आरसा

 




१.


आरसा


लोकमान्य सेवा संघ, पारले यांच्या, माधव दामोदर कोल्हटकर सांस्कृतिक शाखेच्या, विलेपार्ल्याचा आद्य सार्वजनिक गणेशोत्सव (वर्ष १०६ वे), या गणेशोत्सव कार्यक्रमात शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर रोजी, संस्थेच्या पु. ल. देशपांडे सभागृहात. मंगला खाडिलकर यांचा ‘आरसा’ हा एकपात्री प्रयोग आयोजित करण्यात आला होता. 


कार्यक्रमाला पोहोचायला मला थोडासा उशीर झाला होता. प्रस्ताविक तसेच मंगला जींचं स्वागत सत्कार संपून प्रसन्न वदना, मंगला जी व्यासपिठावर उभ्या होत्या. मला जिथे जी जागा मिळाली तिथे मी बसले. 


ज्यांचं बोलणं नेहमीच ऐकावसं वाटतं अशा मंगला जींनी बोलायला सुरुवात केली.  सर्व प्रथम त्यांनी लोकमान्य सेवा संघ या संस्थेची महती सांगत माझ्या सारखे सर्वच कलाकार अशा संस्थेत कार्यक्रम करता आला की तो त्यांचा सन्मान समजतात. अशा संस्थाचे ते ऋणी असतात असं म्हणत लोकमान्य सेवा संघा बद्दलची आपुलकी व्यक्त केली. 


आपल्या ‘आरसा’ या कार्यक्रमा बद्दल त्या म्हणाल्या की मी काही वर्षांपूर्वी हा कार्यक्रम करणं बंद करून दुसरे कार्यक्रम करू लागले. पण गेल्या काही वर्षात पुन्हा या कार्यक्रमा बद्दल रसिक विचारू लागले. मनात आलं की आता पुन्हा काही नवीन घेऊन तो सादर करता येईल. ‘आरसा’ पुन्हा करू लागले पण आता मोजदाद करणं सोडलंय.


मला शब्दांनी कधी दगा  दिला नाही. मी मुलाखती घेत होते, सदरंही  लिहित होते. १९९५ पासून “ आरसा” हातात आला. आसावरी काकडे यांच्या ‘आरसा’ या कविता संग्रहाचा उल्लेख करत त्या म्हणाल्या की “माझा आरसा” किंवा “मी माझा आरसा तुला दिला.” म्हणजे नक्की काय! तर तो असतो बिंब प्रतिबिंब ह्याचा खेळ! 


आरसा कधी कधी आपल्याला आपल्याच प्रतिमे बद्दल संभ्रमीत करतो. हे जे आपण आरशात दिसतोय, आपण खरेच तसे आहोत का? की “मैं ख़याल हूँ किसी और का.?” आज आत्ता आपण जे जसे व्यक्त होतोय खरेच ते तसे आपण आहोत का? 


मंगला जींनी “माझ्यातल्या मी ला जागं केलं होतं.”

मी मनापासून ऐकत होते. आरसा आणि त्यातली प्रतिबिंब यातला गहन अर्थ उलगडत नेतांना त्या पुढे म्हणाल्या की मी मान्यवरांच्या, कलाकाराच्या मुलाखती घेते तेंव्हा प्रश्न विचारते आणि जेंव्हा ते त्या प्रश्नाचं उत्तर देत असतात ते ऐकताना मला तो कलावंत आणि रसिक यांच नातं पारखायची सवय लागली. कला आणि कुसर ह्या शब्दांची गंम्मत उलडताना त्यांनी संत गाडगेबाबा यांची “सबसे बडा कौन” ही गमतिशीर गोष्ट सांगितली. बाबा हा प्रश्न विचारतात, गावकरी त्यांच्या कुवती प्रमाणे त्याचं उत्तर देतात. प्रत्येक वेळी गावक-यांनी सांगितलेल्या “बड्या” पेक्षा, दुसरा “बड़ा” ठरत जातो. अगदी शेवटी रामाचं बड़ेपणही संतांच्या संगतीवर अवलंबून आहे हे बाबा लक्षात आणून देतात. 


