टर्की

 टर्की १

अनेकदा अनेक देशांचा प्रवास झाला पण टर्कीला जाणं  मात्र  झालं नव्हतं. अमेरिकेला जाता येताना तसंच दोन वर्षांपूर्वी ग्रीस फिरून आलो तेंव्हा, टर्किश एअरवेजने प्रवास केल्याने, ब्रेक जर्नी ह्या स्वरुपात इस्तांबुल एअरपोर्ट पाहिलं होतं. ब्रेव्ह अॅन्ड ब्यूटिफुल सारख्या टरकिश सीरियल्स मधून झालेलं टर्कीचं विलोभनीय दर्शन मनाला सुखावून जायचं आणि टर्कीला जायलाच हवं हा विचार पुन्हा पुन्हा यायचा. 

काश्मीर मधील आतंक आणि मग ऑपरेशन सिंदूर. टर्कीच्या पाकिस्तान समर्थना विषयीच्या बातम्या यामुळे मात्र आम्ही तिथे जाण्याचा विचार सोडून दिला होता. मधे काही काळ गेला शाल्मली, तेजस आमची लेक आणि जावई यांच्या बरोबरील गप्पांमधून टर्कीला जायला हवं असं अनेकदा म्हटलं गेलं आणि मग ते अमेरिकेतून आणि आम्ही भारतातून टर्कीला जायचं  नक्की झालं. 

कोवीड पूर्वी आम्ही चौघं असेच स्पेनला एकत्र फिरायला गेलो होतो. तेंव्हा प्रवासाचं सर्व प्लॅनिंग तेजसने केलं होतं. यावेळी आम्ही 7लक्स हॉलिडेजवर ही जबाबदारी सोपवली. ह्या ट्रॅव्हल कंपनी बरोबरचा आमचा म्हणजेच माझा नवरा दिगंबर ऊर्फ किशोर आणि मी, अनुभव फारच चांगला होता. 7लक्सने आमच्या नॉर्व-आइसलॅंड आणि ग्रीस ह्या टूर्स  अत्यंत चांगल्या पद्धतीने अविस्मरणीय बनवल्या होत्या. 

14 डिसेंबर ते 23 डिसेंबर अशी ही आमची टर्कीची टूर. 14 तारखेला साधारण सकाळी सातची आमची फ्लाईट त्याच दिवशी टर्कीला साडे अकराला पोहचत होती. टर्किश एअरलाईन आणि इंडिगो यांच्या परस्पर सहकार्याने ही विमान सेवा आहे. मुंबई ते इस्तांबुल हा  प्रवास साधारण सात तास. तेजस आणि शाल्मली यांची फ्लाईट आमच्या नन्तर तासाभरात इस्तांबूलला पोहचणार होती. 

आमची विमानाची  तिकिटं आधीच बुक झाली होती आणि डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच इंडिगोची विमानसेवा कोलमडली होती. ‘दुस-या एअरलाइनची तिकिटं काढावी का?’ अशा संभ्रमात होतो. कॅन्सलेशनचा नीट आढावा घेतला आणि लक्षात आलं की त्या गोंधळात त्यांची इस्तंबूलला जाणारी फ्लाईट एकदाही रद्द झाली नव्हती. संयम ठेवला इंडिगो सेवा बरीच सुरळीत झाली होती. तरिही २४ तारखेला एअरपोर्टला जाताना धाकधूक होतीच. आम्ही जास्तीचे पैसे भरून बिझनेस क्लास मागच्या पाय लांब करता येतील अशा सीटस् घेतल्या होत्या. मुंबई इस्तंबूल प्रवास ‘तसा’ चांगला झाला.

या ‘तसा’ चा अर्थ- ब्लॅंकेट हवं असेल तर पैसे द्यायचे होते. कुठल्याही स्वरूपात मनोरंजन अथवा माहिती मिळण्याची सोय नव्हती. अल्कोहोल नव्हतं आणि फूड “घ्या फुकट्यांनो!’ असं काहीसं सर्व्ह झालं. तरिही प्रवास खूप छान वाटला कारण तो वेळेत होता….

सामान घेऊन एअरपोर्ट बाहेर 7लक्स हॉलिडेजने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचलो. तिथे हारून नावाचा प्रसन्न चेह-याचा तरूण हॅन्डसम मुलगा आमची वाट पहात होता. टर्कीची करन्सी लीरा. सध्या एक लीरा म्हणजे आपले दोन रुपये. हारून आमच्याकडील अमेरिकन डॉलर किंवा युरोला बेस्ट प्राइज़ देतो असं म्हणत लीरा घेऊन सज्ज होता. आम्ही थोडे डॉलर देऊन लीरा घेतले. आमच्याकडे थॉमसकुकचं डेबिट कार्ड आणि आमच्या बॅंकांची कार्ड्स होतीच. शाल्मली तेजसची फ्लाईटही लॅन्ड झाली होती पण त्यांना एअरपोर्ट ते हॉटेलसाठी दुसरी गाडी होती. 

हारूनने आमचं सामान घेतलं आणि आम्ही आमच्या गाडी पर्यन्त पोचलो. ही गाडी होती कस्टममेड, मर्सिडीज मेबॅक, आलिशान आणि अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशी गाडी. आरामदायक सीट्स, लाकडी फिनिश चे इंटीरिअर. राजेशाही अनुभव देणा-या गाडीत बसलो आणि आपली ही टूर ‘लय भारी’ होणार याचा अंदाज आला. आम्हाला आमच्या संपूर्ण टूरसाठी अशाच गाड्या होत्या. आजचा दिवस आराम होता. आमच्या पाठोपाठ काही वेळातच तेजस आणि शाल्मली हॉटेलला पोहचले. 

डिनरच्या आधी मी आणि शाल्मली जवळच असलेल्या मॉल मधे चक्कर मारून टर्किश कॉफी प्यायलो. हवेत सुखद गारवा होता. डिनर बरोबर थोडी वाईन छान वाटली.

——————-

टर्की २

१५ डिसेंबर दुसरा दिवस तेजसचा वाढदिवस होता. आज आम्ही प्रिन्सेस आयलंडस् नावाच्या बेटांच्या समुहातील एका बेटावर जाणार होतो. हॉटेलचा ब्रेकफास्ट स्प्रेड मस्त होता. तेजस फारसा ब्रेकफास्ट करत नाही. आम्ही मात्र भरपेट खाऊन घेतलं. आम्हाला बंदरावर नेणारी टॅक्सी वेळेत आली.

टर्कीत आल्यावर एक गोष्ट जाणवली की इथले लोक प्रचंड धूम्रपान करतात. पुरूष महिला सर्वजण, ई सिगरेट, सिगरेट अगदी सतत चालू. दुसरी गोष्ट जाणवली ती म्हणजे टर्की हे अत्यंत लोकप्रिय टुरिस्ट डेस्टिनेशन असुनही इथे प्रामुख्याने टुर्की भाषाच वापरली जाते. इथल्या टॅक्सी चालकांना इंग्रजी अजिबात समजत नाही. हॉटेल मधे इंग्रजीत मेन्यूकार्ड असतं  त्यावर बोट ठेऊन ऑर्डर दिली की त्याचा टर्किश मेन्यूकार्ड बरोबर ते संबंध लावतात. आणखी एक गोष्ट म्हणजे इथले पुरुष रांगडे आणि स्त्रिया सुंदर असतात. त्यांचा गोरा रंग फटफटीत पांढरा नसतो. 

किशोर बरेचदा टॅक्सीवाल्या बरोबर काहीतरी बोलायच्या प्रयत्नात असे. त्याला तेजस चिडवून म्हणायचा “केके (किशोरचं आणखी एक पॉप्युलर नाव) हा बोलला तर आज मी ट्रीट देईन.”

