दर्शन
दर्शन
कधी कधी न ठरवता ती गोष्ट होणार असते तशी होते. आमचं म्हणजेच मी आणी माझा नवरा दिगंबर उर्फ किशोरचं अयोध्येला जाणं अगदी तस्सच झालं.
आमचे खूप जुने म्हणजे जवळ जवळ पंचेचाळीस वर्षां पूर्वी पासूनचे मित्र श्री सुधीर गुप्ता यांच्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण आलं. लग्न कानपूरला होतं. बोलावणं करतानाच चंद्रिका ( सुधीर यांच्या पत्नी ) म्हणाल्या “कानपूर आना और फिर अयोध्या होके रामजीके दर्शन भी कर लेना।”
अयोध्येच्या राम दर्शनाला गेलो तर आधुनिक, आरामदायक आणि सेवा, स्वच्छतेसाठी बहुचर्चित अशा “वंदे भारत” नावाने सुरू झालेल्या गाडीने प्रवास करण्याची माझी इच्छा पूर्ण होणार होती आणी अेका बहुचर्चित जागेला जाणं होणार होतं. कानपूरचा दिमाखदार, आपुलकीचा, प्रेमाचा लग्न सोहळा आटपून आम्ही, दिल्ली- कानपूर-लखन्नौ- अयोध्या जाणारी “वंदे भारत” ट्रेन कानपूरला पकडली आणी अयोध्येकडे निघालो.
“वंदे भारत” बद्दल जे ऐकले होतं त्याची प्रचिती आली. आमचा ट्रेन प्रवास अत्यंत सुखकर झाला. श्रावण महिना असल्याने जिकडे नजर जाईल तिकडे मस्त हिरवाई! शेतात काम करणारे मजूर, अखंड चरणा-या शेळ्या, पाण्यात डुंबणा-या म्हशी, बालकविंच्या कवितेतले हिरवे हिरवे गार गालिचे पहाताना हरवून गेले. गाडीतून दुथडी भरून वहाणा-या गंगा मैय्याचं दर्शन झालं. व्हिडिओ, फोटो माझी गडबड चालू होती. साडेतीन तासाचा प्रवास कधीच संपला आणि अयोध्येतील अयोध्या कॅन्टॉन्मेंट या स्टेशनला गाडी पोचली.
प्लॅटफॉर्मच्या बाहेर रिक्षावाल्यांची गर्दी, जो तो किधर जाना है? असं विचारत होता. आम्हाला इरा या ऑर्किड हॉटेलला पोचायचं होतं. ऊबर या कंपनीची टॅक्सी बुक करण्याचा प्रयत्न केला पण ती झाली नाही. मग इलेक्ट्रॉनिक रिक्षा हा पर्याय होता. हॉटेलवर पोचलो.
स्टेशन ते हॉटेल या प्रवासात हे लक्षात आलं की रस्त्यांची कामं चालू आहेत. शहराचा काया पालट होत असला तरी रहदारीला अजिबात शिस्त नाही. ज्याला जिथे जसं घुसता येईल तो तसा घुसतोय. चालणारे कसेही चालतायत.
रिक्षावाल्याला अयोध्येच्या विकासा बद्दल विचारलं तो फारसं बोलला नाही पण बीजेपी अयोध्या सीट का हरली याविषयीच्या गप्पांमधे मात्र गमतिशीर उत्तरं मिळाली. जसं की “ बंदा जब खुदको समझने लगा तो ये होना ही था।”, “ हमारे घर का खाना हमने दुसरे को दिया और हम भूखे रह गए” इ. इ. “ साब हर कोई हमें यही पूछता है।” असं म्हणत आम्हाला हॉटेलवर ड्रॉप करून हसत हसत तो निघून गेला.
