समाज माध्यमांवरील लेखन आणि लेखक

 


समाज माध्यमांवरील लेखन आणि लेखक


मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा १२६ वा वार्षिकोत्सव शुक्रवारी दिनांक १ ऑगस्टला २०२५ ला संपन्न झाला. साल २०२३/२४, सर्वोत्कृष्ट कार्य करणारी शाखा पुरस्कार, विलेपार्ले शाखेला देण्यात आला. 

विलेपार्ले शाखा अध्यक्ष लता गुठे, ग्रंथपाल मनिषा आणि नम्रता यांच्या बरोबर कार्यकारिणी सदस्य म्हणून मला या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. 


या कार्यक्रमात प्रसिद्ध साहित्यिक श्रीमती मोनिका गजेंन्द्रगडकर यांनी, “समाज माध्यमांवरील लेखन आणि लेखक” या विषयावर अध्यक्षीय भाषण केलं. 


मराठी साहित्य विश्वात कथा लेखनासाठी मोनिका गजेंन्दगडकर यांची विशेष ओळख आहे. त्या मौज प्रकाशनाच्या, मौज दिवाळी अंकासह, मुख्य संपादक आहेत. मला मौजच्या एका कार्यक्रमात तसेच आणखी दोन साहित्यिक कार्यक्रमात त्यांचे भाषण ऐकण्याची संधी मिळाली होती. त्यांच व्यक्तिमत्त्व, बोलण्याची पद्धत अत्यंत प्रभावशाली आहे. 


भाषणाच्या सुरुवातीलाच “अध्यक्ष म्हणून, साहित्य सम्मेलनाच्या अध्यक्षांना या सोहळ्यात आमंत्रित करण्याती परंपरा आहे, पण  या वर्षीच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर आज उपस्थित राहू शकणार नव्हत्या म्हणून मी हे अध्यक्षीय भाषण करत आहे.” असं निखालसपणे सांगून मोनिका गजेंन्द्रगडकर यांनी ही संधी दिल्याबद्दल संस्थेचे आभार मानले. 


मराठीतील लेखिका, समीक्षिका सरोजिनी वैद्य यांच्या सांगण्यावरून आपण मुंबई मराठी ग्रंथसंग्रालयात येऊ लागलो. ही वास्तू, इथले ग्रंथालय, ग्रंथपाल हे आपल्या मराठी साहित्य क्षेत्रातील कामासाठी कसे महत्वाचे ठरले हे मोनिका गजेंन्द्रगडकर यांनी आवर्जून सांगितलं. 


मोनिका गजेंन्द्रगडकर यांच्या भाषणातून मला जे भावलं, समजलं, लक्षात राहिलं आणि त्यांचं भाषण ऐकून मला जे वाटलं ते लिहिण्याचा माझा हा प्रयत्न. 


मोनिका गजेंन्द्रगडकर म्हणाल्या “समाज माध्यमांवरील लेखन आणि लेखक. हा आजचा म्हणजे आजच्या काळाचा विषय आहे. मी स्वतः लेखक आहे आणि संपादकही आहे. मला आज या विषयावर संपादक म्हणूनही व्यक्त होता येईल" 


समाज माध्यमांची ताकद जबरदस्त आहे. आता ती माध्यमं आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहेत. ती संपर्काची तसेच ज्ञान, मनोरंजन आणि माहितीची साधनं आहेत. पण त्या माध्यमांचा अतिरेक हे व्यसन आहे.  ही माध्यमं नैराश्य, तुटलेपणात आधार देतात. फार मोठा साहित्य व्यवहार समाज माध्यमांवर होतो आहे.  नवनिर्मिती, लेखन यांना पोषक माध्यमं अशी त्यांची सकारात्मकता आहे पण त्यांच्या विषयी बरेच प्रश्नही आहेत. 


 समाज माध्यमं (Social Media) म्हणजे, इंटरनेट-आधारित अशी माध्यमं. समाज माध्यमांचा मुख्य उद्देश हा संवाद आणि माहिती देणे असा आहे. लोकांना जोडणे आणि त्यांच्यात संवाद शक्य करणे हा आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कुणिही आपले विचार, अनुभव, बातम्या आणि इतर माहिती  सहजपणे प्रकाशित करू शकतात. 


