विजया मेहता
विजया मेहता
“विजया मेहता यांचे ३० जून २०२६ रोजी निधन झाले.” ही बातमी ऐकली, वाचली आणि पाहिली सुध्दा. मधे काही दिवस गेले, का कशी माहित नाही, आज पुन्हा विजया बाईंची आठवण आली. “आपणही काही लिहावं का त्यांच्या बद्दल!” मनात आलं आणि लिहीत गेले. हा लेख लिहितांना निधन झालंय पण ज्या व्यक्ती अजरामर कतृत्व गाजवून गेल्या किंवा ज्या मनाच्या जवळ आहेत त्यांच्या नावाच्या आधी मला ‘स्वर्गीय’ हा शब्द लिहावा असं वाटलं नाही म्हणून मी तसं लिहिलं नाही.
“अभिजात भारतीय रंगभूमी, लोकरंगभूमी आणि समकालीन रंगभूमी यांचे अचूक भान असणा-या प्रतिभाशाली नाट्यदिग्दर्शिका तसेच जाणकार अभिनेत्री म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. त्यांचं ‘झिम्मा’ नावाचं आत्मचरित्र ज्यातून उलगडत गेलेली रंगभूमीची गोष्ट/ माहिती, रसिक वाचकांना माहीत आहे. बाईं बद्दल इतकं लिहिलं गेलंय, बोललं गेलंय मग मी नवीन काय लिहिणार!” असा विचार मनात आला आणि तरिही त्यांच्या बद्दल लिहावसं वाटलं कारण मी त्यांना भेटले होते. हो मी बाईंना भेटले होते!
मी IWEP म्हणजेच इन्टरनॅशनल वर्क अॅन्ड इक्सपीरिअन्स प्रोग्रॅम या श्रेणीच्या ब्रिटिश व्हिसा संदर्भात, एजंट आणि व्हिजा कन्सल्टंट म्हणून सुट्टीचे दिवस सोडून जवळपास रोज ब्रिटिश व्हीएफएस चर्चगेटच्या ऑफिसला जायचे, तेंव्हा मला बरेचदा ज्याचा आनंद आणि अभिमान वाटावा अशा व्यक्ती दिसल्या, भेटल्या, पंडित रविशंकर, अभिनेत्री शुभा खोटे, गायिका आशा भोसले आणि दिग्दर्शक, अभिनेत्री विजया मेहता.
लिहावसं वाटलं तशा जुन्या आठवणी जाग्या झाल्या. पं रविशंकर चौपाटीच्या रस्त्यावर त्यांच्यासाठी उभ्या असलेल्या गाडीकडे जाताना मी पाहिले पण त्यांच्याशी बोलण्याचं भाग्य लाभलं नाही. शुभा खोटे दिसल्या तेंव्हा त्या व्हिसा प्रोसेस संदर्भात एका खुर्चीत शांत बसलेल्या होत्या. त्यांच्या जवळ जाऊन मी त्यांना “तुम्हाला भेटून छान वाटलं!” असं म्हणून नमस्कार केला होता. व्हीएफएस ऑफ़िसच्याच बिल्डिगमधे ‘केसन्स’ नावाच्या साड्यांच्या दुकानात चक्कर मारायला म्हणून मी आत गेले आणि काय माझं भाग्य! तिथे चक्क आशा भोसले साडी खरेदीत रंगून गेलेल्या दिसल्या. कसं सुचलं माहीत नाही पण आशा भोसलेना पहाताच त्यांना वाकून नमस्कार करत मी म्हणाले “तुम्हाला पाहून, ‘दिसलीस तू फुलले ऋतू’, याचा अर्थ समजला!” माझं ते वाक्य ऐकताच, नमस्कार करायला झुकलेल्या मला त्यांनी धरलं आणि माझ्या पाठीवर हात ठेऊन त्या इतकं सुंदर हसल्या की मी हरवून गेले. मी खरंच त्यांना इतकं मार्मिक काही म्हणू शकले याचा मला भलताच आनंद अभिमान वाटतो.
विजया बाईंच्या बाबतीत मात्र तसं नव्हतं. त्त्या मला दिसल्या आणि मी चक्क गोंधळून गेले. त्यांच्या बद्दल मनात प्रचंड आदर होता पण त्यांचा दरारा जास्त होता. मी गोंधळून गेले आणि त्या गोंधळात माझी पर्स खाली पडली. जागा होती एशियाटिक डिपार्टमेंटच्या बाहेरच्या बाजूचा फळवाला!