आम्ही पोर्टला पोहोचलो. गाईडचं नाव होतं ओनर, एकदम रुबाबदार! त्याने आमचं स्वागत केलं आणि बोटीवर घेऊन गेला. आजच्या साइट सिइंगची त्याने माहिती दिली. एवढ्यात टर्की चहा, कॉफी आणि स्नॅक्सची पाकिटं घेऊन एक वयस्क माणूस आला. चहा ही गोष्ट मला नेहमीच खुणावत असते. आम्ही पटकन चहा-कॉफीचे कप उचलले. तेजसने पैसे दिले. उरलेले पैसे परत न करता तो माणूस फक्त गोड हसला आणि गेला सुध्दा. “भाषा येत नाही म्हणून हा वेडा पेढा खाऊन गेला रे” माझ्या वाक्यावर तेजस खुश..

इस्तांबूलच्या मरमरा समुद्रातील प्रिन्स आयलंडस् हा द्वीप समूह आहे. ही बेटे शांत आणि निसर्गरम्य आहेत. मोटरगाड्यांना प्रतिबंध असल्याने सायकल किंवा इलेक्ट्रिक बसेस चालतात. बुयुकाडा ह्या सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय बेटावर आम्ही पोहोचलो.

हेबेलियाडा, बर्गजाडा, किवालिआडा अशी आणखी  आठ बेटे आहेत. ब्युयुकाडा ह्या बेटांवर घड्याळ टॉवर आहे. वास्तुशिल्पीय वारशाची आवड असेल तर मशिदी, चर्च आणि मठ यांसारखी ठिकाणे देखील येथे आहेत.रेस्टॉरंटस् आणि कॅफेज आहेत. 

बोटीवरून उतरून तिकीटं घेऊन बस मधे बसलो. बस एका ठिकाणी थांबली. “गेतिंग दाऊन” माझं इंग्लिश. बस चालक ढम्म मुद्रा. मी हे “गेतिंग डाऊन” आपल्या पूर्वेकडील म्हणजेच थायलंड, चायना, जपान चे लोक म्हणतील तसं का म्हटलं? माझंच मला हसू आलं पण माझ्या बोलण्याचा परिणाम म्हणा किंवा आमचा जोश पाहून म्हणा आमच्या पाठोपाठ बस मधील तीन चायनीज बायकाही उतरल्या होत्या हे आमच्या खूप नन्तर लक्षात आलं. 

समोरच्या कॅफेत जाण्याचा मोह एकमताने टाळून आम्ही वेडी वाकडी वळणं घेत छोट्याशा पण गुळगुळीत रस्ता असलेल्या डोंगर उतारा वरून चालू लागलो. हिरवी गार गर्द झाडी. थोडीशी बोचरी पण हलकं ऊन असल्याने गुलाबी थंडी. उतारावरून समोर दिसणारा निळा समुद्र, त्यातल्या छोट्या मोठ्या होड्या, बोटी… क्या बात है! थोडे थांबत, गप्पा मारत, फोटो काढत आम्ही चालत होतो. माझं “ दावा कोकणची निळी निळी खाडी” चं गुणगुणणं चालू असतानाच मी म्हटलं “बिबट्या” आणि मग शाल्मलीला सांगितलं “मना, हल्ली आपल्या कोकणात अशी निघालिस की बिबट्या दिसतो हं…” तिला आश्चर्य वाटलं. 

“सुहाना सफर और ये मौसम” चालू असताना लक्षात आलं की आपण खूप उतरतोय आणि वाटेत वाहन दिसलेलं नाही. आमच्या पासून तशा दुर असलेल्या त्या चायनीज बायकाही तेंव्हाच नजरेत आल्या. कडाडून भूक लागली होती. जेवण करून पुन्हा बोट पकडायची होती. “मी नाही चालणार आता” असं एकमेकांना म्हणत आम्ही थांबलो. तेवढ्यात ‘सुखाची झुळुक ‘ वाटावी अशी एक बस समोरून आली.  आम्ही बस थांब्यावर उभे आहोत हे लक्षातच आला नव्हता. हात दाखवला आणि बस थांबली. 

टर्किश फिश, राइस आणि बिअर. लाजवाब जेवण. आम्हाला जेवण आवडलं म्हणून धन्य झालेला रेस्टॉरंटचा मालक. जगात कुठेही जा लहान गावात गेलं की जी आपुलकी दिसते ती पाहून वाटतं आपण इथलेच आहोत. पुन्हा बोटीवर आलो. यंग मुली स्वतःचं मेकअप करण्यात गु्तल्या होत्या. एखाद दुसरं प्रेमी युगुल एकमेकांत पूर्ण हरवलं होतं. ते पाहून लक्षात आलं की टर्कीचा आत्ताचा शासक हा कट्टर मुस्लीम असला तरिही सर्व सामान्य जीवनावर युरोपियन संस्कृतीचा ठसा कायम आहे. 

—————

टर्की ३

संध्याकाळी वेळ होता म्हणून ग्रँड बाजार ह्या इस्तंबूलच नव्हे तर टर्की मधील जगातील सर्वात जुन्या आणि मोठ्या संरक्षित (covered) बाजारांपैकी एक म्हणून प्रसिद्ध असलेल्या मार्केटला धावती भेट द्यायला गेलो. हा बाजार 1461 मध्ये बांधला गेला आणि यात 61 गल्ल्यांमध्ये 4,000 हून अधिक दुकाने आहेत, ग्रॅंन्ड बाजार मधे पारंपरिक तुर्की हस्तकला, कार्पेट्स, दिवे, सिरॅमिक्स, चामड्याच्या वस्तू, दागिने आणि मसाले मिळतात. हा बाजार ऐतिहासिक सिल्क रूटचा भाग होता आणि पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण आहे. हा डोळे दिपवून टाकणारा बाजार पाहून भारावून गेलो.  बाजारात कितीही फिरलो तरी समाधान होणार नव्हतं. 

किशोर हॉटेलवर परत जायची घाई करत होता, मी आणि शाल्मलीही त्याला समर्थन देत होतो कारण 7 लक्सच्या ओनरने मनालीने त्याच्या वाढदिवसाचा केक आणि शॅम्पेनची संध्याकाळची सरप्राईज व्यवस्था किशोरला कळवली होती आणि त्याने ते आम्हा दोघींना सांगितलं होतं. आमची ती घाई बघून तेजस थोडा वैतागला पण टूर संपताना इथे येऊन मनसोक्त खरेदी करूया असा ठराव एकमताने पास करून आम्ही तिथून निघालो. 

तेजस शाल्मली त्यांच्या रूमवर जाताच किशोरने तो केक त्यांच्या रूमवर द्यायला सांगितलं. केक आणि शॅम्पेन पोहताच तेजसने आम्हाला बोलावलं. थेट भारतात बसून इतक्या आठवणीने 7लक्स कंपनीच्या मनालीने अॅरेंज केलेलं हे सरप्राईज खरंच खास होतं. 


तेजस आणि शाल्मली फूड इंडस्ट्रीत आहेत. त्यांच्या परिचयातले शेफ़ बुराक यांना डीनरसाठी आम्ही भेटणार होतो. ते टर्कीचे मूळ रहिवासी. त्यांची पत्नी ही तेजस बरोबर स्टॅन्फर्ड युनिव्हर्सिटीत काम करायची. शेफ बुराक अमेरिकेत शाल्मलीचे फेसबुक मधले सीनियर. त्यांचे रेस्टॉरंट खूप प्रसिद्ध आहे. आम्ही टॅक्सीने तिथे पोहोचलो. पण रेस्टॉरंट जरा पुढे होतं. वाटेत विचारलं पण रेस्टॉरंटचं टर्कीशमधे लिहिलेलं ते नाव दिसत असुनही आम्हाला समजलं नाही आणि त्या नावाचा आमचा चुकीचा उच्चार होत असल्याने कुणीच काही सांगेना. शेवटी एका गजबजलेल्या रेस्टॉरंटमधे गेलो. तिथल्या भितीवरील फोटोत शेफ बुराक दिसले आम्हाला त्यांना भेटायचंय हे लक्षात येताच तिथला माणूस त्यांना सांगायला गेला. 