“प्रतिभा हट्टी असते.” असं म्हणून ते कसं हे सांगण्यासाठी, शांताबाई शेळके एक किस्सा सांगायच्या तो किस्सा मंगला जींनी सांगितला. शिल्पकार शिल्प बनवत असते. त्यासाठी मॉडेल म्हणून बसलेली तरुणी कमालीची सुंदर असते. शिल्प साकारताना मॉडेलची मूर्खासारखी अव्याहत बडबड चालू असते. शिल्पकार वैतागलेली पण तरिही ती ते शिल्प पूर्ण करते. ते पूर्ण झालेलं शिल्प झाकलेलं असतं. रात्री शिल्पकाराच्या मनांत येतं की आपल्याला ती मॉडेल सुंदर दिसत असुनही अजिबात आवडली नव्हती.  त्या विचारात ती त्या शिल्पावरील कापड काढते आणि सुन्दर स्त्रीच्या जागी तिच्या प्रतिभेला जाणवलेली कुरूप स्रीच त्या शिल्पात साकारलेली तिला दिसते . ती ते शिल्प भग्न करते. आपल्या मनाच्या आरशाला जे जसं दिसतं तसंच त्याचं प्रतिबिंब तयार होतं. 


प्रतिभेचा हट्टीपणा, स्वच्छंदीपणा सांगताना मंगल जींनी कवी बोरकरांची आठवण काढली. मी अजुनही गावी गेले की बोरकरांच्या घरा कडून गाडी नेते असं सांगत त्यांनी बोरकराचा एक किस्सा सांगितला. बोरकर एकदा आपल्या भावा बरोबर बाहेर पडले. रिमझिम पाऊस पडू लागला. बोरकर त्यांच्या स्वरचित कविता गायचे. त्यांना कविता सुचली आणि ते गायला लागले “घन बरसे रे घन बरसे रे” ते ऐकून भावाने सहज विचारलं “बाकीबा ही कुणाची रे चीज?” झालं…संवेदनशील बोरकरांना तो प्रश्न दुखावून गेला. ते गाणं १८ वर्ष अपूर्ण राहिलं. मंगला जी साहित्याच्या जाणकार आहेत साहजिकच त्यांनी जाता जाता बोरकरांच्या आणखी एका मजेदार कवितेत बिलंदर प्रियकर प्रेयसीला “मला विसर”, असे म्हणताच ती त्याला “विसर म्हणाया कधी तुझे मी केले स्मरण?” असा खटकेबाज प्रश्न विचारते हे सांगितलं आणि श्रोत्यांनी दाद दिली..



मंगला जी त्यांच्या कार्यक्रमासाठी खूप ठिकाणी जात असतात. गोवा येथील शांता दुर्गा देऊळातील एका कार्यक्रमाला त्या गेल्या असतांना घडलेली विचार करण्या सारखी एक घटना त्यांनी सांगितली. एक अगदी अनोळखी मुलगी,  “मावशी तुला काही सांगायचंय…” असं म्हणत मंगला जींवर प्रचंड विश्वास ठेवून, आत्मियतेने सांगते, “मला अेक मुलगा आवडतो तो उदयोन्मुख कवी, गायक आहे. पण तो कमवत नाही.  मलाही त्याच्या सारखंच गाणं आवडतं. तो म्हणतो की तू हो म्हणालीस की सगळं चांगलं होईल.”  मंगला जींच्या लक्षात येतं की ही मुलगी अल्लड आहे. तिच्या आयुष्याच्या अगदी महत्त्वाच्या निर्णयाचं ओझं ती आपल्यावर टाकतेय.  मंगला जी सावध होतात. त्या मुलाच्या प्रेमाला खोट्या प्रेमाचं लेबल न लावता मंगला जी तिला सांगतात, “त्याला तू प्रश्न विचार की माझं गाणं फुलवायला तू मला मदत करणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आई बाबांना सांग.” पुढच्या वर्षी योगायोगाने ती पुन्हा मुलगी पुन्हा त्यांना भेटते. तिला त्या मुलाला मंगला जीं नी विचारायला सांगितलेल्या त्या प्रश्नाने लक्षात आलेलं असतं की ती त्या मुलाच्या खिजगणतीत नव्हती. मंगला जी जेंव्हा कधी दीपमाळ पाहतात त्यांना ती मुलगी आठवते. हा किस्सा ऐकला आणि लक्षात आलं मंगला जी हा त्या मुलीच्या मनाचा आरसा स्वच्छ करण्यात यशस्वी झाल्या होत्या. 


