अंबरीश मिश्र
१.
अक्षरांचे देणे प्रस्तुत ‘अनौपचारिक अंबरीश मिश्र!’
रविवार दि. १ फेब्रुवारी २०२५, रोजी, अक्षरांचे देणे प्रस्तुत ‘अनौपचारिक अंबरीश मिश्र!’ हा कार्यक्रम संपन्न झाला. ह्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर कार्यक्रमाचा परिचय करून देणारं, ‘जुनी हिंदी चित्रपट गीते आपल्याला अजुनही भुरळ का घालतात?या चिरंतन प्रश्नाचा, गीतांच्या वैशिष्ट्यांसह घेतलेला अभ्यासपूर्ण मागोवा’ हे वाक्य यथार्थ करणारा हा कार्यक्रम कमालीचा रंगला.
“अल्ला तेरो नाम” या प्रार्थनेच्या ऑडियोने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रदीप पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे वक्ते अंबरीश मिश्र यांचं संस्थेच्यावतीने स्वागत तसेच सत्कार करण्यात आला. प्रदीप पाटील यांनी “अक्षरांचे देणे” या उपक्रमाची माहिती दिली. हा उपक्रम त्यानी २००७-२०११ या कालखंडात एकूण १७ उत्तमोत्तम कार्यक्रम करून यशस्वीपणे चालवला. काही कारणांनी त्यात खंड पडला. हा उपक्रम पुन्हा सुरू करावा आणि तो सुरू करताना अंबरीश मिश्र यांच्याच, प्रदीप पाटील यांना भावलेल्या कार्यक्रमाने तो सुरू करावा असं त्यांनी ठरवलं.
प्रदीप पाटील हे साहित्यिक उपक्रमांसाठी शिस्तबध्द प्रयत्न करतात आणि त्यांना यश मिळतं. विनोद पवार (दिवाळी पहाट ही संकल्पना प्रथम सुरू करणारी व्यक्ती) आणि नेहमीच प्रोत्साहन देणारे हितचिंतक यांच्या सहकार्याने “ अक्षरांचे देणे” चा हा दुसरा अध्याय सुरू झाला. विनोद पवार यांनी खुमासदार शब्दात अंबरीष मिश्र यांचा परिचय करून दिला. परिचयात, ते साधारण ५१ वर्षे सातत्याने कार्यरत. ऑल इंडिया रेडियोत नोकरी, पत्रकारिता, गुलज़ार यांच्या साहित्याचे तसेच विजया मेहता याच्या ‘झिम्मा’ पुस्तकाचा मराठी अनुवाद. ‘पत्र’ या विषयावर कार्यक्रम, त्यांचा उर्दूचा अभ्यास, बंगाली भाषेची ब-यापैकी चांगली ओळख, अशी अंबरीश मिश्र यांची महत्त्वाची माहिती त्यांनी दिली.
—————
२.
अबरीश मिश्र यांनी आपल्या अत्यंत मृदू तरिही सुस्पष्ट आणि प्रवाही वाणीत बोलायला सुरुवात केली. प्रदीप पाटलांचे आभार मानून त्यांचं ‘मराठी भाषेचा मित्र!’ म्हणून कौतुक केलं.
मजरूह सुल्तानपुरी, साहिर लुधियानवी, शैलेंद्र आणि गुलज़ार या चार शायर, कवी, गीतकारांच्या काही निवडक गाण्यांचे रसग्रहण तसेच विश्लेषण श्राव्य माध्यमातून करण्यात आले.
————-
साहीर लुधियानवी
साहीर लुधियानवी हे चित्रपट सृष्टित तुफाने सारखे शिरले वादळासारखे पसरले. त्यांना सिनेमात यायचं होतं. तेंव्हांच्या अनेक साहित्यिकां प्रमाणे ते कम्युनिस्ट विचारसरणीचे झाले, फाळणीनंतर पाकिस्तानात गेले. पण मनात होतं “बॉम्बे जाऊँगा!”मुंबईने त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली.
