पार्ले सप्तसोपान
💐
————
पार्ले सप्तसोपान
जेष्ठ मनोविकास तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ ठाणे यांच्या सहयोगातून, मन चैतन्य फाउंडेशन संचालित, पार्ले सप्तसोपान, जेष्ठ नागरिक- मनमेंदू संवर्धन केन्द्राचा उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, पार्ले पूर्व येथे आयोजित करण्यात आला होता.
१६ सप्टेंबर २०२५ पासून विलेपार्ले येथे, “पार्ले सप्तसोपान” हा एक अभिनव उपक्रम सुरू होत आहे.
या उपक्रमाच्या उद्घाटन समारंभा निमित्त विशेष अतिथी म्हणून लाभलेल्या व्यासंगी आणि प्रसन्नवदना, सुसंवादिनी मंगला खाडीलकर, यांच्याशी या उपक्रमाचे मार्गदर्शक, ज्येष्ठ मनोविकास तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी, यांनी मनमोकळ्या गप्पा मारत वृध्दत्वाकडून आनंदी ज्येष्ठत्वाकडे जाण्याचा मंत्र सहजसुंदरतेने उलगडून दाखवला.
मंगला जीं नी, डॉ. नाडकर्णींना विचारलं की वृध्दत्व आणि ज्येष्टत्व म्हणजे नक्की काय? त्याचं उत्तर देताना डॉक्टर म्हणाले की या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने स्वतःला पुढील पाच प्रश्न विचारून मिळवावं.
तुमचं शारिरिक वय काय? तुम्ही किती वयाचे दिसतां असं तुम्हाला वाटतं? तुम्ही स्वतःला किती वर्षांचे समजता? तुम्हाला लोक किती वर्षांचे समजतात? आणि तुम्हाला किती वर्षांच रहायला आवडेल?
हे प्रश्न सांगताना डॉक्टरांनी ते खुमासदार पध्दतीने सांगितले. मंगला खाडीलकर यांनी त्यावर मिश्किल वाक्यांत प्रतिक्रिया दिल्या आणि कार्यक्रम मस्त फुलत जाणार हे लक्षात आलं. डॉक्टरांनी सांगितलेले हे पाचही प्रश्न विनोदी ढंगाचे वाटले तरी प्रत्येकाला अंतर्मुख करणारे होते.
बोलताना डॉक्टर म्हणाले की पूर्वी सर्वसाधारणपणे विकसित आणि विकसनशील देश कुणाला म्हणायचं हे तिथल्या नागरिकांच्या आयुर्मानावर ठरवलं जायचे. आधुनिक देशांत जसं आयुर्मान वाढायला लागलं तशी ज्येष्ठत्व ही संकल्पना आली. अनेक मान्यवर तज्ञांनी हेल्दी एजिंग म्हणजेच निरोगी वृद्धत्व या विषयी अभ्यास करून वृध्दत्व निरोगी असण्यासाठी कोणते घटक महत्वाचे ते सांगितलं आहे, ते घटक असेः
आजार असले तरी ते नियंत्रित असणे, घरातले आणि घराबाहेरचे नाते संबंध, सोशलायझेशन (समाजीकरण), आर्थिक स्थैर्य, वृद्धांनी नव्या गोष्टी शिकणं.
जेष्ठ मंडळी नव्या गोष्टी शिकतात पण ‘शिकणं हे व्यक्ति सापेक्ष असतं’ असं म्हणून आपण त्याला तितकसं महत्व न देता सोडून देतो, पण त्याला महत्व देऊन ते संस्थात्मक (इन्स्टिट्यूशनल) असणं महत्वाचं. नवीन गोष्टीं शिकण्या बद्दल बोलताना डॉ. नाडकर्णींनी ते शिकणं सहज असण्यावर भर दिला.
परीक्षा नाही. नैपुण्याची अट नाही, कुठल्याही मागणीचा दबाव (प्रेशर) न घेता शिकणं महत्वाचं असं ते म्हणाले.
कुठलीही कृती करताना आपण मज्जा संस्थेचा वापर करतो. काही मज्जामार्ग आपण खूप वापरतो. मज्जामार्गाना अनेक फाटे असतात. नर्व्हस सिस्टम/ मज्जा संस्थे बद्दल बोलत असताना डॉ. नाडकर्णींनी पुलंच एक विनोदी वाक्य उद्धृत केलं. “मराठीत मज्जा म्हणजे मजा तर इंग्लिशमधे ती मज्जा ‘नर्व्हस’ होते.” ते वाक्य ऐकून सभागृहात हशा पिकला.
नवीन गोष्टी शिकल्याने मेंदूचं परफ्यूजन होतं. मेंदूला चालना मिळते. तो टवटवीत होतो. मेंदूचा तल्लखपणा टिकवायचा असेल तर ह्या मज्जा मार्गांच्या वापर पध्दतीत वैविध्य हवं.
“मेंदू ताजा कसा कराल?”, असा प्रश्न विचारून त्याचं उत्तर देत डॉ. नाडकर्णी म्हणाले, “आपण जे जन्मभर केलं ते काम न करता काहीतरी वेगळं करायचं.” तसं केलं की शिकतानाचा आनंद, शिकल्यावरचा आनंद, मूल्यमापनाचा (ॲप्रिसिएशनचा) आनंद मिळतो.