मंगला खाडिलकर ही व्यक्ती बोलते तेंव्हा ते बोलणं सहज सोपं असतं. माहितीपूर्ण असतं. दर्जेदार असतं. आपलंस वाटणारं असतं. मंगला जी म्हणाल्या आपल्या प्रत्येकाकडे एक लोलक असतो. आणि तो लोलक जपायला हवा. या मागचा खरा अर्थ आपल्याला सहज कळावा यासाठी त्यांनी आपल्या लाडक्या साहित्यिक शांताबाई शेळके यांचा उल्लेख करून सांगितलं की शांताबाई म्हणायच्या “देवळाच्या गाभा-यातून तून उचललेला लोलक, माझ्या हातून हरवला.” मंगला जी सांगत होत्या “रोजचं जगणं रंगित म्हणजेच अर्थपूर्ण हवंहवंस करता यायला हवं. माणसं सुद्धा असतात इन्द्रधनुश्याच्या रंगाची पण ते सुंदर रंग दिसायला ती दृष्टि तो लोलक हवा!” त्या फिरायला जातात तेंव्हा धमाल करत बोटीच्या डेकवर फुगड्या, किल्ला विकत घेण्याचा खेळ अशा मजेशीर गोष्टीत त्या कशा रमतात हे सांगून मंगला जी म्हणतात की हे असं काही करताना “शांताबाईंचा तो हरवलेला लोलक”माझ्या हातात असतो. हल्ली पूर्वी सारखं हसता येत नाही पण मी हसते. रस्त्याने जातांना एखाद्या बाईची साडी आवडली तर तसं तिला सांगावं. मनात येतं ते व्यक्त करावं. आपला लोलक हरवूं देवूं नये! वय वाढलं वृध्दत्व आलं तरी परिपक्व जेष्ठत्वाने ते सुंदर करावं.


महान साहित्यिक गदीमा हे संपूर्ण महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व. त्यांचा आणि राजा मंगळवेढेकर यांचा किस्सा ऐकताना खूप मजा आली. मंगला जी म्हणाल्या, स्वतः साहित्यिक असुनही राजा मंगळवेढेकर मस्त स्वैपाक करायचे. त्यांनी बनवलेल्या देशस्थी आमटीचा भुरका घेऊन गदिमा म्हणाले “नवल वर्तले गे माये!” आणि पुढे या शब्दांचे गीत जन्मले. कलाकार हे कला सादर करताना अद्वैताची अनुभूती देतात आणि घेतात जसं की, एक तबलजी म्हणाले होते, “लगता है आज परवरदिगार खुद बजा रहा है।”. 


“कसे कसे हसायचे आहे मला.” ही ओळ उद्धृत करून. मन हेलावून टाकणारी एक गोष्ट मंगला जींनी सांगितली. अर्थ सिनेमातली, “कोई ये कैसे बताए, की वोह तनहा क्यों है” ही त्यांची अत्यंत आवडती गझल त्या ऐकत असतांना त्यांना शीतल आमटेच्या संशयास्पद मृत्यूची बातमी मिळाली. त्या गझलला मृत्यूगंध बिलगला. ते दुःख मनात राहिले एखाद्या विषयी ही अशी खोल आठवण मनात कायमची राहते, त्यासाठी नातं असावच लागतं असं नाही. 


आपल्या सादरीकरणात अनेक मजेदार  किस्से मंगला जींनी सांगितले त्यातला पंचमदांचा म्हणजेच संगीतकार आर. डी. बर्मन यांचा किस्सा असा, गाण्याची चाल बसत नव्हती. खोलीतला पंखा नीट चालत नव्हता. पंखा चालत नाही म्हणून त्याच्याशी खाटखुट करताना तो कसाबसा सुरू झाला. त्याची ती बेढंगी चाल पाहून गाणं झालं “सुनो! कहो! कहाँ! सुना! कुछ हुवा क्या?” याच गाण्याच्या संदर्भात खरं खोटं माहित नाही पण अनेक ठिकाणी सांगितला जाणारा आणि हमखास हशा मिळवून देणारा शौचालय किस्सा ही त्यांनी सांगितला आणि श्रोते ही हसलेच…