त्यांच्या आधीची फिल्मी गीते म्हणजे चार ठिपक्यांची रांगोळी जी त्यांनी चौसष्ट ठिपक्यांची अशी भव्य दिव्य रंगीन केली. ते गीतकार ॲसोसिएशनचे अध्यक्ष होते. प्रेम धवन हे त्यांचे मित्र जे सात बंगला येथे राहत. साहीर प्रथम तिथेच आले. त्यांचं पहिलं गाजलेलं गाणं 1951 ती फिल्म 'नौजवान' मधलं, ‘ठंडी हवाएं लहरा के आए’, (गायिका: लता मंगेशकर, संगीतकार: एस.डी. बर्मन).
‘तदबीर से बिगड़ी हुई तक़दीर बना ले.’ हे बाजी चित्रपटातील गीता दत्त यांच्या आवाजातील गाणं ऐकवलं गेलं.
यातल्या ‘अपनेपे भरोसा है’ या शब्दांसाठी बंगालमधे टेलीफोन केबल खेचणारे जोर लावतांना असं काहीतरी म्हणायचे आणि तिथून हे आलं असा मजेदार किस्सा अंबरीशजींनी सांगितला. पुढे बोलतांना हे गाणं म्हणजे गझलला कॅबरेसाठीचं गाणं बनवलं असंही ते म्हणाले.
साहिर म्हणजे विरलेलं आणि विझलेलं जगणं . त्यांच्या लिखाणात दुःख्खाची, कडवटपणाची छटा पण त्यात फ्रेंडशिप पण आहे. गालीबची फिलॉसॉफी पण दिसते. प्रेमातली विफलता आहे पण जीवनाचं तथ्यही आहे जसं त्यांच ‘मिलती है जिंदगीमें मुहब्बत कभी-कभी’
“चलो एक बार फिर से” हा काळाच्या पुढचा नवा विचार जसा ऑंधी सिनेमा वेगळी दृष्टी. “मै जिंदगीका साथ निभाता चला गया” असं साहीरचं जगणं’. हे गाणं वाजवलं गेलं.
साहीर आणि तत्कालीन साहित्यिक मार्क्सवादाकडे का कसे झुकले झुकले या बद्दलचे अलिसरदार जाफरी यांचे विचार ‘कट्टर इस्लाम नाकारला म्हणून मार्क्सवाद.’ नेहरूंचा काळ, आशावादाने भरलेले दिवस. उ. दा. राजकपूरचे सिनेमे अशा अनेक गोष्टींवरच भाष्य तो काळ, इतिहास तेंव्हाचा समाज, मूल्य यावर प्रकाश टाकणारं. ‘अल्ला तेरो नाम’ मधले- ‘धनवानोंको दे दे ग्यान।’ या गोष्टीकडे त्यांनी लक्ष वेधले.
साहीर प्रचंड मातृभक्त कदाचित म्हणूनच त्यांची स्त्री विषयी एकांगी विचार ही मूळ बैठक. सुधा मल्होत्रा आणि साहीर यांच्यातील संबंधांचा फक्त उल्लेख.
तरिही साहिरनी अत्यंत उत्कट प्रेमाची गाणी लिहिली अशी अनेक गाणी अंबरीशजींनी सांगून त्यांनी ‘चित्रलेखा’ या सिनेमातील ‘संसारसे भागे फिरते हो’ हे गाणं ऐकवलं.
साहिर लुधियानवी यांचा पत्ते खेळत असताना अचानक मृत्यू कसा झाला हे सांगून बोलताना छोटासा विराम घेतला.
—————————-
३
मजरूह सुल्तानपुरी.
मजरूह सुल्तानपुरी हे परंपरा म्हणून इस्लाम पाळणारे, युनानी औषधोपचारांचे जाणकार. खूप गप्पा मारायचे. अंबरीश जींनी त्या गप्पामधून मजरूह श्रोत्यांपर्यन्त पोहोचवले. एखादा मिमिक्री आर्टिस्ट जशी एखादी व्यक्ती साकारतो काहीसं तसं.
मजरूह क्वचित टीका करायचे पण लगेच त्या गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीने पाहायचे. याचं उदाहरण म्हणजे ‘चोली के पीछे’ हे गाणं थोडं धीटपणाने (अश्लिल वाटावं असं) लिहिलं आहे असं म्हटलं तर मग त्या आधीचं ‘सो जा निंदियाकी बेला है, आ जा पंछी अकेला है’ याला काय म्हणायचं? असं विचारून हसायचे.
