प्रवास वर्णनः ग्रीस 1
((28 मे 2023, दिवस पहिला.)
7लक्स हॉलिडेज ने आमच्यासाठी कस्टमाइज्ड केलेल्या ट्राव्हल प्लॅन प्रमाणे सकाळी 6:40 मुंबई ते इस्तंबूल फ्लाइटने निघालो. फ्लाईट वेळेत होती. टर्किश एअर लाइनची ही फ्लाइट ऑपरेट करतं इन्डिगो. सहा तासांच्या फ्लाइटला फक्त ब्रेकफास्ट मिळतो. अल्कोहोल अथवा इतर काही हवं असेल तर विकत घ्यावं लागतं. फ्लाइटमधे करमणुकही नाही. फ्लाईट इन्टरनॅशनल पण तिचं ऑपरेशन अेकदम लोकल. अर्थात ही फ्लाइट डायरेक्ट नसल्याने पैसेही वाचतात. आनन्दाची गोष्ट म्हणजे इस्तंबूलला 11:10 ला अगदी वेळेत पोहोचलो.
साधारण दोन तासांनी अथेन्सची फ्लाइट होती. इस्तांबूल विमानतळ तसा ब-यापैकी मोठा आहे. एअर पोर्ट बराच मोठा असला की फ्लाइट बदल तसा कटकटीचा मामला! पण निरनिराळे एयरपोर्ट तिथल्या कार्यपध्दती, माणसं यांचं निरिक्षण मला नेहमीच मजेदार वाटतं. स्कॅनिंग प्रक्रिया आटपून गेटवर पोचलो. 1:20 ची फ्लाइट एथेन्सला अडीच तासाने म्हणजे 14:50 ला पोचणार होती. दोन वाजले तरी फ्लाईटचा पत्ता नव्हता. आम्ही आमच्या एथेन्सच्या आम्हाला पिकअपला येणा-या ड्रायव्हरला फोन करून त्याची कल्पना दिली. बहुतेक प्रवासी चिंता, राग, अगतिकता अशा भावनांनी ग्रस्त पण एअर लाइनवाले मात्र काहीच बोलायला तयार नाहीत. आता भांडणं, गरमागरमी अटळ असं वाटायला लागलं, तितक्यात विमान लागलं. सर्वांनाच ‘हुश्श’ वाटलं! त्या छोट्याशा प्रवासात नाश्ता मात्र सुन्दर मिळाला.
जॉर्ज आमचा ड्रायव्हर, प्रसन्न चेह-याने आमची वाट पहात होता. ग्रीसमधे ड्रायव्हिंग राइट हॅन्ड आहे, म्हणजे भारता सारखे नाही. अत्यंत शिस्तित, नियम पाळून गाड्या चालतात. आमचे बुकिंग हॉटेल ग्रॅन्ड हयातला होते. तिथे पोचायला पाऊण तास लागणार होता. जॉर्ज बरोबरच्या गप्पांमधून ग्रीस विषयी माहिती मिळाली. अथेन्स मधे घराचे भाडे महाग आहे. कामगारांचे पगार तसे कमी आहेत. करप्शन आहे. “आत्ता टूरिस्ट हंगाम सुरू झाला आता साधारण सहा महिने रग्गड काम आणि मग तसा आराम! “ जॉर्ज म्हणाला. त्याला आपल्या भारता बद्दल खूप उत्सुकता होती हे पाहून खूप छान वाटलं.
संध्याकाळचे सात वाजले होते तरिही चांगलाच उजेड होता. आमच्या रूमला सुन्दर बाल्कनी होती. त्यातून अॅर्क्रोपोलिस दिसत होतं. दुरूनही ती पुरातन इमारत किती भव्य असेल त्याचा अंदाज येत होता. समोरच वहाता रस्ता. वेगात पण शिस्तित पळणारी लहान मोठी वाहने, बसेस, बाइकर्स. तो रस्त्या पहायला मजा वाटत होती.
प्रवासाचा थकवा घालवायला स्वीमिंग करायचं ठरवलं आणि हॉटेल इन्फ़ॉर्मेशनला फोन केला. दोन स्वीमिंग पूल होते अेक ग्राउंड फ्लोअरचा इनडोअर आणि दुसरा रूफ टॉपचा आउट डोअर. इनडोअरला बुकिंग गरजेच होतं. साडे सातचं बुकिंग मिळालं म्हणून तिथे जायचं ठरवलं.
हा पूल फार छान होता. पूलचं पाणी कोमट म्हणता येईल इतपत गरम होतं. मंद प्रकाश, हलकं संगीत, पूलच्या बाजूला आराम करायला पूल बेडस, त्यावर ठेवलेले टॉवेल्स, झाकुझी, स्टीम, सौना, अेकदम भारी वाटलं.
स्वीमिंग करून रूफ टॉपला गेलो. तिथला स्वीमिंग पूल पाहून तर अवाक झालो. इमारतीच्या अगदी कडेला असलेला पूल आणि समोर दिसणारी तीच अॅक्रोपोलिसची प्राचीन वास्तू. आमच्या रूम मधून पाहिली त्याहून आता अधीक सुन्दर दिसत होती कारण आता प्रकाशयोजनेमुळे ती उजळून गेली होती. ते सौन्दर्य पहायचा मोह आकाशातल्या चन्द्रालाही झाला असावा. म्हणुनच ढगांच्या आडून तो ते पहात होता. गार वारा सुटला होता, तरिही तिथून निघावं असं वाटत नव्हतं.
——————————————
चारुलता काळे 🙏
टिप्पण्या