तेजस शाल्मलीला पहाताच त्यांच स्वागत करण्यासाठी दोन्ही हात पसरून ते हसत हसत आमच्याकडे आले. खूप दिवसांनी भेटले होते त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. त्यांनी अगदी खास जागेवर प्रशस्त टेबलाच्या भोवती आम्हाला बसवलं. संपूर्ण टेबल भरून गेलं. विविध प्रकारचे अनेक पदार्थ येत होते आणि आम्ही त्याचा आनंद घेत होतो. 

टर्किश खाण्यात सर्वात आधी मेझे सर्व्ह केलं जातं ज्यात व्हेज, नॉनव्हेज स्टार्टर्स आणि सॅलडस् असतात. टर्किश कबाब चिकन, मटण वापरून बनवलेले असतात. आम्ही बीफ खात नाही हे शेफ बुराक यांना माहीत होतं. म्हणून त्यांनी बीफ तसंच पोर्क सर्व्ह केलं नव्हतं. टर्किश पदार्थ ऑलीव्ह ऑयल तसेच तिथले विशिष्ट मसाले वापरून बनवलेले असतात. अजिबात तिखट नसतात. दही, चक्का ह्याचा उपयोगही करतात. 

शेफ बुराकना आम्ही डेझर्टसाठी मात्र नम्रपणे नकार दिला कारण आम्हाला कनाफे नावाचं डेजर्ट खायचं होतं. कनाफेसाठी प्रसिद्ध असलेलं एक छोटंस रेस्टोरंट जवळच होतं. शेफ बुराकना धन्यवाद देऊन आम्ही निघालो. 

कनाफे हे चिरलेल्या पेस्ट्रीचे (पीठ किंवा रवा) थर, मऊ चीज किंवा क्रीम भरून, साखरेच्या पाकात भिजवून बनवले जाते; बाहेरून बारीक शेवया असल्याने कुरकुरीत आणि आतून मऊ, मलईदार. गरमा गरम कनाफे खायला बरेच लोक बसले होते. 

कनाफे पाहून इतकं तुडुंब खाल्लेलं असुनही धीर धरवत नव्हता. एकच कनाफे आम्हाला पुरेसा होता. तो सर्व्ह होताच आम्ही काटे चमचे सरसावले. हा पदार्थ पेलेस्टाईन आणि अरब देशांमधे सण समारंभात आवडीने खाल्ला जातो. 

————-

टर्की ४

हॉटेलवर आलो. दुस-या दिवशी आमची दुपारी पावणे तीनची साधारण एक तास वीस मिनिटांचा वेळ घेणारी नेवसेहेरची टर्किश एअरवेजची फ्लाईट होती. एअरपोर्टला पोचलो एक विशेष गोष्ट म्हणजे तिथे तुमचे सामान स्कॅन करण्या पर्यन्त मदत सेवा उपलब्ध होती. आमच्या एकूण आठ बॅगा नेण्यासाठी साधारण हजार रुपये म्हणजेच पाचशे लीरा काउंटरवर दिले. मोठ्या ट्रॉलीवर आमचे सामान व्यवस्थित रचून ते घेऊन हेल्पर निघाला. 


त्याने स्कॅनिंगसाठी बॅगा ठेवल्या आणि त्या पुन्हा घेण्यासाठी तो पलीकडे थांबला. शाल्मलीची एक बॅग काहीतरी गडबड वाटून परत परत तपासली जात होती. तिथले अधिकारी आम्हाला ती उघडायला सांगून त्यातल्या गोष्टी वेगळ्या करत होते. वरून शांत वाटले तरी आम्ही थोडे वैतागलेले आणि टेन्शनमधे. तिथल्या अधिकाऱ्यांनी शेवटी जो छोटा पाउच वेगळा करून दाखवला तो उघडला त्यात गळ्यातली माळ होती जिचं पेंन्डन्ट बंदुकीच्या गोळीसारखं दिसत होतं. 

“हाश सुटलो एकदा!” असं वाटलं. कमाल म्हणजे तिथले अधिकारी आम्हाला हा त्रास झाला त्यासाठी चक्क माफी मागत होते आणि हा सर्व गोंधळ संपेपर्यन्त आमचा हेल्पर ती बॅग परत परत उचलत ठेवत होता. त्या सर्वांना हसून धन्यवाद देत चेकइन काऊंटरवर सामान देऊन आम्ही विमानाकडे निघालो. 

फ्लाईट छान होती इतक्या कमी वेळाच्या अंतराच्या प्रवासात अत्यंत हसतमुखाने बर्गर आणि कोक मिळाल्याने ती खूपच छान वाटली. बाहेर आमची आलिशान गाडी आणि टोलगा नावाचा ड्रायव्हर आमच्या स्वागताला उभा होता.  

हवा चांगलीच गार होती. अरुंद अशा गुळगुळीत रस्त्यावरून गाडी पळत होती. रस्त्याच्या बाजूला झाडांची रांग पण पानगळ झालेली. आजूबाजूला उजाड जमीन. अधून मधून छोट्या विंटेज गाड्या दिसत होत्या. रस्त्याच्या बाजूचा गडद निळ्यापिवळ्या रंगाचा सायकल ट्रॅक मोहक दिसत होता. त्यावर क्वचित एखादी शाकारलेली सायकल दिसत होती. 

रस्त्याच्या कडेला थोडा बर्फ पडलेला असल्याने सर्व धुरकट पांढरं दिसत होतं. हळूहळू  मशरूम सारख्या छोट्या डोंगर सुळक्यांचं दर्शन होत होतं. साधारण तासाभरात आम्ही गोरेमे नावाच्या छोट्या शहरात पोहोचलो.  हलकासा बर्फ भुरभुरत होता. 

मिथरा केव्ह हॉटेल (Mithra Cave Hotel) ह्या लोकप्रिय केव्ह हॉटेलमधे आमचं बुकिंग होतं. रस्ता ते फ्रॅन्ट ऑफिस. आणि तिथून आमच्या रूम्सला जायला दगडी पाय-या होत्या. आमचं सामान रूमवर येणार होतं. पाय-या चढतांना मनात आलं ‘या गुहेसारख्या हॉटेलच्या कोंदट खोल्यांमधे रहायला कसं काय  जमणार बुवा!’ 

चावी फिरवून रूम पाहिली तर ते चक्क ऐसपैस प्रशस्त स्वीटस् होते. जसं काही एक स्वप्न! दिसायला पारंपरिक गुहा (cave) पण ती ओटोमन/ग्रीक शैलीतील अत्यंत आकर्षक पद्धतीने सुशोभित केलेली आणि आधुनिक सोयी सुविधांनी सज्ज! छोटं अंगण त्यात  बसायला सुंदर बाकं. छोटा झोपाळा.  समोर  पाच सहा पायऱ्या चढून एक टेरेस तिथेही बसायची छोटी बाकडी. दोन गुबगुबीत पर्शियन मांजरीपण होत्या. त्या आपला अंदाज घेऊन जवळ यायच्या. 

नजर जाईल तिकडे व्हॅली आणि मधुनच ते छोटे मशरूम डोंगर दिसत होते. आजुबाजूला या हॉटेलला जोडून तसेच काही अंतरावर दुसरी केव्ह हॉटेल्स होती. गप्पा टप्पा करत रूमवरच ड्रिंक्स घेत बसलो. बाहेर कडाक्याची थंडी तरिही मधुनच बाहेर चक्कर मारत होतो. संपूर्ण व्हॅली मंद हलक्या विविध रंगातल्या उजेडात अेखाद्या परिकथेतील दृश्या सारखी दिसत होती.  

