शारीरिक आणि भावनिक आधारासाठी योग!
शारीरिक आणि भावनिक आधारासाठी योग!
योग हा शब्द आपल्याला माहीत आहे. बोलताना आपण तो आपण बरेचदा वापरतो ही. “योगा योगाने भेटलो.” ,”मला अमूक काही करायचय पण योग नाही आला.”, “या सगळ्या योगाच्या गोष्टी!” ही अशी अनेक वाक्ये आपण बोलतो आणि ऐकतो. या वाक्यातील ‘योग’ या शब्दाचा अर्थ ‘जमून येणे’ पण आज आपण ज्या “योग” (योगा) बद्दल विचार करणार आहोत तो त्याहून वेगळा.
आजचा विषय आहे, ‘शारीरिक आणि भावनिक आधारासाठी योग!’ यातला ‘आधार’ हा शब्द विचारात घेतला तर लक्षात येतं की जे कमकुवत आहे, नाजूक आहे, शक्तिहीन आहे, अशाच गोष्टींना आधार लागतो. त्याच बरोबर ज्या गोष्टी महत्वाच्या असतात त्यांचीही विशेष काळजी म्हणून तशी गरज वाटली नाही तरिही आपण त्या गोष्टींना आधार देतो.
माणसाचं शरीर आणि मन ह्या त्याच्या जीवनासाठी अत्यावश्यक गोष्टी. सुदृढ शरीर आणि मन ह्याच्या पेक्षा मौल्यवान काहीच नाही. शरीर आपण पाहू शकतो पण मन ही संकल्पना आहे, जी पहाता येत नाही. हृदय आणि मन ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बरेचदा आपण त्या एकाच अर्थाने वापरतो. हृदय हा शरीराचा एक भाग, एक अवयव पण मन म्हणजे विचार, भावना, संवेदना. हे मन खरंतर आपल्या मेंदू ह्या शरिराच्या एका भागाशी संबंधीत आहे. मेंदू हा विचार आणि इतर मानसिक कार्यांसाठी आधारभूत अवयव आहे, तर विचार ही मेंदूमध्ये तयार होणारी एक प्रक्रिया आहे. या दोन गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात आणि त्या मानवी अनुभव आणि वर्तनासाठी आवश्यक आहेत.
योगाभ्यास केल्याने आपण आपल्या शरीराची आणि मनाची स्वतः बरोबर नीट ओळख करून घेतो. योगाच्या आधाराने आपलं शरीर आणि मन आपला चांगला जोडिदार बनते आणि जगणे सुन्दर होते. हे कसं ते समजून घेण्यासाठी आधी योग म्हणजे काय हे समजून घेणे महत्वाचे.
माणूस शहरात रहाणारा असो वा खेड्यातला, भारतात “सूर्य नमस्कार” हा योगातला महत्वाचा घटक बहुतेक सर्वांना माहीत असतो. कधीकधी सूर्य नमस्काराचा योगाशी असलेला संबंध मात्र माहीत नसतो. माझे बालपण ज्या गावात गेले तिथे आम्ही सर्व मुले सूर्याची बारा नावे घेत बारा सूर्य नमस्कार घालायचो आणि मग बरेचदा तिथून रामतीर्थ या तळ्यावर पोहायला जायचो. ओम, प्राणायाम हे शब्दही ऐकले होते. हातात जपमाळ घेऊन जप करणारे, ध्यान करणारे आजी आजोबा आपण पाहिलेले असतात. पण खरा ‘योगाभ्यास’ म्हणजे काय हे बरेचदा माहित नसते.
आपण नीट निरीक्षण केले तर योग नैसर्गिक आहे असे म्हणावे लागेल कारण सर्व सजिवांमधे तो कुठल्या ना कुठल्या स्वरूपात जाणवतो. निर्जिव वस्तुंच्या गुणधर्मावरून, स्थिती वरूनही योगात त्याचा समावेश होतो. उदाहरणार्थ पद्मासन, वज्रासन, शवासन, भुजंगासन, ताडासन, वृक्षासन, अर्धमत्स्येंद्रासन, हलासन, पवनमुक्तासन, धनुरासन, मयूरासन, पश्चिमोत्तानासन, मत्स्येंद्रासन, सिंहासन, भद्रासन, स्वस्तिकासन, गोमुखासन, वीरासन, कूर्मासन, कुक्कुटासन, उत्तानकूर्मासन. इ.
माणसाच्या विचार करण्याच्या आणि अनुकरण करण्याच्या क्षमतेतूनच योगाचा जन्म झाला असावा. योग महत्त्वाचा आहे याची जाणीव झाली, ही जाणीव कृतीतून आचरणात आणली गेली आणि त्याचे शरीर आणि भावना यांच्यासंदर्भात फायदे दिसायला लागले.