माझी ती गडबड पाहून त्या माझ्याकडे पहात शांत उभ्या होत्या. माझा गोंधळ, गडबड लक्षात घेऊन मदतीसाठी त्यांनी पुढे केलेला हात मी नकळत धरला खरा पण लगेचच तो सोडून मी त्यांच्या समोर नतमस्तक झाले.
त्यांच्या कुठल्याही फोटोत दिसते तशीच भपकेबाज नाही तर साधी पण छान आकर्षक साडी. कोपरा पर्यंत बाह्या असलेला ब्लाऊज, मंगळसूत्र, कानातल्या कुड्या बहुधा हि-याच्या असाव्यात कपाळावरून थेट मागे फिरवलेल्या केसांचा बॉबकट. कपाळावर मोठी ठसठशीत टिकली….त्यांना अनपेक्षितपणे प्रत्यक्ष पाहून भारावलेली मी, त्यांना पहातच बसले. माझी ती अवस्था पाहून चष्मा सारखा करत माझ्यावर नजर रोखून त्या कसलं कमालीचं गोड हसल्या म्हणून सांगू! विजया बाई हसतात तेंव्हा नेहमीच मोत्यांची बरसात झाल्या सारखं वाटतं. मी धन्य झाले! जी व्यक्ती भारतीय नाट्य सिनेसृष्टीतच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध, लोकप्रिय आहे तिला, मी वेंधळ्यासारखं म्हटलं, “तुम्ही मला माहित आहात” तरिही त्या कौतुकाने “हं” असं प्रश्नार्थक स्वरात म्हणून पुन्हा हसल्या.
मी त्या ‘हं’ मधलं कौतुक बरोब्बर ओळखलं आणि मग मात्र मी खरंच त्यांची सच्ची चाहती आहे हे दाखवण्यासाठी, “हमिदाबाईची कोठी, अखेरचा सवाल”, अशी पटापट त्यांच्या नाटकांची नावं घेत “कलियुग या सिनेमातलं तुमचं गांधारीशी नातं सांगणारा छोटासाच पण महत्वाचा रोल मला समजला” असं बरंच काही बोलले आणि त्यांचा चेहरा सुखावला. मी तुमचं पुस्तक… असं म्हणून नाव न आठवल्याने अडखळले पण त्या हसून म्हणाल्या ‘झिम्मा’. ते ऐकून मला हायसं वाटलं आणि हसू आलं.
त्यांचा ड्रायव्हर तिथेच उभा होता. त्यांना निघायचं असणारच मी माझं नाव त्यांना सांगितलं. “आता निघू ना” असा मिश्किल प्रश्न विचारून, पुन्हा छानसं हसून त्या गेल्या.
मी त्या भेटीचा आनंद मनात साठवून, “आजकल पाँव जमींपर नहीं पड़ते मेरे” अशा अवस्थेत घरी पोचले. आपल्या शाळेच्या कडक शिस्तप्रिय बाई किती प्रेमळ आणि काळजी घेणा-या होत्या ते शाळा संपल्यावर लक्षात येतं ना तसंच झालं माझं! विजया बाईंची ती करारी पण प्रेमळ नजर, ते आत्मीयतेचं हसणं मी अनुभवलं. आपण इतक्या महान व्यक्तीला या अशा जागी पाहिलं, हे मला जेंव्हा आठवतं तेंव्हा ते स्वप्नच वाटतं.