फ्रेश होऊन आम्ही भटकंतीला निघालो. इथला गोंधळ पाहता हॉटेलमधे रजिस्टर्ड असलेला रिक्षावाला बोलावला आणि बाहेर पडलो. अयोध्येत गल्लिगल्लित देवळं आहेत. श्रावण महिना असल्याने सर्वत्र भगव्या लाल कपड्यातले कावड यात्रेकरू दिसत होते. हायवे तसेच काही रस्ते हे उत्तम सुशोभित असले तरी ठिकठिकाणी अत्यंत जुन्या मोडकळीला आलेल्या इमारती, घरं दिसतात. तुंबलेली आणि वहाणारी उघडी गटारं कच्चे खडबडीत रस्ते माती धुरळा यांच ओंगळवाण दर्शन होत रहातं. अनेक छोट्या गल्ल्या आणि त्यातच उघड्यावर छोले भटूरे, पु-या, चाट, पेढे, मिठाई, चहा अशी दुकाने रेकड्या दिसतात. लोकं खात असतात. यात्रेकरूंना आकर्षित करतील अशा माळा, मूर्त्या, बांगड्या, गळ्यातली, कपडे, छोटी खेळणी अशा अनेक गोष्टिंची दुकानं, टप-या, फेरिवाले दिसत असतात.
आमचा रिक्षावाला संजय सिंह हा खूप उत्साही, शहराची पूर्ण माहिती असलेला आणि मेहनत करणारा हसतमुख मुलगा होता. त्याच्या बरोबर “हनुमान गढी” आणि “शरयू नदीची आरती” या दोन गोष्टी आम्ही करणार होतो. खडबडीत रस्त्यातून जाताना आमची अक्षरशः वाट लागत होती. मी त्याला तसं म्हणताच तो पटकन म्हणाला “ सॉरी मॅडम मै आपको कहना भूल गया, आप मेरे पीछे जो उल्टी सीट है वहॉं बैठिये। सीधी सीट पहियेपे आनेसे जादा झटके लगते है।” अरे खरंच की असं म्हणत आम्ही तसे बसलो.
“पोलिटिकल गेम है मैडम। लोग समझते नही, जिसने विकासका काम किया उसीसे बेईमानी हुवी। मुस्लिमोंका तो समझते हैं पर यादवोंने गड़बड़ कर दी उसका गम है।” मोदी, योगी यांचा मनापासून आदर असलेला, त्यांच्यावर भरवसा असलेला हा सूर होता।
मलाही कुठेतरी हे होऊ शकतं असं वाटलं. अयोध्येत रस्ते, मोठमोठी हॉटेल्स, यांच काम चालू आहे. इथे रोजगार निर्माण झाला तर? अेक आशावादी विचार मनात आला. आम्ही हनुमान गढी इथे पोचलो. लोकांची प्रचंड गर्दी पाहून, देवळात न जाताच परत निघालो. मनात विचार आला “मंदिराच्या वाटेवर अनेक ठिकाणी हनुमानाचे वंशज दर्शन देत होतेच की.”
वाराणसीची गंगा आरती पाहिलेली असल्याने आम्हाला शरयू आरतीही तशी खास नव्हती पण संजयचा उत्साह पाहून आम्ही तसं म्हटलं नाही.
दुस-या दिवशी संजय सकाळी सहाला येऊन आम्हाला राम लल्लाचं दर्शन करवणार होता. आम्ही पावणे सहालाच तयार होतो. त्याचा फोन आला, “हर जगह बॅरिकेटस् लगाए है। मुझे थोडा घूमके आना पडेगा।” “झालं हा उशिरा उठला असेल!” आमच्या मनांत आलं. बरोब्बर दहा मिनिटात म्हणजे सहाला पाच मिनिटं असताना हा हजर. आमचा अंदाज चुकला होता.
आम्ही निघालो. रस्त्यात खरोखरी अनेक ठिकाणी वाहनांसाठी रस्ते बंद केलेले होते. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला मेठ्ठाल्या बस उभ्या होत्या. रिक्षावाले उलट सुलट फिरून मंदिराच्या जवळ जाण्याच्या प्रयत्नात होते. श्रावणातला दुसरा सोमवार कावड यात्रेकरुंची संख्या मोठी होती. संजयही अेखादा चक्रव्यूह भेदावा तसा अनेक रस्ते अनेक गल्ल्या चकरा मारत आम्हाला कमितकमी चालावं लागेल अशा ठिकाणावर आम्हाला घेऊन मंदिराच्या जवळ पोचला. रिक्शा पार्क करून तो आमच्या बरोबर आमची दर्शन व्यवस्था करायला बरोबर आला.
