पार्किन्सन-अल्झायमर
पार्किन्सन-अल्झायमर
वक्ता- डॉ. शिरीष बर्वे
शनिवार दिनांक २५/७/२०२६ या दिवशी एका मायक्रोसॉफ्ट टीम मीटच्या (मोबाइल मिटिंग) माध्यमातून डॉ. शिरीष बर्वे या शास्त्रज्ञाचे प्रेझेंटेशन पहाता आलं. अमेरिकेच्या विविध भागातून तसेच भारतातून काही लोक या ऑनलाइन मीट मधे सहभागी झाले होते.
डॉ. शिरीष बर्वे हे केन्टकी, अमेरिका येथील University of Louisville मधील एक प्रसिद्ध प्राध्यापक आणि Norton Healthcare मधील मुख्य संशोधन वैज्ञानिक (Chief Research Scientist) आहेत. ते गट-ब्रेन कनेक्शन (gut-brain axis) आणि मायक्रोबायोम संशोधनातील आंतरराष्ट्रीय तज्ञ आहेत. नॉरटन न्यूरोसाइंस इन्स्टिट्यूट मधे ते मुख्य संशोधन वैज्ञानिक, ह्या महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत. पार्किन्सन, अल्झायमर आणि मज्जासंस्थेचे आजार हे डॉ शिरीष बर्वे यांचं संशोधन क्षेत्र आहे.
पार्किन्सन आणि अल्झायमर या दोन आजारां विषयीची साधारण माहिती अशीः
पार्किन्सन रोग हा मेंदूचा एक गंभीर विकार आहे, ज्यामुळे शरीराच्या हालचालींवर नियंत्रण रहात नाही. हात-पाय थरथरणे, स्नायू कडक होणे, हालचाली मंदावणे आणि शरीराचा तोल जाणे अशी याची मुख्य लक्षणे आहेत.
अल्झायमर हा मेंदूचा एक गंभीर आजार आहे ज्यामध्ये स्मरणशक्ती, विचार करण्याची क्षमता आणि साधी कामे करण्याची बुद्धी हळूहळू कमी होते. अल्झायमर हा डिमेंशिया म्हणजेच मनोभ्रम तसेच विसरण्याचा आजार होण्याचे सर्वात मोठे कारण आहे. या आजारात ताज्या घटना किंवा गोष्टी वारंवार विसरणे. रोजची साधी कामे करताना काही आठवत नाही म्हणून ती न करता येणे, रस्ता विसरणे. इ. लक्षणे दिसतात.
डॉ. शिरीष यांनी या दोन्ही आजारांच गांभीर्य लक्षात आणून दिलं. विविध स्लाइड (माहितीपत्रक) दाखवत ते बोलत होते. जठर, आतडे अशा पचन संस्थेची स्लाइड दाखवून आपण जे अन्न खातो त्या अन्नाचे पचन कसे होते. आतड्यांमधील जिवाणूंच्या (gut flora) कामाबद्दल आणि आपल्या आरोग्यावरील त्यांच्या परिणामाबद्दल डॉ. शिरीष यांनी जी माहिती दिली ती ऐकून लक्षात आलं की आपलं अन्न आणि मेंदू तसेच शरिराच्या इतर सर्वच अवयवांचं स्वास्थ्य ह्याचा सरळ संबंध आहे.
पचनक्रिया सुधारणे, रोगप्रतिकारक शक्ती टिकवणे, शरिराला उपयुक्त जीवनसत्त्वांची निर्मिती हे आतड्यांमधील सूक्ष्मजीवांचे (बॅक्टेरियाचे) शरिराला उपयुक्त असे कार्य. या कार्यात बिघाड होतो कारण असंतुलित अन्न, अयोग्य अन्न आणि अयोग्य पध्दतीने खाल्लेले अन्न आतड्यांमधील सूक्ष्मजीवांचे (बॅक्टेरियाचे) असंतुलन किंवा अतिवृद्धीला कारणीभूत होते. ते सूक्ष्मजीव विस्कळीत होवून शरीराला घातक ठरतात.
वाईट बॅक्टेरिया वाढल्याने आतड्यांमधील चांगल्या जिवाणूंचा नाश होतो. आतड्यांच्या अस्तराला इजा पोहोचल्याने पोटात सूज येते तसेच जळजळ जाणवते. पेटके येतात, वेदना होतात. ऍलर्जी, लठ्ठपणा आणि पचनसंस्थेचे गंभीर आजार होतात. काही घातक बॅक्टेरिया अन्नाचे रूपांतर विषारी रसायनांमध्ये करतात, ज्यामुळे अल्झायमर व डिमेंशियाचा धोका वाढू शकतो.
डॉ. शिरीष बर्वे यांनी दाखवलेली पुढील स्लाईड आणि त्या बद्दलची माहिती थक्क करणारी होती.
मायक्रोबायोमची (Microbiome म्हणजे शरीरात रहाणारे सूक्ष्म जीव) संख्या ही जीनोम (Genome म्हणजे सजीवातील सर्व जनुकांचा संच) पेक्षा खूपच जास्त असते. मायक्रोबायोमचा DNA वर 99% परिणाम असतो. मायक्रोबायोम हे अनुभवाने शिकतात म्हणूनच त्यांचा इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती बरोबर संबंध असतो.
मानवी शरीरातील सूक्ष्मजीवांचा समूह (मायक्रोबायोम) भविष्यात वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रात मोठा बदल घडवून आणणार आहे. यामुळे वैयक्तिक उपचार, आजारांचे लवकर निदान, आणि आहार व जीवनशैलीत सुधारणा शक्य होणार आहे.