विजयाबाईंचे नाव न घेता आधुनिक महाराष्ट्राचा आणि भारतीय नाट्यक्षेत्राचाही इतिहास पूर्ण होत नाही. विजया मेहता घडल्या कशा याचा धावता आढावा घेताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येतात. त्यांचे वडील, थिओसॉफिकल विचारसरणी असलेल्या ॲनिबेझंटचे सेक्रेटरी होते. अॅनी बेझंट या इंग्लंडमध्ये जन्मलेल्या होत्या तरी भारतीय स्वातंत्र्यसैनिकां बद्दल आस्था असलेल्या , समाजसुधारक, स्त्री-सुधारणावादी आणि तत्त्वज्ञानी होत्या. लेखिका आणि व्याख्यात्या म्हणून विख्यात होत्या. विजया बाई फक्त सहा वर्षांच्या असताना त्यांचे वडील वारले पण वडिलांमुळे घरात आधुनिक विचार नक्कीच होते. बाईंचे चुलते भजन करायचे त्यामुळे बाईंनी भक्तीचं आध्यात्मिक वातावरणही अनुभवलं होतं. विजया बाईचा भाऊ त्यांच्यापेक्षा २२ वर्षांनी मोठा. सहाजीकच त्या त्यांच्या बरोबरीच्या मावस भावंडांच्या बरोबर कर्णिक कुटुंबात असायच्या. मावशीचे यजमान मोठे विचारवंत. ‘माणूस आहात विचार करून वागा. अंधश्रद्धा ठेवायची नाही.’ अशी त्यांची रॅडीकल (मुळापासून बदल अपेक्षित असलेली), क्रांतिकारी विचारसरणी. बाईंचा आतेभाऊ डिरेक्शनचा अभ्यास करायला जर्मनीला जाऊन आलेला. हे सारं लक्षात घेतलं तर जाणवतं की कळत नकळत विजया बाई, आधुनिक, आध्यात्मिक, क्रांतिकारी आणि पाश्चात्य संस्कृतीचा परिचय असलेल्या अशा बहुआयामी व्यवस्थेत वावरल्या.
स्वातंत्र्य लढ्याचा काळ. विजया बाई सेवादलात सामील झाल्या होत्या. “स्वतंत्र भारताची पहिली पिढी म्हणून देशासाठी काही करून दाखवा ती तुमची जबाबदारी आहे.” अशी शिकवण देणा-या जयप्रकाश नारायणां सारख्या नेत्यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. सेवादलाचे संस्कार जन्मभर त्यांच्या बरोबर राहिले.
विजया मेहता अगदी कमी वयात एम ए झाल्या.
विल्सन कॉलेजात शिकत असताना नामांकित समीक्षक वा. ल. कुलकर्णी हे विजया बाईंचे प्राध्यापक. वाङ्मय मंडळाच्या कुठल्याशा कार्यक्रमात एका उताऱ्याचं चांगलं वाचन केल्यामुळे वा. ल. कुलकर्णी यांनी आपल्या ह्या विद्यार्थिनीला नाटकात काम करण्याची सूचना केली. योगायोग म्हणावा तसं नन्तर कुणीतरी सांगितलं म्हणून विजया बाईंनी भारतीय विद्या भवनात नाट्य स्पर्धेत नाटकात काम केलं आणि तिथे त्यांना पहिलं बक्षिस मिळालं. बाईंच आणि रंगभूमीचं हे तिथून सुरू झालेलं नातं त्यांनी जन्मभर मोठ्या प्रेमाने जोपासलं, जपलं, आणि ते नातं चिरंजीव झालं.
नवसाहित्य, नवा सिनेमा, नवीन रंगभूमी असा तो रेनेसान्स म्हणजेच पुनर्जागरणाचा काळ.
दुर्गा खोटे यांचा मुलगा हरीन खोटे यांच्याशी विवाह झाल्यावर दुर्गा बाई सासूबाई आणि माहेरचे कुटुंबीय अभिनेत्री नलिनी जयवंत, अभिनेत्री शोभना समर्थ त्यांच्या कन्या नूतन, तनुजा, हे असे सिनेक्षेत्रात नातलग असुनही, हिंदी चित्रपटांच्या मायाजालामध्ये बाई गुरफटल्या नाहीत.
काही तरी नवीन शिकण्याची उत्सुकता आणि प्रयोगशीलता हा विजया बाईंचा स्वभाव. विजया मेहता, इब्राहिम अल्काझिंना भेटल्या आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. इब्राहिम अल्काझी हे आधुनिक भारतीय रंगभूमीचे प्रणेते आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेचे पहिले संचालक होते. त्यांचा जन्म पुण्यातला त्यांनी लंडनमधून नाट्यशिक्षण घेतलं होतं. अल्काझिंमुळे पाश्चात्य रंगभूमीची शिस्त, नवीनता, वेगळा दृष्टिकोन, कामाची पद्धत यामुळे त्या प्रभावित झाल्या.
