भारतातील पारंपरिक सण आणि उत्सव
भारतातील पारंपरिक सण आणि उत्सव
आज गणपती आगमन कानठळ्या बसवणा-या डी जे च्या आवाजाने त्रस्त होऊन मी माझ्या घराचे खिड़की दरवाज़े घट्ट बंद केले. टीव्ही सुरू केला तिथेही गणराजाच्या बातम्या आणि मोबाइलवर त्याच संदर्भातील पोस्टस्. “ह्या धाबडधिंग्याचा नुसता कंटाळा आलाय!” असं म्हटलं आणि पंखा सुरू करत सोफ्यावर मागे मान टाकून बसले. गार हवेने देह सुखावला आणि पंख्याच्या फिरणा-या पात्यांकडे पहाताना मन मात्र त्याच गतीने थेट कोकणात बालपणातल्या गणपती बाप्पाच्या जवळ पोचलं. वैतागलेल्या मनाला ती आठवण उत्साहित, आनंदित करून गेली.
गणपती वरून सुरू झालेल्या या विचारा पाठोपाठ पारंपारिक भारतीय सण आणि उत्सव यांच्या विषयीच्या विचारांची मनात गर्दी झाली.
जगात अनेक देश आहेत. प्रत्येकाच्या आपल्या परंपरा, सण, उत्सव आहेतच पण आपला भारत देश हा ह्या बाबतीत अव्वल, अद्वितीय!
उगवत्या सूर्याला नमस्कार आणि तो मावळत असतांना तिन्हिसांजेला दिवा लावून त्याला वंदन करण्याची आपली परंपरा. मदर्स डे आणि फादर्स डे आता आपणही साजरे करतो पण अनादी काळापासून आपण मात्यापित्यांना देव मानून त्यांची सेवा करतो. आपले गुरू आपला देव. आपलं देवाकडे मागणं सुद्धा संपूर्ण विश्वासाठी. संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीच्या शेवटी देवाला केलेली प्रार्थना ‘पसायदान’, ज्यात सर्व प्राणीमात्रांमध्ये प्रेम, सलोखा निर्माण व्हावा, वाईट विचार दूर व्हावेत आणि सर्वांना सुख-समृद्धी मिळावी अशी विनंती केलेली आहे.
सण म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक किंवा धार्मिक, कारणांनी साजरा केला जाणारा विशेष उत्सव, प्रसंग. सणांचे अनेक प्रकार आहेत जसे की राष्ट्रीय सण उ.दा. देशाचा स्वतंत्रता दिवस, घटना दिवस, राष्ट्रीय नेत्यांच्या आठवणींसाठीचे काही विशिष्ट दिवस. धार्मिक सण जे धर्मातील चाली परंपरांप्रमाणे साजरे होतात. आणि कापणी झाल्यावर पिकं हातात आली की साजरे होणारे हंगामी सण.
भारतात अनेक धर्म आहेत आणि त्या त्या धर्माचे खास सण उत्सव आहेत. बरेचदा दुसऱ्या धर्माचा आदर करत एका धर्माचे लोक दुस-या धर्माचे सण उत्सव साजरे करतात. विविध धर्म, पंथ, परंपरा, चालिरीतीच्या लोकांचा एकमेकांना सोबत घेऊन जगण्याचा हा जल्लोष!
महत्वाच्या हिंदू सणांच्या यादीत गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, गणेशोत्सव, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन,गोकुळाष्टमी,दसरा (विजया दशमी), दिवाळी, मकर संक्रांती, महाशिवरात्रि, होळी
हे सण येतात तसेच कुंभमेळ्या सारखे धार्मिक उत्सव येतात.
मुस्लिम धर्मातील प्रमुख सणांमध्ये ईद-उल-फित्र (रमजान ईद) आणि ईद-उल-अझहा (बकरी ईद) हे दोन सण आहेत. याशिवाय, मोहरम, शब-ए-बरात, आणि शब-ए-मेराज हे देखील महत्त्वाचे सण आहेत,
ख्रिश्चन धर्मातील प्रमुख सण आहेत, नाताळ, ( ख्रिसमस), ईस्टर आणि पेंटेकोस्ट. जे येशू ख्रिस्ताच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना, जसे की त्याचा जन्म, मृत्यू आणि पुनरुत्थान, यांच्याशी संबंधित आहेत.
पारशी (झोरोस्ट्रियन) समुदायाचे मुख्य सण आहेत, नवरोज (नवीन वर्ष), पतेती (वर्षाचा शेवटचा दिवस), फर्वर्दिन सण, गहंबार सण आणि मेहेरंगण सण.
