प्रवास वर्णनः ग्रीस 6

ग्रीस

( 2 जून 2023, दिवस सहावा.)


दुपारी साधारण अेक वाजता सॅन्टोरिनीत पोहचलो. पाऊस पडत होता. बरीच गर्दी होती, त्यात हातात बोर्ड धरून उभ्या असलेल्या आमच्या ड्रायव्हरला शोधणं जरा कठीण होतं. मोबाईल ऊंच करून किशोरने लांबूनच त्या गर्दीचा फोटो घेतला. त्या फोटोत आमच्या नावाची पाटी दिसताच आम्ही पटापट त्या दिशेने निघालो. पटकन गाडीत बसलो.  आजच थोडा पाऊस आहे. नन्तर व्हेदर छान आहे अशी ड्रायव्हरने दिलेली माहिती ऐकून बरं वाटलं. 


सेन्टोरिनित आमचं हॉटेल होतं “डी सोल”, ह्या पंचतारांकित हॉटेलची रचना अेखाद्या रिसोर्ट  सारखी होती.  आमच्या रूमला सी व्ह्यू होता पण तो मिकोनोस इतका सुन्दर नव्हता. इथली खास गोष्ट होती रूम मधे असलेला झाकुझी. 


सेन्टोरिनी  आणि त्याच्या आजूबाजूची बेटं ज्वालामुखीमुळे निर्माण झाली. सेन्टोरिनी हे लांबीत पसरलेलं डोंगराचं बेट आहे.  माथ्या पासून खाली उतरत येणारी घरं, इमारतींना क्वचित कुठे दुसरा रंग दिसतो पण तो सोडल्यास संपूर्ण शहर स्वच्छ पांढरं.  सॅन्टोरिनी बरंच मोठं आहे. सिनिक व्ह्यू , भरपूर दुकानं, रेस्टॉरेंट्स या गोष्टिमुळे सर्वात लोकप्रीय पण गर्दी असलेला भाग म्हणजे फिरा. फिराला पोचण्यासाठी आमच्या हॉटेलची अेक अेक तासाने फ्री शटल सर्विस होती. पाऊस होता पण अगदीच कमी होता. तयार झालो आणि निघालो फिरा फिरायला. 


इथला बाजार पाहून हरवून जायला होतं. उत्कृष्ट दर्जाचे कॉटन , लीननचे हाय फॅशन कपडे. क्रोशिया काम केलेले लहान मुलांचे कपडे, डिझायनर कपडे, सिल्व्हर, गोल्ड, डायमंड ज्वेलरी, फॅशन ज्वेलरी,  स्टायलिश पर्सेस, मेकअपचं साहित्य,  काय आणि किती सांगणार! इथे फिरताना सतत चढ उतार करावा लागतो. पाऊस जाणवायला लागला, हवा गार वाटू लागली. आम्हाला हॉटेलच्या मुलीने सुचवलेल्या रेस्टॉरेंटला पोचलो.  गर्दी असुनही आम्हाला बसायला चांगली जागा मिळाली. कडकडून भूक लागली होती. मेन्यू कार्ड पाहिलं आणि इनफ फॉर टू अशी फिश प्लॅटरची ऑर्डर दिली ज्यात वाइन, सॅलड, ब्रेड बास्केट आणि पॅक्ड पाणी याचा समावेश होता. झिरमिर पाऊस, समोर अथांग पाणी, हातात वाईनचा ग्लास आणि हलकं इन्सट्रुमेंटल म्युझिक, व्वा! नशा ही नशा…!


तो नशा अधीक गहरा झाला अेका मनस्पर्शी घटनेने! आम्हाला फिश कशी वाटली हे विचारायला मॅनेजर टेबल जवळ आला. त्याच्याशी बोलताना आम्ही त्याला सांगितलं की आम्ही इन्डियन आहोत. हे ऐकताच त्याने विचारलं “डू यू नो नरगीस? माय मॉम यूज टू सिंग हर सॉंग्ज, इनडियन फिल्म सॉंग्ज सो ब्यूटीफ़ुल!” मी हसून माझ्या मोबाईल मधलं “आजा सनम, मधुर चाँदनी में हम” हे गाणं वाजवून त्याचे हात माझ्या हातात घेत नाचाची अेक स्टेप घेतली. किशोरने तो क्षण मोबाईल मधे टिपला. 


चारुलता काळे



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रवास नॉर्वे आणि आइसलैंड

प्रवास वर्णनः ग्रीस 2

लेखः ओशो भाग ३