कुठलीही गोष्ट करायची असेल तर त्या गोष्टीची पूर्ण माहिती घ्यायची. रंगभूमीचंही तसंच, प्रयोगाची तयारी प्रयोगाच्या अर्धातास आधी आटपून प्रयोग सुरू होण्यापूर्वी अत्यंत शांत बसायचं, मन एकाग्र करायचं..नाटक सुरू झालं की फक्त रंगमंचावर आवाज असणार. विजया बाईना व्हिजुअलायझेशनचं महत्त्व लक्षात आलं कारण अल्काझी स्वत: पेंटर होते. भुलाबाई देसाई मेमोरियल इन्स्टिट्यूट येथे इब्राहिम अल्काझी यांनी 'स्कूल ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट' चालवले त्यात विजया बाई होत्या. एम. एफ. हुसेन, व्ही. एस. गायतोंडे आणि पंडित रविशंकर यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी येथे स्टुडिओ उभारून आपापल्या कलेची साधना केली. गायिका किशोरी आमोणकरही तिथे येत. भुलाभाई इन्स्टिट्यूटने विविध कलांसाठी जागा दिली होती. त्या सेंटर मध्ये इतर कलांशी संबंधित दिग्गज मंडळींची हजेरी असे. आर्ट सेंटरला जागा दिलेली असल्याने अशा अनेकांशी बाईंचा परिचय झाला. आपलं काम झालं की दुसऱ्याच्या कले बद्दल समजून घ्यायचं ही त्यांची वृत्ती आणि तिथुनच रंगायनची संकल्पना जन्माला आली.
रंगायन बद्दल बोलताना बाई म्हणायच्या रंगायन ही फक्त संस्था नव्हे तर चळवळ होती. लेखक तेंडुलकर मी दिग्दर्शक/ अभिनेत्री. संस्था जरी नाटकाशी संबंधित असली तरी इतरही कला क्षेत्रातली मंडळी त्यात होती. श्री पु भागवत मौज प्रकाशन, मान्यवर कवी, गायक जीतेंद्र अभिषेकी, शोभा गुर्टू इ. रंगायन मधे बरेच कार्यक्रम होत असत. रंगायनच्या वार्षिक कार्यक्रमात नृत्य, साहित्य, गायन इ. कलांचा समावेश असायचा.
रंगायन सोडणं ही गोष्ट बाईंच्या मनाला लागली.
तेंव्हा त्यांनी चक्क नोकरी धरली. दामू केंकरे म्हणाले “पळून जातेस का?” त्या बोलण्याने त्या व्यावसायिक रंगभूमीकडे वळल्या. बाईऱ्नी व्यावसायिक रंगभूमीला नवीन गोष्टी दिल्या. तिथे जयवंत दळवी हे लेखक मिळाले. मनापासून शिकायला तयार असे नट मिळाले ज्याला त्या त्यांची ‘गॅंग’ म्हणून संबोधतात. खूप दौरे असायचे काही काळानंतर अभिनय करणं बंद करून त्या नाटकं बसवायला लागल्या. त्यांना नव्याने डोळे कान उघडे ठेवायला वेळ मिळाला थिएटरच्या संभावना तपासायला वेळ मिळाला.
हिंदी इंग्रजी नाटकं, दूरदर्शन, चित्रपट अशा क्षेत्रांत विजया मेहता वावरल्या पण त्या आजन्म खऱ्या रमल्या त्या नाटकातच. भूमिकेचा विचार करायचा तर त्या पात्राचे भावविश्व नाटकातल्या संवादांच्या पलीकडे काय असेल याची पुरेपूर कल्पना असली पाहिजे. रंगभूमीवर पाऊल ठेवलं की भूमिकेत शिरायचं तसंच तिथून बाहेर त्या भूमिकेतून पूर्णपणे बाहेर यायचं. विजू जयवंत नंतर विजया खोटे आणि त्यानंतर विजया मेहता- त्यांचं आयुष्य अनेक आव्हानांनी भरलेलं होतं. रंगभूमीची सेवा करतांना त्यांनी वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी तिथे आणल्या नाहीत.
विजया बाईंनी अनेक लेखकांची नाटकं अभिनय करून गाजवली आणि दिग्दर्शक म्हणून अजरामर केली.
