रविंद्र पिंगे
1.
जेष्ठ साहित्यिक रविंद्र पिंगे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम- ‘स्मरणांजली’!
दि. १५ नोव्हेंबर २०२५, शनिवार, जेष्ठ साहित्यिक रविंद्र पिंगे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘स्मरणांजली’ हा कार्यक्रम, पिंगे परिवाराने आयोजित केला होता. केशवराव घैसास सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला चित्रा वाघ ( रविंद्र पिंगे यांची कन्या) यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. ती सांगण्याआधी रविंद्र पिंगे यांच्या बद्दलचं प्रेम आदर व्यक्त करताना “बाबा गेलेले नाहीत, ते आमच्यात असतातच” असं म्हणून “नभाचा भरोसा जसा, तसा हा दिलासा तुझा, तरी एकदा सांग ना, आहेस ना…” ही काव्य पंक्ती उद्धृत करून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाची सुरुवात रविंद्र पिंगे यांचा साहित्य परिचय तसेच त्यांचे सामाजिक आणि कौटुंबिक जीवन प्रसंग/ क्षण यांचा संक्षिप्त परिचय करून देणा-या ए.व्ही. म्हणजेच ऑडिओ व्हिजुअलने,(ध्वनी चित्रफीत) झाली जी रविंद्र पिंगे यांचा मुलगा सांबप्रसाद पिंगे यांनी बनवलेली होती, संहिता होती चित्रा वाघ यांची आणि आवाज जावई राजू वाघ यांचा.
पिंगे कुटुंब मूळचे विजयदुर्गजवळच्या ‘उपळं’ खेड्यातले, रवींद्र पिंगे ह्यांचा जन्म गुढी पाडव्याच्या दिवशी, मुंबईच्या गिरगावात झाला. वडील रामचंद्र परशुराम पिंगे आणि आई सुभद्राबाई दोघेही मुंबई नगरपालिकेत प्राथमिक शिक्षक म्हणून काम करीत असत. राष्ट्रसेवादलाचं काम, मुंबईतील जुनी पण समृद्ध वाचनालयं, फुटपाथवरील पुस्तकं याच्या संगतीने जगणारा मुंबईकर. ‘चांगलं वाचलं की चांगलं सुचतं’ हा विश्वास. शाळा कॉलेज पासूनच साहित्याची आवड असल्याने लिहिते झाले. साधारण चाळिशीत असतांना लग्न. पहिली कादंबरी परशुरामाची सावली, तिला पुलंची प्रस्तावना आणि पहिला पुरस्कारही मिळाला.
नौदल, रेशनिंग कार्यालयामध्ये नोकरी करीतच, अर्थशास्त्र विषय घेऊन ते बी. ए. झाले. त्यानंतर त्यांना मंत्रालयात नोकरी मिळाली. तेथे पंधरा वर्षे नोकरी केल्यानंतर १९६५मध्ये ते आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात साहाय्यक निर्माता म्हणून रुजू झाले आणि एका चैतन्यमय, साहित्यिक विश्वाशी निगडीत अशा सृष्टीत दाखल झाल्याचा आनंद रविंद्र पिंगे यांना निवृत्तीपर्यंत मिळाला. मंत्रालयाची चांगली नोकरी सोडून आकाशवाणीची कंत्राटी नोकरी घेणं हा निर्णय त्यांचं साहित्य प्रेम दर्शवणारा.
आकाशवाणीने अल्पाक्षरी आणि मुद्देसूद लेखनाचे संस्कार दिले. “मी आकाशवाणीवर फुलं वेचली.” हे त्यांचं वाक्य त्यांनी हे काम किती समरसून केलं हे सांगणारं. रविंद्र पिंगे यांची भ्रमंती, सूक्ष्म निरीक्षण, त्यांना मिळालेले विविध पुरस्कार. उपळे गावाचं प्रेम/ कोकण प्रेम, जनसंपर्क, तरुणां बरोबर पत्रव्यवहार. साहित्यिक संस्थामधे सहभाग. समृद्ध कौटुंबिक आयुष्य. हे सारं ऐकून पाहून श्रोते भारावून गेले. रविंद्र पिंगे यांनी हात नेहमी लिहिता ठेवला. वृद्धावस्थेत आयुष्याच्या अगदी अंतिम टप्प्यावर सुद्धा ‘आईची हाक’ हे बालनाट्य सुचलं ही त्यांची अखेरची नोंद.
