव्हता. रेस्टोरेन्ट भरलेलं होतं तरी समुद्र दिसेल असं अेक टेबल दिसलं. लगबगीने पुढे जात तिथल्या अतिशय हॅन्डसम तरूण मॅनेजरला विचारलं “कॅन वुई सिट हिअर?” तो किशोरच्या खांद्यावर हात ठेऊन चक्क “नो!” म्हणाला. पण लगेचच माझ्याकडे पहात म्हणाला “ यू आर अ लकी वूमन! इट इज फ़ॉर यू!” किशोर हसत हसत म्हणाला “ या! शी इज द बॉस!”. आम्ही बसलो. आज चिकन डीशवर ताव मारला. बरोबर थंडगार बिअर होतीच. जाता जाता आइसक्रीम खायचा मोह झाला. तिथून निघालो तर चक्क आमच्या हॉटेलकडे जाणारी बस उभी दिसली. “चला, बघुया बस कशी आहे!” असं म्हणत बस मधे चढलो ड्रायव्हरला हॉटेलचं नाव सांगून बस तिकडेच जाते याची खात्री केली. हॉटेल बस स्टॉपच्या पुढे होतं बस स्टॉपवर उतरायला आम्ही उठतोय हे पाहून ड्रायव्हर म्हणाला “ डोन्ट! आय वुइल स्तॉप टु होटेल.” आम्हाला कौतूक वाटलं. त्याला पुन्हा पुन्हा धन्यवाद देत आम्ही हॉटेलवर पोचलो. पूलवर बसून रम्य सूर्यास्त अनुभवला. तिस-या दिवशी नाश्ता करून मिकोनोसला बाय करत, पुन्हा सी जेट च्या प्रवासाचा आनन्द घेत सॅन्टोरिनीत पोचलो.
चारुलता काळे
टिप्पण्या