इंदिरा संतांवरील लेख प्रतिक्रिया
‘जळत्या चांदण्यांचा चिद्गंध- इंदिरा संत’
विपुलश्री दिवाळी अंकातील आशुतोष उकिडवे यांचा हा अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण आणि संवेदनशील लेख वाचून जे समजलं, वाटलं ते लिहिण्याचा हा प्रयत्न. अनावधानाने काही चूक झाली असेल तर क्षमस्व 🙏
‘राधा आणि गोकुळ जागं होण्याआधी वाजलेली मुरली ही फक्त माझ्यासाठी….’ ह्या अत्यानंदाने तनामनाला पाण्यात टाकून भान हरपलेली कुब्जा शब्दात साकारणारी इंदिरा संतांची कविता लेखाच्या सुरवातीला वाचली आणि लेख वाचण्यासाठी उत्सुक झाले.
ह्या लेखात साहित्यिक म्हणून इंदिरा संतांनी राष्ट्रवाद, वर्णव्यवस्था, स्त्रीमुक्ती, शृंगार आणि असे बरेच विषय सोडून एखादा अपवाद वगळता केलेलं व्यक्तिनिष्ठ किंबहुना आत्मनिष्ठ लिखाण, त्यांच्या कवितेतलं निसर्गाचं नेपथ्य किंवा सृष्टीच्या सृजनत्वाचा आणि संहाराचा सहज स्वीकार. साधेपणाने केलेली सुरुवात पण कविता जशी पुढे जाते तशी खोल मनातली खदखद, वेदना, संवेदना अचानक जाणवू लागते. हे असे उल्लेख करत, त्यांच्या वेगवेगळेपणाची तुम्ही जाणीव करून दिलीत.
इतकी आत्मकेंद्रित असुनही संपूर्ण साहित्य जगतात आपली नोंद घ्यायला लावणारी किंबहुना नादी लावणारी कविता” हे त्यांच्या कविते बद्दलचे तुमचे शब्द तुमच्या अभ्यासपूर्ण लिखाणाची साक्ष देतात.
इंदिरा संतांच्या साहित्या बद्दल लिहिण्यापूर्वी तुम्ही त्यांच वैयक्तिक आयुष्य आणि साहित्य ह्याचा केलेला सखोल अभ्यास हे झपाटलेपण आहे. तुमच्या या मेहनतीला सलाम…
आशुतोष, इंदिरांच्या बालपणा पासूनचा भाग तुम्ही उत्कृष्ट ललित लेखक अहात ह्याची साक्ष देतो. घरची श्रीमंती, सुशिक्षित समृद्ध संवेदनशील वडिलांचं नीधन, सूर्य किरणांमधे आपल्या लाडक्या बाबांना शोधणारी इंदिरा, काकांची सत्ता , त्यांचा धडकी भरवणारा रागिट विचित्र स्वभाव, मातृवियोग, तरिही मनात जपलेल्या सुखद अनुभवांचे इंदिरांच्या साहित्यातले दर्शन या लेखात समर्पक शब्दात कमाल सुंदर पध्दतीने मांडले आहे.
इंदिरांचे पुण्यातले शिक्षण आणि तेंव्हा जमलेलं
ना. म. संत ह्या रसिक कविमनाच्या व्यक्ती बरोबर जुळलेलं प्रेम, त्या प्रेम भावना हळुवारपणे व्यक्त करणारी “पुस्तकातली खूण कराया, दिले एकदा पीस पांढरे” ही कविता, प्रेम व्यक्त करणारी प्रेम कविता सापडताच काकांनी इंदिरांचा हात तापलेल्या कंदिलाच्या काचेवर पोळणं, प्रचंड विरोध असुनही झालेलं लग्न. लग्ना नन्तरचा सासुरवास हे सर्व वर्णन म्हणजे एखादा चित्रपट पहाण्याची अनुभूती. आशुतोष ह्या सर्व वर्णनात तुम्ही त्या पति पत्नीच्या सहजीवनातला प्रणय, सुंदर, हळुवार, शब्दात व्यक्त केला आहे.
मनापासून असलेलं संत पतिपत्नीचं प्रेम, आयुष्यातही बरचसं स्थैर्य आलेलं आणि आजारपणात संतांचा अचानक मृत्यू. त्यांचं जाणं आणि इंदिरांच सर्वस्व हरपून सर्वार्थाने उध्वस्त होणं हे तुम्ही त्यांच्याच कवितेतून वाचकांपर्यन्त पोहचवलं आहे. ह्या कवितांचे शब्द, आशय हा त्या कविता लिहिताना इंदिरांची भावनिक परिस्थिती काय होती हे लक्षात आल्याने मनाचा ठाव घेतात.
आशुतोष त्यांची “नको नको रे पावसा” ही कविता तशी परिचित पण आज या लेखातून ती खरी उलगडली. सांज टळली तरिही, दार लावावे वाटेना” किती साधे शब्द पण मनाचा ठाव घेणारे.
