माझ्या कविता 3
———————————
चंद्रकळा
तू मिठी मारता, शहारले मी,
मिटून गेले डोळे.
शाम रंग तव नयनी उरला,
गारुड त्याने केले.
पौष मास हा, हवा गुलाबी,
मन हे व्याकुळ झाले.
शाम रंग तो ओढुन घेण्या,
चंद्रकळा मी ल्याले.
चंद्रकळेचा पदर देखणा,
बारिक नक्षी छान.
स्पर्श रेशमी हवाहवासा,
हरपुन बसले भान.
भाळा वरती चंद्रकोर,
अन नयनी काजळ रेषा.
गाला वरचा तीळ बोलतो,
गोड तिळगुळी भाषा.
रोखून डोळे पाहिलेस तू,
रोमांचित मी अशी.
बहर चांदणे लेउन सजते,
चंन्द्रकळा ही जशी.
चारुलता काळे.
—————————————
आमचे सर
“आपल्या सराना, देवाज्ञा झाली!”
शाळेतिल मित्राचा निरोप आला.
सर, शाळा आठवणींचा,
मनामधे कल्ला झाला.
आठवला त्यांचा गोरा रंग,
उंच बांधा , मोठ्ठ नाक,
हातात अेका पुस्तक घेऊन,
चालण त्यांच रुबाबात.
मुलगा जर चुकला तर
पोटाला ते घ्यायचे चिमटा.
आणी जर मुलगी चुकली,
हात उगारत क्वचित जरासा.
धाक त्यांचा वाटला तरी,
भिती कधीच वाटली नाही.
हसत खेळत त्यांचा तास,
अगदी पटकन संपून जाई.
सरांना श्रद्धांजली वहाताना,
जोडले हात, डोळयात पाणी,
प्रत्येकाच्या मनात होत्या,
कितीतरी आठवणी…..
दु:ख अनावर होत तरी,
क्षणात अेका विचार आला.
देहदान करून आपलं,
शिक्षक जगण शिकवून गेला!
चारूलता काळे
————————————
व्हेलेंटाइन डे
मनात ज्याच्या प्रेम आहे,
कळत नकळत बहरला.
आला, आला, आला…
पुन्हा “व्हेलेंटाइन डे” आला.
छोट्या मोठ्या भेट वस्तू,
गुलाबांनी बाजार सजला,
आशेचा तो दोरा बांधुन,
हृदय फुगा नाचू लागला.
“व्हेलेंटाइन डे”, नव्हता जेंव्हा,
तरुणाई ती तशीच होती.
प्रेम द्यावं, प्रेम घ्यावे,
मनात इच्छा अशीच होती.
भेट वस्तू, नाही दिली,
तरी मनं जुळत होती.
गुलाब नाही दिला तरी,
गज-या मधे फुलत होती.
प्रेम जेंव्हा, होत तेंव्हा,
श्रावण पाऊस, घेऊन येतो.
तोच खरा व्हेलेंटाइन डे,
वसंत जेंव्हा बहरून येतो!
चारुलता काळे
—————————————
ताजमहल
यमुनेच्या त्या तीरावरती,
ताज महल तो संगमरवरी,
बादशहाची अमर प्रीत तो,
जगा सांगतो, मूक राहुनी.
शिल्प कलेचा अजोड नमूना,
आखिव रेखिव, निंतांत सुन्दर.
लाल पत्थरी उंच कमानी,
तीन दिशांना सदैव तत्पर.
वेल बुट्टिची कशिदाकारी,
कुराण वचने सजली त्यावर.
पूर्ण चंन्द्र आकाशी येता,
मोहकता ती येते बहरुन.
हिरवाईचा गर्द गालिचा,
बाग दिसे ती आखिव रेखिव,
प्रतिबिंबित तो ‘ताज’ होतसे,
पाण्यावरती हळवी थरथर.
दोन देह ते, मने गुंफुनी,
चिर निद्रेची, चादर ओढुन.
शिल्प गझल ही मनी उतरते,
त्या प्रेमाला, सलाम देउन.
चारुलता काळे
————————————————
मृगजळ
होई देहाची काहिली, जीव था-यावर नाही,
शोष कंठाला पडतो, पाणी दिसेना कुठेही.
नदी नाले सुकलेले, शेते ओसाड उघडी,
ठक्क कोरडी विहिर, रीती घागर उपडी.
रानी वनीची पाखरे, कण अन्नाचा धुंडती,
घर, गाव सोडुनीया, बाप्ये मजुरी शोधती.
पोट पाठीला बिलगे, पान्हा उरीच आटला,
रडुनिया थकलेला, बाळ झोळीत निजला.
दारिद्र्याचे ते गिधाड, सदा घिरट्या घालते,
मृगजळ जगण्याचे, तरी मनात जपते.
चारुलता काळे
———————————————
कुसुम
नाव तिचे कसुम आणि,
ती तशीच आहे,
जगण्याला अर्थ देत,
दरवळते आहे.
वेलीवर उमलली,
कतृत्वे बहरली.
गौर वर्ण, कांति तिची,
तेज तेच आहे.
जगण्याला अर्थ देत,
दरवळते आहे.
नुकती फुलली होती,
वादळ ते आले.
पाकळीत जपली ती,
इतुकि़शी बाळे.
रडली परि खचली ना,
भार सहज वाहे.
जगण्याला अर्थ देत,
दरवळते आहे.
मुले छान शिकली,
अन धन्य जीव झाला.
बाळांची बाळे ही,
मिरविती यशाला.
योग, कला, वाचनात,
रमलेली राहे.
जगण्याला अर्थ देत,
दरवळते आहे.
वासंतिक बहर धुंद,
ती निवांत होती.