हॉटेलचं छोटंसं रेस्टॉरंट तिथेच वरती काही पाय-या चढून गेल्यावर होतं. आम्ही ऑर्डर दिली सर्विसला असलेली मुलं मुली विद्यार्थी असावेत कारण थोडं दूर बसून ते काही लिहीत वाचित होते. त्यांना इंग्लिश येत होतं. 

तेजसच्या वाढदिवसाचं एक्सटेंडेड सेलिब्रेशन म्हणून दुसरा दिवस आम्ही बलून राईडसाठी नक्की केला होता. टूर ठरली तेंव्हाच हे प्लॅनिंग झालं होतं आणि त्याचा खर्च किशोर करणार होता. 

थंडी लक्षात घेऊन कपडे चढवत होतो. ठरलेल्या वेळेवर टेम्पो ट्रॅव्हलर ज्यात बारा पंधरा माणसं बसू शकतील अशी गाडी आली. बलून राइडसाठी दुसऱ्या हॉटेल्सची लोकंही घ्यायची होती. सर्वांना घेतलं आणि शहरा पासून लांब निघालो. बलून राईडच्या साइटवर पोहोचलो. साधारण सात वाजले होते. आमच्या प्रमाणेच इतरही गाड्या पोहोचल्या होत्या. बलून पॅक केलेल्या गाड्या एकमेकां पासून विशिष्ट अंतर राखून उभ्या होत्या. 

मी आणि किशोरने दक्षिण आफ्रिकेत बलून राईड केली होती. तरिही आनंद उत्साह होताच. किशोर फार वेळ स्वस्थ बसू शकत नाही तो गाडीतून उतरला. बाहेर वारा होता. जरा इकडे तिकडे करून पुन्हा गाडीत आला. आम्ही तिघांनी त्याला त्यावरून चिडवलं. आणखी दहा मिनिटं गेली आणि खराब हवामानामुळे बलून राईडला परमिशन मिळाली नाही. मन खट्टू झालं. केकेंचे पैसे वाचले… आम्ही किशोरला चिडवत होतो. 

हॉटेलवर आलो आमच्या हॉटेल स्टे मधे नाश्ता धरलेला होता. किशोर. मी आणि शाल्मलीने टम्म नाश्ता केला. तेजस आमचं खाणं पाहूनच दमला असावा. आम्ही रूमवर जाऊन पुन्हा ठीक-ठाक व्हायच्या गडबडीत मी रूम ऊघडली आणि लाईटचा स्वीच शोधण्याच्या गडबडीत चक्क उपडी पडले. थंडीचा बचाव म्हणून एकावर एक दोन पॅन्टस् असल्याने फार लागलं नाही पण गुडघा आदळून त्याची चामडी निळी काळी पडली होती. चालायला त्रास वाटत नव्हता. 

आज आम्ही कॅपॅडोसिया फिरणार होतो. आमचा आजचा गाईड होता उमुथ. एकदम हिरो, उत्कृष्ट इंग्लिश आणि स्मार्ट. आमच्या अलिशान मेबॅक गाडीतून निघालो. सर्वात प्रथम गोरेम ओपन-एअर संग्रहालय ह्या कॅपाडोकिया मधील  सर्वात महत्वाच्या आणि युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद झालेल्या ठिकाणी जायचं होतं. उमुथ माहिती देत होता. तिथे कसं फिरा ह्याच्या सूचना देऊन त्याने आम्हाला फिरायला वेळ दिला. 

सुरुवातीच्या ख्रिश्चनांनी ज्वालामुखीच्या खडकात कोरलेले  दगडी बांधकाम चर्च, मठ आणि चॅपल पाहिले. ते तसे भव्य दिव्य नाहीत पण निसर्गाच्या आपत्तीमुळे तयार झालेल्या नैसर्गिक रचनांचा मानवाने केलेला उपयोग पाहून त्या कल्पकतेची कमाल वाटते. संग्रहालयातून चालताना अनातोलियातील सुरुवातीच्या ख्रिश्चन मठवासी जीवनाची एक दुर्मिळ झलक मिळते.

मी सकाळीच लोटांगण घातलं होतं आणि उमुथच्या सांगण्यावरून उगाचच वाटेल तसे वर खाली जाणे तसे सुरक्षित न वाटल्याने आम्ही तसे सांभाळून पण मनसोक्त फिरलो. फोटो काढले. 

————————-

टर्की ५

जाता जाता फक्त ४५ लोकं रहात असलेलं अॅक्टेपे असं काहीसं नाव असलेलं गाव उमुथने दाखवले. त्याला इंग्रजी येत असल्याने आणि तो आमच्याशी बोलायला उत्सुक असल्याने गप्पा रंगल्या. आत्ताच्या प्रेसिडेंन्टला लोकांनी निवडून दिलंय म्हणजे तो त्यांना पसंत आहे असं सावधपणे म्हणून उमुथ इथले अपुरे पगार, तरुणांना फक्त शहरातच रोजगार मिळत असल्याने शहरातली गर्दी, ओस पडलेली गावं. असं बरंच बोलला. एका फ्रेंच टुरिस्ट बरोबर सूत जमलं लग्न झालं तिने पेपर टाकलेत आणि आता मी पॅरिसला जाणार त्याने आपली प्रेम कहाणी सांगितली. ती ऐकून तो खरा हिरो आहे असं वाटतंय तोच तो म्हणाला. “ ती आधुनिक विचाराची आहे पण मुलांना आपल्या संस्कृतीच्या मर्यादा समजावून संस्कार करायलाच हवेत. त्यांनी सांगून ऐकलं तर ठीक नाहीतर पट्टा आहेच”  ही गंमत असेल तर ठीक पण नाहीतर…. मनात विचार आला. 

पुढे संपूर्ण टूर मधे शाल्मली गमतीनं म्हणाली की मला इथला हॅन्डसम हिरो आवडेल मी रहाते इथेच की आम्ही तिला ‘पट्ट्याची’ आठवण करून द्यायचो आणि हसायचो. 

उमुथ आम्हाला ‘प्लेस ऑफ इनॅजिनेशन’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका जागेवर घेऊन आला. समोरच्या थोड्याशा लांब असलेल्या टेकडीवर दगडांमधे कल्पना केली की विविध आकार दिसत होते. बसलेला उंट, लग्नाचा गाऊन घातलेली मुलगी असं बरंच काही. मला आपल्या लेह लडाखची आठवण झाली. जिस्पा ते लेह हा प्रवास करताना कल्पना करून अशा कितीतरी गोष्टी डोळ्यांसमोर साकारतात. 

कॅपॅडोकियाला बलून राईड आणि उडणारे रंगीत बलून पहाणे या आनंदाला आम्ही मुकलो होतो. पण तरिही इथे आवर्जून करावी अशी एक गोष्ट माझ्या मनात आली ती म्हणजे इथला कल्चरल शो. तसं पाहिलं तर आमच्या इस्तांबूल मधील क्रूज़वर नाईट शो पहायचा होता पण इथला शो पहाणं जमण्यासारखं होतं. 

आम्ही उमुथला त्या बद्दल विचारताच तो म्हणाला की इथले हे कार्यक्रम खूप छान असतात. तुम्हाला नक्कीच आवडतील. आम्ही आमच्या ट्राव्हल एजंटला विचारलं आणि आजचा शो बुक झाला. 

आम्ही हॉटेलवर येऊन ताजे तवाने झालो. रात्री साडे सातला एवरानोस या केव्ह रेस्टोरेंटला कल्चरल शो पहायला गेलो. ह्या शो बरोबर डीनर आणि सॉफ्ट ड्रिंक्स इनक्लूड होतं. विविध पातळ्यांवर सर्वाना दिसेल अशी टेबल्सची रचना होती. 

