गोष्ट इथे संपत नाही
गोष्ट इथे संपत नाही
रविवार, दि. ५ ऑक्टोबर २०२५, दीनानाथ मंगेशकर नाट्य गृह, विले पार्ले येथे संजीवनी भिडे आणि अटल सेवा केंद्र प्रस्तुत गोष्ट इथे संपत नाही या शीर्षकाखाली, “आग्र्याहून सुटका”, हा सादरकर्ते सारंग भोईरकर आणि सारंग मांडके यांचा अत्यंत सुंदर लक्षवेधी कार्यक्रम पाहिला.
२०१७ पासून ते हा कार्यक्रम करतात. हा कार्यक्रम २१६ वा होता. त्यांचे “गडकिल्ल्यांना भेटी” सारखे इतर उपक्रही आहेत.
सारंग भोईरकर आणि सारंग मांडके यांच्या या कार्यक्रमाची संहिता अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. सादरीकरण कमाल आहे. शाळेत इतिहासाच्या पुस्तकातली ही छोटीशी गोष्ट तशी माहितीची पण ती सादर करताना तिचे अनेक पैलू ते अधोरेखित करत विशद करतात.
कार्यक्रम निवेदन आणि स्लाईडस् च्या माध्यमातून सादर केला गेला. प्रस्तावनेत सारंग मांडकेंनी आपला तसाच सारंग भोईरकर यांचा परिचय देऊन काही सूचना दिल्या. सारंग भोईरकरनी देवीची प्रार्थना आणि छत्रपति शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
ओजस्वी आवाजात सारंग भोईरकर बोलत होते. सुभाषचंद्र बोस यांचे कलकत्याच्या घरातील बंदिवासातून जर्मनीला पलायन. सुभाषचंद्र शिवाजी महाराजांकडे त्यांची प्रेरणा म्हणून पहात असत. आझाद हिंद सेनेची स्थापना आणि “कॉम्रेडस्, फाइट लाइक शिवाजी महाराज!” हे त्यांच वाक्य त्यानी उद्धृत केलं.
—————-
सारंग मांडकेः
पुरंदरचा तह, तळ कोकण मोहीम, मिर्झा राजे सिंहगडावर, फर्मान वाडीचा मंडप (फर्मान स्वीकारताना गुडघ्यावर बसून मान झुकवून ते घ्यावं लागतं.) विजापूर मोहिमेला सुरुवात, महाराजांनी फळटण घेतलं, महाराजांची आग्रा भेट ठरली या अशा महत्वाच्या घटनांवर प्रकाश टाकत. सारंग मांडकेनी हे लक्षात आणून दिलं की पुरंदरच्या तहा नन्तर पदोपदी महाराजांना जाणीवपूर्वक अपमानास्पद वागणूक देण्यात आली.
मिर्झाराजांनी ठरवलं की शिवाजीला उत्तरेला पाठवायला हवं. औरंगज़ेब त्याच्या वडिलांच्या मृत्यु नन्तर आग्र्यात रहाणार होता, महाराज आग्र्याला जायला तयार झाले कारण ती एक राजनैतिक भेट होती. महाराजां बरोबर रघुनाथ कोरडे हे त्यांचे वकील म्हणून होते. महाराज आग्र्याला गेले तेंव्हा जिजाऊ मॉं साहेब स्वराज्याच्या कारभार पहात होत्या त्यांना मदत करायला इतर जाणकार लोकही होतेच.
राजस्थानी लोकांनी केलेल्या वर्णना वरून अनेक गोष्टी समजतात. आग्र्याला महाराजाना पहायला
दुकर्फा गर्दी करून लोक उभे होते. औरंगज़ेबाचा पन्नासावा वाढदिवस होता. महाराजांचा स्वतंत्र राजाचा थाट होता पण रहायला जागा धर्मशाळेत देण्यात आली. आदल्या दिवशी कुठलाही सरदार स्वागताला आला नाही, गिरिधारीलाल मुंशीनी स्वागत केलं.
