माझ्या कविता 2
——————————————
गोष्ट आमच्या प्रेमाची
‘दुनियादारी’ सिनेमाला,
गेलो होतो जेंव्हा,
माझ्या सोबत आई आणी,
बाबा होता तेंव्हा.
थोडी ओळख असलेली ‘ती’,
मैत्रिणीं बरोबर दिसली,
मी सहज ‘हाय’!’ म्हणालो,
पण ती नाही हसली.
‘अग, तुझ्या लेकीन,
माझ्या लेकाला ओळखल नाही!’
ऑफिस मधे सहजच,
बोलून गेली आई.
अेफ. बी. वर मेसेज तिचा,
“सॉरी, लक्षात नाही आल!”
मेसेज पाहून, “इट्स ओके!”
मी ही पटकन लिहिल.
सरळ सोप्प वागण माझ,
आवडल तिला.
आणी तिच ते “सॉरी!”
भावल होत मला.
अेफ. बी. वरचे मेसेजेस,
अेक वर्ष गेल.
मागावा का तिचा सेल नम्बर.
माझ्या मनात आल.
गप्पांचा पाऊस झाला.
मेसेजेस ना पूर आला,
भेटूया का डीनरला,
मी हळुच विचारल तिला.
तसा प्रश्न अपेक्षीत,
पण लाजून ती नाही म्हणाली,
‘नाही’ मधे ‘हो’ आहे,
समजून गेलो दोघेही.
भेटलोच मग डीनरला,
भेटीने त्या जादू झाली.
आणी मग पुन्हा भेटलो,
डीनरच्या नावाखाली.
प्रेम प्रेम म्हणजे काय,
आत्ता लक्षात आल!
लग्न करतोय आम्ही दोघ,
सर्वांना माहित झाल.
—————————————
गोडुले
रस्त्याच्या कडेला,
अेक झोळी टांगलेली.
झोळीत फाटक्या त्या,
नजर माझी गेली.
किती गोड गोडुले हे,
सोनूले झोपी गेले.
किलकिलते डोळे हे,
हसू ओठी उमलेले.
टवटवीत तनू ही,
फुल नुकते फुलले.
चेह-याची ती गोलाई,
चन्द्र बिंब ते हासले.
सावळा रंग त्याचा,
जसा कान्हा यशोदेचा.
की संतांचा हा सखा,
विठू राय पंढरीचा.
चारुलता काळे
——————————
जरास दूर रहायचय!
आज आहे म्हणे कवितेचा दिवस,
मला माझ्या कवितेला आनन्दात पहायचय,
म्हणुनच आज जरास दूर रहायचय....
विरहाने प्रेम वाढत म्हणतात,
आज नव्याने तिच्या प्रेमात पडायचय.
म्हणुनच आज जरास दूर रहायचय.....
“दूर असे ते मनी वसे”, म्हणतात,
ती विरहातली हुरहुर अनुभवून पहायचय,
म्हणुनच आज जरास दूर रहायचय....
“हे काय भलतच!” म्हणाली जर ती,
स्वत: गप्प राहून, तिला बोलू द्यायचय,
म्हणुनच आज जरास दूर रहायचय....
चारुलता काळे
———————————————
आज थांब ना घरी...
किती दिवस हे, आले गेले,
ऋतु बहरले, वरिस ही सरले,
झुरते मी अंतरी,
सख्या रे!
आज थांब ना घरी...
सण रंगांचा, आली होळी,
प्रेम रंग हा खुलवुन गाली,
करिते मी विनवणी...
सख्या रे!
आज थांब ना घरी.....
कर्तव्याला कधी न चुकला,
वर्दी मधे साजण दिसला.
निघुन पुन्हा तू जाशिल सजणा,
धडधड माझ्या उरी.
सख्या रे!
आज थांब ना घरी....
तुझी मिठी ती, चैत्र चांदणे,
नजर रोखुनी, मला पाहणे,
आठवणी त्या मला जाळिती,
विसरलास तू जरी,
सख्या रे!
आज थांब ना घरी....
चारुलता काळे
————————————
स्वप्न शिल्प
काजळ रेषा, तव नयनांची,
मना लागला तीर,
लोभस हसणे, मोहक तरिही
तलवारीचा वार.
केस मोकळे, जरा बांधिशी,
चुकार काही सुटती.
वा-या वरती, उगाच लहरत,
आवाहन मज देती.
हातामधे कंगन नाजुक,
पिवळे आणिक लाल.
किणकिण त्यांची येता कानी,
जीव होई बेहाल.
गुलाब कलिका, शुक्र चांदणी,
काय म्हणावे तुला!
स्वप्न शिल्प हे मनात उतरे,
लाभशील का मला!
चारुलता काळे
——————————————
परी
डोळ्यांमधे काजळ रेखुन,
अधराना तो रंग,
डूल लटकती कानी अन ते,
केस तुझे बेबंध.
सुवर्ण कंकण हात सजविती,
रंगीत वस्त्रे छान,
अदा तुझी तो नाज़ुक नखरा,
सौन्दर्याची खाण.
थोडे झुकुनी, नको विचारू,
“दिसते सांगा कशी?”
रंग बिरंगी पाकोळी वा
गोड परी तू जशी!
चारुलता काळे
——————————————
ओझे
सांडून सर्व गेले,
काही न राहिले,
ओझे तरी किती मी,
ते व्यर्थ वाहिले....
चारुलता काळे
——————————————
पहिला पाऊस
आले आभाळ भरून,
मेघ थोडा जडावला,
येई सागरा उधाण,
वेडा वारा सैराटला.