जेष्ठत्वाचा आनंद घेत वृद्धत्वाला सांभाळणं महत्वाचं ही गोष्ट डॉ. नाडकर्णींनी अधोरेखित करत
“व्यवधानं अनेक पण त्याचं प्राधान्य कसं सांभाळलत मंगला जी” असा मंगला खाडिलकर यांना प्रश्न विचारला. मंगला खाडिलकर म्हणाल्या की आम्ही इथे तुम्हाला ऐकायला आलोय पण तरिही सांगते. मंगला जी या भावंडांमधे मोठ्या असल्याने त्यांची जबाबदारी होती. जबाबदारीची जाणीव ठेऊन त्या आनंदाच्या वाटा शोधत गेल्या. लेकीचं शब्दांवरचं प्रेम आईच्या लक्षात आलं तिनं बोलण्यासाठीची माध्यमं शोधायला प्रोत्साहन दिलं. मंगला जी बोलताना भावूक झाल्या, त्यांच बोलणं निखळ होतं. शिरीष पैं चा त्यांनी खूप आदरांने उल्लेख करत सांगितलं की शिरीष पै त्यांच्या पत्राला आपुलकीने उत्तर द्यायच्या.
“रुइया कॉलेजच्या प्राध्यापकांनी मला व्यवधानं दिली.” असं सांगत त्या म्हणाल्या की सकारात्मक असाल तर मदत मिळते. जगाकडे आनंदाने बघायची सवय लागली की गुण ग्राहकता वाढते. व्यवधानं सांभाळताना जागृकता आली. नेहमी जिंकले नाही पण शारिरिक, बौद्धिक, भावनिक अशी स्वतःची क्षमता ताणता यायला लागली. ध्येयासाठी अनावश्यक गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवणं (डिटॅच)आणि महत्वाच्या गोष्टीं बरोबर मनापासून जोडणं (अटॅच) हे जमलं. मंगला जी मनापासून बोलत गेल्या त्यांचे शब्द मनामनांत उतरत गेले.
माझ्या कार्यक्रमांनी मला व्यवधानं दिली. लोभ न करता मी काम करत रहाणार. असं सांगून त्यांनी डॉक्टर नाडकर्णींना प्रश्न केला
“नात्यांचा गुंता न करता त्यात गुंतायचं कसं?”
आपले विचार अगदी जवळच्या माणसालाही पोहचेनासे झाले. नात्यातला तोल सांभाळूनही नाती टिकत नसतील तर ती सोडावी पण नातं पूर्ण तोडू नये. पदार्था प्रमाणे नात्याची चव बदलत जाते. म्हणुनच नातं टिकवण्यासाठी त्यात योग्य वेळी प्रिझरवेटिव हवेत.
डॉ. नाडकर्णीनी “माझी सूर्यमाला ह्या मजेदार खेळा विषयी (ॲक्टिव्हिटी विषयी) सांगितलं. संबंध किंवा नाती म्हणजेच आपल्या आयुष्यातील विविध व्यक्ती.
आपण सूर्य आणि त्याच्या अनेक कक्षा म्हणजेच ह्या व्यक्ती. आयुष्यात अधून मधून आपणच अंदाज घ्यायचा की कक्षा बदललेल्या आणि न बदललेल्या व्यक्ती कोण आणि किती? कोण जवळ यावेत कोण लांब जावेत असं वाटतं. यालाच भावनिक अंतर मोजणे म्हणतात.
जसा आर्थिक गुंतवणूकीचा विचार महत्त्वाचा तसाच भावनिक गुंतवणूकीचा (इमोशनल इन्व्हेस्टमेंट) विचार महत्वाचा. त्या योग्य परतावा देणाऱ्या असाव्यात.
खेळात जसे आपण सूर्य आहोत तशा इतर व्यक्ती सुद्धा सूर्य आहेत हे लक्षात ठेऊन सूर्याचं सूर्या बरोबरचं नातं कसं किती ते ही पहायचं. ग्रहमाला सूर्यावर अवलंबून की सूर्य ग्रहमालेवर हे तपासून वागायचं. सूर्याने आपलं सूर्यत्व ग्रहांना देऊ नये.
संबंधातले कुठले गुंते आधी सोडवावेत हे त्या संबंधाचं महत्व लक्षात घेऊन ठरवावं लागतं. (प्रॉयॉरिटी ठरवावी लागते) नाहीतर गुंते वाढतात. गुंते सुटले नाहीत तरी गाठी, निरगाठी कमी कराव्या.