आकर्षक बांध्याची देखणी तरूण मुलं मुली पारंपरिक वेशभूषेत अप्रतिम नृत्य प्रकार सादर करत होती. जोष, चपळता, लवचीकपणा, पदलालित्य आणि हावभाव सर्वच लाजवाब. प्रेयसीला खुश करणारा प्रियकर, तिचं त्याला झिडकारणं आणि त्याचं तिला मनवणं, रुसवा सोडून तिचा लग्नाला होकार आणि मग लग्नाचा सोहळा. अशा गमती जमती झाल्या.  गुलाबी थंडी आणि हातातल्या मद्याची नशा आणखी वाढवायला बेली डान्स सादर झाला  आणि त्या नन्तर उत्साही प्रेक्षकही त्या ग्रूप बरोबर डान्स फ्लोअरवर अवतरले. आम्हीही आमची डान्सची इच्छा पूर्ण केली. कॅपॅडोसियाची आमची ही शेवटची रात्र अविस्मरणीय आनंदाची ठरली. 

—————————

टर्की ६.

सकाळी लवकर कॅपॅडोसियामधून निघून सन एक्सप्रेस एअरवेजच्या विमानाने कायसरी ते इझमीर असा साधारण पावणे दोन तासांचा प्रवास करून इझमीरला पोहोचलो. आम्ही समुद्र किना-या जवळ वसलेल्या कुसाडासीला रहाणार होतो. आमच्यासाठी आलिशान गाडी एअरपोर्टला हजर होती. साधारण सव्वा तासाचा सुखद प्रवास. 

इझमीर एअरपोर्टला विमान उतरत असताना ग्रीन हाऊसेस दिसत होती त्या वरून येथे ब-यापैकी शेती होत असणार हे लक्षात आलं. प्रवासात दुरून एका वॉटरपार्कचं दर्शन झालं. दूरवर समुद्रात एक भलीमोठी शिप उभी होती. दोन वळणं टाकून गाडी पुढे गेल्यावर लक्षात आलं ती शिप म्हणजे समुद्राच्या बाजूला असलेलं एक भलं मोठं हॉटेल होतं. एजिअन समुद्राच्या किना-यावर वसलेलं कुसाडासी हे रिसोर्टससाठी प्रसिद्ध आहे. 

हॉटेलवर पोहोचलो. आमच्या रूम्सच्या चाव्या घेऊन रूम्सवर गेलो. बाल्कनीतून समोर समुद्र दिसत होता. थोडे जास्त पैसे देऊन सी फेंसिंग रुम्स घेण्याची किशोरची इच्छा अर्थपूर्ण होती. तेजस आणि शाल्मली बाजूच्याच रूममधे असल्याने बाल्कनीतून इकडुन तिकडे करणं सोपं होतं. दुपार टळली होती भूक लागली होती हॉटेलच्या सी फूड रेस्टॉरंटला फारसे ऑप्शन नव्हते तरी तिथेच थोडं खाल्लं. संध्याकाळी बाल्कनीतून सनसेटचा आनंद निव्वळ अवर्णनीय होता. सनसेट पाहून मनात विचारांची गर्दी होते ना! जसा मूड तसा विचार आणि तसा सनसेट. म्हणुनच तो प्रत्येकवेळी वेगळा!

रात्री बाल्कनीत थंडगार हवेत एक एक ड्रिंक धेऊन जवळच्याच एका रेस्टॉरेंट मधे जाऊन टर्कीचा खास पिझ्झा खाल्ला. 

दुस-या दिवशी हॉटेलचा ब्रेकफास्ट मनापासून करणारे आम्ही तिघं म्हणजे मी, किशोर आणि शाल्मली टम्म होई पर्यंत खाऊन आणि तेजसचा झटपट ब्रेकफास्ट आटपून बाहेर पडलो. गाडी आणि गाईड अगदी वेळेवर हजर. 

आज आमची गाईड होती आयेषा. स्मार्ट आणि खूप छान इंग्रजी बोलणारी. ती भारतात टूरिझम सेमिनार्ससाठी आलेली असल्याने तिला मुंबई माहीत होती. आयेषाने आम्हाला आज आम्ही जिथे जाणार होतो त्या सर्व स्थळांची नावे सांगितली तसेच आम्हाला ब-यापैकी चालावं लागणार आहे याची कल्पनाही दिली. 

आम्ही सर्वात प्रथम ‘हाऊस ऑफ द व्हर्जिन मेरी'येथे पोहोचलो. टर्कीमधील 'हाऊस ऑफ द व्हर्जिन मेरी'हे ठिकाण  इफिसस ह्या हेरिटेज साइटच्या जवळ असलेल्या माउंट कोरेसोसवर आहे. काही लोक इथे चालत येतात. आम्ही आमच्या गाडीने इथे पोहोचलो होतो त्यामुळे चढण लक्षात आली नाही. ख्रिश्चन तसेच मुस्लिम अशा दोन्हीही धर्मातील लोकांच तिर्थक्षेत्र म्हणून ही जागा विशेष महत्त्वाची. असं मानलं जातं की, येशू ख्रिस्ताच्या सूळी जाण्यापूर्वी त्यांनी आपली आई मेरीची जबाबदारी संत योहानकडे सोपवली होती. मेरीने तिची शेवटची वर्षे या शांत ठिकाणी व्यतीत केली। हे ठिकाण "मेरीमाना एवी" किंवा "मदर मेरीचे घर" म्हणून ओळखलं जातं. हे एक लहान दगडी घर असून, 19 व्या शतकात एका कादंबरीकाराला आलेल्या दृष्टान्तावरून हे घर शोधले गेले. येथील शांतीपूर्ण वातावरणासाठी हा परिसर ओळखला जातो. 

मेरीच्या घरात मी मान झुकवून डोळे बंद केले. मनात आलं आपल्या मुलाला इतक्या वाईट पद्धतीने मारलं जाईल याची तिला कल्पना असेल का? येशूच्या अत्यंत भयानक आणि क्रूरपणे केलेल्या वधाची बातमी ऐकून तिला काय झालं असेल. त्याच्या वधानंतर ती वेदना घेऊन, तिचं या ठिकाणचं एकाकी जगणं…. माझ्या मनात विचारांची गर्दी आणि  डोळ्यात पाणी होतं. मन अस्वस्थ झालं पण तेवढ्यात एक बस आली आणि शाळेच्या सहलीतल्या छोट्या मुलांनी तो परिसर गजबजून गेला. त्या मुलांची थोडीशी दंगामस्ती, धावपळ पाहून मजा आली. 

—————

टर्की ७. 

इफिसस या प्राचीन शहरात फिरत असताना मला आपल्या भारतातील कर्नाटकातल्या हम्पीची सतत आठवण येत होती. इफिसस हे हम्पी प्रमाणेच एक अत्यंत प्राचीन आणि सर्वार्थाने विलक्षण सुंदर शहर जे आता संपूर्णपणे भग्नावस्थेत आहे. गाईड आयशा इफिससची माहिती देत होती आणि आम्ही तिच्या बरोबर चालत होतो. ६१४ मध्ये, भूकंपामुळे ते अंशतः नष्ट झाले. आज, इफिससचे अवशेष पहायला आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक पर्यटक खूप मोठ्या संख्येने येतात. 

इथे फिरताना आपल्याला विविध रंगांची, गुबगुबीत मांजरं दिसतात. कधीकधी ती तेथील भग्न अवशेषांवर अशी काही उभी रहातात, बसतात, चालतात की ती जणू काही मॉडलिंग करत आहेत. माहिती ऐकवणारी आमची गाईड आयशा आणि इतर बरेच गाईड, टुरिस्ट  त्यांना खास त्यांच्यासाठीचं खाणं  (कॅट फूड), त्यांना देतात आणि फोटो काढतात. आम्हीही तो मोह टाळू शकलो नाही. 