—————-
रविंद्र पिंगे यांच्या स्नुषा छाया पिंगे यांनी सूत्रसंचालन केलेल्या भागात काही मान्यवरांनी रविंद्र पिंगे यांच वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवलं.
डॉ. निधी पटवर्धन यांनी व्यक्तिचित्र या विषयावर विशेष अभ्यास केला आहे. अत्यंत मोजक्या शब्दांत त्यांनी रविंद्र पिंगे यांच्या साहित्यावर आपले विचार फार प्रभावीपणे मांडले. सदैव मनात राहील अशी एक आठवण सांगताना त्या म्हणाल्या “शालेय जीवनात मी त्यांचा ‘कोकणातले दिवस’ हा धडा वाचून प्रभावित झाले आणि रविंद्र पिंगे या लेखकाला मी पहिलं पत्र लिहिलं आणि विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे त्या पत्राला त्यांनी उत्तर दिलं.” व्यक्तिचित्र या साहित्य प्रकाराचा अभ्यास करताना त्यांच्या साहित्याचा अधीक परिचय झाला. रविंद्र पिंगे यांच वाङ्मयीन व्यक्तिमत्व कसं तयार झालं या विषयी त्यांनी विचार मांडताना त्यांनी शामची आई, कारागृहाच्या भिंती यांचा उल्लेख करून रविन्द्र पिंगे यांच्यावर टिपणं काढणं ह्या गोष्टीसाठी व्यंकटेश माडगूळकर, दुर्गा भागवत यांचा प्रभाव असल्याचं नमूद केलं. कुठल्याही व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व हे अशा विरोध, तटस्थता, सहकार्य करत घडतं. रविंद्र पिंगे यांचं व्यक्तिमत्व हे जीवनोत्सुकता गुणग्राहकता यातून घडलं. कथात्मक साहित्य प्रकारात सुरुवात आणि मग ललित लेखन, व्यक्तिचित्रण ह्या त्यांच्या साहित्यात पहाणं, टिपणं, पोहोचवणं हे त्यांनी फार उत्तम पध्दतीने केलं. रविंद्र पिंगे यांच लौकिक व्यक्तिमत्व म्हणजे जीवनातल्या दुखांच भान ठेवून सुखी होणं.
—————-
2.
रविंद्र पिंगे यांच्या निवडक साहित्याचं अभिवाचन ही श्रोत्यांना आनंदाची पर्वणीच होती. छाया पिंगे यांच्या मार्मिक सूत्र संचालनातून ते सादर झालं.
‘ललितलेखकाला बिलगलेलं कोकण’- अभिवाचन आशीष जोशी (रंगकर्मी). लक्षणीय मुद्देः
कोकणी विश्व माणसांच्या मानगुटीस बसतं. मनातल्या मनात पालवत रहाणारं. विजयदुर्गच्या कशिद्यामधला रंगीत ठिपका म्हणजे उपळं गाव. तिथलं पडकं घर पाहून मनात येतं. “होतं काय उरलं काय!” रात्रीच्या मिट्ट काळोखाची आठवण. काजळा सारखा दाट मिट्ट काळोख. गावातल्या लोकांच चंद्र सूर्याच्या उजेडावर जगणं. ती अखंड अंधारयात्रा. तो सुंदर काळोख आता नवस करुनही लाभणार नाही.
——
‘पर्ल बग-फुलं वाटणारी लेखिका’- अभिवाचन राजू वाघ. लक्षणीय मुद्देः
वाङ्मयात नोबल पारितोषिक मिळवलेली लेखिका. तिची कहाणी. नव-याचं नीधन झाल्यावर संपादकाने अनेकदा लग्नाची मागणी केली. ती नाही म्हणत राहिली. अखेर लग्न झालं. पुढे त्याला अंधत्व आलं, बहिरा झाला आणि नन्तर सर्व संवेदना संपत गेल्या. स्वतःच्या आयुष्यात इतके काटे असूनही पर्ल बग तिच्या साहित्याची फुलबाग सजवत राहिली.
