प्रवास वर्णनः ग्रीस 3

30 मे 2023, दिवस तिसरा. 


ग्रॅन्ड हयातचं चेकआउट करून सकाळच्या 8:40 च्या सी जेटने निघून 11:35 ला आम्ही मिकोनोसला पोचणार होतो. काल फिरलो ती क्रूज होती. सी जेट हा प्रकार त्याहून तुफानी वेगवान! या जेटचं तिकीट महाग आहे. यात साधारण 1300 पॅसेन्जर्स, तसेच 200 वाहने सामावली जातात. काही सी जेटस् याहुनही जास्त सक्षम असतात. या बोटीचा तळाचा भाग दोन्ही बाजूनी पाण्याला टेकलेला असतो  आणि मधला भाग उंचावलेला असतो जो पाण्याला टेकत नाही. बोट चालली की या भागाचे पाण्याशी घर्षण न झाल्याने ही बोट तूफ़ान वेगात पळते पण जराही धक्के लागत नाहीत. (असा आमचा अनुभव). बोटीच्या डेकवर मात्र प्रचंड वारा लागतो त्यामुळे सगळे आतच बसतात.सी जेटला विमाना प्रमाणे क्सास असतात. 7 लक्स ने आमचे बुकिंग बिझनेस क्लासचं केलं असल्याने आम्ही जरा जास्तच खूश होतो. पाण्यावरचा प्रवास वा-याच्या गतीने करून आम्ही मिकोनोसला पोहचलो. आमचा ड्रायव्हर आमची वाट पहात होता.  


30  मे ते 2 जून असं आमचं मिकोनोसचं वास्तव्य असणार होतं. आमच्या हॉटेलचं नाव होतं थेरो ऑफ मिकोनोस. हे पंचतारांकित हॉटेल बुटीक हॉटेल आहे. प्रवेशद्वारावर  कलात्मकतेने लावलेली फुलझाडांची सुन्दर झाडं आणि तितकाच हसतमुख विनयशील फ्रन्टऑफिसचा स्टाफ़ आमच्या स्वागताला हजर होता. रिसेप्शन मधून, छोट्याशा लॉबीतून आम्हाला स्विंमिंग पूलवर नेण्यात आलं इथे स्विमिंग पूल आणि झाकुझी दोन्ही होतं. समोरच अथांग समुद्र. वेलकम ड्रिंक म्हणून चक्क व्हाइट वाईन दिली गेली.


निळाशार समुद्र, त्यात उभ्या महाकाय बोटी, छोट्या बोटी, होड्या, दूरवर दिसणारे डोंगर, समुद्रात मधेच छोटी बेटं, स्वच्छ पांढरी घरं, इमारती.  उंच इमारती नाहीत. मिकोनोसची ओळख असलेल्या त्या सहा पवनचक्क्याही इथून दिसत होत्या. इथून दिसणारा तो देखावा म्हणजे साक्षात स्वर्ग वाटत होता!


आमच्या रूमच्या बाल्कनीतूनही हा समुद्र तसेच दूरपर्यंत पांढरी शूभ्र घरं, हॉटेल्स दिसत होती. मधुनच निळ्या घुमटांची चर्च दिसत होती. हॉटेलमधे अनेक सुन्दर कलात्मक गोष्टी अत्यंत रसिकतेने सजवलेल्या होत्या. 


आम्ही थोडासा आराम करून बाहेर पडलो. रस्ते चढउताराचे आणि अत्यंत अरुंद आहेत, तसेच इथे ट्रॅफिक सिग्नल्स नाहीत,  ह्याची कल्पना फ्रन्ट ऑफीसच्या ‘मानुस’ नावाच्या तरुणाने दिली, आणि “बी केअरफुल व्हाइल वॉकिंग!” ही त्याची प्रेमाची सूचनाही. त्याने दाखवलेली ही आत्मियता भावली. इथल्या संपूर्ण वास्तव्यात त्याच्याकडून आणि संपूर्ण स्टाफ कडून तसाच अनुभव येत राहिला. 


मिकोनोस मधे सहा पवनचक्क्या असलेला भाग महत्वाचं टूरिस्ट ॲट्रॅक्शन आहे.  अनेक छोट्या छोट्या गल्ल्या कपडे, सुव्हिनिअर्स, ज्वेलरी, वॉचेस अशा अनेक गोष्टिनी सजलेल्या  दिसतात. शूभ्र तलम पांढरे कपडे, उच्च दर्जाचे लीननचे कपडे पाहून अक्षरशः हरवून जायला होतं.  छोट्या छोट्या गल्ल्या, बोळ पण कमालीची स्वच्छता! आपल्या नजरेला नवीन पण शरिराचा बराचसा भाग दिसेल असे कपडे घातलेली तरुणाई मनाला नजरेला सुखावत असते. मिकोनोस हे पार्टी आयलंड म्हणून ओळखलं जातं. 


मिकोनोसच्या ‘लिटल व्हेनिस’ म्हणून ओळखल्या जाणा-या एरियात इटालिअन, ग्रीक आणि इतरही देशांचे पदार्थ असलेली हॉटेल्स, पब्ज, छोटी मोठी इटाउटस्, आइसक्रीम पार्लर्स टूरीस्टनी फुललेली असतात. उन्हाळ्यात दिवस चांगलाच मोठा असतो. रात्रीचे साडे आठ झाले तरी बराच उजेड होता.  सगळीकडे धमाल मस्ती असली तरी धक्काबुक्की असभ्यपणा अजिबात नाही. आम्ही इटालिअन रेस्टोरेन्ट मधे पिझ्झा आणि वाईन घेतली, अेक लॉंगआयलंड दोघांनी संपवली. मस्तपैकी आइसक्रीम खाल्लं. आता हवा चांगलीच थंड झाली होती. रात्रीचे अकरा वाजले होते. टॅक्सीने हॉटेलवर पोचलो. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रवास नॉर्वे आणि आइसलैंड

प्रवास वर्णनः ग्रीस 2

लेखः ओशो भाग ३