बेनेव्हेसेज' किंवा फ्रान्सिस बोमॉन्ट आणि जॉन फ्लेचर यांच्या संयुक्त नाट्यलेखनाची अशी एक वेगळी शैली आहे. विजया बाईंचा याच्याशी परिचय झाला. रंगभूमीवर जे घडतंय त्याची आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण होण्यासाठी बेनेव्हेसेज ह्याची चळवळ सुरू झाली. विजया बाई या चळवळीत सहभागी झाल्या भारतीय मातीचा गंध असलेलं नाटक साता समुद्रापार पोचवणं महत्त्वाचं होतं. 'अजब न्याय वर्तुळाचा' हे चिं. त्र्य. खानोलकर ऊर्फ आरती प्रभू यांनी लिहिलेलं नाटक, प्रसिद्ध नाटककार बर्टोल्ट ब्रेख्त यांच्या जर्मन नाटकावर आधारित होतं. ते नाटक बर्लिन फेस्टिव्हलला गेलं. त्याचा अस्सल भारतीय बाज पाहून जर्मन लोक अवाक झाले. नन्तर शाकुंतल जर्मन भाषेत जर्मन ॲक्टर्सनी केलं.
टेलीविजनसाठी भास्कर घोष यांनी गिरीश कर्नाड, कारंथ आणि विजया बाईंना बोलावले. नाटकांच टेलीविजन मधे तसेच सिनेमात रूपांतर हा नवा प्रयोग या लोकांनी केला. डॉ मेननमुळे त्या एनसीपीएत गेल्या तिथे मग भाभांशी परिचय झाला. भाभा, टाटा आणि डॉ. मेननची साथ मिळाली. तब्बेतीच्या कारणाने डॉ. मेनन दिल्लीला गेल्यावर भाभांनी विचारलं आणि एनसीपीएची प्रमुख म्हणून विजयां बाईंनी पुढे सात आठ वर्षं काम केलं.
विजया बाई जेंव्हा बोलतात तेंव्हा त्यांच्या प्रत्येक शब्दाला वाक्याला अर्थ असतो.
संस्कार घ्यायचे असतात. अस्वस्थ शोध आणि श्रध्दा ठेवून शिका. कलेचा आदर करा कलेवर प्रेम करा. अभिनय म्हणजे आधी तो विचार ती भावना आणि मग कृती. (मेंटल ॲक्शन आणि मग फिजिकल ॲक्शन).
बघणं आणि पाहणं, संवाद आणि बोलणं. समजून ऐकणं आणि फक्त ऐकणं. यातला फरक समजून शिका, काम करा. दृष्य, श्राव्य, लय लक्षात घ्ऊन प्रतिमा साकारणं म्हणजे रंगभूमी.
प्रेक्षकांच्या सानिध्यात जे त्या क्षणी जन्माला येतं ते खरं प्रायोगिक नाटक.
विजया मेहता यांनी नाना पाटेकर, रीमा लागू, अशोक सराफ, सुहास जोशी, नीना कुळकर्णी, विक्रम गोखले, मंगेश कुलकर्णी, भारती आचरेकर, वंदना गुप्ते आणि प्रतिमा कुलकर्णी यांसारख्या कलाकारांना तयार केलं. ही सर्व मंडळी त्यांच्याकडे नेहमीच शिकण्यासाठी उत्सुक असत.
भक्ती बर्वे अभिनेत्री म्हणून विजया बाईंना खूप आवडायच्या.
ध्येय मिळालं की प्रवास संपला. कलाकार संपला कला संपली. हा प्रवास अखंड असावा. त्या स्वतः एक यशस्वी दिग्दर्शक होत्या त्यांच मर्म सांगताना त्या म्हणतात. “दिग्दर्शक आदेश देणारा नसावा निर्देश देणारा असावा मला तसं म्हटलं जातं आणि मी आनंदात आहे.”
विजया मेहता यांच लौकिकार्थाने निधन झालं. पण त्यांचा प्रवास रंगभूमी आणि कलेच्या माध्यमातून चालतच राहील. त्या प्रवासात त्यांचे विचार, निर्देश हे अखंड, अक्षय चालतच रहातील.
चारुलता काळे
🙏
टिप्पण्या