ऐकायला साधं सोप्प पण अर्थपूर्ण असं मंगला जी बोलत होत्या. अेका गाण्यात विवादी स्वर चुकून लागला. पण स्वप्न आणि वास्तव ह्यातही विवादाचं दर्शन घडतंच आणि म्हणूनच एखाद्या गाण्याच्या चालीत तो विवादी सूर तसाच ठेवला जातो. बोलता बोलता किती गहन सत्य त्या सांगून गेल्या! मंगला जींनी त्यांच्या गूढ स्वप्नाच्या बहाण्याने आणखी एक महत्वाची गोष्ट सांगितली.  “ख-या आयुष्यात कधीही केली नाही अशी एक गोष्ट माझ्या स्वप्नात मी करते. खोल विहिरीच्या पाय-या उतरत मी विहिरीतून पाणी काढते देवाला वाहते. स्वप्न आहे तो पर्यंत मी आहे!“



त्या त्या क्षणाला तेवढा तेवढा वेळ काढत जगावं . हे कसं ते  सांगताना मंगला जींनी, साहित्यिक भावे, मंगळवेढेकर आणि गदीमांचा गमतीशीर किस्सा सांगितला. मंगळवेढेकर जेवण बनवत होते. भाव्यांनी गदींना विचारलं, “आनंदाने जगण्यासाठी तुम्हाला काय हवं?” “लई नाही, लई नाही मागणं असं म्हणत भाकरी पासुन सुरू करून गदी फक्त हे हवं ते हवंची मागणी करत करत लई नाही घराला सोन्याची कौलं हवी” पर्यंत पोहचले आणि तिघेही गडगडाट करत हसले. 


अनुदिनी नवीनता हवी ती असावी म्हणून माझ्या अनेक गोष्टीं मधील माझी एक लाडकी कविता असं म्हणूत मंगला जींनी आदरणीय अटलजींची, “ मुझे दूर का दिखाई देता है, मैं दीवार पर लिखा पढ़ सकता हूँ, मगर हाथ की रेखाएं नहीं पढ़ पाता।

क्या मैं बूढा हो चला हूँ “ या कवितेच्या काही ओळी सादर करून, अशा अनेक कवितांची प्रतिबिंब माझ्याकडे असतात असं सांगितलं. 


कवी कुसुमाग्रजांवरचा कार्यक्रम करायला नाशिकला त्यांच्या घरी त्या पोहोचल्या. “काही खाल्लय का?“ हा कुसुमाग्रजांचा प्रश्न, आणि मग काय घडलं तो प्रसंग सांगून शंकर वैद्य, श्रीराम लागू, मोहनदास सुखटणकर अशा अनेक नामवंतांची नाव घेत, अनेक कार्यक्रमांचा मंगला जींनी धावता आढावा घेतला. 


जीतेन्द्र अभिषेकीनी संस्कृत स्क्रिप्ट दिलं. माझा संस्कृतचा अभ्यास असल्याने आपण चांगलंच वाचलंय असं वाटत असतानाच “परत एकदा वाचुया का? असा अभिषेकींचा प्रश्न आणि माझा अभिमान तुटला.” हे मंगला जी अगदी सहजतेने सांगून गेल्या आणि त्याच बरोबर स्वतःच व्यक्किमत्व, कसं वेगळं विलोभनीय आहे त्यांचं मर्म सांगून गेल्या. “मी अभिषेकीना गुरू मानते.” असं सांगून अभिषेकींच्या मुलाखतीचा किस्सा. “नेमके प्रश्न विचारा” असा त्यांचा आग्रह कारण प्रश्न विचारणारा त्या कुवतीचा आहे ना हा संदेह. परिचय झाल्यावर अभिषेकींच्या अनेक दिलखुलास मुलाखती मी घेऊ शकले हे मोठ्या अभिमानाने पण तितक्याच नम्रपणे मंगला जींनी सांगितलं. 


विदुषक ही माझ्या जिव्हाळ्याची संकल्पना. 

कुसुमाग्रजांच्या ययाती देवयानी नाटकातल्या विदुषका बद्दल त्या सांगत गेल्या. विदुषक सांगतो मी अस्सल. तसं पाहिलं तर आपण सगळेच विदुषक सांस्कृतिक फोलफट खरवडलं की विदुषक दिसायला लागतो. मंगला जींच “पुरुषाला स्त्री विदुषक बनवते तर तिला तिचं मूल.” हे वाक्य पटलं आणि भावलं…