मजरूह म्हणजे जखमी कवी/गीतकार ज्यांनी ‘आवडत्या’ जखमा दिल्या! ते जिगर मुरादाबादीना मानायचे. सुरुवातीला त्यांना सिनेमासाठी लिहायचं नव्हतं.
“ऐसे सिच्युएशनपे कोई गाना लिखता है क्या? असं म्हणत ‘हम तुम चोरी से, बँधे एक डोरी से’ हे त्यांनी कसं लिहिलं हे सांगून, त्यांचं ड्युएट गाणं ‘हाल कैसा है जनाब का?’ ऐकवलं गेलं. मजरूह सुल्तानपुरी यांनी लिहिलेल्या एका पेक्षा एक जबरदस्त अशा ड्युएटची यादी अंबरीशजींनी ऐकवली ज्यात मेल ड्युएट ‘ए मॉं तेरी सूरतसे अलग, भगवान की सूरत क्या होगी’ या ड्युएटचाही समावेश होता.
मजरूहजींच्या गाण्यात सेन्स्युॲलिटी होती. त्यांच्या गाण्यातला अवयवांचा उल्लेख पहा असं म्हणत अंबरीश जींनी काही गाणी सांगितली
‘आजा पिया तुझे प्यार दॅूं।’
‘सजाउंगा लुटकरभी तेरे बदन की डाली को’
‘ये रेशमी ज़ुल्फ़ें, ये शरबती ऑंखें।
‘जलते है जिसके लिए’
मजरूह सुल्तानपुरी यांनी रोमॅंटिझम आणला ..
मराठीत ‘या जन्मावर या जगण्यावर’ गाणं आहे ना, तसं काहीसं म्हणुया…
शम्मीवर चित्रित झालेली मजरूहनी लिहिलेली गाणी ऐका. म्हणजे ते कसं हे समजेल तुम्हाला, असं म्हणत अंबरीश जींनी, “आजा आजा मैं हूँ प्यार तेरा” हे गाणं ऐकवलं.
मजरूह बद्दल बोलतांना अंबरीश जींनी त्यांचा एक शेर अगदी मनापासून गाऊन त्याचा अर्थ सांगून त्यातलं सौन्दर्य कमालीच्या सुन्दर पध्दतीने उलगडून दाखवलं. श्रोत्यांनी त्याला “वाह! क्या बात है!” म्हणत मनापासून दाद दिली. तो शेर असाः
“माना के शबे ग़म, सुबह की महरम तो नहीं है।
सूरज से मगर रंगे हिना, कम तो नहीं है।”
(मी मान्य करतो की दुःख्खात पोळलेली रात्र ही नुकतीच आंघोळ करून आलेल्या गुलाबी सुन्दर, लावण्यवान पहाटेची मैत्रीण होऊ शकत नाही. पण सूर्याच्या किरणांपेक्षा तुझ्या हाताची मेंदी काही कमी सुंदर नाहीए.)
हे ऐकवून लगेच पुढे याच मीटरमध्ये बसणारं “ मीलती है जिंदगीमें मुहब्बत कभी कभी” हे गाणं म्हणून अंबरीश जींनी सांगितलं की मजरूह म्हणायचे “की वो साहीर है ना, वो जिन संगितकारोंको समझ नहीं होती उनको जाके ये सुनाता है, और वो फिर म्युझिक देते है।” हे ऐकून सभागृहात हशा पिकला.