सौख्य माळ तुटली अन,
गळला तो मोती.
दु:ख खोल देठाशी,
दडपुनी, जगते आहे.
जगण्याला अर्थ देत,
दरवळते आहे.
चारुलता काळे
—————————————
माहित आहे देवा तुला…
रागावू नको देवा, पण
बोलणं तुझं खरं नाही!
‘संभवामी युगे युगे’ म्हणून,
तुझं हे लपून बसणं बरं नाही.
रामायण संपल,
महाभारत झालं,
पण युध्द अजून,
संपलच नाही.
माहित आहे देवा तुला,
तुझं हे लपून बसणं बरं नाही.
राजकारण म्हणावं,
की सत्तेचा आखाडा!
डोळ्यावर पट्टी बांधून,
होतो इथला निवाडा.
खोटं असं रेटून बोलतात,
खरं कुठेच टिकत नाही.
माहित आहे देवा तुला,
तुझं हे लपून बसणं बरं नाही.
मतलबाची दुनिया नुसती,
लाज शरम विकून खातात.
आपली चोरी दाबुन खुशाल,
समोरच्याची झडती घेतात.
माणसा मधली माणुसकी,
आता फार दिसत नाही.
माहित आहे देवा तुला,
तुझं हे लपून बसणं बरं नाही.
द्रौपदीची विटंबना,
आजही होतेच आहे,
मेल्यासारखी जगते कुणी,
कुणी जीव देते आहे.
‘निर्भया’ कसं म्हणावं त्यांना,
कोडं हे सुटत नाही.
माहित आहे देवा तुला,
तुझं हे लपून बसणं बरं नाही.
चारुलता काळे
———————————
अद्वैत
देवाजीचा विशाल सागर
त्यातिल आपण मासे.
इच्छांची ती आग भयंकर,
काय करावे त्याचे?
चहू बाजुला पाणिच पाणी,
जाणिव त्याची नाही,
आशांचे ते पंख लाऊनी,
उडण्याची मग धाई…..
सागरातुनी उसळी मारून
घेतो जरी भरारी,
पुन्हा पुन्हा त्या पाण्यामधे,
कोसळतो माघारी.
विशाल गगनी, उंच भरारी,
ताप सरावा आस.
वेडी आशा, छंद खुळा हा,
हा तर नुसता भास.
मुक्त हवा अनुभवण्यासाठी,
खुशाल जावे वरती,
जल जेंव्हा ते नसते भवती,
प्राण येतसे कंठी….
तगमग वाढे जशी जशी ती,
अवचित होई ज्ञात.
तूच देव तो, तूच जलाशय,
तूच पोहणे त्यात.
चारुलता काळे
——————————————
अश्वत्थामा
मी अश्वत्थामा, मरण रोजचे,
जगतो आहे,
भळभळणारी जखम घेउनी,
फिरतो आहे.
वाद कुणाचा, मी का लढलो,
कळले नाही,
मनास माझ्या मीच रोज हे,
पुसतो आहे.
भळभळणारी जखम घेउनी,
फिरतो आहे.
युध्दच होते, कोण कुणाला,
मारित होता.
भान कुणाला होते का,
मी स्मरतो आहे.
भळभळणारी जखम घेउनी,
फिरतो आहे.
आप्त स्वकिय जे, होते जवळी,
सोडुन गेले.
ते होते का खरेच जिवलग?
संभ्रमीत आहे.
भळभळणारी जखम घेउनी,
फिरतो आहे.
चिरंजीव मी, मरण मला ते,
दुर्लभ आहे.
धरेल खपली, तेल कुणी द्या,
म्हणतो आहे.
भळभळणारी जखम घेउनी,
फिरतो आहे….
चारूलता काळे.
————————————————
हे असेच असते जगणे
हे असेच असते जगणे,
डोळ्यात आणते पाणी,
पायात रुते तो काटा,
ओठात तरिही गाणी.
हे असेच असते जगणे,
जणु ओंजळीतले पाणी.
होतात रिक्त ते हात,
मग उरते अेक विराणी.
हे असेच असते जगणे,
कधी रडणे तर कधी हसणे.
लाऊन जीव तो कोणा
जगण्यावर त्याच्या मरणे.
चारुलता काळे
———————————————
तरिही…
आला पुन्हा तोच पाऊस,
तोच आनन्द झाला,
तशीच सुखावली ती माती,
तोच गंध दरवळला.
तीच झाड न्हाली,
हिरवी गार झाली.
मातीच्या त्या कुशीतून,
हिरवळ डोकावली.
तोच मोर फुलवून पिसारा,
तस्साच धुंदीत नाचला.
तोच झरा वेडा होऊन,
उगाच धावत सुटला.
तीच ओढ तनामनात,
पुन्हा जागी झाली.
तेच शब्द, तोच अर्थ
तरिही नवी कविता झाली..
🤦♀️🙈🤪😀
चारुलता काळे
🙏
—————————————————
बंध
अेक तू अन अेक मी,
हा भास आहे,
वेगळा तू अन् वेगळी मी,
आभास आहे.
भेटलो केंव्हा कसे,
ते आठवेना,
बंध हा दोघातला पण,
खास आहे.
रीत माझी ती निराळी,
अन् तुझे ते वागणे,
साथ पण वाटे हवीशी,
अेक अपुली आस आहे.
मी सदाची गुंतलेली,
तू सदाचा मोकळा,
तू सदा माझाच रे,
माझ्या मनी विश्वास आहे.
श्वास हे संपून जाता,
वेगळे झालो जरी,
‘अेक ती अन् अेक तो’,ची
गोष्ट मग उरणार आहे.
चारुलता काळे
——————————————
टिप्पण्या