आम्ही दोघं अगदी धडधाकट असलो तरी सिनिअर सिटिझन्स म्हणून व्हील चेअर घ्यावी असं संजयने आदल्या दिवशीच आम्हाला सुचवलं होतं. आमचं वय सिनिअर म्हणून तसं लक्षात येत असलं तरी वयाचा पुरावा म्हणून आम्ही आधार कार्ड घेतलं होतं. व्हील चेअरचा इथे कुठलाच चार्ज नाही. पण व्हील चेअर ढकलणारे दीडशे रुपये घेतात. जो त्यांचा ठरलेला मेहनताणा असतो. इथेच तुमचा मोबाईल इतर वस्तू, बॅग्ज ठेवण्यासाठी लॉकर्स आहेत. पैशांच पाकीट लहान पर्स (ज्यात ऑब्जेक्शनेबल वस्तू नसव्यात) बरोबर नेता येतात. मंगला आरती तसेच इतर आरत्या यांचे पासेस आधी काढावे लागतात. विशेष दर्शन पासेसही बुकिंग करून उपलब्ध असतात.
फारशी इच्छा नसतानाही गर्दी पाहून आणि आरामात जवळून धक्काबुक्की सहन न करता दर्शनाचा पर्याय म्हणून व्हील चेअरमधे बसलो. संजय तिथेच थांबला.
महेश आणि भोला या दोन तरूण मुलांनी व्हिलचेअरच्या खास मार्गिकेवरून आम्हाला अत्यंत काळजीपूर्वक आदराने नेलं. मुख्य मंदीर तसेच मंदीर परिसरात अनेक वास्तुंचं काम अजुनही जोरात सुरू आहे. व्हील चेअर ढकलतांना भोलाने मला मंदिरा बद्दल शक्य तेवढी माहिती दिली. मंदिराच्या उदघाटनाला मान्यवर कुठे बसले होते, मंदिराचे किती मजले होणार आहेत हे सांगत त्याने मंदिराच्या नक्षिकामाचं सौन्दर्य पहाण्यासाठी थोडा वेळही दिला.
बाबरी मशीद नष्ट करून, कोर्टातील लढा जिंकून, अनेक वाद विवाद, आरोप प्रत्यारोपांच्या वादळातून निर्माण झालेली आणि अजुनही जिच्या बद्दल चर्चा आहे, होत राहील अशीही भारतातच नव्हे तर देश विदेशातही माहित झालेली वास्तू खरंच इतक्या लवकर मी पाहावी, पाहीन असं वाटलं नव्हतं. इथे पोचले आणि माझ्या मनातल्या वादळाची जागा आनन्दाने घेतली.
मी राम लल्लाची मूर्ती काही फुटांवरून डोळे भरून पहात होते. ती सावळी मूर्ती सजीव होऊन माझ्याकडे आपलेपणाने पहून हसत होती. मला कुणी माझं भेटल्याच्या आनन्दाने मी भावूक झाले. डोळ्यातून घळाघळा अश्रू पाझरले. माझी व्हील चेअर फिरवून बाहेर नेताना भोलाने ते पाहिले आणि कमाल म्हणजे पुन्हा अेक वळसा घेऊन तो मला परत मूर्ती समोर घेऊन आला. “ पीछे भीड नही है ना इसलिअे” असं त्याने म्हणताच तिथली सिक्सुरिटीवाली मुलगी हसली. अयोध्येच्या राजाचं मला दर्शन घडलं अेकदा आणि पुन्हा अेकदा…!
संध्याकाळी अयोध्या मुंबई विमान प्रवासात ही माझी अयोध्या कहाणी लिहून काढली.
चारुलता काळे.
टिप्पण्या