आज आपण “YOGA” असं ज्याचं इंग्रजीत शब्दलेखन (स्पेलिंग) केलं जातं त्या “ योग” बद्दल विचार करणार आहोत. मराठीत 'योग' या शब्दाचा अर्थ 'जोडणे', 'जुळवणे' किंवा 'एकत्र करणे' असा होतो. हा शब्द संस्कृतमधील 'युज्' या धातूपासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ 'जोडणे' किंवा 'एकत्र येणे' असा आहे.
योगशास्त्राचा इतिहास खूप प्राचीन म्हणजे साधारणतः ५००० वर्षांपूर्वीचा आहे. भगवान शिव यांना पहिले योगी किंवा आदि योगी मानले जाते. योगशास्त्राचे मूलभूत सिद्धांत भारतीय उपखंडात वेदांमध्ये आणि उपनिषदांमध्ये आढळतात. ऋग्वेद, अथर्ववेद, उपनिषद आणि महाभारतात योगाचा उल्लेख आहे.
पतंजली योग हा योगशास्त्रातला महत्वाचा टप्पा. इ.स.पू. दुसरे शतक (अंदाजे २०० BCE) मध्ये, पतंजलींनी योगसूत्रे लिहिली, ज्यात योगाच्या पद्धती आणि तत्त्वज्ञानाचे पद्धतशीर वर्णन आहे. पतंजलींनी अष्टांग योगाचे वर्णन केले आहे, ज्यात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यांचा समावेश आहे.
रामदास स्वामी आणि योग यांचा संबंध खूप जवळचा आहे. त्यांनी केवळ भक्ती आणि ज्ञानाचाच उपदेश केला नाही, तर 'हिंदवी स्वराज्य योग' आणि 'शारीरिक-मानसिक आरोग्य' यांसारख्या विषयांवरही मार्गदर्शन केले.
सामान्यतः योग हा शब्द योगासने, प्राणायाम या विषयी वापरला जातो पण योगाचे भक्ति योग, ज्ञान योग, कर्म योग, हठ योग, राज योग असे अनेक प्रकार म्हणजेच मार्ग आहेत.
योग आपल्याला माहित होता पण आधुनिक समाजात त्याचे महत्व कमी होत गेले होते. योग हा वयस्कर मंडळीसाठी असतो असा समज होता. टेलिव्हिजन आला आणि राष्ट्रीय वाहिन्यांवर क्वचित योग संबंधित कार्यक्रमांची सुरुवात झाली. बाबा रामदेव यांचे नाव माहित झालं. टेलिव्हिजन पाठोपाठ मोबाईल आणि इन्टरनेट अशा गोष्टींमुळे तरूण वर्गाला सुद्धा योगाचं महत्त्व लक्षात आले.
योग हा आपला सांस्कृतिक, आध्यात्मिक, वैज्ञानिक, पारंपरिक वारसा आता संपूर्ण जगात ज्ञात आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाला (International Day of Yoga) जगभरात मान्यता मिळाली आहे आणि तो २१ जून रोजी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने (United Nations) २०१४ मध्ये या दिवसाची घोषणा केली, संयुक्त राष्ट्र संघाची मान्यता मिळाल्यानंतर योगाचे महत्त्व आणि फायदे जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवता येत आहेत.
पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून २०१५ रोजी नवी दिल्लीतील राजपथ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली साजरा करण्यात आला. आता हा दिवस जगभरात साजरा होतो.
शारीरिक आणि भावनिक अशा दोन्ही गोष्टींसाठी योगाभ्यासाचा आधार निश्चितच फायदेशीर ठरतो हे आता शास्त्रीय वैद्यकीय दृष्ट्या मान्य झालेले आहे.
योगाचे तीन प्रकारचे महत्त्वाचे फायदे आहेत.
शारीरिक फायदे
योगासनांमुळे शरीराची लवचिकता, ताकद आणि संतुलन सुधारते. पचनक्रिया, झोप यांसारख्या गोष्टींमध्ये सकारात्मक बदल होतात.
मानसिक फायदे
योगामुळे तणाव कमी होतो, एकाग्रता वाढते आणि मानसिक शांती मिळते. विचारांच थैमान कमी होऊन, विवेकीपणाने निर्णय घेण्याची क्षमता वाढते.
आध्यात्मिक
योग आपल्याला आत्म्याशी जोडतो आणि जीवनाचा अर्थ शोधायला मदत करतो. मानवता हाच परमात्मा याची जाणीव करून देतो.
शारीरिक आणि भावनिक आधारासाठी योग!
यातील योगाचे शारिरीक फायदे कोणते व कसे ते आधी पाहू.
योगासनांमुळे शरीरातील स्नायू बळकट होतात आणि सांध्यांची लवचिकता वाढते. यामुळे शरीर अधिक चपळ आणि मजबूत होते. इतर व्यायाम प्रकारात अनेकदा शरीराची लवचीकता रहात नाही शरीर मजबूत होते पण ते वळत नाही. म्हणूनच आधुनिक पद्धतीचा व्यायाम करणारे लोकही आता योगासनेही करतात.
योगामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे विविध आजारांशी लढण्याची क्षमता सुधारते. कोविडच्या काळात योगाचे महत्व अधोरेखित झाले. अनेकानी नेती, कपालभाती, भस्त्रिका ह्या सारख्या गोष्टी श्वसन मार्ग शुध्दीसाठी अवलंबिल्या होत्या. बाहेर पडणे शक्य नसल्याने चालणे, पोहोणे, मैदानी खेळ, जिम, व्यायामशाळा यातील काहीच शक्य नव्हते. ऑनलाइन योग गुरूंच्या मार्गदर्शनात योगाभ्यास मात्र शक्य होता.
योगासने पचनसंस्थेला चालना देतात, योगाभ्यासात अहार विहार या गोष्टींचाही विचार केलेला आहे. ज्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या कमी होतात आणि पचनक्रिया निरोगी राहते.
नियमित योगाभ्यासामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. रक्ताभिसरण क्रिया सुधारते.
प्राणायामासारख्या श्वासोच्छ्वास तंत्रामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि श्वसनसंस्था अधिक कार्यक्षम होते. मेंदूला तरतरी येते. उत्साही वाटते.
काही विशिष्ट योगासने आणि प्राणायाम तसेच आहार याची वजन कमी होण्यास आणि नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. अत्यंत कृश आणि अशक्त व्यक्तींनाही फायदा होऊन शरीर सुडौल होऊ शकते.
योगामुळे शरीराची ठेवण (Posture) सुधारते, पाठीचा कणा, मान या गोष्टींबद्दल सजगता आली की पाठदुखी आणि इतर शारीरिक वेदना कमी होतात.
योग आणि आयुर्वेद यातील खाण्यापिण्याच्या सवयी, आहारा संबंधीचे विचार, लंघन, उपवास या बद्दलच्या सूचना यांत साधर्म्य दिसते.
येगाभ्यासात शरीर आणि मन या दोन्ही गोष्टींना महत्व आहे. स्वस्थ शरीर आणि स्वस्थ मन हेच योगाचे उद्दिष्ट आहे. योगामुळे मानसिक फायदे होतात.
योग आणि ध्यानामुळे मनाला शांतता मिळते, ज्यामुळे ताणतणाव, चिंता आणि नैराश्याची लक्षणे कमी होतात. योग करणारी व्यक्ती व्यसन, नशा यांसारख्या गोष्टींच्या आहारी जात नाही.
योगामुळे मनाची एकाग्रता आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. विद्यार्थी, कलाकार यांना त्याचा फायदा होतो. कार्यकुशलता वाढल्याने कुठलेही कार्य उत्तम पद्धतीने करता येते, ज्यामुळे आर्थिक समृद्धी तसेच सामाजिक मान्यता प्राप्त होते.
स्पर्धा आणि धकाधकीच्या जीवनात माणसं नेहमीच तणावात असतात. योगाभ्यासामुळे मन शांत आणि स्थिर होते, ज्यामुळे आंतरिक शांतीचा अनुभव येतो.
योगामुळे वर्तमान क्षणात राहण्याची आणि स्वतःच्या भावना व विचारांबद्दल अधिक जागरूक होण्याची क्षमता वाढते. साक्षीभावाने जगण्याची सवय लागली की मन प्रसन्न राहते.
नियमित योगामुळे मेंदूतील रसायनांचे संतुलन राखण्यास मदत होते, ज्यामुळे मनःस्थिती आणि भावस्थिती सुधारते आणि सकारात्मकता वाढते.
शारीरिक आणि मानसिक आरोग्यात सुधारणा झाल्यामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.
योगाचे हे फायदे लक्षात आल्यावर आता योगाच्या अनेक शैली, पध्दती विकसित झाल्या आहेत, होत आहेत. तिरूमलई कृष्णमाचार्य, बी.के.एस.आयंगर, स्वामी शिवानंद, परमहंस योगानंद, बाबा रामदेव, श्री श्री रविशंकर आणि सद्गुरु जग्गी वासुदेव या योग गुरूमुळे संपूर्ण जगाला योगाचे महत्व समजले आहे. भारतात ऋषिकेश, वाराणसी, गोवा, केरळ( आयुर्वेद आणि योगा), तसेच थायलंड, इंडोनेशिया, श्रीलंका अशी ठिकाणे योगाभ्यासाची केंन्द्र बनली आहेत.
योग हा केवळ एक व्यायाम नाही, तर ती एक संपूर्ण जीवनशैली आहे जी शारीरिक आणि मानसिक म्हणजेच भावनिक अशा दोन्ही स्तरांवर आपल्याला निरोगी आणि आनंदी राहण्यास मदत करते आधार देते.
माणूस शरीराने किंवा मनाने कमकुवत झाला की त्याला उभारी देणारं वाक्य आहे ,”योगा से होगा!“ योग हा शारीरिक आणि भावनिक आधार देणारा आहे. योग भारतीय जीवनशैलीचा अभिमान आहे! योग हा भारताची शान आहे!
चारुलता काळे
9821806827
टिप्पण्या