——————
चतुरंग प्रतिष्ठानने बाबासाहेब पुरंदरे यांना जीवन गौरव पुरस्कार दिला होता. त्या जीवन गौरव पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन शैक्षणिक क्षेत्रात विशेष योगदान असलेल्या डॉ. स्नेहा देऊस्कर यांनी केलं. 15 नोव्हेंबर बाबा साहेबांची पुण्यतिथि या दिवसाचे औचित्य साधून त्यांच्या बद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी या मानपत्राचे वाचन ही अत्यंत समर्पक अशी संकल्पना. हे मानपत्र म्हणजे शिवशाहीर बाबासाहेबांच्या कतृत्वाचा, कार्याचा सन्मान!
——————-
‘मी तंन्द्री अनुभवतो’ अभिवाचन- छाया पिंगे. लक्षणीय मुद्देः
रविंद्र पिंगे लेखक म्हणून स्वतः बद्दल दिलखुलास लिहितात. मी इतर कुठल्याही कलेच्या मागे, छंदाच्या मागे गेलो नाही कारण माझ्यात लेखन विद्या मुरलेली आहे याची जाणीव. लेखन करून मला वाचकांबरोबर मानसिक हस्तांदोलन करता येतं. लेखन करताना माझी तंद्री लागते. तंद्री- जीव बहरून टाकणारा अनुभव. लेखन ही उपासकाची भूमिका. माझा जीव इवलासा असला तरी तो आहे. लेखनक्रिया आंगवळणी पडली आहे. कागद दिसला की मी लिहितो. मी खूप मोठा प्रथितयश लेखक नसलो तरी साहित्यिकांमधे दुसऱ्या रांगेतली पहिली खुर्ची माझी असं पिंगे म्हणत.
———-
‘अंदमानचा पाहुणा’- कथा कथन सुप्रसिद्ध कथाकार मंजिरी देवरस.
खुनाच्या खटल्यात अडकलेला दामोदर काळ्या पाण्याची शिक्षा सोसून परतलेला. नेहमीच कुठल्याही पाहुण्याचा जसा जमेल तसा पाहुणचार करणारे पिंगे मास्तर त्या आगंतुकाला तो खुनी असेलही पण आता शिक्षा भोगून आलाय म्हणून त्याला घरात घेतात. पण आई त्याला ठेवायला तयार नाही. पिंगे मास्तरांकडे असा खुनी पाहुणा आल्याचा गवगवा, निषेध. चाळक-यांनी दबाव आणल्याने दामोदरला किमान खायला घालून त्याला गुपचूप एक रुपया देऊन नाइलाजाने त्याची रवानगी. तो निघाला पण कुठे जाईल ह्या विचाराने मास्तरांच मन अस्वस्थ. तो गेला पण तो कुठे गेला हा लेखकाच्या बालमनाला आणि नंतरही अनेकदा भेडसावणारा प्रश्न…
कथा इतकी प्रभावी की आता तो प्रश्न कथा
ऐकणा-या प्रत्येकाच्या मनात घर केलेला…
———-
3.
चित्रा वाघ यांनी कार्यक्रमाच्या पुढील भागाची सूत्र सांभाळली रविंद्र पिंगे यांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले मान्यवर बोलणार होते. ठरवलेल्या वेळची मर्यादा सांभाळून सर्वच वक्ते फार छान व्यक्त झाले.
जेष्ठ साहित्यिका माधवी कुंटे- प्रस्थापित लेखिका नसताना ‘मी एक खलाशी’ लिहिलं. प्रकाशनाला रविंद्र पिंग्याना बोलवायला गेले. ते नेहमीच नवोदितांना मार्ग दर्शन मदत करत. वाचकांच्या क्वचित झालेल्या टीकेने मी जेंव्हा व्यथित झाले तेंव्हा पिंग्यांनी सल्ला दिला “पुस्तक लिहून झालं की लोकार्पण करांव. वाचक जे म्हणतात त्यावर फार विचार करू नये. अडचण आली की ती गोष्ट आपल्या परीने करायला प्रवृत्त करून पिंगे मार्गदर्शन करीत. कोमसापची पार्ले येथे सुरुवात झाली तेंव्हा स्वतः अध्यक्ष न होता त्यांनी मला संधी दिली. अशा अनेक गोष्टी सांगण्यात माधवी कुंटे रंगून गेल्या.