कहर म्हणजे आज तेजसने गारफिल्ड नावाच्या अमेरिकन कार्टून फिल्म मधील मांजराचे चित्र पाठीवर असलेला टीशर्ट घातला होता. इफिससच्या क्युरेट्स स्ट्रिटवर आम्हाला त्या कार्टूनशी साधर्म्य असलेलं मांजर दिसलं. आयेशाने सांगितले की त्याचं नाव गारफिल्डच आहे. तिने त्याला हाक मारताच त्याने वळून पाहिलं. माझ्यातला फोटोग्राफर जागा झाला. टीशर्टच्या पाठीवरील गारफिल्डकडे बोट दाखवत पाठकरून उभा राहिलेला तेजस आणि बाजूला आमच्याकडे मान वळवून बसलेला खराखुरा गारफील्ड माऊ. टर्कीमधील ही अनपेक्षित आणि गोड घटना मी मोबाईलमधे झकास टिपली आणि आम्ही खुश झालो. 

इफिसस त्याच्या प्रचंड ग्रेट थिएटरसाठी ओळखले जाते. येथे २५,००० लोक बसू शकतील अशी आसनव्यवस्था होती. या वास्तूत एकेकाळी ग्लॅडिएटर स्पर्धा, नाटके आणि सार्वजनिक मेळावे आयोजित केले जात असत. यातील माउंट पिऑनच्या बाजूला बांधलेले, ध्वनीशास्त्र इतके मजबूत आहे की इथे अजुनही कधीकधी सादरीकरणे आणि कार्यक्रम आयोजित केले जातात. आम्ही काही अंतरावरुन त्या ओपन एअर थिएटरचे फोटो काढले. त्याच्या कड़े पहीत समोर एखादा कार्यक्रम चालू आहे आणि भान हरपून मी तो पहात अशी कल्पना करत काही मिनिटं उभी राहिले. 

क्युरेट्स स्ट्रीट हा एकेकाळी शहराच्या मुख्य रस्त्यांपैकी एक होता. या रस्त्यावर पुतळे, कारंजे, मंदिरे आणि भव्य घरे होती. हा संगमरवरी रस्ता वरच्या शहराला आणि खालच्या दरवाज्यांना जोडणारा रस्ता म्हणून महत्वाचा होता. क्युरेट्स स्ट्रीट पर्यटकांना, एकेकाळी इफिसस किती भव्य होतं याची खरी जाणीव करून देतो.

जगातील सात आश्चर्यांपैकी एक म्हणून मान्यता मिळालेलं, आर्टेमिसचे मंदिर प्राचीनकाळी बांधलेल्या सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक होते. आज फक्त एकच स्तंभ शिल्लक असला तरी, या जागेचे महत्त्व अजूनही कायम आहे. 

इफिससमधील सेल्ससचे ग्रंथालय टर्कीच्या प्राचीन वास्तुकलांचा नमुना म्हणून आपण बरेचदा चित्रात, सिनेमात कुठेना कुठे पाहिलंय असं मला वाटलं. 

२६२ मधील भूकंप अथवा गॉथिक आक्रमणांमधे लागलेल्या आगीत ग्रंथालयाचा आतील भाग आणि त्यातील ब-याच गोष्टी नष्ट झाल्या. १० व्या किंवा ११ व्या शतकात भूकंपामुळे बराचसा दर्शनी भाग नष्ट झाला. १९७० ते १९७८ दरम्यान पुरातत्वशास्त्रज्ञांनी ते पुन्हा बांधेपर्यन्त ही वास्तू उद्ध्वस्त अवस्थेत होती. 

सेल्सस ग्रंथालय हे इफिससमधील सर्वात प्रेक्षणीय आणि सुंदर रचना आहे. आतापर्यंत बांधलेल्या सर्वात सुंदर प्राचीन ग्रंथालयांपैकी एक म्हणून ही वास्तू ओळखली जाते. त्याच्या उंच दर्शनी भागात अत्यंत जटील असे  कोरीव काम केलेले स्तंभ, पुतळे आणि शिलालेख आहेत जे हजारो वर्षांनन्तरही आश्रयचकीत करतात. ग्रंथालयासमोर उभे राहिल्यावर, ज्ञान, संस्कृती आणि रोमन वैभवाचे एक समृद्ध केंद्र म्हणून इफिससची ओळख अधोरेखित होते. 

—————-

टर्की ८

काल आम्ही माणसांनी घडवलेल्या ऐतिहासिक स्थापत्याने भारावून गेलो होते तर आज आम्ही निसर्गाच्या अद्भुत चमत्काराचा अनुभव घेणार होतो. सकाळी झटपट नाश्ता करून डेनिझीलकडे निघालो. साधारण तीन तासाचा प्रवास करून तेथील पाम्मुकाले या ठिकाणी पोहोचलो. पाम्मुकालेच्या जवळच प्राचीन शहर म्हणून प्रसिद्ध अशा हिरापोलीस मधे पुरातन स्थापत्याचे नमुने दिसत होते. 

आज त्यात न रमता आम्ही थेट पामुक्काले इथे पोचलो. पामुक्काले (Pamukkale) हे टर्कीतील सर्वात प्रसिद्ध आणि अनोखे पर्यटन स्थळ आहे, ज्याला ‘परीचा महाल’ किंवा ‘कॉटन कॅसल', (कापसाचा किल्ला)असेही म्हणतात. युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये याचा समावेश आहे. 

हे एक अद्भुत नैसर्गिक ठिकाण आहे. कॅल डागी पर्वतावर , कॅल्शियम कार्बोनेट म्हणजेच चुनखडीच्या साचण्याने त्यांच्या पांढऱ्या खडक उतारावरील पाय-या पाय-यांची ही जागा. या पाय-या विविध क्षेत्रफळाच्या पसरट आणि उथळ आहेत. यात पाणी जमा होतं आणि मग यातून ते  पाणी उताराकडे वहात असतं. पाढ-या शुभ्र चुनखडीची ही पसरट छोटी छोटी तळी त्यात निरभ्र निळ्या आकाशाचं प्रतिबिंब! पाम्मुकाले येथील हे पाणी म्हणजे नैसर्गिक गरम पाण्याचे झरे आहेत. 


ह्या पांढऱ्याशुभ्र टेकड्या खऱ्या कापसासारख्या दिसतात, म्हणून त्याला 'कॉटन कॅसल' म्हणतात. येथील गरम पाण्यात खनिज संपत्ती भरपूर असल्याने ते आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पांढऱ्याशुभ्र टेरेसचे रक्षण करण्यासाठी, पर्यटकांना या भागात फिरताना बूट किंवा चप्पल काढणे सक्तीचे आहे. यातील ‘क्लिओपात्रा पूल’  ह्या जागी पर्यटक गरम पाण्यात पोहण्याचा आनंद घेऊ शकतात.

इथे गरम पाण्यात उतरण्यापूर्वी किशोरने जंगी तयारी म्हणून स्वीमिंगची पॅन्ट घातली होती. तिथली थंडी आणि चेंजिंग रूम्सची सोयही तितकीशी चांगली नाही हे लक्षात येऊन मी, शाल्मली आणि तेजसने मात्र आपल्याला पोहायचे नाही हे नक्की केलं.

आम्ही त्या पाण्याकडे जात असतांना तरूण मुलींचा एक ग्रूप आम्ही भारतीय आहोत याचा अंदाज येऊन आम्हाला पाहून थांबला. त्या मुलींनी आमीर खान, शाहरुख खान यांचे पिक्चर्स पाहिलेले होते. पाचच मिनिटात आमची चक्क दोस्ती झाली. 

