प्रवास वर्णनः ग्रीस 7

 ग्रीस

(3 जून 2023 दिवस सातवा).

सॅन्टोरिनीचा दुसरा दिवस. पाऊस नव्हता. हवा मस्त होती. आम्ही पाच तासाची कॅटॅमरीन टूर बुक केली. त्या टूरचा आमचा हॉटेल पिकअप दुपारी  दोन चाळीसला होता. ब्रेकफास्ट करून ‘फिराला’ गेलो. रोप वे मधून खाली गेलो. थोडे भटकलो. पुन्हा वर येऊन कॉफी पिऊन परत हॉटेलवर जाण्यासाठी शटल पकडायला गेलो तर तिथे कुठल्यातरी क्रूज वरून आलेल्या लोकांना ड्रॉप करायला पाच ते सात बसेस रांगेत उभ्या. प्रचंड गर्दी. “बापरे! आता  काय करायचं?  टॅक्सी करुया का? “ असा विचार मनात आला आणि तेवढ्यात आमची शटल आली. 


आमच्या हॉटेल वरून आम्हाला छोट्या व्हॅनने जेट्टी पर्यन्त नेण्यात आलं. तिथे अनेक कॅटॅमरीन उभ्या होत्या. आमच्या कॅटेमरीनच्या बाहेर चपला, बूट काढून आम्ही वर चढलो. बोटीवर पाय सरकूनये म्हणून ही खबरदारी घेतली जाते. त्या बोटीवर पंधरा प्रवासी आणि चार कर्मचारी असे मोजके लोक होतो. सुरक्षिततेच्या सूचना देणारी मुलगी अत्यंत काटक आणि तितकीच सुन्दर तसेच धमाल मस्ती करणारी होती. आमच्या ग्रूपमधे विविध देशांचे आणि वयाचे लोक होते.


बोटीच्या पुढचा काही भाग जाळीने विणलेला होता आणि त्यावर वॉटरप्रूफ़ बेड म्हणता येईल अशी बसायची सोय. बोट सुरू झाली की समोरून तसेच जाळीतून वर उडणा-या पाण्याने मस्त भिजायला होत होतं. पार्टी म्यूझिक चालू होतं. बोट सुरू होताच अनलिमिटेड खाणं आणि अनलिमिटेड बिअर, वाइन, पाणी दिलं जात होतं. सुसाट वेगाने पळणारी बोट तरिही आधारासाठी रॉड धरून काळजी घेत ज्याला जसं जमेल तसं फिरायला मजा येत होती. विविध देशांचे विविध लोक पण आमचा मस्त ग्रूप जमला. अेकमेकांना चिडवण, हास्य विनोद, तोल जात असेल तर आधार देणं जसे काही आम्ही खूप जुने मित्र होतो. 


फिराच्या इमारती दुरुन दिसत होत्या. रंगीत खडकांवर त्यांची शुभ्रता अधिकच खुलून दिसत होती. सॅन्टोरिनीचे  खडक हे व्होल्कॅनोतून बनल्याने त्यातल्या विविध खनिजांमुळे अनेक रंगांचे होते. उन्हात ते फारच सुन्दर दिसत होते. 


दोनदा बोट थांबवून भर समुद्रात पोहण्याचा अनुभव काही वेगळाच! यात अेका ठिकाणी हॉट स्प्रिंग आहेत. गरमा गरम चविष्ट डीनर सर्व्ह झालं. आकाशात मावळतीचे रंग सजले होते. सूर्यास्ताचा तो अनुभव शब्दांच्या पलिकडचा! आम्ही सगळे त्यात हरवलेले असतानाच पूर्ण गोल चंन्द आकाशात दिसू लागला. लाजवाब!!!!! निसर्गाची ती जादू मनात साठवत मी मावळतीला हात जोडले. 

चारुलता काळे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चित्र कविता

प्रवास नॉर्वे आणि आइसलैंड

काव्यः माझ्या कविता 1