किशोर सोमण- “आकाशवाणी पार्ले केंद्र”, अशी मजेशीर सुरुवात करत बोलायला सुरुवात. लेखक म्हणून पिंगे आवडायचे. पिंग्याना भेटायला गेलो पण भेट झाली नाही पण आपली आवड या कार्यक्रमाची सोमण यांनी केलेली उदघोषणा ऐकून पिंग्यांनी त्यांना भेटायला बोलावून कौतुक केलं. पिंग्यां बद्दल बोलताना सोमण यांची अनेक वाक्य भावली “वरवर पाहू नको, तळा पर्यन्त जा आणि तिथे जे दिसेल त्या बद्दल साशंक रहा असं वागणारी सांगणारी ही माणसं.” “ काहीही लिहिताना त्याची सत्यता तपासून पहावी, त्या बद्दल पुरावा असावा, लेखक आणि वाचक दोघांना फायदा होईल असं लिहावं.”
पिंगे मिश्किल विनोदी होते ते कसं हे सांगतांना पत्नीची ओळख करून दिल्यावर “अरे गेल्यावेळी कुणा दुसऱ्या बाईचा असा परिचय करून दिला होतास!” असं पिंगे म्हणाले. हा किस्सा त्यांनी सांगीतला.
सारंग दर्शने- रविंद्र पिंगे यांच्या कुटुंबाने ज्या पद्धतीने त्यांची शताब्दी साजरी केली त्याचं कौतुक केलं. रविंद्र पिंगे यांच्याशी मटा पुरवणी लिहितांना परिचय झाला. रविंद्र पिंगे नेहमीच आपल्या लिखाणात ठरवून दिलेली विशिष्ट शब्द संख्या काटेकोरपणे ठेवायचे. पाठकोरे कागद वापरायचे, अम्रुता प्रीतम वरील लेखाचं उदाहरण देऊन दर्शने म्हणाले की पिंगे लिहिलेल्याच्या पलिकडचं गप्पांमधून सांगायचे. व्यक्तिचे उमाळ्याने गुण संकीर्तन करायचे. रविंद्र पिंगे यांना मांगल्याची ओढ होती. त्यांची समधाक वृत्ती. ( समधाक वृत्ती हा शब्द मला नवीन होता त्याचा साधारण अर्थ ‘विवेकी’ असा असावा). पिंगे काय लिहावंस वाटतं याची नोंद ठेवत. ते आजारपणात हलले डगमगले नाहीत कारण त्यांना आध्यात्मिक बैठक होती. रविंद्र पिंगे यांनी आपल्याला दिलेला वारसा म्हणजे समाजातील मांगल्यांवर विश्वास ठेऊन ते सांगावं त्याचा जागर करावा.
श्याम जोशी- आत्ता पर्यंत रविंद्र पिंगे यांच्या बद्दल बरंच काही सांगितलं गेलं. कुठला मुद्दा राहिला असा विचार केला तर तो म्हणजे पिंग्यांचा कुटुंबवत्सल स्वभाव. तो स्वभाव उलगडतांना जोशींनी, लेकीच्या आग्रहाखातर तिच्या नावाने पिंग्यांनी पुस्तकाची अर्पण पत्रिका केली हा किस्सा सांगितला. रविंद्र पिंगे यांनी मंत्री बाळा साहेब देसाईंची बरीचशी भाषणं लिहिली अशी माहितीही त्यांनी सांगितली.
विद्याधर निमकर- निमकरांच्या प्रत्येक वाक्यात रविंद्र पिंगे यांचा घनिष्ठ सहवास लाभल्याने त्यांच्या बद्दलची आपुलकी जाणवत होती. पिंगे गोष्टिवेल्हाळ होते. पिंग्यांच्या लिखाणावर प्रेम जडलं. त्यांची वेगळीच शैली. माहित असलेल्या गोष्टी सुद्धा पिंगे त्या अचूक पकडून सांगतात. पिंग्यांना भेटण्याची संधी मिळाली तेंव्हा भारावून गेलो. लपून पिंग्यांना न्याहाळत बसलो. चतुरंगसाठी पिंग्यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली आणि त्याचा साधेपणा पाहून पुन्हा प्रेमात पडलो. रविंद्र पिंगे नेहमी प्रत्येकाची आत्मीयतेने चौकशी करायचे. चतुरंगमुळे वारंवार भेटलो. सहली झाल्या. बार्जवरच्या गप्पांचा मजेदार किस्सा सांगताना निमकर म्हणजे “बार्जवर गप्पा ठरवल्या की लोकं निघून जाऊ शकत नाहीत.” रविंद्र पिंगे यांना चतुरंग जीवनगौरव पुरस्काराच्या निवड समितीवर घेतलं गेलं कारण ते आपले वाटायचे. पिंग्यांना माणुसकी बद्दलचं प्रेम, कौतुक होतं. निमकरांच्या नातवाच्या मुंजीला पिंगे कोकणातल्या आडगावात बसने पोहोचले.