————————
सारंग भोईरकर
राजकीय भेट असुनही महाराजांना समोरून भेटायला न जाता, मिर्झा राजेंच्या मुलाने रामसिंग कुवरनी ते जिथे होते तिथे महाराजाना बोलावलं हा महाराजांचा अपमान होता. महाराजांना दुय्यम स्थानावर उभं रहायला जागा दिली गेली. त्यांना औरंगजेबाला मुजरा करावा लागला. सारंग भावूक होऊन म्हणाले, “शिवाजी महाराज होणं सोपं नाही.”
महाराजांनी नजराणा दिला. औरंगजेबाने त्याची दखलही घेतली नाही. दरबाराचं कामकाज सुरू होतं मानाची वस्त्र देतांना जसवंत सिंग राठोडला ती आधी दिली गेली. महाराजांची सहनशीलता संपली महाराज रागाने थरथरत खाली बसले. महाराजांना समजवायला रामसिंग धावला. या प्रसंगा नन्तर महाराज पुन्हा औरंगज़ेबाच्या दरबारात गेले नाहीत.
सारंग भोईरकर यांनी औरंगजेबाच्या दरबाराचे कडक नियम सांगून. १२ मे १६६६ या दिवशी औरंगजेबाच्या दरबारात अपमानित झालेला तुमचा माझा राजा गरजला “तुम देख्यो, तुम्हारा बाप देख्यो, तुम्हारा पातशहा देख्यो! म्हणताच श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
हे संगळं झालं पण औरंगजेब शांतच होता. कृर कपटी माणसं शांत राहाण्यातं ढोंग करू शकतात.
सादरीकरणात सारंग एक जबरदस्त नाट्यानुभव देतात. औरंगजेबाच्या स्वप्नात बाबर येतो आणि त्याला सांगतो “मुघलांना जो आदर मिळतो ना तो त्यांच्या कृरतेमुळे. तुझी दहशत आहे म्हणून सत्ता आहे. आज दरबारात ही शिवा नावाची चिनगारी दिसली त्याचा वणवा कधी होईल ते कळणार नाही. तुझ्या डोक्यावर हा बारूद कधीही फाटू शकतो.”
——————
सारंग मांडके
दुसरा दिवस. महाराज दरबारात दिसले नाहीत.
जणू काही ही अपमानाची खणखणीत रीटर्न गिफ्ट होती. नन्तर काय घडलं त्याची पत्र आहेत.
महाराजाना हलवायचं ठरलं रामसिंग अस्वस्थ होता.
काबूल मोहिमेवर जायचं आणि बरोबर महाराजांना न्यायचं. ( वाटेत दगाफटका होईल अशी रामसिंगला शंका होती. महाराजांनी औरंगजेबाची एकांतात भेट मागितली जाफरखानानेच ती नाकारली. (शाहिस्तेखान हा जाफरचा मेहुणा). महाराज जाफरखानला भेटले त्या भेटीनंतर जाफरखानला महाराजांचा आदर वाटू लागला. पुढील तीन दिवस महाराज आग्र्यात मोकळे होते. अनेकांना भेटले. ज्यांना भेटले त्यांच्या मनात महाराजांच्या बद्दल आदरभाव निर्माण झाला.
————-
सारंग भोईरकर
परकालदास यांनी लिहिलेलं शिवाजी राजांच वर्णनः
महाराज कमी उंचीचे, सडपातळ, गौरवर्ण, महाराजां बद्दल जे ऐकलंय ते खरं आहे. ते अत्यंत मुद्देसूद बोलतात. ते सच्चे रजपूत आहेत.
औरंगजेबाचे वर्णन सांगताना सांरंग भोईरकरांनी अनेक गोष्टी सांगितल्या. अगणीत अफजल मरतील तेंव्हा एक औरंगजेब जन्माला येतो. औरंगजेब मृत्यूवा विचार न करता भर लढाईत नमाज पढायचा. त्याने तीनही भावांचा पूर्ण सत्यानाश केला. एकाला तडफडवून मारलं. मेलेल्या भावाच्या कापलेल्या मुंडक्याची खात्री करून घेतली. संगीताची प्रेतयात्रा काढली आहे असं कुणी सांगितलं तेंव्हा तो म्हणाला “नीट पुरा पुन्हा वर नको यायला”.
आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या कथा विविध पध्दतीने माहित असतात.
त्यातल्या अनेक गोष्टी ख-या नसतात. सारंग भोईरनी या कार्यक्रमात आवर्जून सांगितलेल्या या अशा गोष्टींपैकी महत्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यातून सुटका करण्यासाठी मदत करणा-या मदारी मेहतर ह्या व्यक्ती बद्दल कोणताही ग्राह्य पुरावा नाही. तसंच महाराज
पेटा-यातूनच पळाले या संदर्भात चार विदेशी, तीन मोगलांचे इतिहासकार, दोन मराठा संदर्भ आणि परकालदास यांचं पत्र असे दहा पुरावे आहेत.
————-
महाराज आग्र्याला असतांना नेताजी पालकर कान्होजी जेधे, प्रतापराव गुजर, मोरोपंत पिंगळे, जिजाऊ मॉंसाहेब यांनी स्वराज्य सांभाळले.
महाराजांनी आपल्या भोवतीची माणसं कमी करण्यासाठी रामसिंगाला जामिनातून मुक्त हो असं सांगितलं, तरिही फौलाद खानाने दगाफटका करू नये म्हणून रामसिंगानेही पहारा ठेवला. गुंता वाढला. आग्र्यात महाराजांबद्दल अफवांना उधाण आलं. महाराजानी त्या मुद्दामच नाकारल्या नाहीत.
माझ्या जवळ कोणीही नको असं महाराज म्हणाले. बरोबर आलेल्या लोकांना राजगडावर जायचे परतीचे परवाने मिळवण्यात आले. मिर्झा राजेंनी औरंगजेबाला निरोप दिला “शिवाला मारू नका त्याला मित्र करा.” याचं कारण महाराजाना काही झालं असतं तर दक्षिणेत मिर्झाराजे अडचणीत आले असते. आग्र्यातून बाहेर पडण्यासाठी महाराजांच्या संन्यास घ्यायच्या निर्णयावर औरंगजेब म्हणाला, “संन्यास काय कुठेही घेता येतो.” महाराजांच्या साथिदारांना त्यांना सोडून परततांना काय वाटलं असेल! मिर्झा राजेंचा सांगावा राजांना परत पाठवायची गरज नाही आणि त्यानंतर महाराजांना रामसिंगाना भेटायला बंदी.
या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करत सारंगनी कृष्ण जन्म आणि महाराजांचा बंदीवास यातलं तिथी सकट अनेक गोष्टींच साधर्म्य दाखवून बोललेलं एक वाक्य मनाला भिडलं “इथे वसुदेव आणि कृष्ण हे एकच होते, ते म्हणजे आपले शिवाजी महाराज!”
परिस्थितीला शरण न जाणाऱ्या लोकांचे इतिहास बनतात. असं म्हणत आग्र्याच्या सुटकेच्या
नियोजना बद्दल निश्चित माहिती नाही. पण ते पुढच्या घटना पाहिल्या की लक्षात येतं. बहिर्जी नाईकांनी आणि महाराजांनी काय ठरवलं होतं माहित नाही, कदाचित अनेक योजनांचा विचार झाला असेल.
जन्माष्टमीच्या निमित्ताने मिठाई वाटायची आहे असं म्हटल्यावर .. “तुम्ही तर कैदेत आहात.” असं म्हटलं गेलं. त्याच्यावर महाराजांच उत्तर होतं “आमचा नेम आहे, परवानगी द्यायची तर द्या.” ती मिळाली. मौल्यवान धनही परत पाठवण्याची व्यवस्था केली गेली. महाराजांनी त्यांच्या दिनचर्येचं चित्र उभं केलं पहाटे उठून पूजा, सुकामेवा खाऊन झोप. सतत तोंडावर पांघरूण घेणे. सामसुम असायची.
