लेखः ओशो भाग ३

 ओशो इन्टरनॅशनल म्यूझिक फेस्टिव्हल अेक अनुभव!

भाग ३


ओशो नादब्रह्म मेडिटेशन


पहिल्या दिवशी म्हणजे ११ ऑगस्टला दुपारी २ः४५ ते ३ः४५ या वेळात ओशो नादब्रह्म मेडिटेशन करण्यासाठी आम्ही ओशो ऑडिटोरियमला पोचलो. रांगेत उभे राहून प्रवेश घेतला. मेडिटेशनच्या वेळा काटेकोरपणे पाळल्या जातात. 

ऑडिटोरियम मधे मेडिटेशनसाठीच्या खुर्च्या असतात. या खुर्च्यात बसलं की जमिनीवर जाड बैठक/सतरंजी घालून बसल्या सारखं बसता येतं. या मेडिटेशन खुर्चीला टेकायला पाठ असते. ध्यान करतांना पाय लांब करूनही बसता येतं. ज्यांना खाली बसायचं नसेल त्यांच्यासाठी खुर्च्या असतात. मेडिटेशनला येणा-याने मेडिटेशन चेअर घेऊन बसायचे आणी मेडिटेशन झाल्यावर ती चेअर पुन्हा जिथून घेतली तिथे ठेवायची. 

नादब्रह्म ध्यान करताना भुंग्यासारखा गुणगुणायचा आवाज करायचा असतो. त्याच बरोबर हातांना फिरवत आपल्या आतील संघर्षरत गोष्टींना अेका लयीत आणायचे आहे. आपले मन आणी शरीर अेका लयीत आलं हे साक्षिभावाने पहायचं आहे. अेका आनन्दाची अनुभूती अनुभवायची आहे. 

नादब्रह्म मेडिटेशन अेका विशिष्ट संगिताच्या साथीनं केलं जातं

या अेका तासाच्या ध्यानाचे तीन भाग आहेत. प्रत्येक भागा नन्तर अेका विशिष्ट आवाजाने त्या भागाची सांगता होते.

या ध्यानात डोळे पूर्णपणे पूर्णवेळ बंद ठेवतात.

भाग पहिलाः वेळ तीस मिनिटे. डोळे आणी ओठ बंद करून गुणगुण (भोव-या सारखा आवाज) सुरू करावी. इतरांना ऐकू जाईल अेवढा आवाज असावा. आपले शरीर पोकळ आहे व या आवाजाने ती पोकळी भरून जात आहे अशी कल्पना करत आवाज करीत रहावे. आपल्या शरिरात कंपन निर्माण होते. काही वेळातच हा आवाज विना सायास होऊ लागतो. 

भाग दुसराः यात साडे सात मिनिटाचे दोन भाग होतात. भाग दुसरा सुरू होताच आपले दोन्ही हात तळवे आकाशाकडे करून बेंबी जवळ, पोटाशी ठेवावे. तिथून दोन्ही हात अेकाच वेळी समोरच्या बाजूला नेऊन गोल बनवत बाहेरच्या बाजूला नेत परत पूर्व स्थितीत आणावे. ( आपला उजवा हात घड्याळाच्या काट्यांच्या दिशेत जाईल तर डावा हात घड्याळाच्या काट्यांच्या विरुध्द दिशेत जाईल.). ही कृती म्हणजे जणूकाही आपण आपल्या कडील ऊर्जा बाहेर पसरवत आहोत. ही क्रिया अेका संथ लयीत चालू ठेवावी.

साडे सात मिनिटांनी म्युझिक बदलले की हाताचे तळवे जमिनीकडे करावेत. पोटाच्या समोरून तळवे बेंबीच्या दिशेने आत आणत. गोल फिरवावेत. (उजवा हात घड्याळाच्या काट्यांच्या विरुध्द तर डावा हात घड्याळाच्या काट्याच्या दिशेत फिरेल). जणूकाही आपण बाहेरील ऊर्जा गोळा करत आहोत. ही क्रिया अेका संथ लयीत चालू ठेवावी. 

भाग तिसराः पंधरा मिनिटे. हातांची क्रिया थांबवून स्वस्थ व्हावे.  मन, शरीर, भवताल समस्वरीत झाल्याची अनुभूती होते.


ध्यान संपल्याचा ध्वनी झाल्यावर कुठलाही आवाज न करता ऑडिटोरियमच्या बाहेर आलो. 

————————————-

चारुलता काळे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चित्र कविता

प्रवास नॉर्वे आणि आइसलैंड

काव्यः माझ्या कविता 1