पाम्मुकाले ही जागा कमालीची सुंदर आहे पण तिथे उन्हाळ्यात सीझनला गर्दी होत असणार.

————————

टर्की ९ 

पाम्मुकाले मनात साठवत हॉटेलला पोहचलो. कुसाडासीचा बाजार आता आमच्या परिचयाचा होता. टर्कीत आल्यापासून इथलेच पदार्थ खात होते. बाजारात जायच्याच रस्त्यावर एक चायनीज आणि इंडियन असं  रेस्टोरेंट दिसलं. आत गेलो डेकोरेशन चायनीज होतं. आमच्या शिवाय दुसरं कुणिही नव्हतं. साशंक मनाने इंडियन जेवणाची ऑर्डर दिली. आज इतक्या दिवसांनी हा असा पहिलाच वाईट अनुभव. परदेशात जाऊन देशी खाण्याच्या हट्टाला हसणारे आम्ही,  पण आज आम्ही तीच चूक केली. एकमेकांना “तुलाच इंडियन खायचं होतं!” असं चिडवत हॉटेलवर आलो. उद्या दुपारी  इझमीर ते इस्तंबूल परतीची फ्लाईट होती. दुपारी दीड वाजता इस्तांबुल एअरपोर्टला पोचून हॉटेल एलीसियम टाक्सीमला पोचलो. 

रिसेप्शन काउंटरवरील स्मार्ट तरूण मुलाने विचारलं “कुठलाही जास्तीचा दर न लावता तुमच्या डिलक्स रूम्स अपग्रेड करून तुम्हाला लक्झरी रूम्स दिल्या तर आवडेल का?” आम्ही सावध झालो कारण बरेचदा हॉटेल्सच्या अशा ऑफर्स फसव्या असतात म्हणजे ज्या रूम्स कस्टमर्सना आवडत नसतात त्या गोड बोलून अपग्रेडेड म्हणून तुम्हाला दिल्या जातात. आम्ही रूम्स पाहिल्या त्या सुंदर होत्या. फक्त बेडरूम वरच्या मजल्यावर असल्याने जिना होता. आम्ही हसत हसत ते त्या मुलाच्या निदर्शनाला आणून दिलं पण तरिही आम्ही त्या आनंदाने स्वीकारल्या. तो दिलखुलास हसला. 

आजच रात्री आमची ‘नाइट शो ऑन बासफोरस’, म्हणजेच क्रूझ मधून इस्तांबुलच्या नयनरम्य सहलीचं बुकिंग होतं. युरोप आणि आशिया खंडाला वेगळे करणाऱ्या बासफोरस सामुद्रधुनीमध्ये रात्रीच्या वेळी हा शो आयोजित केला जातो. दिव्यांची सजावट केलेल्या क्रूझ मधून रात्रीच्या वेळी दिव्यांनी उजळून निघालेले बासफोरस पुल, इस्तंबूलच्या किनाऱ्यावरील महाल, मशिदी आणि किल्ले पहाणं हा फार छान अनुभव असतो. समुद्रातून क्रूझ मधून दोन्ही खंडांचे विहंगम दृश्य पाहण्याची ही सुवर्ण संधी! 

आम्ही मोठ्या उत्साहात एकदम खास कपड्यात  तयार होऊन आमच्या पिकअप कारने वेळेत तिथे पोहोचलो. आमचं क्रूझ पॅकेज खास होतं कारण आम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम पहाता येईल अशा सीटस् दिल्या गेल्या. 

क्रूझ पॅकेजमधे रात्रीच्या जेवणाचा समावेश होता. व्हेज आणि नॉनव्हेज असे पारंपारिक तुर्की मेझे ज्यात सॅलड्स, पेस्ट्री, असे अनेक पदार्थ आणि नन्तर मुख्य जेवण. पॅकेजनुसार मर्यादित किंवा अमर्यादित मद्य आणि सॉफ्ट ड्रिंक्स दिले जात होते. क्रूझ सुरू झाली. बाहेरील नयनरम्य गोष्टींचा आनंद घेण्यासाठीही आमच्या सीटस् सोईच्या होत्या कारण डेकही जवळच होता. आम्ही अधूनमधून बाहेर डेकवरीही जाऊन इस्ताबूल दर्शन करत होतो. 

जेवणासोबतच तुर्की संस्कृतीचे दर्शन घडवणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला गेला. व्हर्लिंग डर्विश (Whirling Dervish) - सुफी नर्तकांचे कमालीचं सुंदर नृत्य. जोरदार पारंपारिक तुर्की लोकनृत्य आणि सर्वात शेवटी बेली डान्स!  तो झाला की आंतरराष्ट्रीय संगीत आणि डीजे पार्टी. गमतीची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यात अनेक बॉलिवुड गाणी वाजवली जातात आणि लोक त्यावर धमाल नाचतात. 

हा क्रूझचा प्रवास साधारण ३ ते ३.३० तासांचा असतो. इस्तांबुलचं मनोहारी दर्शन, सोबत टर्कीची सांस्कृतिक झलक, खाणंपीणं आणि धमाल यात हा वेळ कसा निघून गेला हे समजलंही नाही. 

——————

टर्की १०

आमच्या टूरचा आजचा शेवटचा दिवस. आज आम्ही इस्तांबूल शहरातील जुन्या ऐतिहासिक वास्तू आणि ठिकाणे पहाणार होतो. नेहमीं प्रमाणेच हॉटेलवर नाश्ता केला. गाडीत बसून शहराच्या जुन्या भागात जायला निघाले. गाईड होता मुराद.  त्याला या शहराची उत्तम माहिती होती. सर्वात आधी. Byzantine Hippodrome या ठिकाणी पोचलो. हलकासा पाऊस पडून गेला होता. 

बायझँटाईन साम्राज्याची राजधानी असलेल्या कॉन्स्टँटिनोपलचा हा हिप्पोड्रोम पूर्वी रथ शर्यती, सामाजिक उत्सव आणि राजकीय घडामोडींचे मुख्य केंद्र होता.  हिप्पोड्रोम या शब्दाचा अर्थ मैदान. आज हे ठिकाण 'सुलतानाहमेट स्क्वेअर' म्हणून ओळखले जाते. सुल्तानाहमेट स्क्वेअर मधील ऐतिहासिक महत्व असलेल्या गोष्टी दाखवत मुराद मनापासून त्यांची माहिती देत होता.

 Serpent Column,(सर्प स्तंभ), हा स्तंभ एकमेकांत गुंतलेल्या तीन सापांसारखा आहे. आता त्या सापांची डोकी भग्न झाल्याने ती वस्तुसंग्रहालयात ठेवलेली आहेत. त्या डोक्यांवर  एकेकाळी सोन्याचे भांडे (ट्रायपॉड) ठेवलेले होते. स्तंभावर युद्धात सहभागी झालेल्या ग्रीक शहरांची नावे कोरलेली आहेत. इ.स. पूर्व ४७९ मध्ये 'प्लेटियाच्या युद्धात' ग्रीक नगरांनी पर्शियन साम्राज्याचा पराभव केला. या विजयाचे स्मरण म्हणून ३१ ग्रीक शहरांनी पर्शियन सैनिकांची शस्त्रास्त्रे आणि चिलखते वितळवून हा स्तंभ तयार केला होता. हा स्तंभ सुरुवातीला ग्रीस देशातील डेल्फी येथील अपोलोच्या मंदिरासमोर बसवण्यात आला होता. इ.स. ३२४ मध्ये रोमन सम्राट कॉन्स्टँटिन द ग्रेट याने हा स्तंभ कॉन्स्टँटिनोपल येथे आणून हिप्पोड्रोमच्या मध्यभागी स्थापन केला. 