१६ ऑगस्ट गुरुवार औरंगजेबाकडून प्रस्ताव “मनसब कबूलकर आणि संपूर्ण कुटुंब बोलावून घे.” ह्या प्रस्तावाचं गांभीर्य महाराजांच्या लक्षात आलं.
दुसरा दिवस शुक्रवार दरबाराला सुट्टी म्हणून शंभूराज्यांना दरबारात जायचं नव्हतं. ही संधी जायला नको. महाराज आणि शंभूराजे पेटा-यात बसले. ताज्या दमाचे घोडे तयार होते. मथुरेला मोरोपंत पिंगळे यांच्या बहिणीचे यजमान काशीपंत होते. बाप लेकाच्या जोडीचा शोध होईल, मोठ्या अंतराची घोडदौड बाळ राजांना झेपणार नाही, हा विचार करून शंभुराजाना काशीपंताकडे ठेवून महाराज निघाले. आई विनाचं पोर सोडताना काय वाटलं असेल महाराजांना!
१८ ऑगस्ट हिरोजी फरजंद बिछाना सजवून बाहेर पडले. महाराजांच औषध आणायचा बहाणा केला. शंभूराजांना दरबारात न्यायला सरदार आले. तिथे शंभूराजे किंवा इतरही कुणी नव्हतं म्हणून महाराजांना हाक मारली, हळूच स्पर्श केला आणि महाराज आणि शंभुराजे तिथून सटकले हे लक्षात आलं पण हे औरंगज़ेबाला सांगणार कसं?
औरंगज़ेबाला जेंव्हा समजलं त्याने महाराजांच्या वस्तूंची यादी बनवायला सांगितली. “महाराजांच्या वस्तू विका, वाटून टाका हरामाचे पैसे नको.” नन्तर
त्रंबक डबीर, रघुनाथ बल्लाळ कोरडे पकडले गेले.
त्यांचे प्रचंड हाल केले गेले. आधी निघालेले परवानेवाले लोक पकडले गेले पण त्यांना सोडलं. आधी पाठवलेलं धन परत आलं जे औरंगजेबाने जमा केलं. (हरामाचं धन म्हणून नको म्हटलं नाही), औरंगजेब दिल्लीला परत गेला.
मुघलांच्या प्रदेशाला दूर ठेवत, ४० दिवसांचा, साधारण अडीच हजार किलोमीटरचा खडतर प्रवास महाराजांनी पावसा पाण्यातून कसा केला असेल?
महाराजांची आणि मॉंसाहेबांची भेट झाली.
आग्र्याहून सुटका का, कशी झाली. तर महाराजांच्या मनात जिजाऊ मॉं साहेब होत्या. वादळातल्या बोटीला जसं दूरवर दिसणारं लाईट हाऊस तशाच शिवबांसाठी त्यांच्या आई! सारंगनी सती जायला निघालेल्या मॉं साहेबांनी महाराजांच्या शब्दाला मान देऊन, स्वराज्यासाठी आपला निर्णय बदलला ती हृद्य आठवण सांगितली.
कार्यक्रमाचा समारोप करतांना सारंगनी यथार्थ शब्दात लिहिलेली, स्वलिखित कविता सादर केली
ती अशी
डोळ्यात घालुनी तेल जागती,
पातशहाचे पहारे.
प्रचंड जोखीम घेऊन चालती,
मेव्याचे पेटारे.
घेई बैराग्याचे रूप,
वेश राजाचा टाकुनी,
मुगली मुलूख सारा जाई,
अकस्मात हादरुनी.
गेला कैसा? कोठून, केंव्हा?
असे कला मग न्यारी.
चमत्कार हा नसे जराही,
ही तर गरुड भरारी…
जगदंबेचा उदो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करून कार्यक्रम संपला.
मला चा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य. कार्यक्रमाचं शब्दांकन करताना अनावधानाने, अज्ञानाने काही चूक झाली असेल तर क्षमस्व 🙏
चारुलता काळे
9821806827
—————
टिप्पण्या