मजरूह सुल्तानपुरी यांची आणखी एक ज़िंदा दिल आठवण म्हणजे त्यांचा पार्ल्यात तुफान रंगलेला एक कार्यक्रम. रिज़वी कॉलेजच्या जवळ रहाणा-या मजरूहनी कार्यक्रम कसा होईल लोक आपल्याला स्वीकारतील ना या बद्दल साशंक होत केलेला प्रश्न “वहाँ तो सब बम्मन होंगे, क्या मेरे बारेमें उनको कुछ मालूम होगा, वो मुझे सुनेंगे” आणि “क्यूँ नही? म्हणत अंबरीश जींच त्यांना उत्तर. तो कार्यक्रम कमालीचा रंगला. मजरूह आग्रह करून अंबरीश जींना गाडीत बसवून घरी घेऊन गेले. “हमारी बेगम दरवाजा खोलेगी” असं त्यांनी कौतुकाने सांगितलं, आणि पुढे म्हणाले “जरा उनको भी बताना प्रोग्राम कैसा हुवा, हमारी कितनी वाह वाह, कितनी तारीफ हुवी।” अंबरीश जींना मजा वाटत होती. दरवाजा उघडला गेला आणि मजरूह जींच्या पत्नीला अंबरीश जींनी कार्यक्रमा बद्दल, मजरूह जींच्या लोकप्रीयते बद्दल सांगितलं. ते ऐकून त्या अतिशय गोड लाजल्या. “अब समझे मैंने वो गाना कैसे लिखा!” असं विचारत मजरूह जींनी ‘छोड़ दो ऑंचल जमाना क्या कहेगा’ हे गाणं म्हटलं आणि अंबरीश जींकडे पहात ते मिश्किल हसले. हा किस्सा ऐकून सर्व श्रोत्यांनी मजरूहजींच्या जिंदादिलीला रसिकतेला टाळ्या वाजवत जोरदार दाद दिली.
———
४
मध्यंतरानन्तर प्रदीप पाटील यांनी काही खास मान्यवरांचे आभार मानून त्यांचा सत्कार केला.
शैलेंद्र
अंबरीशजींनी शैलेंन्द्र हे चर्मकार होते. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची. ते रेल्वेत काम करायचे. कविता करायचे, अशी माहिती दिली. एकदा राजकपूरने त्यांना ऐकलं, सिनेमासाठी लिहिण्या विषयी विचारलं. शैलेंद्रनी नकार दिला. “कधी मदतीची गरज पडली तर ये” असं राजकपूरनी म्हटलं होतं. एकदा राजकपूरने पैशांची मदत केली. शैलेंद्र पैसे परत करायला गेले पण ते न घेता राजकपूरने गाण्याची मागणी केली. १९४९ मधे “बरसात में तुम से मिले हम सजन” आणि “पतली कमर है” ही बरसातची दोन गाणी शैलेंद्रनी लिहिली आणि पुढे इतिहास घडला. ही गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. राजकपूरची जादू ही खरंतर शैलेंद्रची जादू आहे.
भारतात गाण्याची जादू कशी आहे हे मजेशीर पध्दतीने सांगताना अंबरीशजींनी पुलंचा किस्सा सांगितला आणि “वक्त ने किया” हे गाणं आरती सरखं गायलं. पुढे ते हसत हसत म्हणाले की अंताक्षरीत “वॉशिंग पावडर निरमा” गाणं म्हणून गायलं जातं.
राजकपूर शैलेंद्रना पुश्किन म्हणायचे. आवाराची कथा ऐकून शैलेंद्र म्हणाले “आवारा था, गर्दिश में था, आवारा था।” यातल्या ‘था’ चं ‘हूँ’ राजकपूरने केलं. “राजकपूरने खूप लोक सांभाळले.” राजकपूर बद्दल कौतूक व्यक्त करत, “मेरा जुता है जपानी” गाणं ऐकवलं गेलं
शैलेंद्र यांची अनेक गाजलेली गाणी सांगून , त्याच्या
“जिदगी ख्वाब है” या गाण्याचा अंबरीशजींनी,
‘हे करकरीत सत्य!’ असा त्या गाण्याचा उल्लेख केला. “ना मै धन चाहूँ ना रतन चाहूँ.” ह्या गाण्याची आठवण करून देत, अंबरीशजी म्हणाले की शैलेंद्र अत्यंत वक्तशीर होते. ते शंकर जयकिशन यांच्यासाठी रोज सकाळी नऊ ते दोन लिहायचे.
चहाच्या टपरी वरचा किस्साः शंकरना तेलगू यायचे ते तिथे काम करणाऱ्या मुलाला म्हणाले “रमैय्या वस्तवय्या (इधर आओ), ते मजेशीर शब्द लक्षात राहिले आणि “रमय्या वस्ता वैय्या, मैने दिल तुझ को दिया” या गाण्यात चपखल बसले.