दीनानाथ मंगेशकर सभागृहातली एक आठवण असं म्हणत मंगला जी सांगायला लागल्या. व. पू. काळेंना मी गुरुस्थानी मानते. असं सांगून द. मा मिरासदारांची गोष्ट बारा मिनिटात सांगण्याची जबाबदारी त्यांनी मंगला जींना दिली. मी त्यासाठी सराव केला असं म्हणून मंगला जींनी गोष्ट सुरू केली. राजा एका युवतीच्या प्रेमात पडतो. तो आपल्या सेवक असलेल्या विदुषकाला त्या युवतीच्या मागावर तिची माहिती मिळवण्याच्या उद्देशाने पाठवतो. कुणीतरी आपल्या मागावर असल्याचं तिच्या लक्षात येतं. ती त्याच्या बुध्दिमत्तेची परीक्षा घेते. जसं की ती दरवाजात फुलं आणि सुगंधी द्रव्य ठेवते.  फुलं घेतली जातात म्हणजेच तो पाठलाग करणारा ख-या नैसर्गिक गोष्टीला महत्व देतो. तिची प्रेमासाठी मूक संम्मत्ती लक्षात येऊन सेवक विदुषक महाराजांना तिला प्रेमपत्रं लिहायला सांगतो. महाराज प्रेमपत्र सेविके बरोबर पाठवतात. सेविका परत येते तिच्या गालावरचे बोटांचे रंगीत ठसे पाहून महाराज गोंधळतात. विदुषक ते ठसे म्हणजे कधी भेटायचं हे  कसं सुचवत आहेत ते महाराजांना उलगडून सांगतो. 


त्या युवतीला महालात घेऊन येण्याची जबाबदारी महाराज विदुषकावर सोपवतात. त्यालाही मनापासून ती आवडते पण तो ती गोष्ट मनातच ठेवतो. बोलताना त्याच्या लक्षात येतं की आत्ता पर्यंत आपला प्रीयकर हुशार असावा ह्या अपेक्षेने तिने ज्या ज्या परीक्षा घेतल्या, त्यात यशस्वी झालेल्या व्यक्तीवर तिचं प्रेम आहे म्हणजेच तिचं प्रेम आपल्याच  बुद्धीमत्तेवर आहे. त्या युवतीची गल्लत झालेली असते “तुमचे महाराज बुद्धिमान आहेत, रसिक आहेत.” हे तिचे शब्द ऐकून विदुषक निःशब्द होतो. ती युवती, मोहिनी महालात जाते. विदुषक विषण्ण होऊन तिथून दूर निघून जातो. 


राजा खूप आनंदात असतो. आपल्याला आवडणारी सुंदर स्त्री ज्याच्यामुळे आपल्याला मिळाली तो इथे हवाच या भावनेने तो विदुषकाचा शोध घेऊन त्याला  बोलावून घेतो. “अरे तू कुठे निघून गेलास” महाराज विचारतात. विदुषक उत्तर देतो ,  “महाराज मी माझी हरवलेली सावली शोधायला गेलो होतो”.  त्याचं हे उत्तर ऐकून तो त्याने केलेला विनोद वाटून सगळे हसतात. फक्त मोहिनी हसत नाही. तिच्या नजरेतून ती विदुषकाला विचारत असते “माझ्या जीवनाचं त्रांगडं करण्याचा हक्क तुला कुणी दिला?”. गोष्ट संपते. ही विराणी ऐकण्यात सर्व श्रोते हरवलेले पाहून मंगला जी हसून मिश्किलपणे म्हणतात “मी आजही गोष्ट बारा मिनिटं पूर्ण होण्याआधीच संपवली हं!”



कार्यक्रम संपवण्यापूर्वी मला काही खास व्यक्तीं बद्दल सांगायचंच आहे आणि त्यातली पहिली व्यक्ती 

गायिका सुमन कल्याणपूर. सुमन कल्याणपूर यांच्या अनेक गमतीशीर आठवणी सांगून मंगला जी म्हणाल्या की सुमन ताईंकडे तो लोलक आहे. त्यांच्या पुस्तकासाठी मुलाखत घेतानाचे किस्से. पुस्तक नको तितके लांबत  चाललंय ह्याची जाणीव ठेवून मंगला जींनी मुत्सद्दीपणाने तो प्रश्न कसा सोडवला हे सांगताना मंगला जी म्हणाल्या, देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणाचा प्रश्न सोडवला अगदी तसा मी तो प्रश्न सोडवला. हे वाक्य म्हणजे मंगलजींच्या उत्स्फूर्त अशा समयसूचकतेचं उदाहरण होतं. “ऐ मेरे वतनके लोगो हे गाणं न मिळाल्याची सुमन ताईंची व्यथा हळहळ आणि वेदना मंगल जींनी मनामनात पोहचवली.