वीज चमकून गेली
घन गर्जना उठली,
आला पाऊस पाऊस,
तप्त मने आसावली.
मोती पाण्याचे झेलाया,
झाडे झुकली वाकली.
चिमुकली ती पाखरे,
घरट्यात विसावली.
मोर रंगात तो आला,
पायी पैंजण बांधून.
बाल गोपाल नाचले,
हात हातात घेऊन.
भेटे पाऊस मातीला,
ओला सुगंधी हुंकार,
गोड लाजरी नवरी,
ओढी हिरवा पदर.
चारुलता काळे
————————————
संभ्रम
अंगणात या फुलून आली,
सदाफुली मोहक हसणारी.
रंग प्रीतिचा ओढुन लाजे,
मुग्ध अबोली कुणी लाजरी.
गंधाची त्या करीत उधळण ,
नाजुक साजुक जाई लपली
आनन्दाचा बहर लेउनी,
मोगर उमले पानोपानी.
प्राजक्ताचा सड़ा पाहुनी,
बकुळीला त्या वेड लागले.
इवलेसे ते फूल तिचे ही,
जमिनी वरती अलगद आले.
शेवंतीचा नखरा न्यारा,
पिवळी हळद कधी अंगाला.
कधी पांढरी जोगिण बनुनी,
विसरुन जाई अवघ्या जगताला.
मिटुन पाकळी हळुच जराशी,
चाफ्याचे ते उगीच रुसणे,
प्रीत लाजरी मनात खुलता
सुगंध उधळित चोरुन हसणे.
रंग, गंध अन सौन्दर्याचे
शिल्प जसे ती गुलाब कलिका,
कुणा कुणाचे चुंबन घ्यावे,
संभ्रमीत तो भ्रमर उगिच का?
चारुलता काळे
——————————————
खिडकी
झुक झुक चाले जीवन गाडी,
गाडी मधे त्या पाउल पडते,
मिळेल का मज, सुलटी खिडकी,
मनात आशा सहज जागते.
कुणास मिळते नुसती जागा,
कुणा नशीबी तीही नाही,
कुणास खिडकी उलटी मिळते,
कुणास सुलटी मिळोनि जाई.
उलट्या खिडकी मधुनी पाहता,
भोवताल जो मागे जातो,
दिसतच राही डोळ्यांना तो,
भूतकाळ तो मनात येतो.
सुलटी खिडकी ज्याला मिळते.
नजरेला त्या दिसे नवनवे.
भविष्यात तो रंगून जातो,
क्षणा क्षणाला स्वप्न रंगवे.
खिडकी अपुली दृष्टिकोण तो,
तुझ्याच हाती काय पहावे.
जुनेच आठव पुन्हा पुन्हा ते,
किंवा नवीन गाणे गावे
चारुलता काळे
——————————————-
वारी
आला आषाढ दारात,
वारी करण्याची आस,
ध्यास विठ्ठल भेटीचा,
दिसे देऊळ कळस.
पायी संसाराची बेडी,
वारी नशीबात नाही.
जीव कसनुसा होई,
मन था-यावर नाही.
हाती कामाचा तो विणा,
वाजे कष्टांची ती झांज.
चाले जगण्याची वारी,
कानी चिपळ्यांची गाज.
स्वप्न पडले पहाटे,
उभा विठ्ठल दारात.
म्हणे घेऊन आलो मी,
वारी तुझ्या अंगणात.
चारुलता काळे
——————————————————
दिवाळी
आली दिवाळी दिवाळी,
घर दार, स्वच्छ केले.
रंग उडाल्या भिंतींना,
नवें रंग कुणी दिले.
नाही नाही म्हणताना,
झाली बाजाराची वारी.
कुणी घरीच राहून,
मागवल्या वस्तू दारी.
दारी तोरण सजले,
बांधा आकाश कंदील.
रंग रांगोळीचे छान,
घाला पणतीत तेल.
मनी आनन्द दाटला
नाही टिकला तो फार.
भिती केरोनाची मनी,
वाटे जगण्याचा भार.
जीव आकाराला येतो.
सांभाळाया उभा हरी.
आला सहज विचार,
मिळे मनाला उभारी.
आकाशीचे सूर्य तारे,
आणी सागराची लाट,
हसणारे मूल, फूल,
नाही उदास ते होत.
भित्या पाठी लागे भूत,
मन खचून ते जाई,
खोल विवेकी विचार,
मना प्रसन्नता देई.
औषधाची मात्रा झाली,
घेऊ काळजी पुरेशी.
जगण्याची नवी आस
खोटी चिंता का करिशी?
चारुलता काळे.
—————————————
——————————-
स्वर्ग
निळी निळाई, आकाशाची,
महासागरा मिठीत घेई.
आनन्दाने वेडा होऊन,
लाटा उधळित नाचे तोही.
लबाड ढग ते, जरा थांबुनी
चोरुन पहाती, त्या दोघांना.
शहाणा वारा, सावध होउन,
हळूच ढकलुन, देई त्यांना.
गडद निळाई, क्षितिजा वरती,
किना-यावरी, हिरवट होई.
हलकी फुलकी लाट फुटोनी,
रंग पांढरा खुलवुनी जाई.
निसर्ग जादू, न्यहाळताना,
भान विसरले, हरवुन गेले.
ब्रह्मानंदी रंगुन जाता,
स्वर्गाचे मज दर्शन झाले.
चारुलता काळे
——————————————
टिप्पण्या