शीख धर्मियांचे मुख्य सण म्हणजे गुरु नानक जयंती, बैसाखी, होला मोहल्ला आणि गुरु अर्जुन देव जी यांचा शहीद दिन.
बुद्ध धर्मातील काही प्रमुख सण आहेत, बुद्ध पौर्णिमा (वेसाक), धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि आंबेडकर जयंती. याव्यतिरिक्त, परिनिर्वाण दिन, बोधी दिन.
विविध धर्मांच्या या सणांची ही लंबे लांब नावं मी आठवत असतानाच, मोबाईलची बेल वाजली माझ्या अमेरिकेत रहाणा-या लेकीचा व्हिडिओ कॉल होता. तिच्या तिथल्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाले होते. बाप्पाची सजावट, रांगोळ्या, नैवेद्य आणि नटून थटून तयार झालेले दर्शनार्थी, नातेवाईक. भारतीय तर होतेच पण अभारतीय मित्र परिवारही अस्सल भारतीय पारंपरिक पद्धतीच्या पोषाखात होता. नऊवारी साडी नेसलेली माझी मनू कसली गोड दिसत होती. माझे डोळे कौतुकाने पाणावले. तिथली पूजा पहाण्यात मी रंगून गेले.
लेकीचा उत्साह मला नवीन ऊर्जा देऊन गेला. आपल्या पारंपरिक सणांचा मन पुन्हा एकदा आढावा घेवू लागलं.
भारतात हे इसके सण, उत्सव का बरं असतात? या प्रश्नाचं उत्तर आहे, भारताची भौगोलिक परिस्थिती, विशालता, इतिहास, धार्मिक विविधता. या सर्व गोष्टी खास आहेत आणि म्हणुनच भारतीय पारंपरिक सण आणि उत्सवही विपूल तसेच खास आहेत.
भारताची संस्कृती सुमारे पाच हजार वर्षांहून अधिक जुनी आहे आणि ती जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक मानली जाते. या संस्कृतीचा उगम सिंधू संस्कृती आणि इतर सुरुवातीच्या सांस्कृतिक क्षेत्रांपासून झाला असून, तिला हजारो वर्षांचा समृद्ध इतिहास आहे.
भारताची संस्कृती ही धार्मिक सहिष्णुता, विविध भाषा आणि परंपरा, कला आणि अध्यात्मिक वारसा यातून बनलेली एक समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृती आहे. सिंधू संस्कृतीपासून सुरू होऊन, या संस्कृतीने जगभरातील अनेक धर्मांना आश्रय दिला आहे आणि आजही ती आधुनिकतेच्या संपर्कात असूनही स्वतःची ओळख टिकवून आहे.
भारत हा भौगोलिक दृष्ट्या अत्यंत समृद्ध देश आहे.
त्याचं वर्णन करताना म्हणावंस वाटतं,
बर्फाचे चमचमते डोंगर,
उत्तर सीमा, हिमालयाची,
हिरवाईची शाल पांघरुन,
लाल माती ही सह्याद्रीची.
वाळवंट ही आहे येथे,
खळखळणा-या नद्या ही दिसती,
तीन बाजुला या देशाच्या,
सागर लाटा नाच नाचती.
बारा महिने भरपूर सूर्यप्रकाश, अनेक डोंगर, उत्तुंग पर्वत, भरपूर नद्या, विशाल समुद्र किनारा, समृद्ध निसर्ग, या सगळ्यांची महती इथल्या आदिमानवाला समजली. स्वतःच्या समृद्धीत त्याने या पंचमहाभूतांचं महत्त्व ओळखलं. आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तो त्यांच्या समोर नतमस्तक झाला. ती त्याची कृती म्हणजे ‘नमस्कार’, तो या पंचहाभूतांची काळजी घेऊ लागला ती काळजी म्हणजे ‘पूजा’. कदाचित या आदिमानवाने त्याला जे निसर्गाने दिलं तेच त्याला अर्पण केलं तो ‘प्रसाद’ झाला. तो हात जोडून काही बोलला आणि ती झाली ‘प्रार्थना’!
ही कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा म्हणजे सण आणि त्यासाठी आनंदाने एकत्र येणं हा उत्सव.
माझा जन्म कोकणातला. तिथेही अनेक सण, उत्सव साजरे करत मी मोठी झाले. कोकणातल्या सर्व सणात सगळ्यात महत्वाचा गणपती उत्सव. कोकणात गणपती आणताना आमचा उत्साह दांडगा असायचा. झांजा वाजवत “गणपती बाप्पा मोरया!” असा गजर करत घरोघरी गणपती आणले जायचे. सार्वजनिक गणपती सुध्दा असायचे पण तिथे आत्ता सारखा धुडगूस नसायचा.
टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात जनजागृतीसाठी सुरू केलेला हा सार्वजनिक गणेशोत्सव आमच्या बालपणी सांस्कृतिक कार्यक्रमांनी बहरायचा. भजन, कीर्तन, कथा कथन, सांगीतिक कार्यक्रमां बरोबरच ‘खेळे’ सादर केले जात. कोकणातील खेळे हा एक पारंपरिक लोकनाट्य आणि कलाप्रकार आहे जो गणेशोत्सवाच्या निमित्ताने हमखास सादर केला जायचा. ज्यात नमन हा एक महत्त्वाचा भाग असतो. या खेळामध्ये नमन मंडळे पारंपरिक गाणी, कथा आणि नाटकांचे सादरीकरण करतात. हे खेळे म्हणजे कोकणच्या सांस्कृतिक वारशाचा एक अविभाज्य भाग आहेत. एका पायात चाळ बांधून झांजा आणि ढोलक्याच्या ठेक्यावर, गोल फिरत गिरक्या घेत, तरूण मुलांचा हा जोशपूर्ण नाच पहाताना मन दंगून जातं.
कोकणातला शिमगा हा सण सुध्दा तसाच खास. या उत्सवात ग्रामदेवतांच्या पालख्या ढोल-ताशांच्या गजरात मिरवल्या जातात. देऊळ सोडून देव पालखीत बसून आपल्या आंगणात येतो त्याचा हा आनंदोत्सव. स्थानिक लोककला आणि नृत्ये सादर केली जातात. होळी पेटवली जाते. जी वाईट शक्तींचा नाश व सत्य आणि धार्मिकतेचे प्रतीक मानली जाते. ज्यातून सामाजिक ऐक्य व सामुदायिकतेची भावना वाढते.
बदलत्या काळात ह्या उत्सवांच स्वरूप बदलत गेलं तरिही मोठ्या शहरांच्या तूलनेत गावात पारंपरिक प्रथा सांभाळून अजूनही साधेपणानं हे सण साजरे होतात.
मुंबईत सर्वच जातिधर्माचे सण साजरे होतात. मुंबईतही गणेशोत्सव साजरा होतोच पण पारंपारिक पध्दतीने साजरा होणारा आणि सर्वांना आकर्षित करणारा मुंबईचा खास सण म्हणजे दहिहंडी. “ढाक्कु माक्कुच्या तालावर” नाचणारे गोविंदा, ढोल ताशाच्या कडकडाटात विविध ठिकाणच्या दहीहंड्या फोडायला उत्सुक असतात. थरावर थर चढवत उभारण्यात येणारे मानवी मनोरे हे त्याचं खास आकर्षण. उंच टांगलेली दही हंडी मानवी मनोरे रचून फोडली जाते. हा उत्सव भगवान श्रीकृष्णाने केलेल्या लोणीचोरीच्या पौराणिक कथेवर आधारित आहे. रोजच्या जगण्यात अत्यंत महत्वाच्या असलेल्या कितीतरी गोष्टींचा दहीहंडीत समावेश असतो. एकमेकांवरचा विश्वास, परस्पर सांमंजस्य, सहकार्य, तत्परता, मेहनत आणि जिद्द या सर्व गोष्टींचा वस्तुपाठ म्हणजे दहीहंडी.
राजकीय पक्षांच्या पाठिंब्याने आता मुंबईचा हा पारंपरिक सण राजकीय झाला आहे. तरिही सामान्य माणसांना तो आपलासा वाटतोच. देश विदेशाचे पर्यटक खास या दहिहंडीचा थरार अनुभवायला भारतात येतात.
महाराष्ट्रात गणेशोत्सव तर गुजरातमध्ये महत्वाचा सण नवरात्र. देवीच्या विविध रूपात तिची पूजाअर्चा करण्याचा हा सण. नवरात्र" म्हणजे मातेच्या नऊ रूपांची उपासना. बंगाल मधे हा सण दुर्गा पूजा म्हणून साजरा होतो. तसंच भारताच्या प्रत्येक प्रांतात नवरात्र वेगवेगळ्या पद्धतीत साजरं केलं जातं. गुजराथ तसेच मुंबईत नवरात्रात गरबा आणि दांडिया आवर्जून खेळला जातो. महिला आणि पुरुष खास पेहराव परिधान करून दुर्गामातेचा जागर करतात. गरबा, दांडियासाठी फेर धरला जातो. गरबा हे पारंपरिक लोकनृत्य असून स्त्रीमधील दैवी स्वरूप, सृजनशीलता आणि जीवन चक्राचे ते प्रतीक आहे. "गरबा" हा शब्द संस्कृतमधील "गर्भ" या शब्दापासून आलेला आहे, ज्याचा अर्थ "गर्भाशय" असा होतो. पारपंरिक गरबा जाळीदार मातीचा घट आणि त्यात प्रज्वलीत असणारा दिव्या भोवती सादर केला जातो. त्या दिव्याला "गर्भदीप" असे म्हणतात.
संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण दिवाळी. ‘प्रकाशाचा सण' म्हणून हा ओळखला जातो, जो अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय दर्शवतो. हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, ज्यामध्ये लोक दिवे लावतात, घरे सजवतात, रांगोळी काढतात, नातेवाईकांना भेटतात आणि मिठाईची देवाणघेवाण करतात. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन (दिवाळी), पाडवा (बलिप्रतिपदा) आणि भाऊबीज या पाच शुभ दिवसांचा एकत्रित उत्सव म्हणजे दिवाळी. दिवाळी म्हणजे सुख समृद्धीचा उत्सव.
भारतातल्या या विविध सणांच उत्सवांचं किती आणि कसं वर्णन करावं! या सर्व सण उत्सवां मागे वैज्ञानिक दृष्टिकोणही दिसतो. संक्रात ह्या सणाला तीळ आणि गूळ ह्या पदार्थांचे सेवन, कारण तेंव्हा थंडी असते. तीळ आणि गूळ ऊर्जा देतात. वट पौर्णिमेला वडाची पूजा करून आपण वृक्षांच महत्व अधोरेखित करतो. नागपंचमीला नागाचं पूजन करून त्याचं महत्त्व पटवून दिलं जातं कारण नाग शेतीचं नुकसान करणा-या उंदराना गिळतात. पोळा हा सण
शेतक-याला मदत करणा-या बैलांची पूजा करून साजरा होतो. वसुबारस ह्या दिवशी गायीची पूजा करून तिच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जाते.
सजीवच नाही तर निर्जीव वस्तूं बद्दलही कृतज्ञता व्यक्त करणारे दसरा आणि दिवाळी सारखे सण जसं की, दस-याला शस्त्रांची पूजा तर दिवाळीत दीप पूजन.
रोजचं जगणं समृद्ध करणारी प्रत्येक गोष्ट पूजनीय. आपल्या देवी देवतांच्या कथांमधुनही आपल्याला योग्य अयोग्याची पारख करून विवेकी बनण्याची प्रेरणा मिळते. दान केलं की पुण्य मिळतं हा विचार सामाजिक बांधिलकी शिकवतो. साधु संताचा आदर, पूजा आपल्याला साधेपणानं जगण्यासाठी प्रवृत्त करते. उपास, व्रतं अन्नाचं महत्त्व लक्षात येण्यासाठी असतात.
आपला आनंद व्यक्त करण्यासाठी आपण सण साजरा करतो. सामाजिक भान राखूनच सण साजरे व्हायला हवेत. दुस-याला कमी लेखून आपली श्रीमंती मिरवणं म्हणजे सण साजरा करणं नाही.
सण आणि उत्सव साजरे करताना, सार्वजनिक ठिकाणी अडचण होईल असे मंडप बांधणे. डोळ्यांना इजा करणा-या क्वचित अंधत्वाचा धोका निर्माण करणा-या लेझरचा उपयोग. कानठळ्या बसतील अशी वाद्य वाजवत मिरवणूका काढणे. सणाच्या पावित्र्याला न शोभणारी अशी दर्जाहीन गाणी वाजवणे. गोविंदा सारख्या मंगल प्रसंगी लोकनृत्य असे गोंडस नाव देऊन उत्तान नृत्यं सादर करणे. बळजबरीने वर्गणी वसूल करणे. राजकीय तसेच पैशाच्या जोरावर कायदा आणि सुव्यवस्था यांची पायमल्ली करणे हे प्रकार निश्चितच निंदनीय आहेत.
व्यापारीकरण, अवाजवी नफा कमावणे, जाहिरातबाजी, अज्ञान, अंधश्रद्धा, अंधानुकरण ह्या गोष्टींमुळे दिवसेंदिवस हे सण, उत्सव म्हणजे अराजकता, गुंडागर्दी करण्याची संधी बनत चालले आहेत.
कायद्याची कठोर कारवाई, समाज प्रबोधन, मूल्य शिक्षण, सामाजिक बांधिलकी ह्या गोष्टी नसतील तर आपले सण आणि उत्सव त्यांचा मूळ उद्देशच हरवून बसतील.
भारतातील पारंपरिक सण आणि उत्सव आजच्या काळात साजरे करताना, जुन्या नव्याची सांगड घालुन, संस्कृतिचा सत्कार करण्याची भावना सतत जागृत ठेवायला हवी.
चारुलता काळे
९८२१८०६८२७
—————
टिप्पण्या