आतड्याच्या मायक्रोबायोमवर अन्न (आहार), औषधं, भौगोलिक परिस्थिती, जीवन चक्राचे टप्पे (वय), श्वसन प्रक्रिया, बाळाला दूध पाजण्याची पद्धत, ताण तणाव ( शारीरिक आणि मानसिक) यांसारखे अनेक महत्त्वाचे घटक परिणाम करतात. हे सूक्ष्म जिवाणू आपल्या पचनक्रियेवर आणि आरोग्यावर थेट प्रभाव टाकतात.
डॉ. शिरीष बर्वे यांनी या सर्व गोष्टींचा धावता आढावा घेऊन त्यातील योग्य तसेच अयोग्य गोष्टी कोणत्या, त्या का तसेच कशा घातक ठरतात हे समजावले. अयोग्य गोष्टींचा परिणाम होऊन बॅक्टेरियल डिस्बिओसिस (Bacterial dysbiosis) म्हणजेच शरीरात, विशेषतः आतड्यांमध्ये असणाऱ्या जिवाणूंच्या समतोलात बिघाड किंवा असंतुलन होते. उपयुक्त बॅक्टेरिया कमी होतात आणि त्रासदायक बॅक्टेरिया वाढतात. ह्या सर्व गोष्टी स्लाईडच्या माध्यमातून दृश्य स्वरूपात दाखवल्याने चांगल्या समजल्या.
आतड्यांतील जिवाणूंच्या असंतुलनाला, गट डायस्बायोसिस (Gut Dysbiosis) म्हणतात, ज्यामुळे पचनसंस्था, मेंदू आणि रोगप्रतिकारक शक्तीवर गंभीर परिणाम होतो. हे सोप्पं करून समजावण्यासाठी शरीरातील सर्व अवयव दाखवून त्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात आणून दिले गेले. मेंदूवर होणारे परिणाम म्हणून सतत ताणतणाव, चिंता (Anxiety) आणि नैराश्य (Depression) वाढणे. स्मरणशक्ती कमी होणे आणि लक्ष केंद्रित न होणे. या गोष्टी सांगितल्या गेल्या.
मेंदू संबंधीत विकार कोणते हे दाखवणा-या स्लाइड मधे जन्मजात असलेले विकार, तसेच अगदी लहान मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये तसेच कुमार वयीन मुलांमध्ये आढळणारे विकार त्या त्या वयोगटातील व्यक्तीचे चित्र दाखवून लिहिलेले होते. पार्किंनसन, अल्झायमर आणि डिमेंशिया हे विकार प्रौढांना होतात तसेच (POCD) म्हणजेच शस्त्रक्रिया केल्यानंतर किंवा अनेस्थेशिया दिल्यानन्तर होणारा मेंदू वरील परिणाम हा अतिवृद्ध व्यक्तींना होतो हे दर्शविण्यात आले होते.
न्युरोपॅथॉलॉजी इन अल्झायमर्स डिसीज या स्लाइड मधे निरोगी मेंदू आणि अल्झायमर बाधित मेंदूच्या आतील भाग दाखवून त्यात काय फरक असतो आणि तज्ञ तो कसा ओळखतात हे डॉ. शिरीष बर्वे यांनी विषद केले.
पार्किन्सन-अल्झायमर या आजारा विषयीच्या संशोधनात उंदरावर करण्यात येणा-या विविध प्रयोगात त्याच्या वागण्यातील बदल कसे अभ्यासले जातात त्याची माहिती डॉ. शिरीष बर्वे यांनी दिली ती ऐकून मजा वाटली. अमेरिकेतील या आजारा विषयीच्या संशोधनाची माहिती तसेच इतर देशातील या विषयीच्या घडामोडी अशा अनेक गोष्टींचाही त्यांनी उल्लेख केला.
या दोन्ही आजारां बद्दल समजायला क्लिष्ट अशा गोष्टी शक्य तितक्या सोप्या करून रंजक पद्धतीने सादर करण्यात आल्या. माहीत असलेल्या या आजारां बद्दल माहित नसलेल्या ब-याच गोष्टी समजल्या. डॉ. शिरीष बर्वे हे गेली अनेक वर्षं अमेरिकेत रहात आहेत. ह्या ऑनलाइन सभेमधे ते मराठीत बोलले याचा मनापासून आनंद झाला आणि कौतुक वाटलं. डॉ. शिरीष बर्वे यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्या प्रत्येक प्रश्नाचे त्यांनी उत्तर दिलं.
डॉ. शिरीष बर्वे हे उत्तम वाचक आहेत. अभ्यासक आहेत. आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी अशी माहिती दिली की जर्नल ऑफ आयुर्वेद ॲन्ड इन्टिग्रल मेडिकल सायन्स मधे रिलेशन बिटविन अग्नी ॲन्ड गट मायक्रोबायम ह्याचा अभ्यासपूर्ण विचार केलेला आहे. यातील अग्नी म्हणजे जठराग्नी म्हणजेच डायजेस्टिव फायर. डॉक्टरांचे आभार मानून मिटिंग संपली.
डॉक्टरांनी दिलेली माहिती अत्यंत उद्बोधक होती.
ती ऐकून एक गोष्ट लक्षात आली जी प्रामाणिक पणे कबूल करायला हवी की अनेक महत्वाच्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. योग्य आहार, विहार, विचार आणि आचार ह्या गोष्टी अपरिहार्य आहेत हे नक्की.
ह्या ऑनलाइन मिटिंगला मी उपस्थित होते. मला जनले तसे मी स्लाइड्सचे फोटो काढले. ते फोटो आणि डॉ. शिरीष बर्वे बोलत असताना केलेल्या नोंदी याच्या मदतीने मला या भाषणातून जे समजलं, लक्षात राहिलं ते लिहिण्याचा माझा हा प्रयत्न आहे.
चारुलता काळे
🙏
———-
टिप्पण्या