रविंद्र पिंगे हे चतुरंगची मानपत्र लिहायचे. त्यांनी लिहिलेली १३ ते १४, मानपत्र दिली गेली. शिवाय जवळपास ३८ कच्ची लिहिलेली मानपत्र त्यांच्या साहित्य ठेव्यात सापडली. रविंद्र पिंगे यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा चतुरंगने केला. एक विलक्षण अशी कल्पना मनात आली की ‘उपळ्याहून आलेल्या पिंगें बद्दल सिध्दहस्त लेखक झालेल्या पिग्यानी मानपत्र लिहावं.’ कमाल म्हणजे रविंद्र पिंग्यांनी ते लिहिलंही. “येऊन जारे रे” असं मला सांगणारा त्यांचा फोनवरचा आवाज काळीज कापत गेला. मी घाबरून गेलो होतो. तो त्यांचा “रे” काळजात आहे. मी पिंगे वाचत आलो वाचतच जातो…..
————
कौटुंबिक रविंद्र पिंगे हा कार्यक्रमाचा अंतिम टप्पा.
कार्यक्रम अधीक लांबू नये म्हणून पिंगे कुटुंबियांनी रविंद्र पिंगे यांच्या बद्दल अत्यंत कमी वेळेत आपल्या भावना व्यक्त केल्या.
भाचा- भाची,
शांत स्वभाव, साधेपणा, नेटकेपणा, वायफळ बडबड न करणारा, गिरगावच्या छोट्याशा जागेत पहाटे लवकर उठून एकटाकी लिहिणं. टापटीप, सर्वांना आदराने अहोजाहो करून बोलणं. समाधानी, “छान, सुंदर, उत्तम.” ह्या शब्दांचा सतत वापर. संगिताची आवड. अशा त्यांच्या अनेक गुणविशेषांचा उल्लेख केला.
नातू तन्मय- “पास होशीलना?” हा आजोबांचा प्रश्न ऐकला आणि अभ्यासाला लागलो. काहीही झालं तरी त्यांचं रूटीन बदलत नसे. नेचर, फिशरीज, एनव्हायरनमेंट हे माझं अभ्यासाचं फिल्ड. आजच्या कार्यक्रमा नन्तर आजोबांच लिखाण वेगळ्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करीन. आज वाटतं की माझ्या अभ्यासाचा विषय त्यांना अधीक कळला असता. माझे आजोबा मला आज जास्त समजले.
नातू केदार- आजोबांचा आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी. आम्ही गप्पा मारायचो. त्यांना मोठेपणा मिरवताना पाहिलं नाही. हीच त्यांची शिकवण. मी रेघोट्या मारलेला कागद त्यांनी जपून ठेवला. मला आणि मित्राला वडापाव खायला
स्वतः हून पैसे दिले. तो आनंद काय होता याचं उत्तर नाही आणि मला ते नकोय कारण त्या प्रश्नामुळे ते आठवत रहातील.
————
मुलगा सांबप्रसाद- बाबांनी कधी व्याकरण शिकवलं नाही. काय वाच सांगितलं नाही. खास आठवण विमानाने मुंबई पुणे प्रवास कॉकपिट मधून लँडिंग पहाता आलं. रायगडावर उघड्यावर झोपून बाबांबरोबर आकाश न्यहाळलं. अनेकदा बाबा हवे होते ते जाणवतं. मला प्रश्न पडला, अडलो की त्यांच एखादं पुस्तक काढतो वाचतो आणि मला मार्गदर्शन मिळतं.
कार्यक्रम संपताना छाया पिंगे यांनी आभार मानतांना. रविंद्र पिंगे यांच्या शताब्दी वर्षातील कार्यक्रमांचा, उपक्रमांचा संक्षिप्त आढावा घेऊन त्या बद्दलही आभार मानले.
चारुलता काळे
🙏
———-
टिप्पण्या