मंगला खाडिलकर आणि डॉ. नाडकर्णी हे एकमेकांना समजून घेत आपले विचार मांडत होते. संबंधांच्या गुंत्या विषयी बोलताना डॉ. नाडकर्णी एक गमतिशीर वाक्य बोलले “शिंक, खोकला, उचकी अगदी तस्साच सल्ला. नकोसा असला तरी तो आपल्याला दिला जातों किंवा आपण देतो” ही सल्ल्याची उबळ कशी दाबावी? हे सांगताना डॉ. म्हणाले, “समोरच्या व्यक्तिच्या भावनेकडे लक्ष द्या, त्या लक्षात न घेता सल्ला देवू नका”. हे कसं हे समजावतांना
“या मातीने लळा लावला” या महानोरांच्या कवितेतील “हिरवी बोली समजायला हवी.”
हे वाक्य कमाल होतं.
आपली भारतीय संस्कृती किती विचार संपन्न आहे असं म्हणत डॉ. नाडकर्णीनी गृहस्थाश्रमा नन्तर डायरेक्ट सन्यासाश्रम नाही मधे वानप्रस्थाश्रम आहे. असा उल्लेख केला.
आपण भौतीक आणि भावनीक मधे बौद्धिक गरजा विसरतो. स्मृतीभ्रंश टाळण्यासाठी खात्रीचा उपाय नाही. पण बौद्धिक गरजा वाढवणे ही त्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे. सप्त सोपान हा उपक्रम
अवयव साथ देत नाहीत, शारिरिक विकलांगता असेल तरिही शक्य आहे. पर्याय शोधणे हे महत्वाचं.
ज्या ज्या व्यवसायांना प्रॅक्टिस म्हणतात त्याला निवृत्ती नाही जसं की डॉक्टर, वकील, कलाकार असं म्हणून डॉक्टर म्हणाले की मी आणि मंगल जी तुम्हीं निवृत्त होणार नाही. मदत घेण्याची लाज वाटू देऊ नये. एका गोष्टीत घेणारा हा दुस-या गोष्टीत देणाराही होऊ शकतो. डॉक्टराच्या या मताला दुजोरा देत, मंगल जी म्हणाल्या “मदत घेताना आपला इगो हर्ट होऊ देऊ नये. मला माझ्या वयाचा आदर म्हणून तरूण मुलं मदत करतात आणि हीच मुलं मला मार्गदर्शनाच्या अपेक्षेने प्रश्न विचारतात तेंव्हा परिपक्व जेष्ठत्वाचा आनंद होतो.”
सतत जुन्या म्हणजेच भूतकाळातील गोष्टीच कशा महान होत्या (टॉक्सिक नॉस्टँलजिया) ह्यातून बाहेर या. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्यांना मजेशीर पध्दतीने क्वचित कधी जुन्या गोष्टी सांगा ते मनापासून ऐकतील. (शेयरिंग युवर नॉस्टॅल्जिया.)
विवेकनिष्ट मानस शास्त्र स्वतःत मुरवायला हवं.
अदंभ (ट्रान्परन्सी) म्हणजे जेष्टत्व.
बौद्धिक गरज पूर्ण केली की भावनीक, सोशल, गरजा पूर्ण होतात. जोडलं जाणं वाढवलं की तोडलं जाणं होणार नाही.
मृत्यू विषयी बोलतांना डॉक्टर म्हणाले जीवन कसं जगायचं हे कळल्याशिवाय मृत्यु कसा कळणार? मी चा सार्थ शोध घेतला तर मृत्यूची भीती नाही. “आयसेन्स” डिस्ट्रिब्यूट करा , त्याचा विस्तार करा.
मृत्यु बद्दल बोलताना मंगला जी म्हणाल्या मरण येण्याआधी माझं हे करायचं राहिलंय अशी वृत्ती ठेवत, स्वप्नपहा. डॉक्टरांनी आपल्या सासूबाई इंटरनेटच्या माध्यमातून कशा देश विदेश फिरत असतात ते सांगितलं.
परिपक्व वृध्दत्व कसं असावं हे सांगताना मंगला जीं नी सुमन कल्याणपुर यांच उदाहरण दिलं. गाणं सोडलं त्यानंतर त्यांनी विविध छंद जोपासले. त्या सतत काहीना काही करत रहातात. त्यांच्या साधेपणात परिपक्व वृध्दत्व अधीक सुंदर दिसतंय.
ओनली बॉडी हँज डेट ऑफ बर्थ ॲन्ड डेथ, रेस्ट ईज लेगसी. अटलजींची मैं बूढ़ा हो चला हूँ… ही कविता
आयुष्यात रंग भरण्यासाठी अर्थपूर्ण जगण्याचा लोलक शोधायला हवा. अशा विवेकी विचार करायला प्रवृत्त करणा-या अनेक गोष्टी ऐकण्यात श्रोते मग्न होते.
कार्यक्रमाची सांगता करताना डॉक्टर नाडकर्णी म्हणाले असं अर्थपूर्ण जगणं म्हणजेच हा लोलक आणि हाच वारसा. असा वारसा सिध्द करण्याचा प्रवास म्हणजेच “सप्त सोपान”!
या कार्यक्रमाला मी एक श्रोता म्हणून उपस्थित होते. मला जे समजलं, लक्षात राहिलं ते लिहिण्याचा हा प्रयत्न. अनावधानाने काही चूक झाली असेल तर क्षमस्व 🙏
चारुलता काळे.
9821806827
————————-
टिप्पण्या