छापील माध्यमं म्हणजे प्रिंट मीडिया.  कुठल्याही भाषेत प्रकाशित होणारी वृत्तपत्रं, मासिकं, आणि इतर मुद्रित सामग्री. यात वर्तमानपत्रं, नियतकालिकं, पुस्तकं आणि इतर छापील साहित्य यांचा समावेश होतो.  समाज माध्यमांमुळे छापील माध्यमं दुरावली आहेत. नियत कालिकं बंद होत आहेत हे वास्तव आहे. मराठी भाषेत आता फक्त दिवाळी अंक हाच एक पर्याय उरला आहे. (त्यातीलही काही आता समाज माध्यमांवरही उपलब्ध आहेत). 


समाज माध्यमांवर, छापील माध्यमातला एक महत्वाचा घटक, ‘संपादक’ नसल्याने लेखकांचं साहित्य नाकारलं जात नाही. कुणीही कुठल्याही विषयावर, त्याला जे जसं आणि जेंव्हा वाटतं तसं पोस्ट करतो.  त्याला प्रतिक्रिया येते. पण समाज माध्यमांवर ताबडतोब जी प्रतिक्रिया येते ती बरेचदा फसवी असते. साहित्य मनापासून वाचून त्याचा आनंद घेऊन, ते अभ्यासून येणाऱ्या प्रतिक्रियांना लेखक मुकला आहे. 


मोनिका गजेंन्द्रगडकर, समाज माध्यमं आणि छापील माध्यमं यांची तुलना करत व्यक्त होत गेल्या. दोन्ही माध्यंमावर लेखकाचा आतला आवाज महत्त्वाचा. समाज माध्यमांनी लेखकांना निर्भय बनवलं. विषयांची विविधता वाढली. विचारांचं आदान प्रदान वाढलं. लेखकांना स्वातंत्र्य आणि प्रचंड प्रसिद्धी मिळू लागली. समाज माध्यमं ही लोकशाहीचा हक्क तसेच व्यवस्थेवर दबाव म्हणून फार उपयुक्त ठरत आहेत. याचं उदाहरण म्हणून त्यांनी माहाराष्ट्र राज्याची त्रीभाषा नीती आणि त्या नंतरची त्या बाबतीत समाज माध्यमांवरील चर्चा याचा उल्लेख केला. दृष्यात्मकता ही समाज माध्यमांची शक्ती आहे आणि त्यांच सामर्थ्य वादातीत आहे हे त्यांनी नमूद केलं. 


समाज माध्यमांच्या तृटी किंवा त्या बद्दलची काळजी व्यक्त करताना मोनिका गजेन्द्रगडकरांनी प्रश्न उपस्थित केले की, संपादक हा घटक नसल्याने सर्जनाला खरंच फायदा होतो का? दर्जा नसलेलं अल्पजीवी लेखन प्रकाशित होतंय का? संपादक चांगल्या लेखकांचा शोध घेतात असं सांगून त्या म्हणाल्या, श्री. पु. भागवत म्हणायचे, “लेखकाला जपायला हवं.”


समाज माध्यमांवर चांगले ब्लॉग, चांगल्या लेखनाचा शोध घेतल्यावर, त्या लेखकाला विचारलं की छापील माध्यमांवर लिहाल का? तर ते प्रतिप्रश्न विचारतात “कशाला लिहू?”   समाज माध्यमांवर लिहिण्याची  शैली ही बरेचदा वेगळी असते.  तिथे सर्जनशील लेखकांना नव्या प्रकारच्या लेखनाची बीजं मिळतात. याचं उदाहरण म्हणून मोनिकांनी ‘अलक’ ह्या कथा प्रकाराचं उदाहरण दिलं. (साधारणपणे पाच किंवा त्यापेक्षा कमी ओळींमध्ये अलक कथा लिहिली जाते.) पण हे अशा प्रकारचे साहित्य प्रकार आभासी तर नाहीत? चटकदार पण अल्पजीवी लेखन होतंय का?


