कविता 4

————————————


माझी माती, माझा देश


भुगोल पुस्तक शाळे मधले,

मला आवडे भारी.

राज्य, देश अन परदेशांची,

मिळे माहिती सारी. 


पैसा थोडा येता हाती,

देश विदेशही  फिरून आले,

काही तिथले जरी आवडले.

मायदेश मम महान, कळले.


बर्फाचे चमचमते डोंगर,

उत्तर सीमा, हिमालयाची,

हिरवाईची शाल पांघरुन,

काळी माती सह्याद्रिची.


वाळवंटही आहे येथे,

खळखळणा-या नद्या ही दिसती,

तीन बाजुला या देशाच्या,

सागर लाटा नाच नाचती. 


विज्ञानाची कास धरोनी,

समृध्दीही दारी आली,

परंपरा अन, आदर्शाना,

कष्टांची त्या साथ मिळाली.


महान नेते, महान योध्दे,

महान इथले कलाकार ते.

माती इथली माय बनोनी,

संस्कारांचे सिंचन करिते.


माझी माती, आई माझी, 

देशच माझा धर्म असे.

फिरून आले दाहीदिशा पण,

देशच माझा मनी वसे.


चारूलता काळे 

————————————


विश्वभरारी


किडा मुंगिची, चाल कशाला,

चित्त्याची ती गती हवी. 

जोश हवा जगण्यात नवा,

अन जगण्याला त्या जिद्द नवी.


माणुस म्हणुनी जन्मा आलो,

कष्टांची त्या तमा नसे.

बुध्दीचे वरदान आम्हाला,

रोज नवी ती सिध्दी दिसे.


कला, शास्त्र अन उद्योगाची,

प्रगती केली अपरंपार.

लेखन, वाचन, प्रवास करुनी,

जगता वरती झालो स्वार.


जुन्या नव्याची सांगड घालुन,

संस्कृतिचा केला सत्कार,

ग्रह अन तारे पाहुन आलो,

भारत भू चा जयजयकार.


अता नाही ते निवांत बसणे,

काम उद्याचे आज करू,

नव आकांक्षा यश कीर्तीची,

विश्वभरारी चला भरू.


चारुलता काळे 

—————————————-


पक्षांची शाळा


स्वप्नात पाहिली,

पक्षांची शाळा

कितीतरी पक्षी,

झाले होते गोळा


छोट्याशा चिमणीची,

गडबड फार

पोपटाचा रंग,

हिरवागार.

कावळा दिसत होता,

काळा काळा फळा,

पांढरा बगळा,

जरासा  बावळा.

जसा कुणी राजा,

तसा मोराचा तोरा,

डोक्यावर तुरा आणी

सुंदर पिसारा.


हाका मारत आईने,

हलवलं जेंव्हा,

स्वप्नातुन खाडकन,

 जागी झाले तेंव्हा.


चारुलता काळे

—————————————

जादू


पक्षी मी झाले तर?

अेकदा मनात आलं.

जादू अेक झाली आणी,

सगळंच बदललं.


छोटी मोठी पिसं,

अंगावर आली,

हाताला लागल्या,

पंखांच्या झुली.

दात आणी ओठ,

गायबच झाले. 

टोकदार चोचीत ते,

मिसळून गेले.

पायाच्या पंजाचा,

बदलला आकार,

बोटांवर आली,

नखं टोकदार. 


इतक्यात आले बाबा,

मी हाक मारली.

बोलता येईना,

माझी फजिती झाली.

नको होणं पक्षी,

जेंव्हा मला पटलं

जादु झालीच नव्हती,

त्याचं किती बरं वाटलं


चारुलता काळे

——————————————————


IMG_0319.jpeg


बहावा


म्हणती तुजला कुणी बहावा,

कर्णिकार कुणी म्हणती.

सोने उधळत तुझे बहरणे,

डोळे तुजवर खिळती.


काल अचानक तुला पाहिले, 

आणी जादू झाली. 

हळदीचा तो मंद रंग अन, 

झुलणे वरती खाली.


पिवळी साडी नेसुन नवरी,

जशी लाज लाजते.

तशीच नाजुक फुले तुझी रे,

रूप किती साजते.


कधी भासशी कृष्ण सावळा,

ओढुन पिवळा शेला,

गोप गोपिका सवे तुझा तो,

रास दिसे रंगलेला.


ग्रीष्माचा तो ताप वाढता,

असह्य होई जगणे,

“येइल पाउस”, बहर बोलिने,

गोड तुझे कुजबुजणे.


चारुलता काळे.

____________________________




षडरिपू


सहज भावना असती जरी ह्या,

षडरिपू ओळख ह्यांची.

विवेक विसरुन नकोच कधीही,

संगत घडुदे त्यांची.


इच्छांचा तो विशाल सागर,

काम ही त्याला म्हणती.

विषयांचे ते फसवे भोवरे,

अविरत लाटा उठती


मना सारखे घडले नाही,

क्रोधाची त्या ठिणगी पडते,

शब्दांचे मग होत निखारे,

दिसेल त्याला पोळत सुटते.


लोभ असे तो खट्याळ वारा,

असतो पण जो नाही दिसला,

हळुच कधी तो, मनात घुसला,

नाही म्हणुनी जो तो फसला.


मृगजळ फसवे मोहाचे ते,

दिसणे त्याचे खोटे असते.

उगाच किती ते धाव धावलो,

हातामधे काही न येते.


अभिमानाच्या अतिरेकाने,

मद-मस्तपण वाढत जाई

गर्वाचा तो फुगा फाटता

हसे होतसे समजुन घेई.


पाहुन प्रगती दुस-याची ती,

नकळत जागे मत्सर जेंव्हा

ईर्षेच्या आगीत जळोनी,

ताप होतसे मनास तेंव्हा.


चारुलता काळे

——————————————-


ती अशीच केंव्हांची…


ती अशीच केव्हांची,

बसलेली दिसते.

आठवणी खोल जुन्या,

कुरवाळित असते.


नाव कधी कोणाचे,

मुळी आठवेना,

चेहरे ते आठवून,

गोंधळून जाते.


शाळेच्या अंगणात,

किती मैत्रिणी त्या,

कोण कुठे वसल्या त्या,

मोजित ती रहाते.


सुटलेले नातगोत,

धूसर त्या आठवणी,

काय अर्थ जगण्याला,

भांबावून जाते.


जिवलग तो मित्र सखा,

जन्माच्या गाठी,

वाट तिथे पाहिल ना?

कासाविस होते.


दिवस पुढे जाईना,

रुसलेल्या रात्री, 

भार तिच्या जगण्याचा,

मूक ती वहाते.


चारुलता काळे

—————————————-


IMG_3028.jpeg


सोनचाफा


पाहिला तो सोनचाफा,

की पाहिले गे मी तुला.

गोड त्या तव आठवांनी,

हरवुनी गेलो पुन्हा.


रंग त्याचा हळदिचा,

नितळ सोनेरी असा,

तव कांतिला मग आठवूनी,

रंगुनी गेलो पुन्हा.


पाकळ्या त्या उमलणा-या

ओठ दिसती ते तुझे,

गुपीत त्या ओठातले,

मी टिपुन घेतो मग पुन्हा


मंद हळवा वास त्याचा,

श्वास की तव सांग ना,

जीव मी जडवून बसलो.

काय हा घडला गुन्हा.


चारुलता काळे. 

—————————-






































टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रवास नॉर्वे आणि आइसलैंड

काव्यः माझ्या कविता 1