‘मेसनरी ओबिलिस्क किंवा कॉन्स्टांटाईन ओबिलिस्क. Obelisk म्हणजे चारही बाजूंनी वरच्या दिशेने निमुळता होत जाणारा व टोकदार असलेला स्मारकाचा स्तंभ. हा  स्तंभ नेमका कधी निर्माण झाले हे माहीत नाही. १० व्या शतकात सम्राट कॉन्स्टंटाईन सातवा याने त्याचे आजोबा बेसिल पहिला यांच्या आठवणीत याची दुरुस्ती केली. स्तंभावर पूर्वी तांबे आणि पितळाचे सुंदर चमकणारे पत्रे लावलेले होते, ज्यावर विजयाचे प्रसंग कोरले होते. इ.स. १२०४ मध्ये चौथ्या क्रुसेड मोहिमेदरम्यान सैनिकांनी यावरील तांब्याचे पत्रे काढून घेतले व वितळवून टाकले. त्यामुळे आज फक्त दगडाचा गाभा शिल्लक आहे. ज्यावर ग्रीक भाषेत एक जुना शिलालेख आहे. 

टर्की म्हटलं की ज्या वास्तूचं नाव सर्वात आधी घेतलं जातं, जी तिच्या सुंदरतेसाठी सर्वांना माहीत आहे आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमधे तिचा समावेश आहे ती वास्तू म्हणजे ब्लू मॉस्क पहाण्याची आम्हाला उत्सुकता होती. 

इस्तांबुलमधील ब्लू मॉस्कचं  मूळ नाव सुल्तान अहमद मशीद. ही मशीद १६०९ ते १६१६ या काळात उस्मानी म्हणजेच ओटोमन साम्राज्याचा सुल्तान अहमद पहिला याच्या राजवटीत बनली.  या मशिदीच्या आतल्या भिंतीना इज्निक या ठिकाणी हाताने बनवलेल्या निळ्या रंगाने रंगवलेल्या हजारो सुंदर सिरॅमिक टाइल्स आहेत. या टाइल्स त्यांच्या चमकदार रंगसंगतीसाठी आणि फुलांचे  आकार तसेच भौमितिक नक्षीकाम यासाठी जगभर प्रसिद्ध आहेत. याच निळ्या रंगामुळे या वास्तूला 'ब्ल्यू मॉस्क' असे नाव पडले. सामान्यतः मशिदींना चार मीनार असतात, परंतु या मशिदीला सहा मिनार आहेत. या मशिदीमध्ये ५ मोठे मुख्य गुंबद, ६ मीनार आणि ८ छोटे गुंबद आहेत. ब्लू मॉस्क पहाताना वेळ कसा जातो ते लक्षात येत नाही. 

ब्लू मॉस्कच्या समोरच हागिया सोफिया ही एक अत्यंत प्रसिद्ध ऐतिहासिक आणि धार्मिक इमारत आहे. इ.स. ५३७ मध्ये बांधली गेलेली ही वास्तू तिच्या अवाढव्य घुमटासाठी आणि सुंदर वास्तुकलेसाठी जगभर ओळखली जाते. ही वास्तू बाहेरून पहाता आली. ही वास्तू मूळत  ख्रिश्चन प्रार्थनाघर (कॅथेड्रल) म्हणून बांधली गेली होती. ओस्मानी (ऑट्टोमन) साम्राज्याने कॉन्स्टँटिनोपोलवर ताबा मिळवल्यानंतर या वास्तूचे मशिदीत रूपांतर करण्यात आले आणि बाजूला मिनार जोडले गेले. 

टोपकापी पॅलेस हा ओट्टोमन (उस्मानिया) साम्राज्याच्या सुलतानांचे मुख्य निवासस्थान आणि प्रशासकीय केंद्र होते. आता त्यात वस्तुसंग्रहालय आहे. Sultan Tombs म्हणजे ओटोमन साम्राज्यातील सुलतान आणि त्यांच्या कुटुंबीयांचे ऐतिहासिक व सुंदर मकबरे (समाधी स्थळे). हे मकबरे आयासोफिया (Hagia Sophia), सुलेमानिया मस्जिद आणि ब्लू मॉस्क यांसारख्या प्रमुख वास्तूंच्या परिसरात आहेत.

ह्या वास्तू पहाताना एक गोष्ट पटकन लक्षात आली ती म्हणजे टर्कीचा कावळा. सर्प स्तंभ पहातानाच मला त्याचं भारतीय कावळ्यापेक्षा असलेलं वेगळेपण लक्षात आलं होतं. आपला कावळा पूर्ण काळा किंवा मानेजवळ अगदी थोडासा करडा. इथल्या कावळ्याचा पोटाचा भाग पांढरा होता. मला मजा वाटली आणि मी त्यांचे वेगवेगळे फोटोही घेतले. प्रवासातल्या या अशा गोष्टी कधीतरी आठवतात आणि एक वेगळाच आनंद मिळतो. इतकं सगळं पाहून आणि फिरून झाल्यावर आमच्या पोटातही कावळे ओरडत असल्याचं जाणवलं आणि आम्ही एका रेस्टॉरंटला गेलो. 

टूरच्या सुरवातीला ग्रॅन्ड बाजारची झलक पाहिली होती. आज पुन्हा त्याला भेट देण्याचा मोह अनावर झाला. हा बाजार म्हणजे माया बाजार आहे. कितिही फिरलं तरी काहीतरी शिल्लक असतंच. थोडीफार खरेदी केली. मुराद म्हणाला की ग्रॅन्ड बाजारच्या बाहेरही अशीच दुकानं आहेत जिथे किमती कमी असतात. हे ऐकताच आम्ही ग्रॅन्ड बाजारच्या बाहेर आलो. मुरादने सांगितलेल्या दिशेने बरीच दुकाने दिसली पण तिथल्या वस्तू अगदीच सामान्य वाटल्या किमती मात्र कमी होत्या. तिथे काहीही खरेदी न करता आम्ही आमच्या गाडीकडे निघालो. 

हॉटेलवर पोचलो. आजचा टर्कीतला शेवटचा दिवस असल्याने मनात अनेक भावना अनेक विचार होते. तेजस आणि शाल्मली अमेरिकेला जायला उद्या सकाळी लवकर निघणार असल्याने घाईने बॅग्ज भरायला त्यांच्या रूमला पळाले. आमची फ्लाईट संध्याकाळची होती आम्ही साधारण दुपारी अकराला निघणार होतो. 

संध्याकाळी थोडंसं ड्रिंक आणि मग डिनर झालं. गप्पांमधून टर्कीतल्या आवडलेल्या जागा, गोष्टी यांची उजळणी झाली. या टूरसाठी आम्ही खूप समाधानी होतो. आता पुढची ट्रीप कुठे या बद्दलची चर्चाही झाली. गप्पा रंगल्या होत्या पण उद्या निघायचं असल्याने लवकर झोपलो. 

पहाटे तेजस शाल्मलीला हॉटेलच्या लॉबीत बाय करताना डोळे भरून आले. ती दोघं गेली दुपारी आम्हीही हॉटेल सोडलं. आमची टूर संपली होती. मुंबईच्या घराकडे परत फिरायची ओढ़ होती आनंद होता. इस्तांबुल एअरपोर्ट वरून विमानाने हवेत झेंप घेतली. कुठलाही नवा देश, नवं ठिकाण फिरून झाल्यावर माझ्या मनात येणारा नेहमिंचाच विचार मनात आला या मातीशी काहीतरी नातं असेल म्हणुनच इथे येणं झालं! विमानातून खाली दिसणारं इस्तांबुल हळूहळू दिसेनासं झालं. आज टर्की बद्दल लिहितांना मी मनाने पुन्हा एकदा टर्कीचा प्रवास केला आणि आनंदीत झाले. 

चारुलता काळे 

*************

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रवास नॉर्वे आणि आइसलैंड

पार्ले कट्टा- श्री. अच्च्युत गोडबोले