ताजेपणा, विविधता आहे पण अक्षयपण, चिरंजीवीपण हरवलं आहे. हितगुज केल्यासारखं,

 स्वकेंद्रित लिखाण हे साधं, उत्कट, मनाला हात घालणारं, आयुष्याशी नातं सांगणार असल्याने ते प्रत्येकाला हवंस वाटतं पण छापील माध्यमांवरील साहित्यात असते तशी दीर्घता, खोली त्यात नाही. समाज माध्यमांवर वाचकांची वचनबद्धता नाही. 


रामदास स्वामींच्या श्लोकातील “दिसामाजी काहीतरी ते लिहावे” किंवा पाडगांवकर म्हणायचे “मी रोज ठरावीक वेळेला लिहितोच.” याची आठवण करत, मोनिका गजेंन्द्रगडकर म्हणाल्या की समाज माध्यमांवर  लिखाणाला चालना मिळते. लेखक वाचक संवाद घडतोय. प्रतिक्रिया देऊन लेखकांना निसटून गेलेल्या गोष्टी वाचक सांगतात. पण त्याच बरोबर तिथे जाणकार मर्मज्ञ वाचक लाभेलच असं नाही. 


अस्वस्थता असली तरच लेखन होतं. अमृता प्रीतम म्हणाल्या होत्या की खरा कलावंत हा तहानलेला असतो. समाज माध्यमांवर माहिती, घटना यांचा मारा होतो. लेखकाला चिंतन करण्याचा अवकाश मिळतच नाही. संवेदनशीलता नवनिर्मितीत परिवर्तन होण्यासाठी लेखकांचे एकटेपण हरवतंय ही गंभीर गोष्ट आहे. लेखकापेक्षा कलाकृती बोलते. समाज माध्यमात लेखक लेखनाचं मार्केटिंग करतोय. त्यामुळे सवंग लेखनही लोकप्रिय होताना दिसतंय. यात अभिजातपणा हरवतोय का? 


लेखक सजग झालाय. पण तो विचारधारेत अडकत चाललाय का? असा प्रश्न विचारून मोनिका गजेंन्द्रगडकर यांनी तुर्की लेखिका एलिफ शफाक यांनी सांगितलेली एक गोष्ट सांगितली. शफाक यांची आजी लोकांचे मस ( चामखीळ) काढून टाकण्यासाठी त्या मस भोवती एक वर्तुळ करायची. ते वर्तुळ काढलं की तो मस काही काळाने गळून जाई. लेखकाला सुद्धा अलिप्त राहण्यासाठी आपल्या भोवती असं वर्तुळ आखता यायला हवं. तरच ह्या वाढलेल्या कलकलाटून सुटका होईल. प्रतिभावान लेखकांची अभिजातता गवसेल. 


आपल्या भाषणाचा समारोप करतांना मोनिका गजेंन्द्रगडकर म्हणाल्या की माध्यम कुठलंही असो, साहित्य आणि लेखकीय वृत्तीच सपाटीकरण, वाङमय चौर्य, अभिजात लेखनाला ‘ओल्ड स्कूल.’ म्हणून नावं ठेवणं या गोष्टी टाळायला हव्यात. लेखकांनी आपल्या आकांक्षांचा विचार करून सावध राहून लिहायला हवं. भूलभुलय्यात हरवून जाऊ नये. मुक्त राहून मुक्तपणे साहित्य निर्मिती करत रहावी.


मोनिका गजेंन्द्रगडकर यांचं हे भाषण समाज माध्यमांवरील लेखन आणि लेखक या विषयावर होतं. समाज माध्यमांवर फक्त टीका न करता त्यांनी त्याचे फायदे सांगून मग त्यातील धोके, त्रुटी यांच्यावर प्रकाश टाकला. त्यांचे हे विचार समाजमाध्यमांवरील अन्य सृजनशील गोष्टींच्या बाबतीतही तितकेच महत्त्वाचे आहेत. 


चारुलता काळे. 

———————-

मोनिका गजेंन्द्रगडकर यांच्या “ खूप छान , मन: पूर्वक लिहिलंय तुम्ही! 🌹” ह्या प्रतिक्रिये नन्तर हा लेख पोस्ट केला आहे.

🙏





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रवास नॉर्वे आणि आइसलैंड

काव्यः माझ्या कविता 1