काला बाजार फिल्म बनत होती. बर्मनदा शैलेंद्रजींना म्हणाले “किधर भी जाने का नही, गाना लिखो!”शैलेंद्र दिवसभर फिरत बसले त्यांच्यामागे आर डी बर्मन फिरत राहिले. रात्र झाली. बहुधा आकाशात चंद्र पाहून गाणं बनलं “ खोया खोया चाँद”
शैलेंद्रयांनी उत्तर भारतीय अनेक लोकभाषांचा उपयोग केला. “ओ बसंती पवन पागल” या गाण्यात “बनके पथ्थर मै पडी थी।” ही ओळ ऐकून अहिल्येची स्टोरी, असं गाण्याला म्हटलं गेलं पण त्या गाण्याचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. अहिल्येच्या गोष्टीचा तिथे काहीही संबंध नाही. हे सांगून, “मिला है किसी का झुमका।” हे गाणं ऐकवलं गेलं.
अंबरीशयांनी शैलेंद्र यांच्या साहित्या विषयी अत्यंत अभ्यासपूर्ण अशा खूप महत्वाच्या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या. शैलेंद्रजींची शैली अल्पाक्षरी होती. त्यांच्यावर संतकाव्य परंपरेचा प्रभाव होता. “अजीब दास्ताँ है ये। कहॉं शुरू कहॉं खतम।”, त्यांच्या रचनांमधे उर्दूचा वापर तसा कमी. पण तरिही त्यांनी “दुआ कर गमे दिल, खुदा से दुआ कर।”, लिहिलं. त्यांच लिखाण सोपं, रसाळ, लोकांच्या मनाला सहज स्पर्श करणारं. त्यांनी भारतीय तत्वज्ञान सुबोध भाषेत मांडलं हे त्यांचं सगळ्यात मोठं योगदान म्हणायला हवं.
शैलेंद्र कथेचं मर्म गाण्यातल्या चार ओळीत सांगायचे “दिल का हाल सुने दिलवाला”
“मुबारकें तुम्हें कि तुम किसी के नूर हो गए
किसी के इतने पास हो कि सबसे दूर हो गए
अजीब दास्ताँ है ये।”
गाईड हा शैलेंद्र यांचा लॅन्डमार्क सिनेमा. विजय आनंद यांनी त्याची गाणी आधी हसरत जयपूरी यांना दिली होती पण हसरत जयपुरी यांना कादंबरीची बहुपेडी वीण लक्षात येत नव्हती. जयपुरी म्हणाले की, नायिका डान्सर आहे म्हणजे ती वेश्या आहे. नायक तिच्याकडे लग्न न करता रहातो म्हणजे तो तिचा दलाल आहे. हे जेंव्हा परत परत म्हटलं गेलं तेंव्हा विजयानंद त्यांना म्हणाले की तुम्ही या चित्रपटाची गाणी लिहू नका. ती कथा १९६६ मधे कळणं कठीण होतं कारण ती त्या काळाच्या कितीतरी पुढची होती. विजयानंद यांना प्रेमाचेच नव्हे तर जीवनाचे अनेक पदर/ रूपं या सिनेमात दाखवायची होती. हे सर्व समजून घेऊन शैलेंद्र यांनी गाणी लिहिली. अंबरीश जी म्हणतात “मानवी मनाचे सर्व मनोव्यापार कळणं कठीण आहे ते बरेचसे कवी आणि कलावंताना कळतात.”
कार्यक्रमाशी संबंधित नाही तरिही सांगतो असं म्हणून जीवनाला व्यापणारा एका इंग्रजी लेखकाने मांडलेला विचार अंबरीशजींनी सांगितला. त्याग, मूल्य, सत्य माणुसकी ही मूल्य आहेत हे एकदा आपण मान्य केलं की आपल्याला वाटतं की ही मूल्यं आपोआप काम करतील आणि आपल्या देशाचं नंदनवन होईल. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जो तो हेच सांगतो. त्याग, स्नेह, ममता, समता ही मूल्यं लोकांचा भरपूर मार खाऊन घरी येतात. आपल्या जखमा धुवून आंघोळ करतात झोपतात आणि पुन्हा सकाळी जगाला शिकवायला बाहेर पडतात. हा विचार पटला मन बेचैन करून गेला.