सुप्रसिद्ध गायक प्रभाकर कारेकर रियाज करत असतांना  दिलीपकुमार आले. “दिलीप कुमारनां गाणं कळतं का?” हा प्रभाकर कारेकरांना पडलेला प्रश्न, शुटिंगला बरोबर गेलो आणि ते गाण्याचे जाणकार आहेत हे लक्षात आलं. दिलीप कुमारां बरोबर मैत्र झालं. दिलीप कुमारांनी तबला भेट दिली. 

असं सांगून मंगला जींनी गोव्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री आणि नन्तर रक्षामंत्री मनोहर पर्रिकरांबद्दलच्या आठवणीं सांगायला सुरुवात केली. 


मनोहर पर्रिकरांच वर्णन करताना मंगला जी म्हणाल्या “पर्रीकर म्हणजे बुध्दीवान डोळ्यांचा हसरा माणूस.”  किती चपखल वर्णन हे! त्यांचा रॉबीनहूड म्हणून केलेला उल्लेख … बोलताना चुकून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हटलं आणि मग सावरून घेतलं पण त्या नन्तर ते केंद्रीय मंत्री झाले. ही मजेशीर गोष्ट. अशा असंख्य आठवणी मंगल जींच्या मनात दाटून आल्या होत्या. “प्रज्ञा, प्रतिभा, संवेदना असलेला माणुस!” मंगल जींनी पुन्हा एकदा पर्रिकर यांच्यासाठी अत्यंत योग्य शब्द वापरले. 


“पर्रिकरांच्या पुस्तकाच्या संदर्भात त्यांनी मुलाखतीसाठी वेळेचं भान ठेवली नाही की मी भांडायचे. त्यांना दुर्धर आजार झाला पुस्तक अपुरं राहील असं वाटलं. पण फक्त ४२ पानं लिहिलेली असतांना ते गेल्यावर पुस्तक पूर्ण केलं.” मंगल जी भावनीक होऊन सांगत होत्या. पर्रिकर तसे गेलेच नाहीत त्यांच्या पुस्तकात मी त्यांच अस्तित्व गोळा केलं. परिकरांच्या पुस्तकासाठी कसलीही अपेक्षा न ठेवता लोकांनी सहकार्य केलं. ऋणानुबंधांच्या हे गाणं त्यांना खूप आवडायचं हे त्यांच्या ड्रायव्हरने सांगितलं. अटल ब्रीज उद्घाटन संमारंभाला उपस्थित असलेल्या पर्रिकराना आजारपणाच्या थकव्यामुळे उभंही रहाता येत नसताना ते संपूर्ण वंदे मातरमसाठी पूर्ण बळ एकवटून उभे राहिले. पर्रिकरां विषयी आपला आदरभाव व्यक्त करून मंगल जींनी त्यांच्या विषयीचं बोलणं संपवलं. 


मला जिथे काही काळ थांबायची इच्छा होती तिथे थांबायची संधी देवाने दिली…असा कृतार्थ, कृतज्ञ भाव व्यक्त करून मंगल जी बोलायच्या थांबल्या. 

सभागृहातील सर्व श्रोते टाळ्या वाजवत त्यांच अभिवादन आणि कौतुक करत होते. 


“आरसा” ही तशी रोजच्या पहाण्यातली गोष्ट पण मंगल जीं नी आज त्याचा वेगळा विचार देत, वेगळा परिचय करून दिला. आपुलाच संवाद आपल्याशी असा काहीसा…


या कार्यक्रमाला मी थोडीशी दूर बसले होते. कार्यक्रम एकपात्री असला तरी भरगच्च आणि वैविध्यपूर्ण होता. मंगला ताईंच बोलणं म्हणजे श्रावण सरी. माझं हे शब्दांकन म्हणजे मी त्या सरीतून माझ्या ओंजळीत जमवलेले काही थेंब. ते शब्दथेंब गोळा करताना काही चूक झाली असेल तर क्षमस्व 🙏


चारुलता काळे.

९८२१८०६८२७


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रवास नॉर्वे आणि आइसलैंड

पार्ले कट्टा- श्री. अच्च्युत गोडबोले