चित्र कविता
श्वासही अवघड झाले.
केस मोकळे वा-यावरती,
उदास हा चेहरा,
छज्ज्या वरती अशी एकटी,
नाही कुणी आधारा,
काय कुणी ग दुखविले तुला,
जगणे नकोच केले
मरणा मधुनी अर्थ शोधिशी,
श्वासही अवघड झाले.....
चारूलता काळे
————————————————-
मौतिक माळ
कोळी कुणी हुशार, जाळे विणोनी जाई,
पाहून कलाकारी, तो मेघ खुळा होई.
हलकेच करी वर्षा,तो सहज कौतुकाची
थबकून थेंब गुंफी, ती माळ मौतिकाची.
वाकून जरा पाही, उन कोवळे उगाच,
रत्ने बनून मोती, करती मजेत नाच.
झाली निसर्ग जादू, डोळ्यात साठवावी,
मनते उदास होता, अवचीत आठवावी.
चारूलता काळे
————————————————-
जाळे
पाहिले मी अचानक,
अेका कोळियाचे जाळे
आणी मनामधे माझ्या,
किती उठली वादळे…
त्या कोळियाच्या जागी,
मी मला कल्पियले,
वेड्या विचाराने अेका,
मन सैरभैर झाले.
मी होतो इटुकला,
अंगणात खेळ रंगे,
माझी बडबड मोठी,
किती ज्ञान मी ते सांगे!
कुणी करी कुरबूर,
कुणी धरी कधी कान,
कुणी रागाने बोलले,
कुणी पोट तीडकीनं.
तो कोळी अेकटाच,
मला होती नाती गोती,
मी माझे काय केले,
प्रश्न त्यांना सताविती.
लटकलो मी पुरता,
कसा जाळे हे सोडवू,
कोळिष्टक हे जन्माचे,
कोणासाठी मी सजवू!
चारुलता काळे
———————————————-
राधा
तो मुरलिचा सूर, मोरपीस ते,
मऊ रेशमी नील.
तो कृष्ण सखा, मी राधा झाले,
पडली मजला भूल.
ते नाव गोड ग, गोंदविले मी,
तना-मनावर असे,
मी ‘तन्मय’ झाले, प्रेम दिवाणी,
प्रीत लाजरी हसे.
चारूलता काळे
———————————————
मधुर
ओठाचे डाळींब फुटले
आणी चमकले मोती.
खळी खुलविते मधाळ हसणे,
डोळे जादू करिती.
मान जराशी वेळावुन ग
पाहिलेस तू जरा.
मधुर तुझे हे रूप पाहुनी,
खुळावलो मी पुरा.
चारूलता काळे
———————————————
साज
साजाला त्या सजविलेस तू
मौतिक ओठी हसले.
हिरवाईचा बाज साजिरा,
रूप तुझे ग फुलले.
टपोर डोळे, अवखळ दिसती,
किंचित कलती मान,
शालिनता अन सौन्दर्याची,
वाढविशी तू शान
चारुलता काळे
——————————————-
ती
बांधलेसजरी केस उघडळती,
चुकार बट ही अशी.
चाफेकळी हे नाक तुझे अन,
ओठ पाकळी जशी.
कर्णफूल ते शोभुन दिसते,
वळवुन बघता मान.
गॉगल ऐटित चढविलास ग,
वाढवितो तव शान.
मावळतिचा तो सूर्य भाळला,
थबकुन तुजला पाही.
किरण रेशमी जरा लांबवून,
सलाम तुजला देई.
चारुलता काळे
—————————————————
अकरित
ह्ये बग बाला, अंदाराला,
भियाचा नाय!
असल रस्ता बिकट तरीबी,
दमायचा नाय!
हात तुजा धरलाय मी,
व्हटावर हाय हसू.
बिगिन पाऊल उचलू आता,
चांदन्या लागतील दिसू.
येक अकरित घडलय,
बग मी, पाटीत भरल काय!
चालून दमला सुर्व्या त्येला,
घरला न्यायाच हाय!
चारुलता काळे
—————————————————
अधिर
सूर्याची अधिरता,
आठवून लाडीगोडी,
पहाट लाजून,
आज, लपून बसली.
झाला सूर्य कासाविस,
आस भेटीची जिवाला,
उत्तुंग इमारत येई,
त्याच्या मदतीला.
म्हणे हसून सुर्याला,
मला मार जरा मिठी.
रागाने लाल होत,
बघ येईल तुझ्यासाठी.
जाई उगिच जरासा,
सूर्य इमारती पाठी.
येई पहाट त्याच्या मागे,
साखर मिठीसाठी.
चारुलता काळे
————————————————-
टिप्पण्या