शैलेंद्रंच्या ‘तिसरी कसम’ सिनेमा बद्दल थोडक्यात माहिती दिली गेली. तिसरी कसम ही फणिश्वरनाथ रेणूंची कथा. ते शैलेंद्र यांना म्हणाले होते की तू फिल्म बनवू नको पण शैलेंद्रनी ती बनवली आणि प्रचंड नुकसान झालं. राज कपूरचा मेरा नाम जोकरही फेल गेला. शैलेंद्र अक्षरशः उध्वस्त झाले.
“कौन हसतॉं है फूलोंमे छुपकर” या गाण्याचा उल्लेख करून अंबरीशजींनी शैलेंन्द्र यांना ‘मूल्य देणारा कवी’ असं म्हणत त नावाजलं. जाता जाता लता मंगेशकर शैलेंद्र यांच्या आठवणीत, “शैलेंद्र मला त्याच्या हातांनी त्याचं गाणं लिहून द्यायचा.” ही आठवण अंबरीशजींनी सांगितलं आणि मन शैलेंन्द्र यांच्यासाठी भारावून गेलं, नतमस्तक झालं.
————-
४
गुलज़ार
गुलजार यांचं खरं नाव संपूर्णसिंह कालरा, ते पंजाबी होते. त्यांना बंगालीची समज होती. त्यांची लिहिण्याची पध्दत पाहिली की लक्षात येतं की ते ‘शैलेंद्र स्कूलचे कवी’ आहेत. गुलज़ारना सिनेमात यायचं नव्हतं. डायरेक्शन करायचं होतं.
मुंबई सोडून जायचं त्यांच्या मनाने घेतलं पण बिमलदा, एस. डी. बर्मनदा त्यांना मुंबई सोडून जाऊ नको म्हणत होते. शैलेंद्र यांनी गुलज़ारना समजावलं “ये तेरी जाने की ज़िद सही नहीं है। तू बिमलदा से, बर्मनदा से जादा बड़ा है क्या?”
“वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजीब है” हे गाणं ऐकवून अंबरीशजी म्हणाले की गुलज़ार हे हिंदी चित्रपटसृष्टीतील बहुपेडी कवी, गीतकार, लेखक आणि दिग्दर्शक आहेत.
गुलज़ारना अेन सी सिप्पीना भेटायचं होतं. त्यांनी पहाटे चारला बोलावलं. चहा बनवला आणि मग गुलज़ारना मनापासून ऐकलं.
गुलज़ारजींनी प्रेमाच्या सर्व शक्यता तपासल्या.
आत्ताच्या काळात मूल्यव्यवस्था कोलमडल्यामुळे आपल्याला अनेकदा त्यांची पात्रं कळत नाहीत, पण तरिही गुलज़ार यांना जुन्या पिढीतील लोक ऐकतात तसंच, ‘जश्न-ए-रेख्ता' सारख्या उर्दू भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या जगातील सर्वात मोठ्या महोत्सवातही तरूण पिढीची मुलं ऐकतात.
“तेरे बिना जिंदगीसे कोई, शिकवा तो नही..” हे गाणं ऐकताना श्रोते हरवून गेले. अंबरीशजींनी सांगितलं की लोकभाषेतील शब्दांचे उपयोग केलेली गुलज़ारजींची गाणी प्रचंड गाजली. जसं की “कजरारे, कजरारे, तेरे कारे कारे नैना।” अंबरीशजींच सहज बोललेलं एक वाक्य मला आवडलं, “गद्य हे दोघां मधलं भांडण आणि स्वतःशी भांडण ती कविता….!”
कम्युनिकेट करणं म्हणजेच संवाद साधणं ही गुलज़ारजींची खास बात. कधी कधी ते ठराविक रूढ़ संकल्पनाना धक्का देतात, असं म्हणून त्यांनी मेरे अपने सिनेमातील एक गाणं सांगितलं. “चॉंद कटोरा लिए भिखारिन रात" ही गुलज़ारजी रचित एक अत्यंत काव्यात्मक आणि प्रसिद्ध कविता. ही कविता 1971 ची फिल्म, मेरे अपने चं गाणं, “रोज अकेली आए, रोज अकेली जाए" चा हिस्सा आहे. लता मंगेशकर यांनी म्हटलेल्या या गाण्यात “रात्रीला भिकारीण म्हणून, ती चॉंद रूपी कटोरा घेऊन येते. असं म्हटलंय.