कमल फडके ही बहीण आणि त्यांचे पती ना. सी फडके यांची मदत. पुढील शिक्षण घेऊन मिळवलेली अध्यापिकेची नोकरी. बिकट परिस्थितीतही मुलांच शिक्षण, संगोपन आणि विशेष म्हणजे त्यांना समजून घेणं थक्क करणारं. रागाने मुलाला मारलं पण ते चूक आहे हे लक्षात घेणारं इंदिरांचं सुजाण पालकत्व अनुकरणीय. “अशी भाग्यवंता आई, एका केळीत भेटली” हे त्यांच्या कवितेचे शब्द, ती कविता म्हणजे “आई” या शब्दातला, शब्दांपलिकडचा अर्थ.
इंदिरा संत यांच साहित्य, पुरस्कार, मान्यवर साहित्यकारांशी संपर्क, मुंबई साहित्य सम्मेलन अध्यक्षपद, कोल्हापुरच्या साहित्य सम्मेलन अध्यक्ष पदासाठीच्या निवडणूकीत हार, उतार वयातले असे क्लेशदायी प्रसंग आणि त्याला त्यांच शांतपणे सामोरं जाणं, अशा महत्वाच्या गोष्टी या लेखात समाविष्ट झाल्याने इंदिरांचे समग्र व्यक्तिमत्व लक्षात येतं
अमृतवाणीची मालनगाथा, ओवी या साहित्य प्रकारावरचं त्यांच प्रेम, व्यासंग, अभ्यास आणि त्यावरील दोन भागात प्रकाशित पुस्तकं, बोलीभाषेतील अगम्य वाटणा-या या ओव्यांचा अर्थ त्यांनी उलगडून दाखवला. उभ्या महाराष्ट्राने तोंडात बोटे घातली, अनेक पुरस्कार मिळाले. आशुतोष या सर्व गोष्टींच महत्व तुम्ही जाणलत आणि तुमच्या लेखामुळे ते वाचकांसमोर आलं.
मराठी संस्कृतीचे प्राचीन स्थापत्य आणि संस्कृतीची लेणी इंदिरांमुळे प्रकाशात आली, हे महाराष्ट्राचे परमभाग्य या वाक्याने त्यांच्या कार्याचे महत्व तसेच त्यांच्या कवितेतील सृष्टी व शब्दवृष्टी अशा शब्दांत त्यांच्या कविते बद्दल कौतुकाचे शब्द या लेखात वाचले. आशुतोष ह्या गोष्टी अचूकपणे मनापासून तुम्ही मांडल्यात त्याचं कौतुक वाटलं
शब्द प्रतिमा निर्माण करण्याचं त्यांच कसब. बिकट परिस्थितीत त्यांना निसर्गाची साथ मिळाली आणि त्यांच्या कवितेने ती साथ सोडली नाही. ह्या सर्व गोष्टी या लेखात त्यांच्या कवितांचे दाखले देत फार परिणामकारकतेने मांडल्या आहेत.
इंदिरांच्या कवितेतील शब्दांच्या सम आणि विषम तालांबद्दल तुम्ही लिहिलं आहे, ती गोष्ट तुमच्या कडून समजून घ्यायला आवडेल. त्यांनी देवपूजेचं प्रदर्शन केलं नाही पण प्रार्थनेतून परमेश्वराशी एकरूप होण्याची संकल्पना त्यांच्या साहित्यात आहे.
कॉलेजच्या प्राचार्या म्हणून शिक्षण पद्धतीत बदल करतांना दैनंदिन धार्मिक कट्टरतेच्या प्रार्थनेचं थोतांड बंद करून त्यांनी मानवतेचा धर्म रुजवण्याचा प्रयत्न केला. पंचमहाभूततांच्या रूपातली वैश्विक शक्ती त्यांना मान्य होती. आशुतोष तुम्ही इंदिरांच्या व्यक्तिमत्वाचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून तुमच्या लेखातून त्यांचे विचार कसे होते ते वाचकांपर्यन्त पोहचवले आहेत.
आपलं इच्छित कार्य पूर्ण झाल्यावर कार्यसमाप्तीचा संकेत, आयुष्याकडे पहाण्याची तटस्थ वृत्ती, वार्धक्यामुळे आलेलं विस्मरण हा त्यांच्या आयुष्याचा शेवटचा टप्पा सांगताना तुम्ही “झोका चढतो उंच उंच, मला थांबता थांबवेना. गुंजेएवढे माझें घर त्याची ओळख आवडेन” या त्यांच्या काव्यपंक्ती उद्धृत केल्या आहेत, त्या वाचून मन आणि डोळे भरून आले.
“चांदण्यांचे हे महाकाव्य अखेर सरणसिध्द झाले” हे शब्द वाचून हात जोडले गेले…
चारुलता काळे.
टिप्पण्या