त्यांची बालगीतं जशी, “लकडी की काठी, तसंच “जंगल जंगल बात चली है, पता चला है।
अरे चड्डी पहनके फूल खिला है, फूल खिला है। ही प्रचंड लोकप्रीय झाली, गाजली पण यातलं ‘चड्डी पहनके’ हे शब्द ऐकून तुम्ही ते बदला असं गुलज़ारजींना सांगण्यात आलं अर्थात त्यांनी ते केलं नाही तरिही रसिकांनी ते स्वीकारलं.
गुलज़ारजींच्या आठवणी सांगताना अंबरीशजी म्हणाले की गुलज़ारजी एकदा त्यांच्यवर चिडले पण दुस-या दिवशी म्हणाले,”मुझे माफ़ करो, कल मैंने तुम्हें डाटा!” वेळ पाळणं. कामासाठी निष्ठा ही गुलज़ार यांची वैशिष्ट्यं. गुलझार हे पंजाबी पण त्यांनी ते सर्व नाकारलं. घराण्याचा कपड़ा बिझिनेस नाकारला. “मुझे सिर्फ़ गुलज़ार रहना है।” असं ते म्हणतात…
गुलज़ारजींच्या आॉंधी या चित्रपटा बद्दल बोलताना,
“इस मोड़ से जाते है।” हे गाणं सांगून अंबरीशजी म्हणाले की गुलज़ार यांची प्रेमगीतं पारंपारीक संकल्पनेपेक्षा वेगळी आहेत. त्यांनी प्रेमातल्या सूक्ष्म गोष्टी तपासल्या, मांडल्या. गुलज़ार दिग्दर्शित, इजाज़त ह्या सिनेमात रेखा नव-याला सोडते पण रेल्वे प्लॅटफॉर्मवरच्या त्या प्रसंगात ती जाताना त्याला वाकून नमस्कार करते. नातं संपलं पण आदर आहे, अनादर नक्कीच नाही. हा मुद्दा अधीक स्पष्ट करण्यासाठी अंबरीशजीनी एक किस्सा सांगितला, भीमाने जरासंघाची हत्या करून त्याच्या प्रेताला लाथ मारली ते पाहून कृष्ण त्याला म्हणाला की तू त्याला मारलंस हे मी समजू शकतो पण लाथ कशाला मारलीस? इजाज़त मधला रेखाचा तो नमस्कार हा नातं संपलं तरिही त्या आधीचं जे सहजीवन होतं त्या बद्दल व्यक्त केलेला आदर आहे.
आदरभाव हा गुलज़ारजींच्या स्वभावातच आहे तो त्यांच्या कलाकृतीत दिसतो, असं म्हणून अंबरीशजींनी एक गमतिशीर किस्सा सांगितला गुलज़ार हे विमल रॉय यांना खूप मानत. विमलजींसाठी त्यांच्या मनात कमालीचा आदर होता. एका मुलाखतीत, गुलज़ारना रॅपिड फायर प्रश्न विचारले गेले, जसं की आवडता रंग, आवडतं शहर इ. आणि त्या प्रत्येकाचं गुलज़ारजींनी दिलेलं उत्तर होतं बिमलदा!
टाळ्यांच्या गजरात कार्यक्रम संपन्न झाला. मला या कार्यक्रमाला प्रदीप पाटीलयांनी बोलावलं होतं. मी कार्यक्रमा बद्दल लिहावं ही त्यांची अपेक्षा होती. कार्यक्रमात मी हजर होते. अंबरीश मिश्र यांना ऐकताना आपण नेहमीच हरवून जातो हा अनेकांचा अनुभव तसाच माझाही. ह्या कार्यक्रमाचं शब्दांकन करताना अनावधानाने काही चुका झाल्या असतील तर क्षमस्व. 🙏
चारुलता काळे
9821806827
टिप्पण्या